वेको : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील टेक्सस राज्याच्या मॅक्लेनन परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,०७,१९१ (२०००). हे डॅलसच्या दक्षिणेस १५६ किमी. अंतरावर ब्रॅझस नदीकाठी वसले आहे. पूर्वी या ठिकाणी हुएको (वेको) इंडियनांची वस्ती होती. त्यावरुन याला वेको हे नाव पडले. १८३० मध्ये चेरकी इंडियनांनी हे गाव जाळले. त्यानंतर १८४९ मध्ये त्याच जागी वेको या नव्या नगरीची स्थापना करण्यात आली. १९१३ मध्ये वेकोला शहराचा दर्जा देण्यात आला.

    आसमंतातील काळी व सुपीक जमीन कापसाच्या पिकास विशेष अनुकूल असल्याने यूरोपीय वसाहतकरी येथे आकर्षित झाले. वेकोची सुरुवातीच्या काळातील आर्थिक भरभराट पृष्ठप्रदेशातील कापूस उत्पादनामुळेच झाली. त्याचप्रमाणे ब्रॅझस नदीवरील, देशातील तत्कालीन (१८७१) सर्वांत मोठ्या (लांबी १४५ मी.) झुलत्या पुलाच्या बांधकामानंतर वेको व त्याच्या परिसराचा अधिक विकास झाला. १८८१ पासून येथे रेल्वे वाहतूक सुरु झाली. दुसऱ्या महायुध्दकाळात येथे दोन मोठे वायुसेना तळ उभारण्यात आले होते. राज्य व संघीय महामार्गांचे तसेच देशातील चार महत्त्वाच्या लोहमार्गांचे हे प्रमुख केंद्र समजले जाते. येथे एक विमानतळ असून तेथून राज्यांतर्गत तसेच आंतरखंडीय हवाई वाहतूक चालते.

शहरात काच, सिमेंट, टायर, कागद, कापड, यंत्रसामग्री, संगणक, लाकडी सामान, खेळाचे साहित्य, औषधे इ. निर्मितीचे प्रमुख उद्योगधंदे आहेत, परिसरात कापूस, अन्नधान्य, तेलबिया, दूधदुभते ही उत्पादने मोठया प्रमाणावर घेतली जातात. येथील कापसाची बाजारपेठ मोठी आहे.

अमेरिकन विधिवेत्ता व धर्मोपदेशक रॉबर्ट एमेट ब्लेड्सो बेलर याने १८४५ मध्ये स्थापन केलेले येथील बॅप्टिस्ट महाविद्यालय हे जगातील सर्वांत मोठे बॅप्टिस्ट विद्यापीठ मानले जाते. आज बेलर विद्यापीठ या नावाने ते ओळखले जाते. याशिवाय शहरात इतर अनेक उच्च शिक्षणसंस्था, विद्यानिकेतने, सार्वजनिक ग्रंथालये आहेत. त्यांत पॉल क्विन महाविद्यालय (१८७२- राज्यातील पहिले निग्रो महाविद्यालय), मॅक्लेन कम्युनिटी कॉलेज (१९६६) इ. संस्था उल्लेखनीय आहेत.   

शहरातील भव्य वृक्षाच्छादित रस्ते, उद्याने आणि आसमंतातील सरोवरे यांमुळे वेकोच्या सौंदर्यात व समृध्दीत भर पडली आहे. ब्रॅझस नदीकाठावरील कॅमरन पार्क, शहरातील लायन्स पार्क व इतर सु. १७ उद्याने-उपवने, बॉस्की नदीवर बंधारा घालून तयार झालेले वेको सरोवर (१९२३) ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. फोर्ट हाउस व मॅन हाऊस या इतिहासप्रसिध्द वास्तू, प्राणिसंग्रहालय, किल्ला, नाटयगृह, सिंफनी वाद्यवृंद इ. उल्लेखनीय आहेत. ११ मे १९५३ रोजी आलेल्या भयंकर झंझावातामुळे शहराचे प्रचंड नुकसान होऊन त्यात ११४ माणसे मृत्युमुखी पडली होती.

चौधरी, वसंत