नार्ल वेंकटेश्वरराववेंकटेश्वरराव, नार्ल : (१ डिसेंबर १९०८–?–१९८५). प्रख्यात तेलुगू पत्रकार व साहित्यिक. जन्म जबलपूर (मध्य प्रदेश) येथे. आंध्र विद्यापीठातून बी. ए. (१९३४). इंग्रजी व तेलुगू या दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. चेन्नईहून प्रसिद्ध होणाऱ्या आंध्रप्रभा  या दैनिकाचे  ते सु. सतरा वर्षे (१९४२-५९) संपादक होते. त्यानंतर सु. अठरा वर्षे ते विजयवाड्याहून प्रसिद्ध होणाऱ्या आंध्रज्योति  या दैनिकाचे संपादक होते (१९६०-७७) त्यांची निःस्पृहता, बाणेदारपणा, निर्भीड वृत्ती आणि परखड विचारसरणी त्यांच्या लेखनांतून प्रतिबिंबित झाली आहे. सामाजिक तसेच व्यक्तिगत दोष-उणिवांवर ते घणाघाती प्रहार करीत. त्यांचे संपादकीय लेख वांड्‌मयीन गुणांनी संपन्न आहेत. टीका, उपहास यांच्याबरोबरच त्यांच्या लेखनांतून वैचारिक गांभीर्यही प्रतीत होते. स्वातंत्र्यपूर्वकाळात १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. ‘दक्षिण भारतीय लेखक परिषद’ या संस्थेचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. त्यांनी अनेक निबंध व नाटके लिहिली. स्वदेशसंस्थानालु (१९२३) या ग्रंथात त्यांनी तत्कालीन देशी संस्थानांची स्थिती वर्णिली आहे. माटामंती (१९५२) आणि पिच्चपाटि (१९५२) हे त्यांचे दोन लघुनिबंधसंग्रह लोकप्रिय आहेत. कोत्तगड्डा (१९४०) या संग्रहात नाटिका व एकांकिका यांचा समावेश आहे. जबली व सीता जोश्यम् ही त्यांची उत्तरकालीन नाटके बुद्धिवादी भूमिकेची निदर्शक आहेत. त्यांना प्रदीर्घ विवेचक प्रस्तावना आहेत. सीता जोश्यम्‌ला १९८१ चा साहित्य अकादेमी पुरस्कारही लाभला पण त्यांनी तो स्वीकारला नाही. काव्यक्षेत्रातील त्यांच्या प्रतिभेची चमक जगन्नाटकम् (१९५७) ह्या त्यांच्या भावकाव्य व गीतांच्या संग्रहातून दिसते. नार्लवारि मतमु (१९५८) या पुस्तकात त्यांच्या सूक्तिवजा पद्यांचा संग्रह केला आहे. त्यांनी काही इंग्रजी ग्रंथही लिहिले त्यातील गॉड्स, गॉब्लिन्स अँड मेन हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.⇨वेमना,कंदुकूरि वीरेशलिंगम्‌ पंतुलू  व ⇨गुर्जाड वेंकट अप्पाराव या तीन श्रेष्ठ तेलुगू साहित्यिकांवर त्यांनी इंग्रजीतून उत्तम व्याप्तिलेख लिहिले असून ते साहित्य अकादेमीतर्फे प्रकाशित झाले आहेत. नवयुगाल बाट (१९७४) या काव्यातून त्यांनी युगांतराचा सूर छेडला आहे. राष्ट्रपति राधाकृष्णन्‌ (१९६२) हा त्यांचा चरित्रग्रंथ प्रसिद्ध आहे. ते १९५८ ते १९७० या कालावधीत राज्यसभेचे सदस्य होते. आंध्र व श्रीवेंकटेश्वर या विद्यापीठांनी त्यांना ‘डी.लिट्’ पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. हैदराबाद येथे त्यांचे निधन झाले.                                                                       

 लाळे, प्र. ग.