वेंकटाचलम्, गुडिपाटि : (१८ मे १८९४–१९७८). आधुनिक तेलुगू साहित्यिक. ‘चलम्’ या लघुनामाने प्रसिद्ध. जन्म काकिनाडा (आंध्र प्रदेश) येथे. १९१६ साली ते बी. ए. झाले. काकिनाडा येथील पीठापुरम् राजा महाविद्यालयात तेलुगू पाठनिदेशक होते. पुढे १९२२ साली होस्पेट येथे शिक्षकाची नोकरी. शाळा-तपासनीस म्हणूनही त्यांनी दीर्घ काळ नोकरी केली. याच काळात त्यांनी ब्राह्मो समाजाच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. मॉरिस माटरलिंक, हॅवलॉक एलिस, गी द मोपासां, डेव्हिड हर्बर्ट लॉरेन्स इ. पाश्चात्य, तसेच देवुलपल्ली वेंकटकृष्णशास्त्री, चिंता दीक्षितुलू, महर्षी रमण इ. पुरोगामी विचारसरणीच्या लेखक-तत्त्वज्ञांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्यांतून त्यांची जीवनदृष्टी, तात्त्विक विचारसरणी, प्रयोगशील वृत्ती व वांग्मयीन शैली यांची जडणघडण झाली. हळूहळू ते निरीश्वरवादाकडे झुकत गेले. त्यांच्या विचारांत व लेखनांत आधुनिकवादी विचारांचा प्रभाव दिसून येतो. स्त्रीला निरंकुश स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, विवाह हीदेखील एक बेडी आहे आणि स्त्रीपुरुषांनी कोठलीही कृत्रिम बंधने वा जाचक आचारनियमन पाळू नयेत, असा बंडखोरीचा सूर त्यांच्या सर्व लेखनांतून दिसून येतो. आध्यात्मिकता, मानवतावाद व आत्मस्वातंत्र्य यांचा संयोग त्यांच्या लिखाणात दिसतो. मुक्त कामजीवनाचा त्यांनी इतका आवर्जून प्रचार केला, की कित्येक वर्षे त्यांच्याविषयी गैरसमजाचे वादळ उठले होते. काव्य, कथा, कादंबरी, नाटक, निबंध अशा सर्वच साहित्य प्रकारांत त्यांनी विविध व विपुल लिखाण केले. तसेच दर्जेदार अनुवादही केले. त्यांच्या साहित्यात शशिरेखा (१९२१), देवमिच्चिन भार्या (१९२३-एच्, जी. वेल्सच्या पॅशनेट फ्रेंड्सचे रुपांतर), मैदानम् (१९२७), अरुणा (१९२९), स्त्री (१९३०), अमीना (१९४२-चार भाग) या कादंबऱ्या चौ चौ (१९२७), जयदेव (१९३५), त्यागमु (१९३५), चलंगारि कलम् (१९३६), हंपी कन्यालु हे कथासंग्रह पद्माराणी, चित्रांगी, शशांक, भानुमती, पुरुरवा (१९४७) ही नाटके सुधा हा काव्यसंग्रह (१९६१) प्रेमलेखलु (१९२४-४०), चलम् उत्तरालु (१९२७), निर्विकल्पम् (१९६३) हे संकीर्ण तात्त्विक चर्चात्मक लेखसंग्रह इत्यादींचा अंतर्भाव होतो. वीरेशलिंगम् यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी प्रयत्न केले तर चलम् यांनी स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य देऊ केले. त्यांनी अनेक ठिकाणी लैंगिक विषयांचीही मोकळेपणाने चर्चा केली आहे. मात्र १९३६ पासून त्यांची वृत्ती आध्यात्मिकतेकडे झुकू लागली. उदा., म्यूझिंग्ज (१९४४) हा त्यांचा स्फुटलेखसंग्रह. चलम् यांनी पारंपरिक शिक्षण पद्धतीतील दोष व मर्यादा दाखवून, मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासास पोषक अशा नव्या शिक्षणपद्धतीचा पुरस्कार केला. बिड्डाल शिक्षण व म्यूझिंग्ज (३ खंड) यांत हे विचार आले आहेत. १९३९ साली ते अरुणाचलम् येथील रमण महर्षी यांच्या दर्शनास गेले व १९५० नंतर तेथेच त्यांनी वास्तव्य केले. त्यांच्या विचारांतील या मूलभूत परिवर्तनाचे प्रतिबिंब त्यांच्या पुढील लेखनात दिसून येते. मुक्त आचारवादी, अतींद्रियवादी, दार्शनिक असे स्वतःच्या परिवर्तनशील व्यक्तिमत्त्वाचे विविधांगी दर्शन घडविणारे साहित्यिक म्हणून चलम् यांचे तेलुगू साहित्यात अढळ स्थान आहे. आंध्र साहित्य अकादमीकडून सन्मान (१९७४), आंध्र विद्यापीठातर्फे ‘कलाप्रपूर्ण’ (१९७५) इ. मानसन्मान त्यांना लाभले.
लाळे, प्र. ग.