वुल्फ, टॉमस क्लेटन : (३ ऑक्टोबर १९००–१५ सप्टेंबर १९३८). अमेरिकन कादंबरीकार. ॲशव्हिल (नॉर्थ कॅरोलायना) येथे जन्म. नॉर्थ कॅरोलायना विद्यापीठातून पदवी व हार्व्हर्ड विद्यापीठातून एम्.ए. (१९२२). वुल्फ हा कादंबरीकार असला, तरी नाटककार होणे ही त्याची महत्त्वाकांक्षा होती. काही प्राध्यापकांनी त्याला न्यूयॉर्कला जाऊन तेथे रंगभूमीच्या क्षेत्रात काम करण्याचा सल्ला दिला (१९२३). त्यानुसार तो तेथे गेलाही तथापि तेथे त्याला यश आले नाही. वैफल्यग्रस्त अवस्थेत न्यूयॉर्क विद्यापीठात तो इंग्रजीचे अध्यापन करू लागला. १९२६ साली तो कादंबरीलेखनाकडे वळला. जीवनाची अनोखी आणि कडवट जादू काय असते, हे आपल्या कादंबरीतून दाखविण्याचा त्याचा प्रयत्न होता. १९२९ साली लुक होमवर्ड, एंजल : ए स्टोरी ऑफ द बेरिड लाइफ ही त्याची कादंबरी प्रसिध्द झाली. वुल्फची ही कादंबरी आत्मचरित्रात्मक असून तीत त्याने स्वतःचे आणि आईवडिलांचे पूर्वजीवन चित्रित केले आहे. ह्या कादंबरीचा नायक युनीज ग्रँट म्हणजे वुल्फच होय. वुल्फचे आईवडिल परस्परांपासून विभक्त झाले होते. त्यामुळे आपले एकाकी बालपण त्याला कधी आईकडे, तर अधी वडिलांकडे घालवावे लागले. त्याला अत्यंत प्रिय असलेल्या त्याच्या मोठ्या भावाच्या निधनाचा दुःखद ठसा त्याच्या मनावर खोलवर उमटलेला होता. लुक होमवर्ड…मध्ये त्याच्यात आणि त्याच्या ह्या भावाच्या पिशाचात झालेले संभाषण त्याने दखविले आहे त्याचप्रमाणे कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाशी त्याच्या वडिलांनी कशी लढत दिली, ह्याचेही प्रभावी चित्रण त्याने केले आहे. आत्मचरित्रात्मकता हे वुल्फच्या लेखनाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य होते. ह्या आत्मचरित्रात्मकतेचे रंग कमीत कमी असलेली नायकाची व्यक्तीरेखा एका महाकादंबरीत त्याला उभी करायची होती. अमेरिकेतील यादवी युध्दाच्या काळापासून त्याच्या स्वतःच्या काळापर्यंतच्या कालपटाचे चित्रण ह्या कादंबरीच्या रूपाने त्याला करावयाचे होते. पाच वर्षे ह्या कादंबरीची कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची धडपड केल्यानंतर त्याला त्या प्रयत्नांतील व्यर्थत्व जाणवले. ह्या काळात आर्थिक चणचण आणि एकाकीपण त्याला तीव्रतेने जाणवत होते. न्यूयॉर्क विद्यापीठातली नोकरी १९३० सालीच त्याने सोडून दिली होती. अशा परिस्थितीत त्याने पुन्हा आत्मचरित्रात्मकतेकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि ऑव्ह् टाइम अँड द रिव्हर ही कादंबरी १९३५ मध्ये प्रसिध्द झाली. युनीज ग्रँटची कथाच ह्या कादंबरीत पुढे चालू राहिली आहे. तथापि काही ठिकाणी व्यक्तिरेखांच्या मानसशास्त्रीय हाताळणीत राहिलेली संदिग्धता आणि अतिनाट्यात्मकता असे ह्या कादंबरीतले काही दोष अभ्यासकांनी दाखवून दिले आहेत.
कादंबऱ्यांखेरीज फ्रॉम डेथ टू मॉर्निंग (१९३५) हा कथासंग्रह व द स्टोरी ऑव्ह् अ नॉव्हेल (१९३६) हा स्वतःच्या कादंबऱ्यांचा परामर्श घेणारा ग्रंथही वुल्फने लिहिला.
संदर्भ : 1. Donald, David Herbert, Look Homeward : A Life of Thomas Wolfe, 1987.
2. Hoagland Clayton Hoagland, Kathleen, Thomas Wolfe Our Friend, 1979.
3. Phillipson, John S. Critical Essays on Thomas Wolfe, 1985.
4. Turnbull, Andrew Winchester, Thomas Wolfe, New York, 1968.
कुलकर्णी, अ. र.