वुलस्टन, विल्यम हाइड : (६ ऑगस्ट १७६६–२२ डिसेंबर १८२८). ब्रिटिश शास्त्रज्ञ. रसायनशास्त्र, प्रकाशकी, शरीरक्रियाविज्ञान इ. विषयांत त्यांनी विशेष मोलाचे संशोधनकार्य केले. प्लॅटिनम, टंगस्टन, मॉलिब्डेनम आणि इतर संक्रमण धातूंच्या [→ संक्रमणी मूलद्रव्ये ] आधुनिक औद्योगिक प्रक्रियांकरिता वुलस्टन यांचे चूर्ण-धातुविज्ञान तंत्र [→ प्लॅटिनम ] आदर्श नमुना म्हणून अद्यापही वापरले जाते. त्यांनी प्लॅटिनमच्या धातुकातील (कच्च्या रूपातील धातुमधील) पॅलॅडियम (१८०३) व ऱ्होडियम (१८०४) या संबंधित मूलद्रव्यांचा शोध लावला आणि पालास (पॅलस) या लघुग्रहावरून पॅलॅडियम हे नावही सुचविले.
वुलस्टन यांचा जन्म ईस्ट डीयरम (नॉरफॉक, इंग्लंड) येथे झाला. त्यांनी १७८२ साली केंब्रिज येथील केझ महाविद्यालयात वैद्यकीय विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला आणि १७८७ साली पदवी मिळविली. १८०० सालापर्यंत त्यांनी लंडन येथे वैद्यकीय व्यवसाय केला. नंतर ते रसायनशास्त्र, भौतिकी, ज्योतिषशास्त्र आणि वनस्पतिविज्ञान या विषयांच्या अध्ययनाकडे वळले. पदार्थाची थोडीच राशी घेऊन संशोधनकार्य करण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी होते. त्यामुळे त्यांना ऱ्होडियम व पॅलॅडियम हे नवीन धातू अलग करणे व त्यांचे गुणधर्म ओळखणे शक्य झाले. रासायनिक संशोधन व उत्पादन यांच्या दृष्टीने वर्धनशील (भंग न होता ठोकून आकार देता येईल अशी) प्लॅटिनम धातू मोलाची होती. मात्र या रूपातील प्लॅटिनम मिळविण्याची कार्यक्षम पध्दत तेव्हा माहीत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लॅटिना (कच्चे प्लॅटिनम) निरूपयोगी म्हणून पडून होते. अशा वेळी वुलस्टन यांनी प्लॅटिनमावरील आपले संशोधनकार्य पूर्ण केले (१८०४). यामुळे वर्धनशील प्लॅटिनम मिळविणे शक्य झाले. त्यांनी प्लॅटिनमाची उपकरणे तयार केली व विकली. प्लॅटिनमाच्या अतिशय बारीक तारा तयार करणारी प्रक्रिया त्यांनी शोधून काढली व ती अद्याप वापरातही आहे. आपल्या मृत्यूच्या थोडे दिवस अगोदर त्यांनी या प्रक्रियेचा तपशील उघड केला. अशा रीतीने त्यांनी ही पध्दत गुप्त ठेवल्यामुळे त्यांना भरपूर आर्थिक प्राप्ती होऊन ते आर्थिक दृष्ट्या कायमचे स्वावलंबी झाले. त्यांनी वैद्यकीय संशोधनाकरिता विशेष अनुदान दिले, तसेच त्यांनी लंडनच्या रॉयल सोसायटीला दोन हजार पौंड व भूवैज्ञानिक संस्थेला एक हजार पौंड देणगी दिली. भूवैज्ञानिक संस्थेतर्फे १८३२ सालापासून दरवर्षी ‘वुलस्टन पदक’देण्यात येते.
वुलस्टन यांनी १८०८ साली कार्बोनेट, सल्फेट आणि ऑक्झॅलेट यांवरील प्रयोगांची वर्णने केली आणि या संयुगांची संघटने गुणित प्रमाणांनी सिध्द होतात, हे दाखविले. अणूंच्या सापेक्ष संरचनेच्या त्रिमितीय प्रतिकृतीची उपयुक्ताता त्यांनी प्रथम प्रतिपादन केली. ही कल्पना एकोणिसाव्या शतकामध्ये फार उशिरा कार्बन अणूच्या त्रिमितीय रसायनशास्त्राच्या विकासानंतर निश्चित झाली. घर्षणजन्य व रासायनिक विक्रियाजन्य विद्युत् सारख्याच प्रकारची आहे, असे प्रायोगिक रीत्या त्यांनी दाखविले (१८०१).
वुलस्टन यांनी स्फटिकांच्या निरनिराळ्या पृष्ठांवरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशकिरणांतील कोन मोजणारे परावर्तन कोनमापक (१८०९ गोनिऑमीटर) आणि अतिशय लहान वस्तूंची रेखाचित्रे काढण्यासाठी उपयुक्त असलेले कॅमेरा ल्यूसिडा (१८०७) ही उपकरणे तयार केली [→ कॅमेरा ऑब्स्क्यूरा व कॅमेरा ल्यूसिडा]. एकेरी व दुहेरी परावर्तनासंबंधी संशोधन करून त्यांनी सूक्ष्मदर्शकात व नेत्रवैद्यकात उपयुक्त असलेली जोडभिंगे तयार केली. सौर वर्णपटातील काळ्या रेषांचे (फ्राउनहोफर रेषांचे) त्यांनीच प्रथम निरीक्षण केले (१८०८).
वुलस्टन यांनी १७९७ साली मूत्राश्मरीच्या (मुतखड्याच्या) प्रमुख घटकांचे गुणधर्म विशद केले आणि १८१२ साली एक नवीन व दुर्मिळ खडा ओळखला. तो खडा मूत्राशयात आढळतो म्हणून त्यांनी त्याला सिस्टिक ऑक्साइड असे नाव दिले. नंतर त्याचे नाव ॲमिनो अम्लांपैकी एक अम्ल ‘सिस्टीन’ असे ठेवण्यात आले.
वुलस्टन यांच्या कार्याच्या गौरवार्थ मृत्तिका उद्योगातील एका उपयुक्त खनिजाला ‘वुलस्टनाइट’ असे नाव देण्यात आले. त्यांनी रसायनशास्त्र, खनिजविज्ञान, स्फटिकविज्ञान, भौतिकी, ज्योतिषशास्त्र, वनस्पतिविज्ञान, शरीरक्रियाविज्ञान व विकृतिविज्ञान इतक्या विविध विषयांतील ५६ संशोधनपर लेख लिहिले. त्यांना अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळाले.
वुलस्टन लंडन येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..