विस्टारिया : (विस्टेरिया, इं. दि ग्रेप फ्लॉवर व्हाइन, कुल लेग्युमिनोजी, उपकुल- पॉपिलिऑनेसी), शोभिवंत व आकर्षक फुलांमुळे ज्यांना फुलवेलींची राणी असे म्हटले जाते अशा एका मोठ्या वेलीच्या (⟶महालता) प्रजातीचे (वंशाचे) नाव कास्पार विस्टार (१७६१-१८१८) या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील शरीररचनाशास्त्राच्या प्राध्यापकांच्या स्मरणार्थ या प्रजातीला हे नाव नटॉल यांनी  दिले. हिचे वेल बळकट असून ते बरीच वर्षे जगतात आणि त्याचे खोड काष्टयुक्त असते व त्याचा घेरही मोठा असतो. विस्टारिया प्रजातीतील दोन जाती उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागातील व चार जाती पूर्व अशियातील असून इतर देशांत (विशेषत: समशीतोष्ण) त्या लागवडीत आहेत. काही जाती भारतात व श्रीलंकेत बागांमध्ये लावलेल्या आढळतात. काही जाती भारतात ३० मी. पर्यंत लांब व २० सेमी. जाड वाढत असून पाने लांबट, एकाआड एक संयुक्त विषमदली (दलांच्या संख्या सारखी नसलेली) व पिसासारखी आसतात.दले ७-१३, रेशमी केसाळ असतात. फुले निळी, निळसर निळी-लाल (निलातिरिक्त), जांभळी  किंवा पांढरी असून ती दाट व लोंबत्या मंजऱ्यांवर वसंत ऋतूच्या शेवटी  किंवा उन्हाळ्याच्या सुरवातीला पाने येण्यापूर्वी येतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी कुलात अथवा शिंबावंत कुलात  व पॉपिलिऑनेसी  किंवा पलाश उपकुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. शिंबा (शेंगा) लांब व दंडगोलाकृती असून काही भाग अंकुचित असतो.

विस्टारिया सायनेन्सिस

चिनी विस्टारिया (विस्टारिया सायनेन्सिस किंवा वि.चायनन्सिस) व जपानी विस्टारिया (वि.फ्लोरिबंडा वा. वि. मल्टिज्युगा) या दोन महत्त्वाच्या जातींना सुगंधी फिक्कट जांभळी किंवा निळी जांभळी फुले येतात.वि. व्हेनुस्टा ही जाती मूळची चीनमधील व पांढऱ्या फुलांची  व मखमली पानांची असून वि. फ्रुटिसेन्स ही उत्तर अमेरिकेतील जाती भारतात थंड हवेच्या ठिकाणी लावतात. तिची फुले सुगंधी व फिकट गुलाबी किरमिजी असतात. वि. मॅक्रोस्टॅकिया (केंटुकी विस्टारिया) मूळची अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या मध्य आणि दक्षिण भागातील आहे.

घरांवर बंगल्यांवर, भिंतीवर व ढेलजा (पोर्च) खांब अथवा मोठ्या वृक्षांवर चढविण्याच्या दृष्टीने ह्या वेली चांगल्या आहेत. डेहराडून व चंदीगढ येथे काही जाती चांगल्या येतात, पण कलकत्त्यात त्यांना फार कमी फुले येतात. दाब कलमांनी नवी लागवड चांगली होते आणि प्रसारही बराच करतात. भरपूर सूर्यप्रकाश व उत्तम निचऱ्याची भारी वाळूमिश्रित जमीन त्यांना अधिक मानवते. वाढत्या वेलींची जमिनीजवळ छाटणी केल्यास ती झुडपाप्रमाणे वाढते व फुलेही भरपूर येतात.

कोणी फुले खातात व पानांचा चहा (काढा) करतात. बी मूत्रल (लघवीस साफ करणारे) असते, फुलांत सुगंधी व बाष्पनशील (बाष्परूपाने हवेत उडून जाणारे) तेल असते, परंतु व्यापारी द्दष्ट्या त्याची निर्मिती करीत नाहीत. सालीत व्हिस्टारीन हे ग्लुकोसाइड व एक रेझीन असते. ती दोन्ही विषारी असतात. ती पोटात गेल्यास ओकाऱ्या होतात व अतिसार होतो.

वि. फ्लोरिबंडा ही जाती मिझोराम राज्यातील लुशाई टेकड्यांत आढळते. तिच्या धागेदार सालीपासून दोर आणि तत्सम वस्तू बनवितात.

संदर्भ : 1. Bailey, L. H. The Standard Cyclopedia of Horticulture, Vol. III. New York, 1961.

         2. C. S. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. X, New Delhi, 1976.

         3. Pal, B.P. Beautiful Climbers of India, New Delhi, 1960.

जमदाडे, ज. वि.