विसुद्धिमग्ग : बौद्ध धर्मातील स्थविरवाद वा थेरवाद ह्या संप्रदायाचा एक मौलिक, आधारभूत ग्रंथ. या ग्रंथनामाचे संस्कृत रूप विशुद्धिमार्ग ह्याचा कर्ता ⇨ बुद्धघोष (इ.स. च्या पाचव्या शतकाचा पूर्वार्ध). दीघनिकाय, मज्झिमनिकाय, संयुक्तनिकाय आणि अगुंत्तरनिकाय ह्या चारही आगमांच्या अट्ठकथांतून जे निरनिराळे विषय येतात, त्यांचे परिशीलन विसुद्धिमग्गात केले असून विस्ताराकरिता विसुद्धिमग्ग हा ग्रंथ पाहण्याचा हवाला त्या त्या संबधित अट्ठकथातून देण्यात अलेला दिसतो. हा ग्रंथ सिंहलद्वीपात (श्रीलंकेत) असलेल्या ⇨ अनुराधपुर येथील थेरवाद संप्रदायाच्या महाविहार शाखेत प्रचलित असलेल्या पंरपरेला धरून आहे. अभयगिरी विहारातील शाखा पाखंडी समजून तेथे प्रचलित असलेल्या मतप्रणालीचे खंडन प्रत्यक्ष नाव न घेता, आपल्या या ग्रंथात बुद्धघोषाने प्रसंगोपात्त केले आहे. सिंहली भाषेतील अट्ठकथांचे मागधीत रूपांतर करण्याची आपली पात्रता असल्याचे सिद्ध करून देण्याच्या उद्देशाने बुद्धघोषाने सिंहलद्वीपास गेल्यानंतर प्रथमच हा ग्रंथ लिहिला. त्याचे हे काम बघून तेथील मठाधिपती खूष झाला आणि अट्ठकथांचे रूपांतर करण्याची परवानगी त्याने बुद्वघोषाला दिली.
शील, समाधी, प्रज्ञा ह्या क्रमाक्रमाने मिळविता येणाऱ्या पायऱ्या असून त्यांच्या मदतीने सात ‘विसुद्धी’ (विशुद्धी) प्राप्त करून घेता येतात, असे म्हटले आहे. ह्या सात विशुद्धींची प्राप्ती करून घेतली म्हणजे अर्हत्व हे स्थविर संप्रदायाचे ध्येय प्राप्त करून ह्या भवसंसाराचा नाश करता येतो. त्यानंतर पुनर्जन्म मिळत नाही. ब्रह्मचर्यांचे पालन केले आहे, जे काही करावयाचे ते केलेले आहे, ह्या जन्मात पुन्हा येण्याचे कारण उरलेले नाही असा साक्षात्कार होतो, असेही प्रतिपादन ह्या ग्रंथात केलेले आहे.
समाधी ही मधली पायरी. ती आवश्यकच आहे असे नाही, पण सत्य परिस्थितीचे चिंतन करण्याकरता मनाचे जे स्थैर्य लागते, ते प्राप्त करून घेण्यास समाधीची मदत होते.समाधीच्या मदतीशिवाय जर एखाद्याने प्रज्ञा प्राप्त करून घेऊन अर्हत्व मिळविले, तर त्याला ‘सुकूख विपस्सक’ (संस्कृत रूप–शुष्क विपश्यक) असे म्हणतात.
शीलरक्षण व शीलसंवर्धन हा बुद्धाच्या शिकवणीचा मूळ पाया आहे व त्यावरच पुढील पायऱ्या अवलंबून आहेत. विसुद्धिमग्गाच्या पहिल्याच परिछेदात भिक्षूचे शील कसे असावे हे सविस्तर सांगितले आहे. दुसऱ्या परिच्छेदात म्हटले आहे की शक्य असल्यास भिक्षूने ‘अधिकस्य अधिक फल’ ह्या भावनेने तेरा धुतंग्यांचे पालन करावे.
अशा रीतीने शीलाच्या बाबतीत सुप्रतिष्ठित झाल्यानंतर साधकाने परिच्छेद तीन ते दहामध्ये सांगितलेल्या ४० कर्मस्थानांपैकी त्याला अनुरूप अशा कर्मस्थानावर लक्ष केंद्रित करावे आणि समाधी प्राप्त करून घ्यावी . ह्या समाधीच्या योगे मनावार पूर्ण ताबा येऊन मन स्थिरावले, म्हणजे बौद्ध तत्त्वज्ञानाचे यथार्थ आकलन होते. मनुष्यप्राणी हा नामरूप किंवा रूप,वेदना,संज्ञा,संस्कार व विज्ञान हे पाच स्कंध, किंवा द्वादश आयतन (पाच इंद्रिये, सहावे मन आणि पाच इंद्रियांचे व मनाचे विषय म्हणजे रूप,शब्द,गंध,रस व स्प्रष्टव्य आणि मनाचे विषय बनलेले धर्म), किंवा अठरा धातू(म्हणजे द्वादश आयतनांत अंतर्भूत झालेल्या बाबी आणि चक्षुविज्ञान, श्रोत्रविज्ञान, घ्राणविज्ञान, जिव्हाविज्ञान,काय – विज्ञान आणि मनोविज्ञान) ह्यांचा बनलेला असून तो इतर संस्कृत धर्माप्रमाणे अनित्य, दु:खकारक आहे, त्यात आपले म्हणण्याजोगे असे काही नाही, चार आर्यसत्ये व प्रतीत्यसमुत्पाद ह्यांचे ज्ञान झाल्यावर तो सात प्रकारच्या विशुद्धींनी (शीलविशुद्धी, चित्तविशुद्धी, दृष्टिविशुद्धी, कांक्षा – वितरण – विशुद्धी, मार्गामार्गज्ञानदर्शन – विशुद्धी,प्रतिपद् – ज्ञान दर्शन – विशुद्धी आणि शेवटी निव्वळ ज्ञानदर्शन – विशुद्धी) युक्त होऊन आर्प्य मार्गाचे अंतिम फळ म्हणजे अर्हत्व प्राप्त होते.व तो जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. अशा या विशुद्धींचा मार्ग ह्या ग्रंथात सांगितलेला असल्यामुळे ह्या ग्रंथास विसुद्धिमग्ग असे नाव दिले आहे.
बापट,पु. वि.