विषुव प्रशांत मंडल : अलीकडच्या काळापर्यंत असा समज होता की, उत्तर गोलार्धातील ईशान्य व्यापारी वारे आणि दक्षिण गोलार्धातील आग्नेय व्यापारी वारे ह्या दोन वाऱ्यांच्या पट्ट्यांमध्ये एक क्षीण व अस्थिर वाऱ्याचा पट्टा सागरावर विषुववृत्ताला लागून असतो आणि ह्या पट्ट्यास विषुव प्रशांत मंडल असे म्हणतात. अलीकडे उपलब्ध झालेल्या पुराव्यावरून असे दिसते की, ईशान्य आणि आग्नेय व्यापारी वाऱ्यांमधील संक्रमण साधारणपणे एका अतिअरूंदं पट्ट्यावर होत असून हा पट्टा अटलांटिक महासागरावर आणि मध्य अमेरिकेजवळील पॅसिफिक महासागरावर विषुववृत्तापासून बरेच अंश उत्तरेस असतो.
विषुव प्रशांत मंडलात तीन प्रमुख प्रशांत क्षेत्रे आहेत. पहिले, सर्वांत मोठे क्षेत्र, पॅसिफिक महासागर आणि हिंदी महासागर यांवर पसरलेले असून विषुववृत्तास लागून आहे. पहिल्या प्रशांत क्षेत्राच्या मानाने इतर दोन्ही क्षेत्रे बरीच लहान आहेत. दुसरे क्षेत्र आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून उत्तर अटलांटिक महासांगरात काही अंतरापर्यंत पसरलेले आहे. तिसरे क्षेत्र मध्य अमेरिकेच्या किनाऱ्यापासून पश्चिमेस पॅसिफिक महासागरात काही अंतरापर्यंत आहे.
विषुव प्रशांत मंडलांत हवेचा दाब कमी असतो आणि ऊर्ध्व (वरच्या दिशेत) गती तीव्र असते. या क्षेत्रांवर जोरदार पाऊस पडतो. पाऊस बहुधा दुपारी वा सायंकाळी पडतो. पावसाबरोबर ⇨ गडगडाटी वादळ आणि ⇨चंडवात हे आविष्कारही होतात. ऋतुमानाप्रमाणे विषुव प्रशांत मंडल ५ अक्षांशांपर्यंत उत्तर-दक्षिणेकडे सरकते. उन्हाळ्यात विषुव प्रशांत मंडल अधिकतम अक्षांशावर असते, तर हिवाळ्यात ते न्यूनतम अक्षांशावर असते.
दोन गोलार्धांतील एकत्र आलेल्या व्यापारी वाऱ्यांच्या तापमानांतील फरक गोलार्धींतील उन्हाळ्यात सर्वाधिक असतो. कारण प्रशांत क्षेत्र उन्हाळी गोलार्धांत विषुववृत्तापासून सर्वांत दूर सरकलेले असते. आफ्रिकेजवळील तसेच मध्य अमेरिकेजवळील प्रशांत क्षेत्रे सर्वांत जास्त वादळी आहेत. कारण या क्षेत्रांवर एकत्र येणारे उत्तर गोलार्धीय व्यापारी वारे आणि दक्षिण गोलार्धीय व्यापारी वारे यांच्या गुणधर्मांत बरीच भिन्नता आहे. सागरावरून आलेल्या दक्षिण गोलार्धीय व्यापारी वाऱ्यांत बाष्प बरेच असते, पण तापमान कमी असते. याउलट सहारा वाळवंटावरून अथवा मध्य अमेरिकेतील जमिनीवरून आलेले वारे त्या मानाने शुष्क असतात, पण त्यांचे तापमान जास्त असते.
विषुव प्रशांत क्षेत्रावर हवेस ऊर्ध्व गती असते. उच्च वातावरणात या क्षेत्रावर उच्च दाब असतो. त्यामुळे ही हवा ह्या उंचीवर पोहोचल्यावर उत्तरेकडे [कोरिऑलिस परिणामामुळे ईशान्य दिशेकडे ⟶ कोरिऑलिस परिणाम] आणि दक्षिणेकडे (कोरिऑलिस परिणामामुळे आग्नेय दिशेकडे) वाहू लागते. कारण अक्षांश ३० च्या आसपांस ह्या उंचीवर न्यून दाब असतो. ही हवा हळूहळू थंड होऊन ३० अक्षांशाच्या जवळ भूपृष्ठावर येते. ही हवा भूपृष्ठांवर आल्यानंतर विषुववृत्ताकडे म्हणजे उच्च दाब प्रदेशाकडून न्यून दाब प्रदेशाकडे व्यापारी वारे म्हणून वाहू लागते.
पहा : वारे.
संदर्भ : 1. Critchfield, H, J. General Climatology, New Delhi, 1987.
2. Wallace, J. M. Hobbs, P. V. Atmospheric Science –An IntroductorySurvey, New York, 1977.
गोखले, मो. ना. मुळे, दि. आ.