विशाखा–२ : भारतातील एक प्राचीन नगर. याच्या स्थानाविषयी व सांप्रतच्या गावाशी एकरूपता दाखविण्यात इतिहासतज्ञात मतभेद आहेत परंतु बहुतेक तज्ञांच्या मते अयोध्या अथवा अवध म्हणजेच बुद्धकाळात ओळखले जाणारे ‘विशाखा’ हे नगर असावे. अयोध्येचे ‘साकेत’ हे दुसरे एक नाव प्रचलित होते व कोसल देशही काही वेळा ‘अयोध्या’ या नावाने ओळखला जात होता.
चिनी प्रवासी फाहियान याने वर्णिलेले ‘श-चि’(साकेत) आणि ह्यूएन्त्संगने वर्णिलेले ‘विशाख’ (विशोक) या दोहोंना ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ कनिंगहॅम याने एकत्रितपणे ‘साकेत’ म्हटले आहे. परंतु श-चि आणि विशाखा यांच्या स्थाननिश्चितीच्या वर्णनावरून ती दोन वेगळी गावे असावीत असे काही तज्ञांचे मत आहे. फाहियानच्या मते विशाखा ही श-चि या राज्याची राजधानी होती. केव्ह टेंपल्स ऑफ इंडिया या पुस्तकातील उल्लेखावरून इतिहासतज्ञ डॉ. बर्जेस यांच्या मते ‘लखनौ’ म्हणजे विशाखा असावे असे दिसते तर डॉ. होई यांच्या स्पष्टीकरणाप्रमाणे अयोध्येजवळील गोंड जिल्ह्यातील ‘पश’ (पी-सो-कई) हे सरजू (शरयू) व धोग्रा नद्यांच्या संगमावरील गाव म्हणजे विशाखा असावे.
पहा : अयोध्या – १ कोसल साकेत.
चौंडे, मा. ल.