विल्सन, सर जेम्स हॅरल्ड : (११ मार्च १९१६- ). ग्रेट ब्रिटनमधील एक राजकीय मुत्सद्दी, मजूर पक्षाचा नेता आणि इंग्लंडचा पंतप्रधान (१९६४–७० आणि १९७४–७६). त्याचा जन्म इडर्झफील्ड (यार्कशर) येथे औद्योगिक रसायनशास्त्रज्ञ जेम्स हर्बर्ट व इथेल विल्सन या दांपत्यापोटी झाला. त्याचे प्रारंभीचे शिक्षण चेशर येथील ‘विराल ग्रामर स्कूल’ मध्ये झाले. पुढे ऑक्सफर्ड विद्यापीठातील जीझस महाविद्यालयातून त्याने पदवी संपादन केली (१९३६) व तेथेच त्याची अर्थशास्त्र विषयाचा अधिव्याख्याता म्हणून नियुक्ती झाली (१९३७). युनिव्हर्सिटी कॉलेजचा अधिछात्र (१९३८-३९) म्हणून त्याची निव़ड झाली. नंतर त्याने सर ⇨ विल्यम हेन्री बेव्हरिजचा संशोधन साहाय्यक म्हणून काही महिने काम केले. दुसऱ्या महायुद्धकाळात त्याने विविध नागरी सेवापदे भूषविली. त्यांपैकी सागरपार व्यापार सचिव आणि संसदीय सचिव या पदांमुळे त्यास राजकारणाचा अनुभव मिळाला. काही काळ त्याने युद्ध मंत्रालय-सचिवाचा आर्थिक साहाय्यक म्हणून काम पाहिले. त्या दरम्यान ग्लॅडिस मेरी बॉल्डविन या युवतीबरोबर त्याचा विवाह झाला (१९४०).
तो मजूर पक्षातर्फे १९४५ मध्ये हाउस ऑफ कॉमन्सवर निवडून आला आणि सक्रिय राजकारणाकडे आकृष्ट झाला. त्याच्या अर्थशास्त्रातील व्यासंगामुळे पक्षाने त्याच्याकडे तत्कालीन इंग्लंडमधील आर्थिक स्थितीचा आढावा घेण्याचे कार्य सोपविले. त्यातून निर्माण झालेले त्याचे न्यू डील फॉर कोल (१९४५) हे पुस्तक या व्यासंगाचे निदर्शक आहे. त्याची व्यापार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली (१९४७ – ५१). त्याने युद्धकालीन उद्योगधंद्यांवरील अनेक जाचक आर्थिक नियंत्रणे उठविली. १९५१ मध्ये त्याने राष्ट्रीय आरोग्यसेवेतील बदलांना विरोध दर्शवून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यामुळे पक्षांतर्गत डाव्या विचारसरणीचा प्रवक्ता म्हणून त्याच्याक़डे राजकीय विचारवंत पाहू लागले. एकतर्फी अण्वस्त्र-निःशस्त्रीकरणाला विरोध दर्शविणाऱ्या ⇨ह्यू गेट्स्केलच्या भूमिकेला त्याने विरोध केला. त्यामुळे काही काळ पक्षांतर्गत दोन तट पडले तथापि गेट्स्केलच्या मृत्यूनंतर (१९६३) त्याच्याकडे मजूर पक्षाचे नेतृत्व आले. १९६४ च्या सार्वत्रिक निव़डणुकीत हुजूर पक्षापेक्षा फक्त पाच जागा जास्त मिळवून विल्सनच्या नेतृत्वाखालील मजूर पक्ष सत्तारूढ झाला आणि विल्सन पंतप्रधान झाला. त्याने प्रथमच नि:शस्त्रीकरण खाते निर्माण करून त्यासाठी एक मंत्रिपद निर्माण केले. याशिवाय सागरपार विकास, क्रीडा आणि कला यांकरिता स्वतंत्र मंत्री नेमले. पुढे त्याने ब्रिटनच्या व्यापारविषयक धोरणात धाडसी पाऊल टाकून खरेदीवर नियंत्रण घातले आणि संरक्षणावरील खर्च कमी केला. त्यामुळे तिजोरीवरील ताण कमी झाला. या आर्थिक धोरणामुळे मजूर पक्षाच्या सामाजिक आणि कल्याणकारक योजनांवर निर्बंध आले. १९६६ च्या निवडणुकीत त्याच्या पक्षास चांगले मताधिक्य प्राप्त झाले, तेव्हा त्याने खंबीरपणे काही निर्णय घेतले आणि सुएझ कालव्याच्या परिसरातील ब्रिटिश फौजा मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याने यूरोपच्या सामाजिक बाजारपेठेमध्ये ब्रिटनला सदस्यत्व मिळावे, म्हणून पुन्हा मागणी केली आणि ऱ्होडेशियातील गोऱ्या शासनाबरोबर समझोता करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. परिणामतः ऱ्होडेशिया ब्रिटनपासून स्वतंत्र झाला. त्याने देशांतर्गत काटकसरीचे आर्थिक धोरण अवलंबून कामगारांचे वेतन आणि वस्तूंच्या किंमती यांवर कडक निर्बंध लादले, कर वाढवले, तसेच पौंडाचे अवमूल्यन केले (१९६७). यामुळे ब्रिटनची आर्थिक स्थिती स्थिरस्थावर होण्याच्या मार्गावर असतानाच, त्याने जून १९७० मध्ये सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या. त्यात मजूर पक्षाचा अनपेक्षित पराभव झाला. विल्सनने तात्काळ विरोधी पक्षनेत्याची भूमिका स्वीकारली आणि यूरोपीय सामायिक बाजारपेठेत ग्रेट ब्रिटनला सदस्यत्व मिळवण्याची आपली पूर्वीची भूमिका बदलली. एडवर्ड हीय़ पंतप्रधान असताना इंग्लंडच्या आर्थिक धोरणात फारशी सुधारणा झाली नाही, शिवाय त्याच्या परराष्ट्रीय धोरणावर टीका होऊ लागली. त्याने १९७४ च्या फेब्रुवारी त सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या. या आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन विल्सनने निवडणूक लढवली, त्यात पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्याने बहुमत नसतानाही अल्प मताततील मजूर पक्षाचे शासन सत्तारूढ झाले. मात्र त्याच वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील निवडणुकीत आणखी तीन जागा मिळून मजूर पक्षाचे बहुमत झाले. त्यावेळी त्याने ब्रिटनला यूरोपीय सामायिक बाजारपेठेचे सदस्य करावे म्हणून प्रयत्नांची शिकस्त केली आणि सामाजिक कराराचा वापर करून कामगार संघटनांबरोबर संबंध सुधारले. १९७५ मध्ये त्याने ब्रिटनच्या सामायिक बाजारपेठेतील सदस्यत्वाबद्दल सार्वमत घेतले. परंतु उत्तर आयर्लंडमधील हिंसाचार आणि चलनवाढ यांमुळे ब्रिटनची आर्थिक स्थिती गंभीर झाली. परिणामतः विल्सनने १६ मार्च १९७६ रोजी पंतप्रधानपद आणि पक्षनेतृत्व या दोन्हींचा राजीनामा दिला आणि सक्रिय राजकारणातून तो निवृत्त झाला. पुढे लॉर्ड झाल्यानंतर तो हाउस ऑफ लॉर्ड् समध्ये बसू लागला.
त्याने निवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य सामाजिक सेवेत व्यतीत केले. त्याच्या राजकीय सेवेचा उचित गौरव त्यास ‘सर’ हा किताब देऊन करण्यात आला. याशिवाय त्यास अनेक मानसन्मान मिळाले. त्यांत विविध विद्यापीठांनी दिलेल्या सन्मान्य डॉक्टरेट पदव्या असून, ‘हेन्रीटा झोल्ड’ पुरस्कारही (१९७६) आहे. त्याने स्फुटलेखनाबरोबरच अनेक ग्रंथही लिहिले. ते प्रामुख्याने ग्रेट ब्रिटनच्या आर्थिक व्यवस्थेसंबंधी आहेत. त्याची काही महत्वाची भाषणे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आहेत. पर्पझ इन पॉलिटिक्स (१९६४) हा त्याच्या निवडक भाषणांचा संग्रह होय. त्याच्या ग्रंथांपैकी द न्यू डील फॉर कोल (१९४५), इन प्लेस ऑफ डॉलर्स (१९५२), द वॉर ऑन वर्ल्ड पॉव्हर्टी (१९५३), पर्पझ इन पॉवर (१९६६), द लेबर गव्हर्नमेंट (१९६४–७०), अ प्राइम मिनिस्टर ऑन प्राइम मिनिस्टर्स (१९७७), द चॅरिएट ऑफ इझ्राएल (१९८१), द मेकिंग ऑफ अ प्राइम मिनिस्टर (१९८६) इ. महत्वाचे आहेत. यांशिवाय त्याच्या काही आठवणी, महत्वाचे प्रसंग इ. त्याने अ पर्सनल रेकॉर्ड (१९७१) या आत्मवृत्तपर लेखनाद्वारे प्रसिद्ध केले आहेत.
विल्सन हा लोकशाही समाजवादाचा कट्टर पुरस्कर्ता होता. इंग्लंडच्या यूरोपीय सामायिक बाजारपेठेतील सदस्यत्वाबाबतची त्याची भूमिका संदिग्ध होती. तथापि इंग्लंडला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचे त्याचे प्रयत्न उल्लेखनीय होते.
संदर्भ : 1. Howard, Anthony, Harold Wilson, London, 1965.
2. Kay, Ernest, Pragmatic Premier : An Intimate Port. Of Harold Wilson, London, 1967.
3. Morgan, Austen, Harold Wilson, London, 1992.
देशपांडे, सु. र.
“