विल्सन, रॉबर्ट वुडरो: (१० जानेवारी १९३६ – ). अमेरिकन रेडिओ ज्योतिषशास्त्रज्ञ. त्यांनी ⇨आर्नो ए. पेन्झिआस यांच्या समवेत, विश्वाच्या उत्पत्तीसंबंधीच्या ‘महास्फोट’ [बिग बँग ⟶ विश्वोत्पत्तिशास्त्र] सिद्धांताला प्रत्यक्ष आधारभूत ठरलेल्या वैश्विक सूक्ष्मतरंग प्रारणाचा (पार्श्व प्रारणाचा) शोध लावला. या कार्याबद्दल १९७८ चे भौतिकीचे नोबेल पारितोषिक विल्सन व पेन्झिआस यांना अर्धे आणि नीच तापमान भौतिकीतील कार्याबद्दल ⇨पीटर ल्येऑंन्यीदव्हिच काप्यिट्स यांना अर्धे असू विभागून मिळाले.
विल्सन यांचा जन्म टेक्ससमधील ह्यूस्टन येथे झाला. तेथील राइस विद्यापीठाची भौतिकीतील बी. ए. पदवी १९५७ मध्ये संपादन केल्यावर १९६२ मध्ये त्यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेची पीएच्. डी. पदवी मिळविली. १९६३–७६ या काळात ते बेल टेलिफोन लॅबोरेटरीजमध्ये तांत्रिक कर्मचारी होते. नंतर ते बेलच्या रेडिओ फिजिक्स रिसर्च डिपार्टमेंटचे प्रमुख होते. (१९७६–९०).
विल्सन व पेन्झिआस यांनी बेल टेलिफोन लॅबोरेटरीजमध्ये काम करीत असताना आकाशगंगंभोवतील वायूच्या मंडलापासून येणाऱ्या रेडिओ उत्सर्जनाचा अभ्यास शिंगाच्या आकाराच्या ६ मी. आकाशकाच्या साहाय्याने करण्यास प्रारंभ केला. त्यात त्यांना एक असामान्य पार्श्व प्रारण आढळले. हे प्रारण विश्वात सर्वत्र एकसारखे व्यापून राहिलेले असून त्याचे तापमान ३° के. असल्याचे दिसून आले. हे प्रारण म्हणजे सु. २० अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या व ज्यापासून विश्वाची निर्मिती झाली त्या आद्य महास्फोटाचा अवशिष्ट भाग आहे, असेही आढळून आले. अशा प्रारणाचे भाकित जॉर्ज गॅमो व इतरांनी १९४० नंतरच्या दशकाच्या अखेरीस केले होते. परंतु त्याचा प्रत्यक्ष पुरावा विल्सन व पेन्झिआस यांच्या कार्यामुळेच मिळाला.
विल्सन व पेन्झिआस यांनी अवकाशातील मिलिमीटर तरंगलांबीच्या प्रारणाचे निरीक्षण करण्याकरिता तंत्रज्ञान विकसित केले. त्यांनी १९७० –७२ या काळात आंतरतारकीय मेघांतील कार्बन मोनॉक्साइड व इतर अनेक रेणूंचा शोध लावला. १९७३ नंतर त्यांनी आंतरतारकीय समस्थानिकांची (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच अणूंच्या प्रकारांची)-विशेषतः ड्यूटेरियमाची-विपुलता, विश्वस्थितिशास्त्र व मूलद्रव्यांचा उगम वगैरे विविध विषयांवर लक्ष केंद्रित केले.
विल्सन हे नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, अमेरिकन फिजिकल सोसायटी व इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन या संस्थांचे सदस्य आहेत. त्यांना पेन्झिआस यांच्याबरोबर नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे हेन्री ड्रेपर पदक (१९७७) व रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे हर्शेल पदक (१९७७) हे सन्मान मिळाले. त्यांनी आंतरतारकीय रेणूंची पार्श्व तापमान मापने व मिलिमीटर तरंगमापने यांसारख्या विविध विषयांवर अनेक वैज्ञानिक नियतकालिकांतून लेखन केले.
सूर्यवंशी, वि. ल.