विमान वाहित सैन्य : शत्रूच्या प्रदेशात विमान, ग्ला.यडर अथवा हेलिकॉप्टर यांद्वारे जे सैन्य उतरवले जाते, ते विमानवाहित सैन्य. जर हवाई वर्चस्व प्रस्थापित झाले असेल, तरच असे हल्ले करता येतात. म्हणून युद्धजन्य काळात प्रत्येक राष्ट्र हवाई वर्चस्व मिळविण्यास प्राधान्य देते. युद्धकाळात हवाई वर्चस्व मिळविले म्हणजे शत्रूच्या पिछाडीवर वा रणक्षेत्रावर हल्ला करण्यासाठी विमानवाहित (एअर बोर्न) सैन्याचा उपयोग केला जातो. विमानवाहित सैन्य उभे करण्यापूर्वी सैन्यवाहू व मालवाहू विमानांचा ताफा उभा करावा लागतो. यश मिळण्यासाठी मोठ्या संख्येने विमानवाहित सैन्य असावे लागते. साधारणपणे पहिल्या फेरीतच ३००-४०० मोठ्या आकाराची विमाने वापरली जातात कारण शत्रूचा वाढता प्रतिकार व बदलते हवामान लक्षात घेता दुसरी फेरी केव्हा, कुठे होईल याचा नेम नसतो. छापे मारणे अथवा खास कामगिरी मात्र लहान लहान तुकड्या करतात. विमानवाहित सैन्य सदासज्ज असते आणि आकस्मिक धोका निर्माण होताच त्यास पाचारण केले जाते आणि काही तासांच्या अवधीतच विमानातून उड्डाण करून वेळ पडल्यास छत्रीधारी सैनिक खाली उड्या टाकतात अथवा हेलिकॉप्टरने उतरतात व काही मिनिटांतच लढाईस तयार होतात.
विमानवाहित सैन्याची छत्रीधारी सैन्य (पॅराट्रूपर्स) व विमानउतार (एअर ट्रॅन्स्पोर्टेड/एअर लँडिंग) अशी दोन अंगे असून ग्लायडर सैन्य हे तिसरे अंग दुसऱ्या महायुद्धात अस्तित्वात आले. तथापि ग्लायडरची हानी बरीच होत असल्याने ते आता व्यवहारात उपयुक्त ठरत नाही. आघाडीवरील छत्रीधारी सैन्य साधारणतः शत्रूच्या पिछाडीवर विमानातून उड्या टाकून शत्रूच्या मर्मस्थानावर घाव घालतात. ती कामगिरी पार पडल्यावर शत्रुसेनेच्या आक्रमणापासून स्वतःचे रक्षण करण्यास बतावात्मक क्षेत्र तयार करते. साधारण ४८ ते ७२ तासांत त्याची पायदळ सैन्याकडून सुटका केली जाते विमानवाहित सैन्य विमानानेच पाठवून इष्ट ठिकाणी उतरविले जाते. परंतु युद्धक्षेत्रावर त्यांतील छत्रीधारी सैन्य अल्पकाळच टिकाव धरू शकते. याचे कारण त्यांच्याकडे भारी तोफा नसतात व दारूगोळा मर्यादित असतो. त्यामुळे शत्रूच्या रणगाड्यांचा त्यांना प्रतिकार करता येत नाही.
विमानवाहित सैन्याचे महत्त्वाचे कार्य म्हणजे शक्य तितक्या लवकर शत्रूची मोक्याची ठिकाणे, केंद्रे, दळणवळणावरील पूल इ. काबीज करणे, विमाने उतरविण्यासाठी तात्पुरती धावपट्टी तयार करणे आणि शत्रूचे मनोबल नष्ट करणे, हे होय. विमानवाहित सैन्यदलात पायदळ, हलक्या तोफा, एंजिनिअर, ध्वनिक्षेपण संचार, जीपगाड्या, वैद्यकीय तुकडी आदी सर्व दलांचा समावेश होत असल्यामुळे ते स्वयंपूर्ण असते. तोफा आदी अवजड वस्तूंचे भाग सुटे करून ते पॅराशूटच्या साहाय्याने जमिनीवर अलगद उतरविले जातात आणि थोड्याच अवधीत ते जोडून त्यांचा उपयोग करतात. याप्रकारे आकाशयानातून आणि विमानांनी या सैन्याच्या गरजा भागविल्या जातात. शत्रूच्या दळणवळणाच्या मार्गावरील पूल इत्यादींचा ताबा घेऊन आपल्या सैन्याचा मार्ग सुकर करून चढाईच्या गतीत खंड पडू न देणे, शत्रूच्या तळावर अचानक हल्ले करून त्यांचे वरिष्ठ अधिकारी अथवा महत्त्वाच्या उपकरणांचा ताबा घेणे इ. जबाबदाऱ्या विमानवाहित सैन्यावर सोपविण्यात येतात.
सुप्रसिद्ध अमेरिकन वैमानिक व मुत्सद्दी बेंजामिन फ्रँक्लिन यांनी १७८४ मध्ये संभाव्य युद्धजन्य परिस्थितीत विमाने तसेच विमानवाहित सैन्य यांचा वापर करण्याच्या शक्यतेवर भर दिला होता. पहिल्या महायुद्धामध्ये (१९१४-१८) हवाई दलाचा मर्यादित वापर झाला. त्यानंतर हवाई दलात मोठीच प्रगती झाली. जर्मनी व रशिया यांनी स्वतःचे विमानवाहित सैन्य निर्माण करण्यात आघाडी घेतली. छत्रीधारी सैन्याचे पहिले प्रात्यक्षिकही १९२३ मध्ये झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस १९३९ मध्ये रशियाच्या विमानवाहित सैन्याने फिनलंडवर मोठ्या प्रमाणात अयशस्वी आक्रमण केले. उत्तर आफ्रिकेतून जर्मन फील्ड मार्शल रोमेलने माघार घेतल्यावर इटलीच्या दक्षिणेकडील सिसिली बेटावर ‘ब्रिटिश फर्स्ट एअर बोर्न डिव्हिजन’ने आणि ‘अमेरिकन ८२ एअर बोर्न डिव्हिजन’ने हवाई आक्रमण केले. जून १९४४ मध्ये यूरोपची जर्मनीच्या तावडीतून सुटका करण्याकरिता मित्र राष्ट्रांनी नॉर्मंडीमध्ये समुद्रमार्गे चढाई सुरू केली. त्यावेळी जर्मनांनी वाटेतील पूल उडवून देऊ नयेत म्हणून हॉलंडमध्ये आर्नम, नाइमेगन व आयंटहोव्हन ह्या भागांत फार मोठ्या प्रमाणावर विमानवाहित सैन्य उतरविले. त्याला जर्मनीने जोराचा प्रतिकार केला. जानेवारी १९४५ मध्ये अमेरिकेने प्रशांत महासागरात जपानविरुद्ध चढाई सुरू केली व फिलिपीन्समध्ये विमानवाहित सैन्य उतरवून कॉरिजिडॉर भागावर कबजा मिळविला. ब्रिटिशांचा बालेकिल्ला असलेल्या क्रीट बेटाचा ताबा घेताना जर्मनीने छत्रीधारी, विमानवाहित व ग्लानयडर या सैन्यांचा सुरुवातीस मोठ्या प्रमाणात उपयोग केला.
दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस भारतीय सैन्यदलात सेकंड एअर बोर्न डिव्हिजन कार्यरत होती. फाळणीच्या वेळी ही एअर बोर्न डिव्हिजन कराची, मलीर, क्वेटा, मुलतान, लाहोर या भागांत तैनात केली होती. फाळणीत या डिव्हिजनची वाटणी होऊन ५० पॅरा ब्रिगेड ही भारताच्या वाट्यास आली. ब्रिगेडचे पहिले भारतीय ब्रिगेडियर यशवंतराव परांजपे होते. १९४७-४८ मध्ये पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये बहुसंख्येने घुसखोर पाठविले. या घुसखोरांचा प्रतिकार झंगर, नौशहर या भागांत ५० पॅरा ब्रिगेडनेच ब्रि. उस्मान यांच्या नेतृत्वाखाली केला. परंतु दुर्दैवाने ब्रि. उस्मान त्यात मारले गेले. १९५०-५३ च्या दरम्यान कोरियामध्ये झालेल्या संघर्षात संयुक्त राष्ट्रे या संघटनेमार्फत पाठविण्यात आलेल्या सैन्यात ६० पॅरा फील्ड ॲम्ब्युलन्सचा समावेश होता. भारताच्या जनरल थिमय्या यांच्या नेतृत्वाखाली जी शांतिसेना कोरियात पाठविण्यात आली, तीत एका पॅराशूट बटालियनाचा समावेश केला गेला होता.
एकोणीसशे पासष्टच्या भारत-पाकिस्तान संघर्षातही पॅरा ब्रिगेड आघाडीवर होती. १९७१ च्या भारत-पाकिस्तान सघर्षात टंगाईल भागात विमाने, हेलिकॉप्टरे इत्यादींद्वारे भारतीय सैनिक उतरविले. डाक्का येथे प्रथम प्रवेश मिळविण्याचा मान भारतीय छत्रीधारी सैनिकांनी मिळविला. त्या लढाईत सु. ४,००० पायदळ सैनिक हेलिकॉप्टरने मेघना नदीच्या पलीकडे उतरून हा प्रयोगही यशस्वी करून दाखविला.
श्रीलंकेने देशांतर्गत विद्रोही पथकांची बंडाळी मोडून काढण्याकरिता भारताकडे सहकार्य मागितले (१९८७). त्यानुसार भारत-श्रीलंका करार होऊन भारताने श्रीलंकेच्या उत्तर व उत्तरपूर्व जाफना आणि त्रिंकोमाली भागांत पाठविलेल्या सैन्यात विमानवाहित सैन्याच्या पाच तुकड्या होत्या.
मालदीवमध्ये सत्तापरिवर्तन घडवून आणण्यासाठी अब्दुल्ला हफीफ ह्या देशद्रोह्याने ३०० छापामारी सिंहली तमिळांसह माले या राजधानीवर हल्ला केला व राष्ट्राध्यक्ष मौमून अब्दुल गायूम यांच्या निवासस्थानाचा ताबा घेतला (१९८८). या हल्ल्यात स्वतः गायूम शिताफीने निसटले आणि त्यांनी अमेरिका व भारताकडे मदत मागितली. भारताच्या सु. १,४०० विमानवाहित सैनिकांनी व सु. ३०० छत्रीधारी सैनिकांनी अवघ्या चार तासांत विमानातून प्रवास करून हुलूलू विमानतळ काबीज केला व मध्यरात्रीपर्यंत राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानातून छापामारांना हुसकावून लावून या बंडाचा बीमोड केला. भारतीय विमानवाहित सेनेने केलेल्या पराक्रमाचा जगातील महासत्तांनी गौरवच केला.
पहा : छत्रीधारी सैन्य.
पित्रे, का. ग.