विपाशा : भारतातील बिआस नदीचे प्राचीन नाव. ग्रीक लोक या नदीला हायफॅसिस, हिपानिस किंवा बिपासिस म्हणत. यास्क (तौलनिक भाषाशास्त्राचा आद्य पंडित) याने लिहिलेल्या प्राचीन शब्दकोशावरील निरुक्त या भाष्यात हिचा ‘उरुंजिरा’ या नावाने उल्लेख आढळतो तर वेदोत्तर वाङ्मयात हिचा ‘विपाशा’ या नावाने उल्लेख आला आहे. ⇨बाल्हीक (वाह्लीक) हा देश विपाशा नदीखोऱ्यात असल्याचे वर्णन रामायणात आढळते. शुतुद्री (शतद्रुसतलज)आणि विपाशा यांचा संगम आणि त्यांच्या संयुक्त प्रवाहाचा सिंधू नदीशी संगम यांचे वर्णन ऋग्वेदात आले आहे. वसिष्ठाचे चार पुत्र विश्वामित्राने मारले व त्यामुळे दुःखी होऊन स्वत)चे हातपाय बांधून वसिष्ठाने या नदीत स्वतःला झोकून देऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्याकडून ब्रह्महत्त्येचे पाप होऊ नये म्हणून जोरदार नदी प्रवाहाने वसिष्ठाची बंधने (पाश) मोकळी (विगत) करून त्याचे रक्षण केले. त्यामुळे या नदीला पाशमुक्त करणारी ती ‘विपाशा’ हे नाव पडले अशी कथा महाभारतात दिलेली आहे. मार्कंडेय पुराणात व पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये विपाशा नदीचा उल्लेख आढळतो.
पहा : बिआस.
चौंडे, मा. ल.
“