विधीसूत्रे: (मॅक्झिम्स ऑफ लॉ). न्यायदान प्रक्रियेमध्ये किंवा कायद्याच्या एखाद्या विषयाची चर्चा वा अभ्यास करत असताना, काही महत्त्वाची तत्त्वे स्पष्ट करण्यासाठी वापरण्यात येणारी संक्षिप्त सूत्रे. ही विधीसूत्रे वेळोवेळी तयार होत गेलेली असून विधीज्ञ, न्यायाधीश व वकीलवर्ग यांच्याकडून ती मान्यता पावतात व वर्षानुवर्षे वापरली जातात. विधीसूत्रांना कायद्याचे अधिष्ठान असते. न्यायनिवाडे देताना आणि कायदा व न्याय सुसंगत राहावा यासठी विधीसूत्रांचा आधार घेतला जातो. विधीसूत्रे लॅटिन, फ्रेंच, इंग्रजी इ. भाषेमध्ये आढळून येतात, तसेच ती संस्कृतमध्येही आढळतात. रोमन सम्राट ⇨हिलाप जस्टिनिअन (कार. इ. स. ५२७-५६५) याने ‘कॉपर्स ज्युरिस सिव्हिलिस’ (जस्टिनिअन कोड) ही विधीसंहिता तयार केली. तद्वतच त्याच्याकडे काही महत्त्वाच्या विधीसूत्रांचेही जनकत्त्व जाते. त्याने संकलित केलेल्या विधीसूत्रांना ‘डायजेस्ट ऑफ जस्टिनिअस’ असे म्हणतात.

विधीसूत्रांची उत्पत्ती निरनिराळ्या विधीत्त्वांचे अध्ययन करताकरता मुख्यत्त्वे विद्वानांकडून झाली. थोडक्यात परंतु स्पष्ट शब्दांत ही तत्त्वे विशद करण्याच्या हेतूने या सूत्रांची निर्मीती झालेली असून, कायद्याच्या विद्यार्थांना व अभ्यासकांना ती अत्यंत उपयुक्त आहेत. कायद्याची मूलतत्त्वे विद्यार्थ्यांना समजावीत तसेच ती सहज रीत्या आत्मसात करता यावीत, या हेतूने कायद्याच्या अध्यापकांनी, विधीज्ञांनी ही सूत्रे तयार केली आहेत. न्यायालयांनी दिलेल्या अनेक न्यायानिर्णयांचे परिशीलन करून विधीज्ञांनी ही विधीसूत्रे प्रतिपादन करून त्यांतून तात्विक निष्कर्ष काढले आहेत. अशा रीतीने विधीसूत्रांचे महत्त्व स्वरूप कालौघात रूढ व दृढ होत गेले. त्यांना व्यावहारिक म्हणींप्रमाणे स्वरूप प्राप्त झाले. तेराव्या शतकाअखेरपर्यंत अशी सव्वाशे ते दीडशे विधीसूत्रे ⇨रोमन विधीत तसेच ⇨कॅनन लॉमध्ये एकत्र ग्रंथित केलेली आढळतात.

जर्मानिक कायदा, फ्रेंच कायदा. इंग्लिश कॉमन लॉ कायदा व सामन्याय (इक्विटी) कायदा यांत आलेल्या अनेक विधीसूत्रांपैकी काही विधीसूत्रे तत्त्वप्रतिपादक आहेत म्हणजे ही विधीसूत्रे कायद्याचा अन्वयर्थ लावताना अगर दस्ताऐवजांचे अर्थ लावताना त्यासंबंधी पाळावयाच्या नियमांच्या रूपात आहेत, तर काही विधीसूत्रे कायद्यातील पुराव्यासंबंधी तत्त्वे स्पष्ट करणारी आहेत.

ब्रिटिश राजवटीत निरनिराळ्या विषयांवरील भारतीय कायद्यांचा अभ्यास इंग्रजीत होऊ लागला. १८६१ च्या सुमारास भारतात उच्च न्यायालये स्थापन झाली आणि इंग्रजी न्यायाधीश व कायदेपंडित भारतात येऊ लागेल. त्यामुळे इंग्लंडमधील विधींमध्ये ज्या ज्या गोष्टींचा अंतर्भाव होत होता, त्यांचा सर्वांगीण अभ्यास एतद्देशीय न्यायाधीश, बॅरिस्टर व वकीलवर्गास करावा लागला. तोपर्यंत इंग्लंडमध्ये प्रचलित असलेली विधीसूत्रे भारतीय न्यायदानपद्धतीत रूढ झाली. त्याचप्रमाणे भारतीय कायद्यांची इतर प्रांतिक भाषांत भाषांतरे होत असताना या विधीसूत्रांचादेखील वापर त्यांतील तत्त्वे अबाधित राखून चालूच राहिला.

समन्यायावर (इक्विटी) आधारित चौदा विधीसूत्रांचे संकलन १७२८ मध्ये रिचर्ड फ्रान्सिस याने केले. यानंतर १८३६ मध्ये काही समन्यायदर्शक विधीसूत्रांचे संकलन करण्यात आले. समन्याय न्यायालयांनी दिलेल्या निकालाच्या आधारावर, म्हणजे त्या न्यायालयांत विशिष्ट रीतीने जो न्याय दिला जातो, त्यांमधून निघणाऱ्या तत्त्वांचे संकलन करून ही समन्याय विधीसूत्रे अस्तित्वात आली. इंग्रजीतील काही विधीसूत्रे व त्यांचे मराठी अर्थ उदाहरणादाखल पुढे दिले आहेत: (१) ‘दॅट विच् इज बिल्ट् अपॉन द लँड गोज विथ द लँड’ (जमीन विकली म्हणजे तीवरील सर्व प्रकारच्या बांधकामाचा त्यात समावेश होतो).(२)‘वॉटर पासेस विथ द सॉइल’ (तळजमीन विकली म्हणजे तीमधील विहीर, पाण्याचे प्रवाह वा जलसंचय यांचा त्यात समावेश होतोच). (३) ‘लेट पनिशमेंट बी इन प्रपोर्शन टू द क्राइम’ (गुन्ह्याची शिक्षा त्या गुन्ह्याच्या प्रमाणात असावी). (४) ‘नो वन कॅन ॲट द सेम टाइम बी ॲक्ट वन्स द स्यूटर अँड जज्’ (कोणीही व्यक्ती एकाच वेळी फिर्यादी व न्यायाधिश दोन्ही असू शकत नाही). (५) ‘अ डबल निगेटिव्ह इज ॲन ॲफरमेटिव्ह’ (दोन नकार एकापुढे एक आले म्हणजे तो होकार होतो) व (६) ‘द कॉझर ऑफेन्डस मोअर दॅन द परफॉर्मर’ (जो गुन्ह्याला उद्युक्त करतो, तो प्रत्यक्ष गुन्हेगारापेक्षा जास्त मोठा गुन्हा करतो).

हिंदू धर्मशास्त्रातील निरनिराळ्या ग्रंथात दिवाणी व फौजदारी स्वरूपाची अनेक संस्कृत विधीसूत्रे तसेच वचने आढळतात. मानवी व्यवहार, नीतिनियम यांनुसार कालौघात त्यांत अनेक पंडितांनी भर घातली असून, न्यायदानाच्या क्षेत्रात त्यांचा आवश्यक तेथे उपयोग करून घेतला जाई. उदाहरणादाखल काही विधीसूत्रे त्यांच्या मराठी अर्थासह पुढे दिलेली आहेत:(१) ‘केवलं शास्त्रमाश्रित्य न कर्तव्यो विनिर्णय:| युक्तिहीने विचारे तू धर्महानि: प्रजायते ||’ (याज्ञवल्क्य स्मृतीच्या अपरार्कंटीकेतील बृहस्पतीचे वचन, अ. २:१). अर्थ:निर्णय देताना न्यायधिशाने केवळ तर्ककठोर अशा विधीच्या निष्कर्षावर अवलंबून न राहता युक्तीची किंवा विवेकबुद्धीचीसुद्धा मदत घ्यावी, तसे न केल्यास निर्णय चुकीचा ठरू शकतो. (२) ‘अपुत्रस्य धनं पल्याभिगामि | तदभावे दुहितृगामि | तदभावे पितृगामी | तदभावे मातृगामि | तदभावे भ्रातृपुत्रगामि |’ (विष्णुस्मृति, अध्याय १७). अर्थ:पुत्र नसलेल्या व्यक्तीचे द्रव्य त्याच्या पश्चात त्याच्या पत्नीला मिळावे, पत्नी हयात नसल्यास मुलीला मिळावे, मुलगी नसल्यास (त्या मृत व्यक्तीच्या) वडिलांना, वडील नसल्यास आईला, आई नसल्यास भावाला, भाऊ नसल्यास भावाच्या मुलाला मिळावे इ. क्रम सांगितलेला आहे. (३) ‘विप्रतिपत्तौ साक्षिनिमित्ता सत्यव्यवस्था|’ (गौतम धर्मसूत्र,अ. १३:१). अर्थ : वादी-प्रतिवादींमध्ये खरेपणा पडताळून पाहण्यासाठी साक्षीदारांचा उपयोग करावा. (४) ‘न च संदेहे दण्डं कुर्यात् |’ (आपस्तंब धर्मसूत्र, प्रश्न २:११:२). अर्थ:गुन्ह्यांविषयी संशय असल्यास शिक्षा करू नये. (५) ‘धर्मप्रजासंपन्ने दारे नान्यां कुर्वीत |’ (आपस्तंब धर्मसूत्र, प्रश्न २:११:१२). अर्थ: पत्नी धर्माचे पालन करणारी व पुत्र असलेली भार्या असल्यास दुसरीशी विवाह करू नये. (६) ‘प्रेतस्य पुत्रा: कुसीदं दद्यु: दायादा वा रिक्थहरा: सहग्राहिण: प्रतिभुवो वा |’ (कौटिलीय अर्थशास्त्र, अधिकरण ३, अ. ११). अर्थ:मृत व्यक्तीचे कर्ज सव्वाज त्याच्या मुलांनी फेडावे, किंवा त्याच्या मालमत्तेत वाटा घेणाऱ्यानातेवाईकांनी फेडावे, किंवा त्याच्या कर्जात सहभागी असलेल्या व्यक्तींनी फेडावे, किंवा त्याला जामीन असणाऱ्यानी फेडावे. (७) ‘चोरापहृतं तु सर्वेभ्योन्विष्यार्पणीयम् अलाभे स्वकोषाद्वा अददत् चोरकिल्बिषी स्यात् |’ (याज्ञवल्क्यस्मृतीच्या वालक्रीडाटीकेतील बृहस्पतीचे वचन, अ. २:३८). अर्थ:(राजाने) चोरीला गेलेल्या द्रव्याचा शोध करून ते मालकाला परत मिळवून द्यावे, न सापडल्यास आपल्या खजिन्यातून द्यावे तसे न करणाऱ्या राजाला द्रव्य चोरल्याचे पाप लागते. (८) ‘कूटसाक्षिणां सर्वस्वापहार: कार्य: | उत्कोचोपजीविनां सभ्यानां च |’ (विष्णुस्मृति, ५/१८०-१८१). अर्थ:खोटी साक्ष देणाऱ्यांची व लाच घेण्याऱ्यांची सर्व मालमत्ता जप्त करावी. (९) ‘सस्यभक्षणे सस्योपघातं निष्पत्तित: परिसंख्याय द्विगुणं दापयेत् |’ (कौटिलीय अर्थशास्त्र, अधिकरण ३:१०). अर्थ:जनावरांनी शेतातील पीक खाल्ले असता, शेतातील एका विभागातील पिकाचे उत्पादन किती झाले असते ते ठरवून त्याप्रमाणात संपूर्ण शेतातील उत्पन्नाचा अंदाज घेऊन, त्या रकमेचा दुप्पट रक्कम शेताच्या मालकाला जनावरांच्या मालकाकडून नुकसानभराई म्हणून देण्यात यावी.

वरीलप्रमाणे कायद्यामध्ये अनेक प्रकारची विधीसूत्रे अंतर्भूत असून, त्यांचे न्यायदानाच्या प्रक्रियेतील मूल्य अनन्यसाधारण असेच आहे. 

पटवर्धन, वि. भा. लेले, श्री. नी.