विद्यासागर विद्यापीठ : पश्चिम बंगाल राज्यातील मिदनापूर येथील विद्यापीठ. स्थापना १९८१. संस्कृत पंडित, लेखक व उदारमतवादी सुधारक⇨ईश्वरचंद्रविद्यासागर (१८२०−९१) विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, असा प्रस्ताव ‘रीजनल एज्युकेशन सोयायटी’च्या वतीने सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गायेन यांनी मांडला. कलकत्ता विद्यापीठावरील अतिरिक्त कार्यभार कमी व्हावा, तसेच मागास भागाच्या शैक्षणिक गरजांची पूर्ती व्हावी, या उद्दिष्टांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीने या प्रस्तावाची शिफारस केली. १९७७ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने अधिनियम कलम १२ अ अन्वये या विद्यापीठाच्या विकास साधण्यासाठी मार्च १९७९ मध्ये भावतोष दत्त समिती नेमण्यात आली . या समितीने विद्यापीठाचा भरीव कार्यक्रम व त्याचा कालावधी यासंबंधीचा अहवाल शासनास ऑक्टोबर १९७९ मध्ये सादर केला. पश्चिम बंगाल राज्य विधिमंडळाने विद्यापीठाचा अधिनियम मंजूर केला व विद्यासागर विद्यापीठ अस्तित्वात आले. मिदनापूर जिल्हा व त्यामधील पस्तीस महाविद्यालये यांपुरते विद्यापीठाचे प्रारंभिक क्षेत्र ठरविण्यात आले. कार्यालयीन खर्चासाठी व कर्मचारीवृंदाच्या वेतनासाठी २० लक्ष रुपये, असा विद्यापीठाचा प्रारंभिक अर्थसंकल्प शासनाने मंजूर केला. विधी, शिक्षण, कला, विज्ञान व वाणिज्य या विद्याशाखांतील अध्ययनास संबंधित विभागाच्या शैक्षणिक गरजा आणि सुविधा यांनुसार प्राधान्य देण्यात आले. विद्यापीठ अधिनियमानुसार वन्य जमातीच्या भाषा, रूढी, ग्रामीण प्रशासन, मीठ-उद्योग, वनविद्या, उद्यानविज्ञान, कीटकनाशके, वन्य प्राण्यांचे व्यवस्थापन, मत्स्यसंवर्धन, मासेमारी उद्योग, ग्रामीण आणि शहरी नियोजन, मनुष्यबळ नियोजन, विभागीय साधनसंपत्तीचे नियोजन, परिस्थितिविज्ञान, पर्यावरण-अध्ययन, कृषी आणि ग्रामीण उद्योगधंदे, सागरी संपत्तीचा विकास इ. विषयांचे अध्यापन विद्यापीठात केले जाते.पदवीपूर्व पातळीवरील अध्यापनात इंग्रजी, बंगाली, संस्कृत, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, शिक्षणशास्त्र, गणित, भौतिकी, रसायनशास्त्र, वनस्पतिविज्ञान, शारीरिक मानवशास्त्र इत्यादींचा अंतर्भाव होतो. अध्यापनाचे माध्यम इंग्रजी व बंगाली आहे. कलकत्ता विद्यापीठाच्या विहित अभ्यासक्रमात आपल्या उद्दिष्टांनुरूप विकासाभिमुख असे काही बदल करून, या विद्यापीठाने आपला अभ्यासक्रम तयार केला आहे. खरगपूर येथील भारतीय तंत्रविद्या शिक्षणसंस्थेच्या वास्तुविभागाने विद्यापीठीय इमारतींचा वास्तुकल्प केला असून, त्यात व्यवस्थापन, अधिसभा व शैक्षणिक वास्तू, विधी महाविद्यालय, ग्रंथालय, सभागृह, संशोधन केंद्र, मुलामुलींची वसतिगृहे, कर्मचारीनिवास, व्यायामशाळा, बॅंक, विपणनकेंद्र, गुदामे, तलाव, टपाल व तार कार्यालय,दूरध्वनिकेंद्र इत्यादींचा अंतर्भाव आहे. कलकत्ता येथे विद्यापीठाचे छावणी कार्यालय (कँप ऑफिस) आहे. मिदनापूर येथील सुभाष नगरात विद्यापीठाचे मुख्य कार्यालय आहे.
मिसार, म. व्यं.