विडंबनचित्र : (कॅरिकेचर). विरूपीकरण हा महत्त्वाचा घटक असलेला, व्यक्ती वा वस्तू यांच्या चित्रणाचा चित्रकलेतील एक विशिष्ट प्रकार. या प्रकारात चित्रविषयाचे एखादे ठळक शारीरिक अथवा स्वभावजन्य वैशिष्ट्य किंवा वागण्यातील ढब वास्तवातील प्रमाणबद्धता बाजूला ठेवून अतिशयोक्तीच्या आधारे चित्रित करून विरूपीकरण साधले जाते. व्यक्तीच्या बाह्य रूपाबरोबरीने तिच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचे मर्म, व्यक्तिमत्त्वाचा अर्क विडंबनचित्रांतून अपेक्षित असतो. हे लक्षात घेऊन ‘कॅरिकेचर’ ला ‘अर्कचित्र’ हा मराठी प्रतिशब्द काही वर्षापूर्वी सुचवण्यात आला आणि आता तो बराचसा रूढ झाला आहे.

हास्यचित्र, टीकाचित्र, विडंबनचित्र इ. आजाची विभागणी साधारण पाच शतकांपूर्वी नव्हती आणि कॅरिकेचर हा शब्द उपहासात्मक चित्रण एवढ्या विस्तृत अर्थाने वापरला जाई. व्यक्तीचे उपहासात्मक चित्रण म्हणजे कॅरिकेचर तर समूहाचे वैशिष्ट्यांचे चित्रण ज्यात आहे ते ⇨व्यंगचित्र (कार्टून ही आजची विभागणी प्रचलित व्हायला एकोणीसावे शतक उजाडावे लागेल.

‘मर्यादेबाहेर ओझे लादणे’ किंवा ‘अतिशयोक्ती करणे’ या अर्थाच्या ‘caricare’ या इटालियन क्रियापदावरून ‘caricatura’ ही इटालियन संज्ञा व त्यावरून ‘कॅरिकेचर’ हा इंग्रजी शब्द बनला आहे तर काहींच्या मते ‘carattere’ (स्वभाववैशिष्ट्य) या इटालियन आणि ‘cara’ चेहरा) या स्पॅनिश शब्दांच्या संकरात कॅरिकेचरची व्युत्पत्ती शोधता येईल.

पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात इटालियन चित्रकार ⇨लिओनादों दा व्हींची (१४५२-१५१९) व जर्मन चित्रकार ⇨आल्ब्रेक्त ड्यूरर (१४७१-१५२८) या दोघांनी स्वतंत्रपणे वास्तवातील प्रमाणबद्धता बाजूला ठेवून मानवी चेहऱ्यांची चेहऱ्यांची वेडीविद्री वाटणारी जी अनेक रेखाटणे केली, तीच पहिलीवहिली विडंबनचित्रे असावीत. पंधराव्या शतकातील यूपोपमधील वैचारिक क्रांतीनंरच्या प्रबोधन काळात धर्मसंस्थांचा पगडा कमी होऊन कलाकाराच्या आविष्कार स्वातंत्र्याचे महत्त्व प्रस्थापित झाले. सभोवतालच्या घडामोडींविषयी स्वतःची प्रतिक्रिया हिरीरीने व्यक्तकरण्याचा कलावंताला हक्क आहे, या विचाराला गती मिळाली. यापासून चित्रकला अलग राहणे शक्यच नव्हते. फ्लेमिश चित्रकार थोरला पीटर ब्रगेल (सु. १५२५-६९), डच चित्रकार हीएरोनीमस बॉस (सु. १४५०-१५१६) इत्यादींच्या कलाकृती याची साक्ष देतात. या चित्रकारांच्या कलाकृती आजच्या अर्थाने विडंबनचित्रे नव्हत्या किंवा चित्रणाच्या दृष्टीने व्यंगचित्रेही नव्हत्या पण त्यांमागील दृष्टी व्यंगचित्रात्मक होती. तिने व्यंगचित्रांच्या प्रगतीचा पाय घातला.

यूरोपमधील सु. पाचशे वर्षांच्या व्यंगचित्रांच्या इतिहासात तत्कालीन घडामोडींचे स्पष्ट दर्शन घडते. सुरुवातीच्या काळातील धर्मविषयक घडामोडींचे वर्चस्व कमीकमी होत त्यांची जागा सामाजिक व राजकीय घडामोडींनी घेतली. त्यांचे प्रतिबिंब त्या कालखंडातील व्यंगचित्रांत दिसून येते.

ऑर्थर पाँड या इंग्रज मुद्राकाराने १७४० च्या सुमारास वेगवेगळ्या चित्रकारांच्या पंचवीस विडंबनचित्रांचा एक संग्रह प्रकाशित केला, त्याचा खूपच बोलबाला झाला. या लोकप्रियतेने उत्तेजित होऊन जॉर्ज टाउनझेंडने १७६० च्या दशकात हस्तपत्रिकेच्या स्वरूपात अनेक विडंबनचित्रे बाजारात आणली आणि ती प्रचंड खपली. या खपामागचे रहस्य असे होते. की चित्रासोबतचा मथळा किंवा मजकूर अशा खुबीने लिहिलेला असायचा, की पाहणाऱ्याला त्याचा मथितार्थ तर अचूक समजावा पण सरळसरळ बदनामीच्या खटल्याच्या कचाट्यात मात्र कुणाला पकडता येऊ नये ! ही चित्रे पुढे लंडनमधील नियतकालिकांतून प्रसिद्ध झाली आणि मग अशा नक्कल करणाऱ्या विडंबनचित्राचा पूरच लोटला.

प्रसिद्ध इंग्लिश आरेखक व विडंबनचित्रकार टॉमस रोलँडसन (१७५६-१८२७) याने पुढील दशकात ही परंपरा चालू ठेवली. राजे-महाराजे, सरदार-उमराव, नटनट्या, नाटककार, साहित्यिक, कलावंत यांची असंख्य विडंबनचित्रे रेखाटून त्याने ती लोकांसमोर आणली. व्यक्तीचे नाक, डोळे, चेहरा, अंगलट इत्यादींच्या बरोबरीनेच तिची केशरचना, पोषाख (अगदी हातरुमालसुद्धा) या बाह्य वस्तूंचेही विडंबनात्मक चित्रण त्याच्या चित्रांतून असायचे आणि अनेक घटकांच्या एकसंध विरूपीकरणातून चित्रविषयाचा भंपकपणा, हास्यास्पदता किंवा केविलवाणेपणा यांचे दर्शन घडण्याचे कसब त्याला साधलेले होते. रोलँडसनचा समकालीन जेम्स गिलरे (१७५७-१८१५) खऱ्या अर्थाने व्यंगचित्रकार होता. पूर्वायुष्यातील अनेक वर्षांच्या रंगभूमीवरील अनुभवामुळे कोणत्याही प्रसंगातले नाट्य पकडण्याचा गुण त्याच्या रक्तात पुरेपुर भिनला होता. त्याचप्रमाणे भोवतालच्या जगातील ‘दृश्य’ भाग अचूक टिपण्यात त्याचे डोळे तयार झाले होते. या गुणांच्या जोरावर विडंबनचित्रातील पोषाख, दागदागिने यांसारखे दुय्यम घटक चित्राचा लक्षणीय भाग बनवणे, हा त्याचा हातखंडा खेळ झाला होता.

फ्रान्समध्ये नुकतीच घडून आलेली राज्यक्रांती, नेपोलियनचा उदय आणि अस्त, राजेशाहीचे पुनरागमन इ. प्रचंड उलथापालथीमुळे एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात फ्रेंच समाजात लोकक्षोभ अनावर झाला होतो. नेपोलियनच्या काळात टोकाला गेलेल्या ह्या लोकक्षोभातून फ्रेंच व्यंगचित्रांचा एक वेगळा पंथच अस्तित्वात आला. राजेशाही कडून पुनरागमनानंतर नेपोलियनकालीन लोकांक्षा दडपण्याचा जो प्रयत्न झाला, त्याविरुद्ध व्यंगचित्रकांरांची प्रतिक्रिया उसळून आली. संधी मिळताच La Caricatureह्या नावाचे साप्ताहिक शार्ल फिलिपाँने १८३० मध्ये सुरू केले व अनेक चित्रकारांची विडंबनचित्रे त्यातून प्रसिद्ध करण्याचा सपाटा लावला. या सर्वात गाजली, ती ऑनोरे दोम्ये (१८०८-७९) या फ्रेंच चित्रकाराची व्यंगचित्रे. त्यावेळचा राजा लूई फिलिपचे त्याच्या गबदूल शरीरयष्टीकडे लक्ष वेधून घेणारे व त्याला भल्यामोठ्या पेअर फळाच्या रूपात चित्रित करणारे विडंबनचित्रे दोम्ये याने रेखाटले. त्या चित्राने तर अक्षरशः तुफान माजवले.


काही निवडक विडंबनचित्रे : (१) राजा लूई फिलीपची दोम्ये या चित्रकाराने (१८०८-७९) रेखाटलेली विडंबनचित्र विडंबनचित्रमालिका : ही पाहून राजा एवढा चिडला, की त्याने चित्रकाराला तुरुंगवासाची शिक्षा फरमाविली. (२) डेव्हिड लेव्हिनचे विडंबनचित्र (१९६६). (३) लिओनार्दो दा व्हींचीने (१४५२-१५१९) रेखाटलेली मानवी चेहऱ्यांची विडंबनचित्रे : ही आद्य आत्मविडंबनचित्रे नंतरच्या विडंबनचित्रकारांना स्फूर्तिदायक ठरली. (४) जॉर्ज वर्नार्ड शॉचे विडंबनचित्र (१९२४)-डेव्हिड लो. (५) जेम्स गिलरेचे आत्मविडंबनचित्र (१७८८). (६) ‘लोकांचा पैसा कुणी चोरला? सांगा ! सांगा’ ‘यानं’-टॉमस नॅस्टचे हार्पर्स वीकलीमध्ये प्रसिद्ध झालेले चित्र. (१८७१).  

  

राजाने चिडून त्याची अल्पकाळ तुरुंगात खानगी केली. नंतरच्या काळात मात्र दोम्येने फ्रेंच मध्यवर्गीय समाजापुरती विडंबनचित्रे सीमित केली. त्याच सुमारास स्पेमध्ये ⇨फ्रांथीस्को दे गोया (१७४६-१८२८) याची तत्कालीन सामाजिक-राजकीय घडामोडींवरची टीकाचित्रे लोकांचे लक्ष वेधून घेत होती, तर सत्ताधाऱ्यांची झोप उडवत होती.

केवळ विडंबनचित्रे देणारे मंथली शीट ऑफ कॅरिकेचर्स हे मासिक लंडनमध्ये टॉमस मॅक्लीनने १८३० मध्ये चालू केले तर १८४१ मध्ये हेन्री मेह्यूच्या पंच जवळजवळ १५० वर्षा चालून बंद झाले. या दीर्घ कारकीर्दीत पंचने समाजाच्या विविध थरांतील अगणित विडंबनचित्रे प्रसिद्ध केली आणि असंख्य चित्रकार प्रकाशात आणले. जॉन टेनिएल (१८२०-१९१४), हॅरी फर्निस (१८५४-१९२५) आदींपासून सुरू झालेल्या या परंपरेत अलीकडील काळातील रोनाल्ड सर्ल, इलिंगवर्थ, शेरिफ, हेवीसन इ. चित्रकारांचा समावेश होतो.

 


१९३० च्या आसपास केवळ साहित्यिक आणि कलावंत या वर्गापुरतेच आपल्या विडंबनचित्रांचे क्षेत्र मर्यादित केलेल्या⇨मॅक्स बीअरबोम (१८७२-१९५६) या इंग्रज साहित्यिक चित्रकाराने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने आपल्या नावाचा कायमचा ठसा उमटवला आहे. आपल्या राजकीय टीकाचित्रांनी विसाव्या शतकाचा अर्धा खंड गाजवणाऱ्या ⇨डेव्हिड लो (१८९१-१९६३) या व्यंग्यचित्रकाराने रेखाटलेली तत्कालीन राजकारणी, समाजकार्यकर्ते, साहित्यिक, कलावंत वगैरेंची अगणित विडंबनचित्रे विलक्षण प्रत्ययकारी आहेत.

कोणत्याही व्यंगचित्रात विडंबनचित्र हे अंतर्भुत असतेच हे खरे असले, तरी स्वतंत्र कलाप्रकार म्हणून विडंबनचित्राला स्वतंत्र अस्तित्व आहेच. पण आजकाल निव्वळ विडंबनाचित्रांचे क्षेत्र निवडणाऱ्यांची संख्या अत्यल्पच आहे.

अमेरिकेमध्ये तर डेव्हिड लेव्हिनसारखे काही अपवाद वगळल्यास बहुतेक व्यंगचित्रकार विडंबनचित्राचा वापर राजकीय टीकाचित्राचा हिंस्र धारदार भाग म्हणूनच करताना दिसतात. अमेरिकन यादवी युद्धाच्या काळात गाजलेल्या टॉमस नॅस्ट (१८४०-१९०२) या व्यंगचित्रकाराच्या हॉर्पर्स वीकलीमधून प्रसिद्ध झालेल्या विडंबनचित्रांत न्यूयॉर्कमधील तत्कालीन राजकारणयांच्या भ्रष्ट कारभाराचे औपरोधिक चित्रण एवढे मेदक व तिखट होते, की अशी चित्रे थांबवावित म्हणून नॅस्टला धमक्या देण्यात आल्या, तसेच लाच देण्याचे आभिषही दाखविण्यात आले. ऑस्कर सेझार, हर्बर्ट ब्लॉक, फिटसपॅट्रिक, जॉन फिशेरी इ. विद्यमान व्यंगचित्रकारकांच्या चित्रांतही विडबंनचित्र हे तेवढेच महत्त्वाचा भाग असते आणि आक्रमक हत्यार म्हणून वापरलेले असते.

तुलनेने मराठीतील व्यंगचित्रांची परंपरा अल्पकालीन म्हणजे फक्त शंभर वर्षाची आहे. आणि ब्रिटिशांच्या संपर्कामुळे इंग्रजीच्या प्रभावाखाली वाढलेली आहे. सुमारे १९०० च्या आसपास ठाण्याहून निघणाऱ्या हिंदू पंचमधून आणि नंतर १९३० च्या आसपासस निघणाऱ्या अनंत हरी गद्रे यांच्या निर्भीड साप्ताहिकातून तत्कालीन प्रसिद्ध पुरुषांची विडंबनचित्रे प्रसिद्ध होते. पण चित्रण आणि दृष्टिकोण या दोन्ही अंगांनी ती ढोबळ, बटबटीत आणि प्राथमिक अवस्थेतील होती. १९४० नंतर दीनानाथ दलाल व पुढे बाळ ठाकरे यांनी मराठीतील विडंबनचित्रांना परकीय चित्रांशी तुलनीय दर्जा प्राप्त करून दिला. वसंत सरवटे यांची साहित्यिक-प्रकाशकांची विडंबनचित्रे चित्रविषयाच्या माणूस आणि साहित्यिक अशा संयुक्त व्यक्तिंत्त्वाकडे खेळकर दृष्टीने पहाण्याचा प्रत्यय देतात. प्रभाकर भाटलेकरांनी विडंबनचित्रांपुरते आपल्या कामाचे क्षेत्र मर्यादित केलेले आहे.

सरवटे, वसंत