विडंबन: एखादी प्रसिद्ध साहित्यकृती वा साहित्यप्रकार वा रुपबंध याच्या भाषिक, घाटात्मक अगर वाङ्मयीन संकेतांचे अनुकरण, तसेच एखाद्या प्रसिद्ध साहित्यिकाच्या भाषिक अगर तांत्रिक लकबीचे अनुकरण विडंबन या प्रकारात केले जाते. हे विडंबन सहेतुक व बहुशःविनोद उपहास अगर व्यंजना या अभिव्यक्तीच्या अंगांनी साधलेले असते. विडंबनाचे सम्यक आकलन ते ज्या मूळ साहित्यकृतीचे अनुकरण करते, ती चांगली अवगत असणाऱ्यालाच होते. या अर्थाने विडंबन हा परपुष्ट लेखनप्रकार आहे. मूळ साहित्यकृतीचे अनुकरण करते, ती चांगली अवगत असणाऱ्यालाच होते. या अर्थाने विडंबन हा परपुष्ट लेखनप्रकार आहे. मूळ साहित्यकृती (जिला ‘विडंबित’ म्हणता येईल) बहुधा गंभीर आशय व्यक्त करणारी असते. तसेच काही विशिष्ट अलंकार, संकेत अगर शैलीच्या लकबींचा त्यात अतिरेक दिसून येतो. विडंबिताच्या सौंदर्यात्मक व नीतिमूल्यात्मक गृहीतकांना आव्हान देणे, त्यांचा प्रतिवाद करणे, अगर विडंबनाद्वारे मूळ साहित्यकृतीतील काव्यदोष वा साहित्यदोष अतिशयोक्त स्वरूपात मांडून वाचकाती तत्संबद्ध अभिरुची सजग करणे, हे विडंबनाचे काही प्रमुख हेतू होत. गंभीर आशय व्यक्त करणारे विडंबित (उदा., महाकाव्य, ऐतिहासिक नाटक, वीरकथा इ.) याच्या विडंबनाचे प्रामुख्याने तीन प्रकार दिसून येतात. वर्ण्य विषय व शैली यांत हेतुतः विसंगती आणून-(१) गंभीर वर्ण्य विषय व क्षुल्लक शैली यांची सांगड घातली जाते, याउलट (२) क्षुल्लक विषय गंभीर शैली यांची सांगड आणि (३) गंभीर व क्षुल्लक शैलींची हेतुतः केलेली सरमिसळ हा तिसरा व प्रत्यक्षात अधिक विपुलतेने आढळणारा प्रकार म्हणता येईल. कारण पहिले दोन प्रकार अधिक विस्ताराने हाताळणे अवघड असते.
विडंबन म्हणजे गंभीर वर्ण्य विषयाची, तसेच आदरणीय साहित्यिक अगर साहित्यकृती यांची टवाळी असा सर्वसाधारण समज आहे. पण टवाळी अगर निरागस विनोद म्हटला तरी या गोष्टी साधणे हा विडंबनाचा एकमेव हेतू नाही. हास्य हा पुष्कळशा यशस्वी विडंबनांत प्रारंभबिंदू असतो. पण याद्वारे विडंबनकाराला साध्य करावयाची असते ती जीवनाची समीक्षा. विडंबित ज्या कालखंडाचे व समाजाचे प्रतिनिधित्व करते त्यांना आणि विडंबनकार ज्या कालखंड-समाजाचा घटक आहे त्यांना तुलनात्मक दृष्ट्या एकत्र आणून दोन सौंदर्यात्मक व नीतिमूल्यात्मक संकल्पना-व्यवस्थांचा तौलनिक वेढ घेणे आणि त्यातील एक (पुष्कळदा विडंबितामध्ये प्रतिबिंबित झालेली) संकल्पना-व्यवस्था मानदंडरूप मानून विडंबनकाराच्या कालखंडाची व समाजाची समीक्षा करणे, ही विडंबनाची प्रमुख प्रेरणा आहे. विडंबनकार हा एका विशिष्ट अर्थाने उपरोधकार असतो. उपरोधकार हा मूलतः नीतिनिष्ठ असतो. जीवनाकील अमंगल, असुंदर व दुरितमय यांच्यावर तो शाब्दिक हल्ला चढवतो. या लक्ष्यांच्या गांभीर्यानुसार छटा बदलणारा विनोद हे उपरोधकाराचे शस्त्र असते. विडंबनकाराचे लक्ष्य हे व्यापक दृष्ट्या सामाजिक अमंगल-असुंदर न राहता साहित्यातील त्यांच्या आविष्कारापुरते सीमित होते. जीवनातील सत्य, शिव व सुंदर साहित्यात प्रतिबिंबित व्हावे अशी अपेक्षा असते पण प्रत्यक्षात त्यांना विरोधी अशा प्रवृत्तीसुद्धा साहित्यात घुसू शकतात. त्यांपासून साहित्याचे संरक्षण व्हावे अशी विडंबनकारची तीव्र प्रेरणा असते. त्या अर्थाने समाजाच्या अभिरुचीचा तो रक्षक आहे. सारासारविचार व औचित्यविवेक हे विडंबनाच्या केंद्रस्थानी असतात.
विडंबनाला समानार्थक असा पाश्चात्य वाङ्मयातील ‘पॅरीड’ हा कालौधात विकसित झालेला लोकप्रिय लेखनप्रकार असून तो वाङ्मयप्रकार व लेखनतंत्र अशा दोन्ही स्वरूपांत आढळतो. ‘पॅरडी’ या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ-‘च्याबरोबर गाइले जाणारे गीत’. गंभीर आशय-शैलीतील काव्य-नाटक प्रकारांच्या बरोबरीनेच, त्या प्रकारामुळे निर्माण होणाऱ्या भावनिक ताणाचे विसर्जन करणारे, जीवनाच्या उदात्त-गंभीर-करूण दर्शनाच्या जोडीने त्यातील विसंगत, अनुदात्त अगर विदूषकी अंगांकडे रसिकांचे लक्ष वेधून एक बृहद व सम्यक साहित्यानुभव देणे, पॅरडीच्या मूळ अर्थातच स्पष्ट होते. एका बाजूने गंभीर वाङ्मयात सातत्याने होत असलेल्या, वर्ण्य विषय व शैली या दोन्हींच्या गंभीर पातळीवर संचारामुळे अनुभवास येणारा एकसुरीपणा टाळणे हे कार्य टाळणे हे कार्य पाश्चात्त्य विडंबन करीत आले, तर दुसऱ्या बाजूला विडंबनकाराच्या समाजाची जीवनमुल्ये व नीतिसौंदर्यविषयक गृहितके यांना पूर्वसूरींच्या आदर्शवादी वाङ्मयातील मानदंडाद्वारे आव्हान देणे, हे महत्त्वाचटे कार्यही या साहित्यप्रकाराने केले.
प्राचीन ग्रीक नाटककार ⇨ॲरस्टोफेनीसच्या (सु.४४८ ते ३८० इ. स. पू.) फ्रॉग्ज (इ. स. पू. ४०५) या नाटकात एक्सिकल व युरिपिडीझ या ग्रीक नाटकारांच्या शोकांतिकांचे विडंबन आहे. प्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोनेही (सु. ४२८ ते सु. ३४८ इ. स. पू.) त्याच्या ‘सिंपोझियम’ या संवादात जॉर्जियस या त्या काळाच्या प्रसिद्ध वक्त्याच्या वक्तृत्वशैलीचे विडंबन केले आहे. द बॅट्ल ऑफ फ्रॉग्ज अँड माउस हे होमरच्या महाकाव्याचे विडंबनही प्रसिद्ध आहे.
रोमन काळातील ‘लो कॉमेडी’ या नाट्यप्रकारात शोकात्म शैलीचे विडंबन आढळते. उदा., ⇨प्लॉटस (सु. २५४ ते १८४ इ. स. पू.) या सुखात्मिकाकाराच्या अँफिट्रिऑन या नाटकाचे प्रवेशक.
मध्ययुगीन कालखंड हा विनोद व विडंबन या दोन्ही दृष्टींनी क्षीण होता. तथापि प्रबोधनकाळात या दोन्ही प्रकारांचे पुनरुज्जीवन झाले. इरॅस्मसचे इन प्रेज ऑफ फॉली (१५०९) या धर्मगुरू व चर्च यांच्यावरील उपहासिकेत तसेच राब्लेच्या पाँताग्रुएल (१५३२) व गार्गात्वा (१५३४) या विनोदी कादंबऱ्यातील विडंबनाचा भाग लेखनतंत्र म्हणून महत्त्वाचा आहे. स्पॅनिश लेखक सरव्हँटिझची डॉन क्किक्झोट (प्रथम भाग १६०५, द्वितीय १६१५) ही विडंबनाचा लेखनतंत्र म्हणून विस्तापाने वापर करणारी महत्त्वाची कादंबरी मानली जाते.
इंग्लंडमध्ये सतराव्या शतकात ‘वीरविडंबन’ (मॉक झिरोइक) व बर्लेस्क या स्वरूपात विडंबन-वाङ्मयाला बहर आला. ⇨जॉन ड्रॉयडनची मॅक् फ्लेकनो (१६८२) ही वीरविडंबनात्मक काव्यकृती व अलेक्झांडर पोप रेप ऑफ द लॉक (१७१२) हे महाकाव्याच्या तंत्र-संकेताचे विडंबन करणारे काव्य या विडंबन करणारे काव्य या विडंबन-परंपरेतील विशेष उल्लेखनीय साहित्यकृती होत. हेन्री फिल्डिंगने सॅम्युएल रिचर्डसनच्या पामेला या कादंबरीवर आधारित जोसेफ अँड्रूज (१७४२) ही उपरोध-विडंबनात्मक कादंबरी लिहिली. तिने इंग्रजी कादंबरी वाङ्मयात एक नवा प्रवाह निर्माण केला. गद्य माध्यमातून लिहिलेले विनोदी महाकाव्य (कॉमिक एपिक पोएम इन प्रोज) असे या प्रकाराचे वर्णन केले जाते.
स्वच्छंदतावादी युगातही विडंबनकाव्याचा हा बहर टिकून राहिला. बायरनने व्हिजन ऑफ जज् मेंटमध्ये (१८२२) वर्ड् स्वर्थ, सदी या पहिल्या पिढीच्या रोमँटिक कवीचे विडंबन केले आहे तर टी. एल्. पीकॉकने नाइटमेअर ॲबेमध्ये (१८२२) त्यावेळी लोकप्रिय असलेल्या भयकादंबऱ्यांचे विडंबन केले आहे.
आधुनिक काळात विशुद्ध विडंबन-वाङ्मय काहीसे दुर्लक्षित झाले असेल, तरी विडंबनशैलीचा अगर तंत्राचा वापर अनेक विख्यात आधुनिक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतींत केलेला आढळून येतो. उदा., टी. एस्. एलियटचे वेस्ट लँड (१९२२) हे दार्घकाव्य व जेम्स जॉइसची यूलिसीझ (१९२२) ही कादंबरी यांत वाङ्मयीन संदर्भसूचकता (ॲलूझिवनेस) व तिरकसपणा (ऑब्लीकनेस) या तंत्रांत विडंबन अपरिहार्यपणे येते. विल्यम्स गोल्डिंगच्या लॉर्ड ऑफ द फ्लाइजमध्ये (१९५४) द कोरल आयलंड या व्हिक्टोरियन कादंबरीतील भोळसर आदर्शवादाचे व गोऱ्या वंशाबद्दलच्या सुप्त अहंभावाचे शोकात्म विडंबन केले आहे. पी. जी. वुडहाउससारख्या लोकप्रिय विनोदकाराच्या कथा-कादंबऱ्यांतून विडंबनतंत्राचा प्रभावी वापर केलेला दिसून येतो. अधिक सातत्याने आणि प्रामुख्याने विडंबनवाङ्मयात मोलाची भर घालणाऱ्या लेखकांत मॅक्स बीअरबोम (१८७२-१९५६) या इंग्रजी तसेच जेम्स थर्बर (१८९४-१९६१) व रॉबर्ट बेचर्ल या अमेरिकन लेखकांचा उल्लेख करता येईल.
भागवत, अरूण
मराठी विडंबन साहित्यामागे भारतीय व पाश्चात्य अशा दोन्ही परंपरा आहेत. मराठीमध्ये विडंबनपर काव्यलेखनास प्राचुर्याने आरंभ झाला, तो ⇨प्र. के. अत्रे यांच्या झेंडूची फुले (१९२५) या संग्रहाच्या प्रसिद्धीनंतर. त्याआधी एकोणिसाव्या शतकात मं. स. तेलंग यांनी संगीत हजामत या नावाचे एक लहानसे विडंबनपर नाटुकले प्रसिद्ध केले होते. सौमद्रातील ‘पांडु नृपति’ इ. पदांचे त्यात केलेले विडंबन बरेच लोकप्रिय झाले होते. ना. ग. लिमये यांनी मेघदूत या काव्याचे बल्लचदूत या नावाने एक बरेच दीर्घ विडंबनकाव्य १९२० च्या आधीच प्रकाशित केले होते. परंतु झेंडूच्या फुलांनी आधुनिक मराठी साहित्यात विडंबनकाव्याची एक परंपराच निर्माण केली. चं. ग. दीक्षित यांचे बांडगूळ व लोककवीमनमोहन यांचे शंखध्वनि ही विडंबनगीतांची पुस्तके १९३० नंतरची आहेत. काही काळ विडंबनकाव्य हे मासिक आणि साप्ताहिके यांचे एक ठरलेले सदर होऊन बसले होते.
गद्य वाङ्मयात चिं. वि. जोशी यांनी ‘चहाडखोर पोपट’ या कथेत बाणभट्टाच्या कादम्बरी या संस्कृतातील प्रसिद्ध कथेचे विडंबन केले आहे. माधवराव जोशी यांनी आपल्या नाटकतांतील पदांतून काही लोकप्रिय मराठी नाटकांतील पदांचे विडंबन केले आहे. पु. ल. देशपांडे यांचे ‘अंगुस्तान विद्यापीठ’ तसेच ‘शांभवी: एक घेणे’ या नाटिकेत पु. शि. रेग्यांच्या‘माधवी: एक देणे’ या काव्यात्म नाटिकेचे बहारदार विडंबन आहे. ‘सदू आणि दादू’ या त्यांच्या एकांकिकेत नवनाट्य-तंत्रांचे मार्मिक विडंबन आढळते. वि. आ. बुवा आणि बाळ गाडगीळ यांनीही विपुल विडंबन-लेखन केले आहे.
काही यशस्वी विडंबनकृतीच्या संदर्भात मराठी वाङ्मयातील विडंबनाची गुणवत्ता व वैविध्य यांची ओळख करून घेता येईल. ‘आम्ही कोण’ ही केशवसूतांची कविता हे काव्यप्रतिमा, कवीचे जीवनाचा भाष्याकार व दार्शनिक म्हणून स्थान व कार्य यांचे गुणगान करणारे गंभीर स्वरूपाचे सुनीत आहे तर आचार्य प्र. के. अत्रे यांनी केलेल्या त्याच शीर्षकाच्या सुनीतात-(अ) मूळ सुनीतातील बरेच शब्द तसेच ठेवून व (आ) समकालीन शब्दप्रयोग (जसे ‘फोटो’, ‘खलास’) मिसळून एक अनोख्या प्रकारची कलात्मक गल्लत साधली आहे. मूळ कवितेतील आक्रमकता ही कवीची खरी योग्यता आणि समाजाचे काव्याविषयीचे अज्ञान या पार्श्वभूमीवर खुलून दिसते, तर अत्र्यांच्या विडंबनात ‘दाताड वेंगाडूनी’ यांसारख्या शब्दप्रयोगामुळे आक्रमकतेऐवजी शिरवळपणा व ग्राम्यपणा सुचवला आहे. केशवसुतांच्या सुनीतात कवीला वगळल्यास विश्वरचनेलाच अर्थ उरणार नाही असे ठाम विधान आहे, तर अत्र्यांच्या विडंबनात साप्ताहिके आणि मासिके यांचा कवीवाचून शेवट होईल असे सुचवून, यांत्रिक युगात कविता स्थानभ्रष्ट होऊन तिचे उपभोग्य वस्तूत झालेले रूपांतर व मागणी तसा पुरवठा या परिस्थितीत पैसा व तत्कालिक प्रसिद्धी (तीही फोटोसारख्या काव्यबाह्य स्वरूपाची) यांसाठी हपापलेल्या क्षुद्र कवींचा झालेला सुकाळ या प्रकारांकडे लक्ष वेधले आहे. दोन्ही कविता एकत्र वाचल्यास कवींचे व काव्याचे समाजातील सार्वकालिक आदर्श स्थान व समकालीन परिस्थितीत दोन्हींचे झालेले अवमुल्यन यांचे विलक्षण नाट्यमय दर्शन घडते आणि ‘पॅरडी’च्या (-बरोबरीने गाइले जाणारे गीत) या संदर्भातील अन्वर्थकतेचे ओळख पटते आणि विडंबवाशिवाय साहित्यानुभवाला पूर्णत्व येत नाही, याचा प्रत्यय येतो. विडंवन – वाङ्मयाचे एक साहित्यप्रकार म्हणून स्थान व महत्त्व या कवितेतून स्पष्ट होते.
चिं. वि. जोशी यांची ‘चहाडखोर पोपट’ ही विडंबनकथा विडंबनाचे यशस्वी वाङ्मयीन तंत्र म्हणून विचारात घेता येईल. बाणभट्टाच्या मूळ कादम्बरीतील बोलक्या पोपटाचा संकेत, त्याचे हस्तांतर, त्या निमित्ताने विविध कथा व विविध व्यक्तींची ओळख, सामाजिक परिस्थितीचे दर्शन हे संकेत चिं. वि. जोशींच्या कथेत दिसतातच, तसेच कृत्रिम व बोजड भाषेतला वर्णनांचा अतिरेक हा वाङ्मयदोषही विर्देशित केलेला दिसतो. विषय व गंभीर शैलीच्या गल्लतीचे अनुपस्थितीत पत्नीवर पाळत ठेवण्यासाठी केलेली पोपटची योजना, त्यात बोलक्या पोपटासारख्या अपूर्व पक्ष्याचा क्षुद्र स्वार्थासाठी वापर करण्याची वणिक वृत्ती, पोपटानेही आपल्या स्थानाचा गैरफायदा घेऊन श्रेष्ठी पत्नीला दिलेला त्रास व तिने अखेर आपल्या बुद्धिचातुर्याने परिस्थितीवर केलेली मात अशा आशयाच्या रोचक कथेच्या वाचनातचा आनंदही वाचकाला या कथेत मिळतो. विडंबनकृती ही मूळ कृतीची टवाळी असली, तरी तो केवळ आरंभबिंदूचा असतो. काही विशिष्ट रसात्मक अनुभव (उदा., शृंगार, कारूण्य, अदभूत इ.) दणारी कादम्बरीसारख्या एका अभिजात साहित्याकृती चि. वि. जोशींसारखा भर्मज्ञ विद्वान पाहतो, तेव्हा त्याला या साहित्याकृतीत काही अपूर्व शक्यता आढळतात, त्या विडंबनात सर्जकतेने हाताळल्या जाऊन एक असे वेगळे कल्पित विश्व या कथेतून उभे राहते, की कादम्बरीतील रसानुभवापेक्षा भिन्न, विरोधी पण मूळ साहित्यानुवाची गोडी अनेकपटींनी वाढवणारा रसानुभव चि. वि. जोशींच्या कथेत प्रत्ययाला येतो. विडंबना हे मूळ साहित्यकृतीची टवाळी नसून प्रशस्ती आहे, या विधानाची सत्याता ‘चहाडखोर पोपट’ ही कथा पटवून देते.
गंभीर विषयास एकदा योजिलेली शब्द, वाक्य, वृत्त. शीर्षक इ. सामग्री क्षुद्र, हलक्या विषयास योजिलेल्या जसे एक प्रकारचे विडंबन होते, तसेच त्याच्या उलट गंभीर विषयांकरिता हलक्या विषयाची किंवा प्रकारची सामग्री योजिलेल्या दुसऱ्या उटल्या प्रकारचे विडंबन होऊ-शकते. मराठीमध्ये उपाध्ये यांच्या चालचलाऊ भगवद्गीता ही कविता याचे उत्तम उदाहरण आहे. गीतेच्या पहिल्या अध्यायात कृष्ण-अर्जुन यांचा संवाद आला आहे. कृष्ण अर्जुनास त्याच्या अवसानधातकीपणाबद्दल दोष देतो. चालचलाऊ गीतेत याचे विडंबन करताना कृष्णाची भाषा आजच्या फटकळ माणसात शोभणारी अशी त्यांनी घातली अर्जुनाचा धिक्कार करताना-‘तू बेट्या मूळचाच ढिला, मी यंव करीन आणि त्यंव करीन अशा वल्गना केल्यास आणि आता प्रत्यक्ष प्रसंग आल्यावर असा कसा ढेपाळलास’-अशा सुरात तो बोलतो आहे. त्यामुळे साहजिकच हास्यनिर्मिती होते. याला ‘पर्यस्त-विडंबना’ असे म्हणता येईल. पण अशी उदाहरणे अपवादभूतच आहेत.
विडंबनाचे पर्यवसान साधारणतः हास्यनिर्मि तीत व्हावयास पाहिजे. परंतु ते तसे न होता उपहासामध्ये होते, असेही काही वेळा आढळते. उदा. मर्ढेकराच्या कवितेतील पुढील ओळी: ‘जे न जन्मले वा मेले | त्यांसी म्हणे जो आपुले | तोचि मुत्सद्दी जाणावा | देव तेथे ओळखावा | मोले धाडी जो मराया | नाही आंसू आणि माया | त्यासि नेता बनवावे | आम्हा मेंढरासी ठावे |’-या पंक्तीमध्ये ‘जे का रंजले गांजले’ आणि ‘मोले घातले रडाया’ इ. जुन्या प्रसिद्ध अभंगांची आठवण स्वाभाविकपणे होते. विडंबनातील अनुकरणाचा भाग येथेही आहे परंतु त्यात हास्यनिर्मितीपेक्षा तिरस्कारव्यंजन वा उपहासच आहे. हास्य असेलच तर ते उपहासाचे द्योतक आहे, विशुद्ध विनोदाचे नव्हे. याला विडंबन म्हणावयाचे झाले, तर ते उपहासगर्भ विडंबन होईल. टर किंवा थट्टा यांपेक्षा ते साहजिकच अधिक तीव्र व गंभीर पर्यवसायी असेल.
विडंबर म्हणजे केवळ शुद्ध विनोदही नव्हे. ‘प्रेमाचा गुलकंद’ किंवा ‘प्रेमाचे अद्वैत’ या अत्रे यांच्या कविता विडंबने नव्हेत, तर त्या त्या विनोदी कविता आहेत. तसेच ‘बेगमेच्या विरहगीता’स तिचे उत्तर म्हणून काणेकरांनी लिहिलेली कविता हीही विडंबन नव्हे. कारण या कवितांत कोणत्याही मूळ कवितेचे अनुकरण नाही.
जोग, रा. श्री.
“