विजयानगर साम्राज्य: दक्षिण भारतातील मध्ययुगीन काळातील एक प्रसिद्ध साम्राज्य. इ. स. १३३६ मध्ये कर्नाटकातील विद्यमान बेल्लारी जिल्ह्यात होस्पेट तालुक्यातील ⇨हंपी (विजयामगर) येथे तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेस संगमाचे पुत्र ⇨पहिला हरिहर (कार. १३३६−५६), ⇨पहिला बुक्क (कार. १३५६−७७), मुद्दण, मारप्पा व कंपण या पाच बंधूंनी या राज्याची स्थापना केली. या बंधूंना विद्यारण्य म्हणजे ⇨माधवाचार्य (सु. १२९६−१३८६) स्वामींनी प्रेरणा दिली, अशी वदंता आहे. या साम्राज्याच्या विस्तार दक्षिणोत्तर बेळगावपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पूर्व-पश्चिम आंध्रपासून गोव्यापर्यंत झाला होता. तथापि विजयानगरचे आधिपत्य मानणाऱ्या राजांच्या प्रदेशांचा विचार केल्यास या साम्राज्याची सत्ता उत्तरेस नर्मदा नदीपर्यंत आणि पूर्वेस कटकपर्यंत (ओरिसा राज्य) भिडल्याची दिसते. सुमारे सव्वादोनशे वर्षे विजयानगरच्या सम्राटांनी अधिसत्ता टिकून होती. त्या काळात त्यांनी दक्षिणेत हिंदू संस्कृतीचे संवर्धन-प्रसार-प्रचार कार्य केले आणि दक्षिणेतील मस्लिम शाह्यांच्या राज्यविस्तारास पायबंद घातला. विजयनगर हंपी, पंपाक्षेत्र, होस्पेट इ. वेगवेगळ्या नावांनीही विजयानगरचा उल्लेख केल्याचे दिसून येते. इ. स. १३७३ च्या सुमारास विद्यानगरची (विजयानगर) सेना दक्षिण समुद्रापर्यंत पोहोचली. जवळजवळ दक्षिण हिंदुस्थानातील संपूर्ण प्रदेशावर या सेनेने दिग्विजय मिळविला. त्याप्रीत्यर्थ पहिल्या बुक्क राजाने ‘विद्यानगर’ या आपल्या नगरीचे नाव बदलून ‘विजयानगर’ असे ठेवले. तथापि स्थानिक लोक हंपी असाच याचा उल्लेख करतात.

ऐतिहासिक साधने: विजयानगरविषयी ऐतिहासिक साधनसामग्री विपुल प्रमाणात मिळते. तीत विविध प्रकारची नाणी (सोने, चांदी, तांबे), पुरातत्वीय अवशेष, विपुल ⇨कोरीव लेख तसेच ताम्रपट असून संगम, साळुव आणि तुळव वंशातील राजांची दानपत्रे आणि अज्ञापत्रे, परकीय प्रवाशांचे वृत्तांत वंशावळी व विशेष कार्याचीही विश्वसनीय माहिती मिळते. एक विश्लासार्ह साधन म्हणून या शिला लेखांना विशेष महत्त्व आहे. हे लेखसंग्रह (कॉपर्स ऑफ इन्स्क्रिप्शन) ॲन्युअल रिपोर्ट्‌स ऑफ एपिग्राफिया, आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे वार्षिक अहवाल, एपिग्राफिया कर्निटिका (खंड ३-१२), म्हैसूर इन्स्क्रिप्शन्स (खंड १ ला), म्हैसूर आर्किऑलॉजिकल रिपोर्ट्‌स, नेल्लोर डिस्ट्रिक्ट इन्स्क्रिंप्शन्स (खंड १−३), पुदुकोट्टईं स्टेट इम्स्किप्शन्स. साउथ इंडियन इन्स्क्रिप्शन्स (खंड ४−६) इत्यादींतून प्रसिद्ध झाले आहेत. यांशिवाय ⇨फिरिश्ता (१५५० ? – १६२३?), निजामुद्दिन व सय्यद अली तबातबा या फार्सी इतिहासकारांच्या अनुक्रमे गुलशन-इ-इन्नावहिनी, तबकास-इ-अकबरी आणि बुर्हान-इमआसिर या ग्रंथातून तत्संबंधीची माहिती मिळते. विजयानगर साम्राज्याला निकोले दी, काँ ती, फीगॅरॅदू, बार्बोसा, ⇨अब्दअल्-रझाक (१४१३−८२), पायीश, नूनीश इ. परकीय प्रवाशांनी आपल्या प्रवासवृत्तांतून तसेच पत्रे, दिनदर्शिका व अन्य वृत्तांत यांतून तत्कालीन राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थितीसंबंधी माहिती दिलेली आहे, यांशिवाय ⇨आदिलशाही, ⇨ निजामशाही, ⇨कुत्बशाही या शाह्यांतील तवारिखांतून विजयानगरसंबंधी काही महत्त्वाचे उल्लेख व तपशील उपलब्ध होतात.

विजयानगर साम्राज्य-विस्तार (सु. १४८५−१६०५)


तत्कालीन तेलुगू व संस्कृत साहित्यांतून विजयानगराच्या सांस्कृतीक प्रगतीची कल्पना येते. यांतील, विशेषतः ⇨सायणाचार्य (१३०२-८७) व माधवाचार्य यांच्या ग्रंथांतून, येथील राजांच्या शासनपद्धतीविषयी माहिती मिळते. कंपणाच्या पत्नीने मधुराविजयम् नावाचे काव्य लिहिले. ⇨कृष्णदेवराय (सु. १४८९−१५२९) याने आयुक्तमाल्यदा नावाचे तेलुगू भाषेत प्रबंध-काव्य लिहिले (१५११). वेंकट सेनापती अनंत यांच्या काकुस्थ-विजयम् या ग्रंथातून ऐतिहासिक सामाग्री मिळते. विजयानगराच्या दरबारात पोर्तुगीजांचा राजदूत असे आणि पोर्तुगीजांशी त्यांचे राजनैतिक संबधही होते. त्यामुळे पोर्तुगीज अहवालातून विजयानगरमधील काही घटनांचे तपशील मिळतात.

विजयानगरच्या राजांनी अनेक राजप्रासाद, किल्ले, मंदिरे आणि अन्य वास्तू बांधल्या. त्यापैकी काहींच्या अवशेषांवरून त्यांची वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक दृष्टी आणि वास्तूशिल्पशैली दृग्गोचर होते.

राजकीय स्थिती: तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात बहुतेक उत्तर हिंदुस्थानी दिल्लीच्या सुलतानांच्या अधिसत्तेखाली होता. देवगिरीचे यादव, द्वारसमुद्रचे होयसळ, वरंगळचे काकतीय आणि मदुराईचे पांड्य यांच्यामध्ये दक्षिण हिंदुस्थानची राजसत्ता विभागलेली होती. त्यांत आपसात नेहमीच संघर्ष व लढाया होत ⇨अल्लाउद्दीन खल्जी (कार. १२९६-१३१६) आणि त्याचा सेनापती मलिक काफूर यांच्या फौजांनी देवगिरी (१३०७), वरंगळ (१३१०), द्वारसमुद्र व मदुराई (१३११) अशा चारही हिंदू राजसत्तांचा पराभव केला. परिणामतः दक्षिण हिंदुस्थानातील हिंदू राजाची सत्ता संपुष्टात आली. यानंतर १३२० मध्ये दिल्लीच्या तख्तावर तुघलक घराणे आले.

कंपली हे बेल्लारी, धारवाड, रायचूर, अनंतपूर, शिमोगा व चितळदुर्ग या विद्यमान जिल्ह्यांचे मिळून दक्षिण भारतातील एक स्वतंत्र राज्य होते. ⇨मुहम्मद तुघलकाने १३२६ मधे ते जिंकून तेथील राजपुत्र व सरदार यांना कैद केले आणि इस्लाम धर्माची त्यांना दीक्षा दिली. त्यांत हरिहर व बुक्क हे संगमाचे दोन पुत्र होते. त्यांनी दिल्लीच्या सुलतानाचे दक्षिणेकडील प्रदेशाचे झालेले दुर्लक्ष आणि कंपलीमधील अनागोंदी यांचा फायदा घेऊन स्वधर्म स्वीकारून विजयानगर राज्याची स्थापना केली, असा सर्वसाधारण समज आहे. या संस्थापकांच्या उदयाबद्दल विद्वानांत मतैक्य नाही. काही इतिहासकार संगमाचे हे पुत्र मूळचे कर्नाटकातील होते, असे म्हणतात तर काहींच्या मते ते आंध्रप्रदेशातील असावेत फादर हेरास, बी. ए. सालेतोर व पी. बी. देसाई यांच्या मते ते कर्नाटकातील हिंदू सरदार असून होयसळ तिसरा वीर बल्लाळ याच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यासाठी ते लढले . के. ए. नीलकंठ शास्त्री, एन्. व्यंकटरमणय्या आणि वी. सूर्यनारायणराव यांच्या मते पे आंध्र प्रदेशातीलच होते. फार्सी कागदपत्रांतून आणि संस्कृत साधनातून हरिहर, बुक्क व इतर बंधू वरंगळ राज्यांच्या पदरी होते, अशीही माहिती मिळते. काकतीय राजधानीच्या पतनानंतर त्यांनी कंपलीच्या राजाची सेवा पत्करली. दिल्ली सुलतानाच्या फौजंनी कंपलिदेव याचा पराभव करून या संगमपुत्रांना कैद करून नेले आणि त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला लावला. त्यांची दक्षिणप्रांतावर अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. या सुमारास विद्यारण्य स्वामींशी त्यांची गाठ पडली. स्वामींच्या प्रभावामुळे त्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला आणि दिल्ली सुलतानाविरूद्ध बंड पुकारून विजयानगरची स्थापना केली. परंपरागत कथा, मुसलमान इतिहासकारांचे−जिया-उद्दीन बरनी व इसामी आणि तत्कलीन कोरीव लेख यांचा विचार केला असता वरील मताला बहुतेक इतिहासकार पुष्टी देतात.

विजयानगर येथे १३३६ ते १६४६ पर्यंत संगम, साळुव, तुळुत्र व आरवीडु या चार घराण्यांनी राज्य केले तथापि १५६५ च्या ⇨तालिकोटच्या लढाईनंतर विजयानगरचा वैभवकाळ संपला आणि हे साम्राज्य जवळजवळ संपुष्टात आले. या लढाईनंतर विजयानगरची राजधानी होऊन तेथे एक निराळे राजघराणे राज्य करू लागले.

संगम घराणे: (१३३६−१४८५). या घराण्यात पहिला हरिहर (कार. १३३६−५६) , पहिला बुक्क (कार. १३५६-७७), दुसरा हरिहर (कार. १३७७- १४०४), पहिला देवराय (कार. १४०६-२२), पहिला विजय (कार. १४२२-३०), दुसरा देवराय (कार. १४३०- ४६), दुसरा विजय उर्फ मल्लिकार्जुन (कार. १४४६- ६५)          आणि विरूपाक्ष (कार. १४६५-८५) हे प्रमुख राजे होऊम गेले. दुसऱ्या हरिहरानंतर त्याच्या मुलांत राजपदाकरिता संघर्ष सुरू झाला. त्यात पहिला विरूपाक्ष (कार. १४०४- ०५) याने वर्षभर व त्यानंतर मुलबागलचा सुभेदार दुसरा बुक्क (कार.१४०५-०६) याने वर्षभर कसाबसा राज्यकारभार केला. होयसळ राजे व संगम राजे यांच्या मध्ये वैवाहिक संबंध होत असत. हरिहराने होयसळ राज्याच्या उत्तर भागावर प्रथम आपले वर्चस्व बसविले बारकूर आणि बादामी येथे किल्ले बांधले. आपल्या भावंडांनाच वेगवेगळ्या प्रदेशांवर प्रांताधिकारी म्हणून नेमले. नेल्लोर प्रदेशावर कंपण, मले राज्यावर मारप्पा आणि मुलबागल प्रदेशावर मुद्दप्पा यांची नेमणूक केली. १३४५ पासून बुक्क हा हरिहराबरोबर राज्यकारभार पाहू लागला. हरिहराने राज्याची शासनव्यवस्था नीट बसविली. १३४६ मध्ये हरिहराने श्रृंगेरीचेजगदगुरू भारतीतीर्थ यांना देणगी दिली.

हरिहरानंतर त्याचा धाकटा भाऊ पहिला बुक्क गादीवर आला. बुक्कने राज्याचा विस्तार करून राजनारायण संबुरायाचा पराभव केला आणि अर्काट प्रदेश काबीज केला तसेच कोंडविडू रेड्डींवर विजय मिळवून पेनुकोंडे (पेनुगोंडे) हा प्रदेश हस्तगत केला. त्याचा मुलगा कुमार कंपण याच्या विजयामुळे मदुराईच्या सुलतानाचे राज्य विजयानगर साम्रज्यात विलीन झाले. या घटनेचे कंपणाची पत्नी गंगादेवी हिने आपल्या मधुरविजयम् या संस्कृत काव्यात सुरेख वर्णन केले आहे. रामेश्वरपर्यंतचा दक्षिण हिंदुस्थान विजयानगरच्या अधिपत्याखाली आला. हरिहराच्या काळापासून बहमनी आणि विजयानगर या राजकीय प्रभाव खूपच वाढला. गोवा बुक्कच्या आधीन होते. मलबार आणि श्रीलंका येथील राजांनी त्याला खंडण्या पाठविल्या. १३७४ मध्ये बुक्कने चीनमधील मिंग राजाकडे आपला राजदूत पाठवला होता. या काळात तुंगभद्रेच्या दक्षिणेस विजयानगरचे पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले. बुक्क हा या साम्राज्यातील सर्वश्रेष्ठ राजा मानला जातो. तो पराक्रमी, कल्पक व सर्व धर्माबद्दल समान दृष्टी असणारा सहिष्णू वृत्तीचा राजा होता. वैदिक धर्माचा पुन्नरूजीवनासाठी त्याने पुष्कळ प्रयत्न केले. त्याने ‘वेदमार्गप्रतिष्ठापक’ हे विरूद धारण केले आणि अनेक विद्वानांना आश्रय दिला. आपले गुरू माधवाचार्य आणि त्यांचे बंधू सायणचार्य यांच्याकडून त्याने वेदावरील भाष्ये लिहून घेतली. विजयानगरच्या साम्राज्याचा तोच खरा शिल्पकार मानण्यात येतो.त्याने आपल्या राजधानीचे ‘विजयानगर’ असे नामकरण केले.


दुसरा हरिहर हा पहिल्या बुक्कच्या गौरांविका या पट्टराणीचा मुलगा. सुरूवातीला कोकण आणि तमिळ प्रांत यांतील लोकांनी बंड केले पण विरूपाक्ष या मुलाने ते मोडून काढले, हरिहराने चेऊलपर्यंत (चौल) आपल्या राज्याचा विस्तार केला. आंध्र प्रदेशात उदयगिरी किल्ला व पानगळ हस्तगत केले. बुक्क याच्या काळात वेदावरील टीका लिहिण्याचे काम सुरू होऊन दुसरा हरिहर याच्या काळात ते पूर्ण झाले. त्या निमित्ताने त्याने ‘वैदिकमार्गस्थापनाचार्य’ असा किताब धारण केला. ‘महाराजाधिराज’, ‘राजपरमेश्वर’ वैगरे पदव्यादेखील त्याने धारण केल्या होत्या.त्याच्या कारकीर्दीत विजयानगर साम्राज्याचा बराच विस्तार होऊन त्यात म्हैसूर, मंगळूर (मंगलोर), त्रिचीनापल्ली, कांची हे भाग समाविष्ट झाले होते पण रायचूर, दुआव या प्रदेशासाठी फिरोझशाह बहमनीबरोबर त्याचे युद्ध होऊन त्यात दुसरा हरिहर याचा पराभव झाला तथापि त्याची शेवचची वर्षे शांततेत गेली. त्यांच्या वेळी विजयानगरचे साम्राज्य चारही बाजूंनी वाढले. राज्यातील बंदरातून युरोप आणि आशिया खंडातील देशातून संपत्तीचा ओघ येऊ लागला. त्याचे मुलगे-विरूपाक्ष, इम्मडी, बुक्क व देवराय-हे अनुक्रमे तमिळ, आरग आणि उदयगिरी या प्रांतांवर सुभेदार होते. त्याने वैदिक धर्माचा दक्षिणेत प्रसार केला. नेल्लोर दानपत्रात त्याला ‘वैदिक मार्गस्थापनाचार्य’, ‘धर्मधुरीण’ वगैरे पदव्या दिलेल्या आढळतात. दुसऱ्या हरिहराच्या मृत्यूनंतर विरूपाक्ष याने एक वर्ष व दुसरा बुक्क याने पुढे सु. वर्षभर राज्य केले. नंतर पहिला देवराय बुक्कला पदच्युत करून गादीवर बसला. त्याच्या कारकीर्दीत निकोलो दी काँती या इटालियन प्रवाशाने विजयानगराला भेट दिली. त्याच्या प्रवासवृत्तांतातून पहिल्या देवरायाच्या कारकीर्दीविषयी माहिती मिळते. हा हरिहाच्या मेलांबिका राणीचा मुलगा असून त्याची बहुतेक सर्व कारकीर्द बहमनी सुलतान, राचकोंडचे वेलमा आणि कोंडविडूचे रेड्डी यांच्याशी लढण्यात गेली तरीसुद्धा त्याने समर्थपणे आपले राज्य टिकवले व अंशतः वाढविले. त्याने अनेक मंदिरेही बांधली.

दुसरा देवराय हा संगम वंशातील सर्वात पराक्रमी राजा. त्याने तीन वेळा आंध्रच्या गजपती राजाचा पराभव केला. दक्षिणेतील क्किलॉनच्या आसपासचा प्रदेश त्याने आपल्या साम्राज्यात समाविष्ट केला होता. सिलोन (श्रीलंका) तसेच ब्रह्मदेशाच्या (म्यानमार) राजांकडून त्याने खंडणी वसूल केली. १४४३ मध्ये इराणचा राजदूत अब्द-अल् रझाक याने विजयानगरला भेट दिली आणि तेथील वैभव पाहून तो थक्कच झाला. ‘‘असे शहर डोळ्यांनी कधी पाहिले नाही आणि दुसरे या तोडीचे शहर असलेले कानांनी कधी ऐकले नाही’’ अशा शब्दांत त्याने विजयानगरचे वैभव वर्णन केले आहे. दुसरा देवराय याच्यावर काही आपत्ती आल्या होत्या. त्याच्या एका भावाने राजा, राजपुत्र व सरदार यांना भोजनास बोलावून त्यांची हत्त्या करण्याचे ठरविले. सुदैवाने राजा उपस्थित नव्हता म्हणून वाचला पण सूज्ञ मंत्रिगणांची हत्या झाली. विश्वासघातकी भावाला पकडण्यात आले. ही संधी घेऊन दुसरा अलाउद्दीन बहमनीशाह याने विजयानगराकडे सात लक्ष वराहचलन (नाणी) मागितले आणि न दिल्यास आक्रमणाची धमकी दिली. अखेर युद्ध होऊन त्यात देवराय विजयी झाला. देवरायाच्या मृत्यूच्या वेळी त्याच्या राज्याच्या विस्तार कृष्णा नदीपासून श्रीलंकेपर्यंत व पश्चिम समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत झाला होता.

दुसऱ्या देवरायानंतर त्याचा धाकटा भाऊ दुसरा विजय किंवा प्रतापदेवराय गादीवर आला. त्याने भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी काही उपाय योजले पण अल्पावधीतच दुसऱ्या देवरायाचा मुलगा मल्लिकार्जुन हा गादीवर आला. ‘मुम्मडी देवराय’ या नावाने तो प्रसिद्ध आहे. तो दुर्बल होता तथापि ओरिसाचा गजपती आणि बहमनी सुलतान यांच्या संयुक्त स्वारीला त्याने धिमेपणाने तोंड दिले. पुढे कोंडवीहू आणि उदयगिरी हे महत्त्वाचे प्रदेश विजयानगराला गमवावे लागले. याचा फायदा घेऊन दु सऱ्या देवरायाचा पुतण्या विरूपाक्ष याने राजा व त्याच्या नातेवाईकांना ठार मारले आणि सिंहासन बळकाविले. हा संगम वंशातील शेवटचा राजा अकार्यक्षम ठरला त्याच्या कारकीर्दींत राज्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. कोकण, गोवा, कर्नाटकचा काही भाग हे प्रदेश त्याला गमवावे लागले. त्याच्या कारकीर्दीत परदेशी व्यापार बंद पडला. अखेरीस विरूपाक्षाचा त्याच्या मुलाकडूनच खून झाला. आणि चंद्रगिरीचा प्रांताधिकारी नरसिंह साळुवा याने राजसत्ता आपल्या हातात घेतली.

साळुव घराणे: (१४८५−१५०३). या घराण्यातील नरसिंह साळुव हा पहिला ज्ञात राजा असून त्याने गजपती राजकडून उदयगिरी आणि कोंडविडू हे प्रदेश जिंकून घेतले. साळुव नरसिंह १४९० मध्ये मरण पावला. त्याने अरबी व्यापाऱ्यांकडून उत्तम घोडे घेऊन आपले सैन्य सुसज्ज केले. मुसलमानांपासून संरक्षण करण्यासाठी त्याने गादी बळकाविली होती. त्यामुळे त्याचे हे कृत्यसमर्थनीयठरले. त्याचे मुलगे लहान असल्यामुळे त्याने नरसा नायक (कार. १४९०-१५०३) यास पालनकर्ता कारभारी नेमले.

तुळुव व आरधीडु घराणे: (१५०४−१६४६). तुळुव घराणे विजयानगराच्या इतिहासातील सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने प्रसिद्ध आहे. नरसा नायक हा या वंशातील पहिला राजा. त्याने साळुव नरसिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा तिम्म याला गादीवर बसविले. नरसा नायकाने चेर, चोल, पांड्या व दक्षिणेतील इतर राजे यांना नमवून गजपतीचा पराभव केला आणि आदिलखानाला कैद केले. राचयूर व मुदगल हे किल्ले जिंकले. अंतर्गत वंडाळी मोडून काढून दक्षिण भारतातीस प्रदेश (सांप्रतची कर्नाटक व तमिळनाडू ही राज्ये) आपल्या सत्तेखाली आणले. त्यामुळे विजयानगरच्या पूर्वीच्या सीमा कायम झाल्या व त्यास वैभव प्राप्त झाले. नरसा नायकानंतर त्याच्या मुलगा दुसरा नरसिंह (वीर नरसिंह)-(कार. १५३०-०९) गादीवर आला. तो पराक्रमी होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ कृष्णदेवराय (कार. १५०९-२९) हा विजयानगरचा राजा झाला.

कृष्णदेवराय हा तुळुव वंशाचा राजा होता म्हणून याच्याबरोबर तुळुव वंशाचे राज्य सुरू झाले, असे मानले जाते. कृष्णदेवराय हा दक्षिण भारतातील अत्यंत कर्तृत्ववान असा राजा होऊन गेला. एक कुशल प्रशासक, शूर योद्धा आणि गाढा विद्वान म्हणून त्याची ख्याती होती. धर्माधता व भोदभाव यांना त्याच्या ठायी अजिबात स्थान नव्हते. कृष्णदेवरायाच्या काळात विजयानगर साम्राज्य वैभवाच्या ऐन शिखरावर पोहोचले होते. त्याने ओरिसाच्या गजपती राजाबरोबर युद्ध करून उदयगिरी, कोंडविडू, सिंहाचलम् जिंकून जवळजवळ विद्यमान आंध्र प्रदेश आपल्या राज्यास जोडला. ही स्वारी लष्करी डावपेचांच्या दृष्टीने एक चिरस्मरणीय ऐतिहासिक घटना मानली जाते. त्यानेतर नागार्जुनकोंडा, बेझवाडा, कोंडापल्ली, तेलंगण आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून पोतनूर येथे त्याने आपला विजयस्तंभ रोवला. शेवटी कृष्णदेवरायाने ओरिसाच्या कटक राजधानीला वेढा दिल्यावर गजपती राजा प्रतापरुद्र याने कृष्णदेवरायाबरोबर तह करून जगन्मोहिनी ही आपली कन्या त्यास देऊन या विवाहाने संबंध जोडले.

उत्तरेत कृष्णदेवरायाने आदिलशाहाचा रायचूर दुआब घेऊन, दक्षिणेतील मंगळूर व उम्मत्तूर राज्यांतील शिवसमुद्रम् हे भाग काबीज केले. त्याने गुलबर्ग्याला जाऊन कैदेत असलेल्या बहमनी सुलमान महमूदशाहाची सुटका केली व त्याला गुलबर्ग्याच्या गादीवर बसवून स्वतः ‘यवन-राज्य-स्थापनाचार्य’ हा किताब धारण केला. पोर्तुगीजांबरोबर कृष्णदेवरायाचे संबंध काही किरकोळ संघर्ष वगळता सलोख्याचे होते. त्याने पोर्तुगीज वास्तुविशारदांच्या मदतीने विजयानगरच्या आसपास कालवे खोदून तळी बांधली आणि कोरडवाहू जमीन पाण्याखाली आणली. त्याने अनेक प्रासाद, मंदिरे व शेकडो गोपुरे बांधली. त्यांपैकी रामस्वामी मंदिराचा विस्तार, विरूपाक्ष मंदिरातील कल्याणमंडप आणि एक शिखर, कृष्णस्वामी आणि विठ्ठलस्वामी ही दोन स्वतंत्र मंदिरे प्रसिद्ध आहेत. त्याने नरसिंहाची भव्य मूर्ती करवून घेऊन विजयानगरच्या सौंदर्यात भर घातली.


कृष्णदेवराय हा स्वतः विद्वान असल्यामुळे विद्वानांचा तो आश्रयदाता होता. त्याने स्वतःआमुक्तमाल्यदा (तेलुगू), मंदालसाचरित्र, सकल कथासारसंग्रहम्, ज्ञानचिंतामणि, जांबवती-परिणाम (संस्कृत) इ. ग्रंथरचना केल्या. त्याच्या दरबारत आठ महाकवी होते. त्यांना अष्टदिग्गज म्हणत. ⇨तेनाली रामकृष्ण (सु. १४९५-सु. १५६५) ही तेलुगू महाकवी त्यांच्यापैकीच एक होता. कृष्णदेवराय कर्तबगार व सर्वश्रेष्ठ राजा मानला जातो. त्याची प्रशंसा नूनीश, पायीश, बार्बोसा इ. पोर्तुगीज प्रवाशांनी केली आहे.

कृष्णदेवरायाच्या मृत्यूनंतर त्याचा सावत्र भाऊ अच्युत देवराय (कार. १५२९-४२) गादीवर आला. तो विशेष कर्तबगार नव्हता. त्याचा मेहुणा तिरुमल हाच सर्व कारभार पाहात असे. अच्युत देवरायाच्या कारकीर्दीत नायक राजे स्वतंत्र झाले आणि सलतानांनी रायचूर व मुदगल हे प्रदेश बळकाविले. याशिवाय अंतर्गत कलहाला सुरुवात झाली. कृष्णदेवरायाच्या विधवा राणीने रामराजा (आरवीडु रामराय) या जावयाची बाजू घेऊन त्यास राजधानीवर ससैन्य पाठविले पण तिरुमलाने त्याचा पराभव केला. अच्युताच्या मृत्यूनंतर वेंकट हा त्याचा मुलगा गादीवर आला. तिरुमलाने गादीसाठी त्याचा खून केला परंतु रामराजाने तिरुमलाचा पराभव करून कृष्णदेवरायाचा सावत्र भाऊ रंगराय याचा मुलगा सदाशिवराय (कार. १५४२-६५) यास सर्व पक्षांच्या संमतीने गादीवर बसविले. सदाशिवराय हा या घराण्यातील शेवटचा राजा तो लहान असल्यामुळे रामराजा हा सेनापतीच खरा सत्ताधारी होता. त्याने आपला भाऊ तिरुमल याला मुख्य प्रधान केले आणि वेकटाद्री या भावास सेनापती नेमले. यावेळी मुस्लिम शाह्यांत आपसांत संघर्ष सुरू होता. आदिलशाह व कुत्बशाह यांचे काही प्रदेश रामराजाने घेतले, तेव्हा ते खवळले, तसेच निजामशाहचा मुलूख घेऊन त्याला शरण आणले. परिणामतः या सर्वांनी एकजूट करून रामराजावर स्वारीचा बेत आखला. तिचेच रूपांतर १५६५ च्या तालिकोटच्या भीषण लढाईत झाले. राजकीय कारणांमुळे मुख्यतः ही लढाई झाली. हल्लीच्या विजापूर जिल्ह्यात रक्कसगी व तंगडगी या गावांदरम्यान ही लढाई झाली. तीत विजयानगर विरुद्ध विजापूरचा आदिलशाह, अहमदनगरचा हुसेन निजामशाह, बीदरचा अली बरीदशाह आणि गोवळकोंड्याचा इब्राहिम कुत्बशाह यांनी भाग घेतला. या लढा ईत विजयानगरच्या फौजेचा दारुण पराभव होऊन रामराजाला पकडून ठार मारण्यात आले. चारही शाह्यांमध्ये हुसेन निजामशाहचे वर्चस्व होते. रामराजाबरोबर त्याचा भाऊ वेंकटाद्रीही मारला गेला. त्याचा तिसरा भाऊ तिरुमलराय हा पळून गेला. त्याने नंतर पेनुकोंडे येथून राज्य करण्यास प्रारंभ केला. विजयानगरला कोणीच वाली उरला नसल्यामुळे कितीतरी महिने त्याची लूट चालूच होती. एकेकाळी अत्यंत वैभवसंपन्न असलेले हे नगर काही महिन्यांतच बेचिराक झाले.

तिरुमलरायानंतर त्याचे दोन पुत्र अनुक्रमे दुसरा श्रीरंग आणि दुसरा वेंकट हे गादीवर आले. वेंकट हा या वंशातील शेवटचा महत्त्वाचा राजा होय. त्याने दक्षिण भारतात आपल्या राज्याचा विस्तार केला. श्रीरंगाच्या कारकीर्दीत पेनुकोंड्याहून चंद्रगिरीला राजधानीचे स्थलांतर झाले. पुढे काही वर्षांनंतर वेल्लोर ही विजयानगरची राजधानी करण्यात आली. विजापूर आणि गोवळकोंडा यांच्या फौजांनी १६४६ मध्ये या वंशाचा अखेरचा राजा चौथा श्रीरंग याचा पूर्ण पराभव केला. परिणामतः विजयानगर साम्राज्य अस्तंगत पावले. त्याच वर्षी ⇨छ. शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. हिंदुसत्ता विजयानगरमध्ये लोप पावून जणू काही ती महाराष्ट्रात पुनरुज्जीवितच झाली.

विजयानगरच्या साम्राज्याने दक्षिण भारतातील मुसलमानी आक्रमणाला पायबंद घालण्यात यश मिळविले. सुमारे ३०० वर्षे या साम्राज्याने दक्षिणेत हिंदू संस्कृतीचे व हिंदू धर्माचे कर्तव्यनिष्ठेने संवर्धन आणि रक्षण केले. संगम वंशातील हरिहर व बुक्क यांनी या साम्राज्याचा पाय घातल्यानंतर पुढे बुक्क, दुसरा देवराय आणि कृष्णदेवराय या राजांनी साम्राज्यविस्तार घडवून आणला. तुळुव वंशाच्या कृष्णदेवरायाची कारकीर्द तर विजयनगरच्या इतिहासात सर्व दृष्टींनी सुवर्णयुग म्हणून मानली जाते. विजयानगरच्या इतिहासात सर्व दृष्टींनी सुवर्णयुग म्हणून मानली जाते. विजयानगर साम्राज्यातील बहुतेक राजे ज्ञानी व कर्तृत्ववान होते तसेच ते हिंदू धर्मीय असले, तरी इतर धर्मीयांबद्दल त्यांचे धोरण सहिष्णूतेचे होते. या साम्राज्यातविविध धर्माचे लोक-ख्रिस्ती, यहुदी, मुसलमान तसेच काही परकीय-गुण्यागोविंदाने एकत्र नांदत होते. या साम्राज्याला चौदाव्या शतकाच्या मध्यास उदयास आलेल्या ⇨बहमनी सत्तेशी सतत संघर्ष करावा लागला, परंतु अशा संघर्षमय परिस्थितीतही तत्कालीन सम्राटांनी विजयानगरचे साम्राज्य टिकवून ठेवण्यात यश मिळविले. पुढे बहमनी सत्तेची पाच छकले पडली. मात्र दक्षिणेत त्यावेळी विजयानगरचे साम्राज्य त्याच्या मांडलिकासह बलाढ्य साम्राज्य म्हणून उदयास आले. या साम्राज्यात नेस्तनाबूत करण्यासाठी आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून बहमनी सत्तेच्या पाचही शाह्यांनी तालिकोटच्य लढाईत एकत्र येऊन विजयानगरच्या वैभवशाली हिंदू साम्राज्याचा पराभव केला व नंतर अल्पकाळात अंतर्गत कलहांमुळे विजयानगरचे साम्राज्य नामशेष झाले.

चिटणीस, कृ. ना. 

सांस्कृतिक स्थिती: दक्षिण भारतातील विजयानगर हे चौदाव्या-सोळाव्या शतकांतील एक बलाढ्य व वैभवशाली साम्राज्य होते. त्याच्या राज्यविस्ताराबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही-विशेषतः साहित्य, ललित कला, वास्तुकला, शिल्पकला, चित्रकला, संगीत इत्यादींमध्ये-लक्षणीय प्रगती झाली. सांप्रत या कलांचे अवशेष उपलब्ध असून त्यासंबंधी माहिती तत्कालीन परदेशी प्रवासी निकोलो दी काँती (इटालियन), डोमिंगो पायीश व फेर्नाओ नूनीश, बार्बोसा (पोर्तुगीज), अब्द-अल् रझाक (इराणी) इत्यादींच्या प्रवासवृत्तांतून मिळते. त्यांतून विजयानगर साम्राज्याची काही ठळक वैशिष्ट्ये लक्षात येतात. विजयानगरचे राजे हिंदू होते मात्र त्यांना इतर धर्मांबद्दलही आदर होता, असे दिसते, परमत आणि परधर्म यांबाबत ते सहिष्णू होते. फिरिश्ताच्या म्हणण्याप्रमाणे दुसरा देवराय याने आपल्या सैन्यातील मुसलमानांची संख्या घेऊन त्यांना प्रार्थनेसाठी राजधानीत एक मशीद बांधून दिली होती. त्याच्या धर्मसहिष्णुतेबद्दल बार्बोसाने पुढील गौरवौद्‌गार काढल आहेत:‘‘राजा ख्रिस्ती, ज्यू, मूर वा अन्यधर्मी अशा कोणत्याही जातिधर्मांच्या व्यक्तीस राजधानीत वास्तव्य करण्यास मुभा देत असे. अन्यधर्मियास कोणी कधी उपद्रव केल्याचे वा त्याची चौकशी झाल्याचे ऐकिवात नाही.’’

विजयानगरचे राजे हिंदू संस्कृती व हिंदू धर्म यांचे संरक्षण करणे, हे आपले कर्तव्य मानीत. त्यांनी मुसलमानांच्या आक्रमणास दक्षिण भारतात पायबंद घातला. शिलालेखांत उल्लेखिल्याप्रमाणे त्यांनी ‘पूर्वदमर्यादे’−म्हणजे परंपरागत रीतिरिवाज आणि सांस्कृतिक मूल्ये तसेच वर्णाश्रमधर्म-यांचे पालन केले. राजपदाबद्दल त्यांचे विचार उदात्त होते. ‘धर्मावर लक्ष ठेवून राजाने राज्य करावे,’ हे आमुक्तमाल्यदामधील कृष्णदेवरायाचे विधान विजयानगरच्या सर्व राजांना पुढे मार्गदर्शक ठरले. ‘गोब्राम्हणप्रतिपालनाचार्य’ या बिरुदावरूनही हिंदू संस्कृती व हिंदू धर्म यांबद्दल त्यांनी केलेल्या प्रसार-प्रचार कार्याची कल्पना येत.

विजयानगरचा राज्यांतर्गत तसेच परदेशांशी व्यापार होता. राजधानीत देशी-परदेशी लोक राहत होते. म्हणून बार्बोसा असे म्हणतो की, व्रजवैदुर्य, मोती, पाचू, पोळे, माणिक इ. मूल्यवान रत्नांच्या राशी रस्त्यावर भर बाजारात मांडलेल्या असत व त्या विकल्या जात.


साहित्य: विजयानगक साम्राज्यात विविध व विपुल प्रमाणात साहित्यनिर्मीती झाली. कन्नड, तेलगू, संस्कृत या भाषांमध्ये विशेषेकरून लेखन झाले. शैव, वैष्णव, जैन या धर्म-पंथाचा प्रसार करण्यासाठी अनेक लिहिले गेल. इम्मडी प्रौढदेवराय, विरूपाक्ष साळुव नरसिंह, कृष्णदेवराय इ. राजांच्या काळात संस्कृत वाङ्‌ मयाची-काव्य, नाटक, चंपू, तत्त्वज्ञान-निर्मिती झाली. त्यांपैकी त्यांपैकी माधवाचार्याचे नरकासुर-विजयशंकरदिग्विजय दिवाकराचे पारिजातहरण, देवीस्तुती, रसमंजरि, भारतामृत विरूपाक्षरायाचे नारायण-विलाउन्मत्तराषव कृष्णदेवरायाचे जांबवती-परिणयउषा-परिणय इ. नाट्य-काव्यादी कृती संस्कृत साहित्यात विशेष उल्लेखनीय मानल्या जातात. यांशिवाय वेदार्थप्रकाश हे वेदांवरील भाष्य सायणाचार्या व माधवाचार्या यांनी राजनाथ डिंडिम, वेदांत देशिक, तिरूमलाबा, गंगादेवी, नाचन ⇨सोमाना, ⇨श्रीनाथ, ⇨पेद्दना (१४७५-१५३५), हरिदास, ⇨कुमारव्यास, ⇨चामरस, ⇨पुरंदरदास (सु. १४८४-सु. १५६४), ⇨कनकदास (१५०९- १६०७) इ. संतकवी, लेखक, भाष्यकार या काळात होऊन गेले आणि त्यांनी निरनिराळ्या भाषांतून साहित्यरचना केल्या. मधुराविजयम् किंवा कम्परायचरितम् हे गंगादेवीचे कम्परायाच्या मदुरा मोहिमेचे वर्णन आणि वरदाम्बिका-परिणय हे तिरूमलांबाचे अच्युतरायाबरोबरच्या प्रणयाचे तसेच विवाहाचे वर्णन ही काव्ये अनुक्रमे बीररस व शृंगाररस यांची धोतक आहेत. मनुचरितम्, वीरशैव वचनगळू या काही महत्त्वाच्या ग्रंथरचनांचा उल्लेख करता येईल. संगीत आणि कामशास्त्र यांवरही या काळात ग्रंथरचना झाली. प्रौढदेवरायाने कामशास्त्रावर रतिरत्नप्रदीपिका हा ग्रंथ लिहिला, तर इम्मडी देवरायाच्या पदरी असलेल्या कल्लिनाथ या संगीत तज्ज्ञाने कलानिधी या ग्रंथाची रचना केली. तेलुगू वाङ्‌मयाला कृष्णदेवरायाने उत्तेजन दिले.

ललित कला: विजयानगराची राजसत्ता मुस्लिम आक्रमणाला थोपवून धरण्यात यशस्वी ठरली. परिणामी या साम्राज्य काळात हिंदू संस्कृतीचा सर्वांगीण विकास घडून आला. विजयानंतर साम्राज्याचा काळ भारतीय कलाचा उत्कर्ष काळ मानला जातो. वास्तुकला, मूर्तिशिल्पे, चित्रकला, संगीत, नृत्य आदी कलांची राजाश्रयाखाली भरभराट झाली.

वास्तुकला: विजयानगर तुंगभद्रा नदीच्या दक्षिण काठावर वसले होते. त्यावेळी आशिया खंडातील प्रमुख नगरांत त्याची गणना होई. या नगराच्या वैभवाचे आणि तेथील भव्य वास्तूंचे वर्णन नूनीश, पायीश, रझाक, बार्बोसा इ. परकीय प्रवाशांनी नोंदवून ठेवले आहे. अब्द-अल् रझाकच्या मते विजयानगरचे क्षेत्रफळ ६४ चौ. मैल (सु. १६६ चौ. किमी.) असून त्याभोवती अंतराअंतरावर सात मजबूत तट होते. कडेच्या तीन तटांत शेती होती आणि आतील चार तटांत बालेकिल्ला, राजवाडे, मंदिरे, बाजार तसेच सरदार-उमरावांच्या हवेल्या व सामान्य जनांच्या वास्तू होत्या. पायीश म्हणतो, ‘‘विजयानगर रोमाएवढे मोठे होते. तेथील राजप्रसादांनी लिखनच्या किल्ल्याएवढी जागा व्यापली होती. सुरेख उत्तुंग प्रवेशद्वारे, रूंद रस्ते, व्यापारी पेठा, मंदिरे, फळबागा, द्राक्षमळे यांमुळे शहरास शोभा प्राप्त झाली असून तेथे सर्व सुविधा उपलब्ध होत्या’’. सांप्रत तेथील अवशेषांवरून विजयानगराच्या गतवैभवाची व भव्य वास्तूंची कल्पना येते.

‘विजयानगर वास्तुशैली’ या नावाने रूढ झालेली द्राविड वास्तुशैलीची एक उपशैली या काळात उदयास येऊन विकसित झाली. हिंदू वास्तुशैलीच्या मंदिर बांधणीचा हा अखेरचा आविष्कार होय. त्यानंतर मंदिर-वास्तुशैली जवळजवळ लोप पावलेली दिसते. विजयानगराच्या वास्तुशैलीचे लौकिक वास्तू व धीर्मिक वास्तू असे दोन ठळक प्रकार दिसून येतात. धार्मिक वास्तूमध्ये प्रामुख्याने मंदिर-वास्तू येतात तर लौकिक वास्तूंमध्ये प्रामुख्याने मंदिर राजवासे, मनोरे, सिंहासन, किल्ले इत्यादींचा अंतर्भाव होते. काही अवशिष्ट लौकिक वास्तूंत राजवाड्यांच्या जोत्यांशिवाय आणि सिंहासनाच्या दोन व्यासपीठांव्यतिरिक्त अन्य फार थोडे अवशेष आढळतात. तथापि त्यांतूनही त्यांच्या भव्यतेची कल्पना येते. यांतील राजदरबार-गृह मोठे असून त्यात सिंहासन आहे, अब्द-अल् रझाकच्या मते ही इमारत बालेकिल्ल्यातील सर्वांत उंची वास्तू होती. सिंहासनाच्या बाजूंवर अलंकृत    मूर्तिकाम आहे, तसेच प्रवेशद्वारावर आणि सिंहासनाच्या मार्गावरील भिंतीवर मूर्तिकाम आढळते. पडझडीमुळे या वास्तुंची रचना नेमकी कशी होती, याची पूर्ण कल्पना येत नाही. या इमारतींच्या जवळच कमल महाल, हत्तींच्या पागा, जनानखान्याजवळील मनोरे इत्यादींचे अवशेष आहेत. विजयानगराच्या राजांच्या काही किल्ले बांधले त्यांपैकी ⇨बेल्लोर व शिवगंगा हे दोन दुर्ग लक्षणीय आहेत. लौकिक वास्तुकलेत इस्लामी पद्धतीच्या कमानी व मूळच्या स्थानिक वास्तुकलेचे पारंपारिक सज्जे यांचे समतोल मिश्रण आढळते.

विजयानगर मंदिर वास्तुशैलीचे विपुल नमुने आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक आदी दक्षिणेकडील राज्यांत आढळतात. हिंदू स्थापत्यशैलीचा हा पुनरूज्जीवनाचा काल मानण्यात येतो. तत्कालीन शिलालेखांवरून मूळ द्राविड वास्तुविधानाचा पुनराविष्कार झाल्याचे दिसून येते. मूळ द्राविड वास्तुविधानाचा पुनराविष्कार झाल्याचे दिसून येते. गर्भगृह, मुखमंडप, अर्धमंडप, महामंडप, विमान इ. वास्तुघटक मंदिराच्या आकारमानानुसार असुन त्यांत कल्पाणमंडप व अम्मान मंदिर (गृह) या दोन वास्तुविशेषांची भर या काळात पडली. अम्मान मंदिर ही मूळ मंदिराची पूरक लहान प्रतिकृत मूळ देवाच्या पत्नीसाठी उभारण्यासाठी उभारण्यात आला. तेथे लोकांच्या दर्शनार्थ प्रसंगोपात्त देवतेच्या प्रत्यमा ठेवत. याशिवाय या काळात दगडी रथाची रचना हा देखील मंदिर वास्तुशैलीचा एक महत्त्वाचा घटक बनला.

विजयानगर वास्तुशैलीचे प्रातिनिधिक नमुने खुद्द विजयानगर राजधानीत तसेच ताडपत्री, ⇨कांचीपुरम्, तिरूवल्लूर, श्रीरंगम्, ⇨चिदंबरम्, ⇨रामेश्वरम्, ⇨मदुराई, तिरूनेलवेली इ. ठिकाणी पाहावयास मिळतात. विजयानगरचे सम्राट, नायकराजे व सेतुपर्तीसारखी लहान धराणी यांनी मंदिरे बांधून घेतली. यांतील विजयानगर आणि ताडपत्री येथील मंदिरे स्वरूप दृष्ट्या काहीशी निराळी आहेत इतरत्र मात्र त्यांचा घाट एकाच प्रकारचा आढळतो. विजयानगर येथील पंपापती, विठ्ठलस्वामी आणि हजार राम ही अवशिष्टस मंदिरे सोळाव्या शतकात कृष्णदेवरायाने बांधली. त्यांपैकी विठ्ठलस्वामी आणि हजार राम ही एकाच समविधानाची आणि समलंकृत आहेत मात्र हजार राम हे मंदिर लहान असून त्यात गर्भगृह आणि मंडप ही दालने जोडलेली आहेत व अम्मान मंदिर स्वतंत्र आहे. पूर्वेकडील गोपुरातून प्रवेशद्वार आहे. ते राजप्रसादाजवळ असल्यामुळे राजघराण्यातील स्त्री-पुरूषांचे ते नियमित दर्शनाचे स्थान असावे. शिखर विटा व चुना यांचे असून त्यावर चुनेगच्चीत मूर्तिकाम आहे. विठ्ठलस्वामी मंदिर पूर्वाभिमुख असून हजार राम मंदिरापेक्षा आकाराने तिप्पट मोठे असून त्याचे बांधकाम पुढे अच्युतरायाच्या कारकिर्दीतही चालू होते. मंदिराच्या पूर्वेस, दक्षिणेस व उत्तरेस भव्य गोपुरे आहेत. मूळ मंदिर तीन प्रमुख दालनांत विभागलेले असून उघडा मंडप भिन्न प्रकारच्या अलंकृत स्तंभांनी व्यापला आहे. तुळ्या, छत, देवळ्या, छज्जे इत्यादींवर कलाकुसरयुक्त केरीवकाम आहे. अम्मान मंदिर, कल्याणमंडप, अलंकृत दगडी रथ या सर्व रचनांसाठी परिणत अवस्था येथे दृग्गोचर होते. द्राविड मंदिरशैलीची सर्व वास्तुवैशिष्ट्ये विठ्ठलस्वामी मंदिरात प्रकर्षने दिसून येतात.


ताडपत्री येथील मोडकळीस आलेले मंदिर कृष्णदेवरायाच्या प्रांताधिपतीने बांधले. या मंदिरातील दोन गोपुरांची रचना विठ्ठलस्वामी मंदिरातील गोपुरांपेक्षा सरस व आकर्षक आहे. या गोपुरांचा खालचा भाग अनलंकृत आहे पण वरच्या भागावर विपुल शिल्पांकन आहे. पार्वती मंदिर (चिदंबरम्), वरदराजस्वामी आणि एकास्रनाथ (कांचीपुरम्), जंबुकेश्वर (तिरूचिरापल्ली), मार्गाशेखेश्वर (विरंजिपुरम्)इ. मंदिरे सुस्थितीत आहेत. या सर्व मंदिरांतील मंदपांत पार्वती मंदिरातील मंडप हा विजयानगर वास्तुशैलीच्या प्रथमावस्थेतील, तर वेल्लोर किल्ल्यातील कल्याणमंडप हा या शैलीची परिणत अवस्था दर्शवितो. या मंडपातील मेहरपीनधील स्तंभांवरील कोरीवकाम गुंतागुंतीचे असेल, तरी त्यातील सूक्ष्म तपशील कारागिरांचे कौशल्य दर्शवितात. मेहरपीमधील स्तंभ हे रूपक पुढे द्रविड शैलीचा एक गुणविशेष बनले. या स्तंभावर अश्वारूढ भव्य पुतळे आणि भिन्न भव्य ⇨व्यालमूर्ती खोदलेल्या आहेत.

उंच आणि भरभक्कम ⇨गोपुर हे या वास्तुशैलीचे आणखी एक वैशिष्ट्य होय. मंदिरप्राकारांच्या भव्य अलंकृत प्रवेशद्वारांना ही संज्ञा रूढ झाली. मंदिराच्या शिखरापेक्षा गोपुराची उंची अधिक ठेवण्याचा संकेत होता आणि त्याचे वास्तुविज्ञान आयताकार असे. प्राकाराला समांतर अशी त्याची रचना असून मध्ये प्रवेशद्वारा असे. मंदिराभोवती तट (आवरणे) घालण्याची पद्धत या काळात रूढ झाली. या तटाच्या आतील बाजूस उघड्या खांबांवर आधारलेल्या ओवऱ्या असत आणि साधारणतः पूर्व, दक्षिण व उत्तर या दिशांना तोंड करून ही गोपूरे बांधीत. प्राकारात सहस्त्रस्तंभी मंडप (उदा., वरदरा जस्वामी मंदिर), कुंडे, अम्मान मंदिर व इतर देवतांची छोटी मंदिरे असत. मंदिरापासून प्राकाराचे अंतर जितके जास्त, त्या प्रमाणात गोपुरांचा आकार वाढत जाई. श्रीरंगम् येथील विष्णुमंदिर अशा प्रकारच्या वास्तुविशेषाचा प्रातिनिधिक नमुना होय. मुख्य विष्णुमंदिर लहान असून अनाकर्षक आहे पण सभोवतालच्या सात तटांमुळे तेशील गोपुरांची संख्या (चौदा) आणि आकार वाढला आहे. दगडी तळमजल्यावर लहान मजले विटा व चुना यांत बांधून ते मूर्तिसिल्पे व अन्य अलंकरणात्मक ज्ञापके यांनी सुशोभित केलेले आहेत. यांवरील मूर्तिकाम चुनेगच्चीत केलेले असून ते चित्रविचित्रपणे रंगविलेले दिसते. सर्वात वरच्या मजल्यावर गजपृष्ठाकार छप्पर आणि त्यावर स्तुपी (कळस) आढशतो. मजल्यांवर भिंतींभोवती कूट (चौरस) आणि शाला (आयत) या वास्तूंच्या छोट्या प्रतिकृति असून त्यांत देवदेवतांच्या मूर्ती बसविलेल्या आहेत. विमान व शिखर यांच्यावर सजावटीसाठी बारीक नक्षीकाम केलेले सर्वत्र आढळते. दक्षिण भारतातील या गोपुरांत कांचीपुरम् येथील एकाम्रनाथ मंदिरातील गोपुर भव्य व वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचे बांधकाम कृष्णदेवरायाच्या कारकीर्दीत झाले. त्याची उंची सु. ५७ मी. असून त्यात एकूण दहा मजले आहेत. येथील मूर्तिकाम गोपुराच्या भव्यतेला साजेसे आहे. मदुराई येथील मीनाक्षी मंदिरातील तिरूमल नायक यांने बांधलेले गोपूर अंतर्वक्र आहे. त्यामुळे ते गतिमान दिसते. ताडपत्री येथील गोपुरही सुंदर व अलंकरणसमृद्ध आहे.

विजयानगर मंदिरशैलीची सर्व वास्तुवैशिष्ट्ये हंपी येथील मंदिरसमूहातून दिसून येतात. पीठावरील थर येथे ठळक आहेत. भिंतींना फारशी मोडणी नाही अर्धस्तंभांनी काही ठिकाणी भिंत विभागली असून मधल्या बागात देवगोस्ट आणि गोस्टपांज्जर ही रूपके वापरली आहेत. विमानांची रचना मजल्यांची असून त्यांवर कूटशाला यांच्या हारांची योजना केलेली आहे. एकूण विजयानगरची मंदिर-वास्तुशैली निर्विवाद भव्य आणि दिमाखदार आहे. तिच्या सुशोभनात आलंकारित रूपकांची विपुलता आणि सौंदर्य आहेय त्याची प्रचीती वैविध्यपूर्ण रेलचेल आणि कलाकुसरयुक्त सुबक स्तंबरचनेतून येते तथापि तपशिलांची रेलचेल आणि गुंतागुंत यांमुळे पुष्कळ अशी ती गोंधळात टाकणारी झाली आहे तरीसुद्धा वास्तुकाराने अलंकरण आणि वास्तूचा घाट यांत कौशल्यपूर्ण समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.

शिल्पकला:विजयानगरच्या सुरुवातीच्या काही शिल्पांवर चालुक्य शैलीचा प्रभाव दिसतो. पुढे मात्र या मंदिरशैलीत−गोपुर, मंडप, विमान याच्या बांधणीत-याशैलीचे वास्तुविशेष प्रकर्षाने आढळतात. या काळात भव्य मूर्ती खोदण्याची प्रवृत्ती वाढली. त्यापैकी हंपी येथील स्वतंत्र मूर्तीत नरसिंह (६.७० मी. उंची) आणि गणेश या मूर्ती प्रसिद्ध आहेत. नरसिंहाच्या मूर्तीखाली शिलालेख असून ती १५२८ मध्ये कृष्णदेवरायाने एकसंध दगडात खोदून घेतली. तिरूपतीपरिसरातील चक्रतीर्थ सरोवराजवळची एकसंध पाषाणातील रंगनाथ, चक्रपुरुष, पांडुरंग यांच्या कलात्मक मुर्ती तसेच द्वारपाल आणि इतर सेवकांच्या एकसंध पाषाणातील अनेक प्रतिमा प्रसिद्ध आहेत. विजयानगरच्या सुरुवातीच्या काळातील काही सुरेख शिल्पाकृती ताडपत्री येथील रामस्वामी मंदिराच्या गोपुरांवर आढळतात. येथील द्वारशाखेतील मकरावर उभी असलेली गंगादेवीची उत्थित शिल्पाकृती गतिमानता आणि प्रमाणबद्धता यांमुळे आकर्षक वाटते. विष्णुमंदिर (पेनुकोंडे) आणि हजार राम मंदिर (हंपी) येथील मंदिरांवर रामायणातील कथा आणि कृष्णाच्या बाललीला यांचे शिल्पांकन आहे. किंबहुना रामायण आणि भागवत या ग्रंथांतील विषय तत्कालीन शिल्पकारांच्या आवडीचे होते. त्याचप्रमाणे काही शैव संतांच्या कथांचेही शिल्पांकन पेनुकोंडे येथील मंदिरात आढळते. विजयानगरकालीन स्तंभ वैविध्यपूर्ण असून स्तंभांवरही विपुल कोरीवकाम आहे. चार, सहा असे स्तंभ एकमेकांशेजारी एकमेकांना जोडून कमानीमधील मोठा स्तंभ तयार होतो. यांना जोडून व्याल, घोडेस्वार, देवदेवता, सुरसुंदरी, शालभंजिका अशा विविध मूर्तीचे समूह कोरलेले दिसतात. श्रीरंगम् (तिरुचिरापल्ली) मंदिराच्या मंडपातील स्तंभांवर पत्रपट्ट, रत्नपट्ट इ. कोरीवकाम आहे. चौथऱ्यावर पूर्माकारात व्याल, शालमंजिका, नर्तक-नर्तकी यांच्या मूर्ती आहेत.


हंपी येथील मंडपांच्या पीठावर कोरीव शिल्पपट्ट असून त्यात अश्रावरूढ सैनिक, हत्तींची मिरवणूक, नृत्यांगना, गायक-वादकांचा जथ्था आणि कोलाट्टम् हे लोकनृत्य दाखविले आहे. विजयानगरचा शिल्पकार हा एकसंघ दगडात रथाचे शिल्प खोदण्यात विलक्षण कुशल होता. ताडपत्री आणि हंपी येथील रथ हे याचे उत्कृष्ट नमुने होत. दक्षिण भारतातील काष्ठ-रथशिल्पाचे रूपकच येथे दगडात वापरलेले दिसते. लेपाक्षी मंदिरातील नाट्यमंडपातील अप्सरा, गायक-वादकवृंद आणि नटराज यांच्या शिल्पांतून तत्कालीन कलेचे वैभव व भव्यता दिसून येते. वेल्लोरच्या किल्ल्यातील कल्याणमंडपातील स्तंभांवरही अश्वारूढ प्रतिमा व अन्य मूर्ती कोरलेल्या आहेत. पुढचे पाय वर उचलून घेतलेल्या घोड्यांच्या व त्यांवरील स्वारांच्या प्रचंड मूर्तीत वीररसीचा आवेश दिसतो, तर खालच्या बाजूस स्वारांचे सहकारी आहेत. सैनिकांच्या हातांतील तलवारी, उधळलेल्या घोड्याचा लगाम, लगामाने रुंदावलेले ओठ आणि खोगिरीवरील बारीक कलाकुसर यांतुन वास्तव चित्रणाचा प्रत्यय येतो तसेच मूर्तीतील गतिमानता आणि भव्यता दृग्गोचर होते. मंडपाच्या छतावरील दोन पायांवर उभे राहिलेले सिंह, घोडे माकडे आणि कबुतरे यांची शिल्पे जिवंत वाटतात. अशाच प्रकारची परंतु आधिक गुंतागुंतीची शिल्पे नंतरच्या वरदराजस्वामी, रंगनाथ (श्रीरंगम्), मार्गशेखेश्वर व इतर स्थळी असलेल्या मंदिरांतून आढळतात. विजयानगरच्या राजांनी शिल्पकारांकडून आपली व्यक्तिशिल्पेही खोदून घेतली आणि ती आपल्या आराध्य देवतांच्या सान्निध्यात ठेवली. कृष्णदेवरायाचे एक व्यक्तिशिल्प चिदंबरमच्या एका गोपुरात पहावयास मिळते. त्याची तुलना त्याच्या धातूच्या प्रतिमेबरोबर केली असता तीत विलक्षण साम्य आढळते. तिरुक्कोयिलूर येथील कंकाळ मूर्ती, तंजावर जिल्ह्यातील बाल सुब्रह्मण्यमची मूर्ती किंवा त्याच जिल्ह्यातील धर्मपूर मठातील वृषभवाहन मूर्ती या अतिशय रेखीव व सौंदर्यपूर्ण धातुमूर्ती आहेत. यांशिवाय अनेक देवदेवतांच्या मूर्ती येथे मिळाल्या आहेत. वेंकटपतिरायाची एक धातुमूर्ती उपलब्ध झाली आहे.कृष्णदेवराय आणि त्याच्या राण्यांचे एक धातुशिल्प प्रसिद्ध असून कृष्ण देवरायाच्या व्यक्तीशिल्पांमधे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. काही मूर्ती मिश्रधातूंमध्ये बनविलेल्या आढळल्या आहेत. प्रारंभीच्या मूर्तींमध्ये अप्रमाणशीर उंची व कृशता प्रकर्षाने जाणवतात. अगदी लहान मुलाचा चेहरासुद्घा प्रौढत्व दर्शवितो. तसेच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वाकदार चोचीसारखी नाके लक्ष वेधून घेतात. तंजावर येथील पार्वतीची मूर्ती या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण मानावी लागेल. नायक काळात ही प्रवृत्ती वाढली. मदुराई येथील दीपलक्ष्मी कमरेत वाफलेली पण उभे राहण्यात त्रिभंग मूर्तीचे लालित्य नाही.विजयानगरच्या कलाकारांनी काही हस्तिदंती मूर्ती घडविल्या. त्यांतील काही नाजूक व कलाकुसरयुक्त आहेत. तिरूमल नायकाच्या काही हस्तिदंती प्रतिमा श्रीरंगम् मंदिरातील वस्तुसंग्रहालयात आहेत. विजयानगरचे शिल्पकाम भव्य आणि ठाशीव असले, तरी बाह्य व अंर्तभीगातील एकूण मूर्तींचा विचार केला असता, त्यात एकजिनसीपणा आढळत नाही. मूर्ती आणि वास्तू वेगळ्या घाटतात. मूर्तींचा केवळ एक परंपरीगत रूपक म्हणून येथे उपयोग केला आहे.

चित्रकला, संगीत व नृत्य : विजयानगरच्या चित्रकलेविषयीचे, विशेषतः भित्तिचित्रांचे नमुने मंदिर, राजप्रासाद, मठ, वाडे यांतून उपलब्ध झाले आहेत, पायीश याने विजयानगरच्या चित्रकलेविषयी लिहून ठेवले असून कृष्णदेवरायाच्या महालातील चित्रांचा आवर्जून उल्लेख केला आहे. या काळात मंदिरे रंगविण्यात येत. खुद्द विजयानगरमधील विरूपाक्ष मंदिरातील सभामंडपाच्या मिरवणुकीचा देखावा चितारलेला आहे. अनेगुंदीमध्ये उचमप्प मठाच्या छतावर विविध प्रकारचे भौमितिक आकृतिबंध वेलबुट्ट्या चितारलेल्या आहेत. येथील स्त्री-प्रतिमांतून तत्कालीन दागदागिने व पोषाखाची कल्पना येते. अनेगुंदी व लेपाक्षी या दोन ठिकाणी या काळातील चित्रकाम आहे. यातील लेपाक्षी मंदिरातील, मनुनीतिकुंद या राजाला आर्शीवाद देण्याच्या आविर्भावातील गंगाधर शिव व चन्देश सेवक इ. दृश्ये लक्षणीय आहोत. हे मंदिर वीरभद्र या देवतेचे असल्यामुळे येथील भित्तिचित्रांत शिवीच्या विविध रूपांचे चित्रण आहे. हंपी येथील त्रिपुरांतक कथा आणि द्रौपदी स्वयंवर ही दृश्ये विजयानगर चित्राशैलीची उत्कृष्ट उदाहरणे होत. नायक राजांनी ही भित्तिचित्र परंपरा पुढे चालू ठेवली. तिरूवल्लूर येथील मुचकुदाची कथा, भिक्षाटन शिव आणि मोहिनी यांच्या कथातून ती दृग्गोचर होते. पापमाशेश्वर मंदिराच्या छतावर चित्रकाम असून त्यात महाभारत आणि विविध पुराणे यांतील प्रासंगिक कथांचे चित्रीकरण आहे. अर्धमंडपात शिवतांडव, दक्षिणमूर्ती, गंगाधर तसेच हरिहर यांच्या चित्रप्रतिमा शिल्पशास्त्राच्या संकेतानुसार बनविलेल्या आहेत. ही भित्तिचित्रे विजयानगरची प्रातिनिधिक चित्रे होत. अशाच प्रकारची भित्तिचित्रे चिदंबरम् येथील शिवकामसुंदरी मंदिरात क्रमश: चितारलेली आहेत. तिरूवलंजुळी (जि. तंजावर) येथील कपर्दिश्वर नटराज शिव आणि त्याचे नृत्यमग्न गण आढळतात. भित्तिचित्रांत समुद्रमंथन, कामदेवाचा नाश, नल-दमयंती विवाह, दशावतार, कृष्णालीला आदी पौराणिक विषय सामान्यतः हाताळलेले दिसतात तसेच हत्ती उंट व इतर प्राणाही चितारलेले आहेत. चित्रात उपलेपनावर प्रथम तांबड्या रंगाने बाह्यकृती रेखाटीत, नंतर त्यांत अगदी भडक छटांचे लाल, पिवळे व निळे रंग भरीत. शेवटी ठळक काळ्या रंगाने बाह्याकृती पुन्हा गिरवण्यात येई. मानवी आकृती दाखविण्यावर विशेष भर होता.

वास्तु−शिल्प−चित्रादी कलांबरोबर संगीत−नृत्यादी कलांना विजयानगरच्या सम्राटांनी प्रोत्साहन दिले. या काळात शाखोक्त संगीतावर ग्रंथ टीकाटिपण्णी लिहिल्या गेला. इम्मडी देवरायाच्या आज्ञेवरून कल्लिनाथ याने शादेवाच्या संगीतरत्नाकर या ग्रथांवर टीका लिहीली. कर्नाटक शैलीची अभिवृद्धी याच काळात झाली धृपद व ख्याल या गायनप्रकारांचा प्रसार झाला. कल्लिनाथाचा नातू पं रामामात्य याने स्वरभेलकलानिधी (सु. १५३०) हा ग्रंथ लिहिला. श्रीपादस्वामींनी शेकडो छंदाची रचना केली. संगीतातील थाटपद्घतीचा आरंभ विजयानगर दरबारात प्रथम झाला. राजदरबारात समारंभप्रसंगी नृत्य-संगीताचे कार्यक्रम होत. विजयानगरच्या शिलालेखांत ढोल, भेरी, मंजीर इ. वाद्यसामग्रीचे उल्लेख येतात. राघवेंद्र-विजयम् मध्ये कृष्णदेवराय स्वतः वीणा वाजवीत असल्याचे वर्णन आढळते.याशिवाय शिल्पांत नृत्यांच्या अनेक मुद्रा आढळतात.

देशपांडे सु. र.

संदर्भ : 1. Ayyangar. S. K. Sources of Vijayanagara History. Madras, 1919

           2. Brown, Percy, Indian Architecture (Buddhist and Hindu Periods), Bombay, 1959,

           3. Fillozat, Vasundhara, Ed.Trans, Sewell, Robert. The Vijaynagar Empire as seen by Domingos Paes and Fernao Nuniz, New Delhi, 1977.

          4. Karishma, Noboru, Towards a New Formation, Bombay, 1992.

          5. Kulkarni S. D. Ed. The Struggle For Hindu Supremacy, Bombay, 1992.

          6. Mahalingam, T. V. Administration and Social Life under Vijayanagar Empire, Madras, 1951.

          7. Mujumdar, R. C. Ed. The Delhi Sultanate, Bombay, 1960.

         8. Reddy D. Ramalinga, Vijayanagara Empire, and its Lessons, Madras, 1968.

          9. Salelore, R. N. Vijaynagar Art, Banglore, 1984.

         10. Sastri , K. A. N. : Venkataramanayya, N. Further Sources of Vijaynagara History, 2 Vols., Madras 1946.

         11. Sewell, Robert. Forgotten Empire, London, 1964.

         12. Sivaramamurti, C. Art of India, New York, 1974.

         13. Sivaramamurti, C. Indian Sculpture, New Delhi, 1961.

          14. Shrikantya, S. Founders of Vijayanagar, Banglore, 1938

          15. Stein Burton, Vijayanagara, New Delhi, 1994.

          16. Venkataramanayya, N. Origin of the City and the Empire, Madras, 1953.

         १७. उपाध्याय वासुदेव, विजयनगर-साम्राज्य का इतिहास, नवी दिल्ली, १९४५.

         १८.करमरकर, दत्तात्रेय परशुराम ओतूरकर, राजाराम विनायक, संपा. विजयनगर स्मारक ग्रंथ, पुणे, १९३७.

         १९. माटे, म. श्री. प्राचीन भारतीय कला, पुणे, १९७४.


राममंदिराच्या गोपुरातील स्तंभ, ताडपत्री, १६ वे शतक.विठ्ठलमंदिरासमोरील कलात्मक शिलारथ, हंपी, १५१३.सहस्त्रस्तंभी दालनातील स्तंभांवरील घोडेस्वारांच्या प्रतिमा : रघुनाथस्वामीचे विष्णुमंदिर, श्रीरंगम्‌, १७ वे शतक.

कृष्णदेवराय व त्याच्या राण्या - तिरुमलांबा व चित्रादेवी ब्राँझशिल्प, तिरुपती, १६ वे शतक.एकसंध पाषाणातील नरसिंहमूर्ती (अंशदृश्य), विजयानगर, १५२८.