विजयदुर्ग: महाराष्ट्रातील एक इतिहासप्रसिद्ध जलदुर्ग व बंदर. हा किल्ला प. किनारपट्टीवर सिंधुदुर्ग विजयदुर्ग : तटबंदी व दीपगृहाचे दृश्यजिल्ह्यात वाघोटन (विजयदुर्ग) या नदीमुख खाडीवर एका ३० मी. उंचीच्या खडकावर वसला आहे. मराठी अंमलात हा ‘घेरीया’ नावाने प्रसिद्ध होता. जवळच्याच गिर्ये या खेड्यावरून त्यास हे नाव देण्यात आले. विजयदुर्ग व गिर्ये गावची एकूण लोकसंख्या ४,५६२ (१९९१). देवगड्या उत्तरेस सु. २५ किंमी वरील हे बंदर बाराही महिने खुले असून सागरी व्यापाऱ्यांसाठी मराठी अंमलापासून ते प्रसिद्ध आहे.

विजयदुर्गाचा प्राचीन इतिहास सुस्पष्ट नाही. तो शिलाहारांनी बांधला असावा, असे एक मत आहे. पंधराव्या शतकात विजापूरच्या आदिलशाहने तेथे काही प्रमाणात बांधकाम केले पण किल्ल्यावर  मुसलमानी वास्तकलेचे फारसे अवशेष दिसत नाहीत. सतराव्या शतरात चंद्रराव मोऱ्यांचा पराभव करून छ. शिवाजी महाराजांनी कोकणातील मुलूख काबीज केला. तेव्हा त्यांनी विजयदुर्ग घेऊन (१६५४) त्यात पदरी तट, भव्य बुरूज व अनेक वास्तू बांधल्या. सिद्दी तसेच इंग्रज−पोर्तुगीज यांवर वचक ठेवण्साठी महाराजांनी हे आरमारी ठाणे निवडले. त्यांच्या मृत्यूनंतर छ. राजाराम ह्यांच्या वेळी कान्होजी आंग्र्यांनी विजयदुर्ग येथे आपले प्रमुख ठाणे उभारून ‘सरखेल’ हा किताब मिळविला आणि १६९८ ते १७२९ पर्यंत पश्चिम किनाऱ्यावर आपले वर्चस्व राखले. छ. शाहू महाराजांनी त्यांची सेवा लक्षात घेऊन पुढे त्यांच्या मुलाकडे सरखेलपद दिले. आंग्र्यांनी येथे गोदी बांधून जहाज बांधण्याचे कारखानेही सुरू केले. कान्होजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांत तंटे सुरू झाले. मुलगा तुळाजी आंग्रे पेशव्यांना जुमानीसा झाला. तेव्हा त्याचा उच्छेद करावा हा हेतू मनात धरून पेशवे व इंग्रज एक झाले. तुळाजीने १७५४ मध्ये त्यांची अनेक जहाजे पकडली, काही जाळली. तुळाजीने आपल्या आरमारात अनेक नवीन जहाजे बांधविली व त्यांवर पगारी यूरोपीय कामगार नेमले. यामुळे पश्चिम किनाऱ्यावर तो जणू अनभिशिक्त राजात समजला जाऊ लागला. आंग्रे यांच्याशी मराठ्यांचे संबंध बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीत बिनसले. हे तंटे कमी करण्याऐवजी पेशव्याने ते वाढविले, असा शाहूंचा स्पष्ट आरोप होता. पेशव्यांचे इंग्रज आणि पोर्तुगीज या पाश्चिमात्य सत्तांशी मैत्रीचे संबंध होते. त्याचा फायदा घेऊन आंग्रे बंधूचा मिळेल तितका प्रदेश जिंकण्याचा सपाटा पेशव्यांनी लावला. तुळजीची भीती प्रामुख्याने पाश्चिमात्यांना होती तथापि नानासाहेबाने स्वार्थी हेतूने आँग्र्यांच्या आरमाराचा नाश केला आणि पुढे पश्चिम किनाऱ्यावर त्यामुळे इंग्रज बलवत्तर झाले. तुळाजी आंग्रे विरूद्घच्या युद्धात कोणत्याही आंग्रे बंधूंनी युतीच्या बाजूने भाग घेतला नाही. परिणांतः विजयदुर्गाबरोबरच मानाजी आँग्र्यांच्या आरमाराचा नाश केला आणि पुढे पश्चिम किनाऱ्यावर त्यामुळे इंग्रज बलवत्तर झाले. तुळाजी आंग्रे विरुद्धच्या युद्धात कोणत्याही आंग्रे बंधूंनी युतीच्या बाजूने भाग घेतला नाही. परिणामतः विजयदुर्गाबरोबरच मानाजी आँग्रेचा पनवेलजवळचा बिकटगड आणि इतर प्रदेशही बाळाजी बाजीरावाने जिंकून घेतले. तुळाजीने घाबरून नानासाहेब पेशव्यांना पत्र लिहून उभय पक्षांचा घरोबा पूर्वीपासून चालत आहे, त्याची अभिवृद्धी व्हावी असे कळविले तथापि पेशव्याने २६ मार्च १७५५ रोजी तुळाजीविरोधी संयुक्त मोहिमेस प्रारंभ केला. अखेर तुळाजीचा पराभव होऊन विजयदुर्ग इंग्रजांच्या हाती पडला (१३ फेब्रुवारी १७५६). इंग्रजांनी किल्लावरील अमाप संपत्ती लुटली. तुळाजी पुढे पेशव्याच्या कैदेतच १७८६ मध्ये मरण पावला. वाणकोटच्या बदल्यात इंग्रजांनी विजयदुर्ग पेशव्यास दिला. आंग्र्यांच्या अस्तानंतर विजयदुर्गचा प्रांत व आरमाराची सुभेदारी पेशव्यांनी आनंदराव धुळप यास दिली. मराठ्यांचे आरमार कमकुवत होण्यास येथूनच प्रांरंभ झाला. पुढे माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीजांचे कोकणपट्टीवरील विजयदुर्ग, रत्नागिरी वगैरे स्थळे घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा १७७३ च्या जानेवारीत त्र्यंबक विनायक व कृष्णाजी धुळप यांनी पोर्तुगीजांना विजयदुर्गातून हुसकावून लावले. पेशवाईच्या अस्तापर्यंत (१८१८) विजयदुर्ग मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर इंग्रजांनी तो जिंकून घेतला.

सुमारे आठ हेक्टर (५ चौ. किंमी.) क्षेत्रफळाच्या या किल्ल्याला त्रिपदरी तट, सत्तावीस बुरूज व तीन प्रवेशद्वारे आहेत. मुख्य द्वाराच्या आतील बाजूस जुन्या कोठाराची इमारत असून तिची डागडुजी करून विश्रानधामात रूपांतर करण्यात आले आहे. त्याच्यासमोर पोलिसांकरिता निवासस्थाने बांधलेली आहेत. विश्रामधामाजवळच जीर्ण अवस्थेत एक जुना तलाव असून त्याजवळ मत्स्योत्पादन केंद्र/मासे खारविण्याचे केंद्र आहे. या वास्तूसमोरच लॉकियर या पाश्चात्त्य ज्योतिर्विदाने १८९८ मध्ये ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी बांधलेले सिमेंटचे कट्टे आहेत. विजयदुर्गच्या खाडी किनाऱ्याला लागूनच३ किमी. वर आंग्र्यांनी उभारलेली ११० मी. लांब व ७० मी. रूंद अशी उत्तराभिमुख गोदी आहे.

विजयदुर्गच्या किल्ल्यात चार लहान मंदिरे आहेत. यांशिवाय परिसरात नाना फडणीसांचे बंधू गंगाधर भानू यांनी बांधलेले रामेश्वर मंदिरे असून समामंडपाबाहेर दीपमाळ आहेत. गाभाऱ्यात शिवपिंड आणि बंदिस्त खोलीत पन्नास किलो वजनाची चांदीची वृषबारूढ चतुर्भुज शिवमूर्ती आहे. मंदिराच्या उजव्या बाजूस आवाराबाहेर आंग्र्यांची एक छत्री व सतीची शिळा आहे.

किल्ल्याजवळ एक दीपगृह आहे. परिसरत दोन माध्यमिक शाळा आहेत. येथे गव्हाच्या शिंगाच्या वस्तू बनविण्याचा छोटा उद्योग तसेच वाघोटन नदीत मच्छेमारीचा व्यवसाय चालतो.

सांप्रत विजयदुर्ग हे एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे.

संदर्भ: 1. Apte, B. K. A History of the Maratha Navy and Merchantships, Bombay, 1972.

          2. Government of Maharashtra Maharashtra State Gazetteers: Ratnagirl District, Bombay 1962.

         ३. गर्गे, स. भा. कदम, व. शं. संपा., मराठी रियासत, खंड ४, पुणे १९९०.

         ४. घाणेकर, प्र. के. साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची!!,पुणे, १९८५.

घाडगे, विमल