वॉशिंग्टन, बुकर ताल्यफेर : (५ एप्रिल १८५६-१४ नोव्हेंबर १९१५). अमेरिकन निग्रो शिक्षणतज्ज्ञ, सुधारणावादी नेता आणि निग्रोंचा प्रवक्ता. व्हर्जिनियातील हेल्सफोर्ड (फ्रँक्लिन काउंटी) येथे गुलाम निग्रो माता व गौरवर्णीय पिता या दांपत्यापोटी त्याचा जन्म झाला. गौरवर्णीय वडिलांनी पालक या नात्याने बुकरची कोणतीच जबाबदारी स्वीकारली नाही. त्याची आई जेन फर्गसन एका मळ्यात स्वयंपाकीण म्हणून काम करीत असे. यादवी युद्धाच्या वेळी व्हर्जिनियात पळून आलेल्या एका गुलामाबरोबर तिने दुसरा विवाह केला. निग्रोंना गुलामगिरीतून मुक्त करण्याच्या शासकीय निर्णयानंतर (१८६५) ती पती व मुलांसह मॉल्डेन (पश्चिम व्हर्जिनिया) येथे राहावयास गेली. सावत्र वडिलांनी मुलांना खाण-उद्योगात मजूर म्हणून कामास लावले. त्यामुळे नवव्या वर्षापासूनच वॉशिंग्टनने खाणीत काम करून फावल्या वेळेत अध्ययन केले. पुढे तो ‘कमवा आणि शिका’ हे तत्त्व पुरस्कारणाऱ्या ‘हॅम्प्टन इन्स्टिट्यूट’ या कृष्णवर्णियांच्या विद्यालयात गेला (१८७२-७५). वर्गात हजेरीच्या वेळी सर्व मुले आपले नाव व आडनाव सांगत. त्यावेळी बुकर गोंधळला आणि त्याने धाडकन वॉशिंग्टन हे आडनाव आपल बुकर नावाला जोडले. आईकडून त्याला ताल्यफेर हे खरे आडनाव समजल्यावर त्याने बुकर टी. वॉशिंग्टन हे नाव धारण केले. त्याने पदवी संपादन केल्यावर हेल्सफोर्ड येथे दोन वर्षे शिक्षक म्हणून काम केले (१८७६-७८). विद्यार्थिदशेत फावल्यसा वेळात तो गवंडीकामही शिकला होता. नंतर त्याने वेलँड (वॉशिंग्टन डी.सी.) मधील कॅथलिक पंथीय पाठशाळेत अध्ययन केले. पुढे त्यास हॅम्प्टन इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली (१८७९). या शाळेत औद्योगिक शिक्षणावर प्रामुख्याने भर होता. औपचारिक शिक्षणाबद्दल वॉशिंग्टनचा भ्रमनिरास झाला. निग्रोंना व्यावहारिक, व्यवसायभिमुख धंदे शिक्षण दिल्यास, ते त्यांच्या दारिद्र्यनिर्मूलनास उपयुक्त ठरेल आणि कृष्णवर्णीय स्वतःच्या पायावर उभे राहतील, अशी त्याची धारणा बनली. कारण या वेळी दक्षिणेकडील राज्यांत ग्रामीण भागात असंख्य निग्रो दारिद्र्यात पिचत पडले होते. त्याची ही विचारसरणी प्रत्यक्ष कृतीत आणण्याची संधी त्याला लवकरच मिळाली.

ॲलाबॅमा राज्यातील टस्कजी येथे कृष्णवर्णियांसाठी नवीन महाविद्यालय स्थापण्यात आले. त्याच्या संस्थाप्रमुख व प्राचार्यपदी गोऱ्या व्यक्तीऐवजी वॉशिंग्टनची निवड करण्यात आली (१८८१). विद्यार्थ्याच्या सहकार्याने त्याने इमारती बांधून व भोवती बाग तयार करून महाविद्यालयाचा परिसर विकसित केला आणि हळूहळू विद्यार्थ्यांची संख्याही वाढू लागली. ‘टस्कजी इन्स्टिट्यूट’ ही त्याची कर्मभूमी बनली व तिच्या भरभराटीसाठी त्याने स्वतःला वाहून घेतले. त्याच्या प्रगल्भ नेतृत्वाखाली (१८८१-१९१५) ती कृष्णवर्णियांना औद्योगिक प्रशिक्षण देणारी आदर्श व महत्त्वपूर्ण संस्था म्हणून नावलौकिकास आली. वॉशिंग्टनने येथील निग्रो विद्यार्थ्यांना कृषिशिक्षण, धंदेशिक्षण देऊन स्वतंत्र व्यवसायास उद्युक्त केले. नंतर त्यांना राजकीय व नागरी हक्क आपोआपच प्राप्त होतील, अशी त्याची धारणा होती. ही शिक्षणपद्धती आणि त्याची सामाजिक उपपत्ती यांचा ऊहापोह त्याने अप् फ्रॉम स्लेव्हरी (१९०१) ह्या आत्मचरित्रपर ग्रंथात केला आहे. तत्पूर्वी त्याने कृष्णवर्णियांच्या व्यवसायास मदत करण्यासाठी निग्रो व्यवसाय संघ स्थापन केला (१९००). आपले शिक्षणविषयक विचार त्याने विविध वृत्तपत्रे, व्याख्याने आणि स्फुट लेख यांद्वारे मांडले. जॉर्जिया राज्यातील ॲटलांटा येथे वॉशिंग्टनने दिलेले व्याख्यान (१८९५) ‘ॲटलांटा कॉम्प्रोमाइझ’ या नावाने प्रसिद्ध आहे.

या व्याख्यानात त्याने निग्रोंची समानता, सामाजिक-राजकीय हक्क अशा मागण्यांना गौण स्थान देऊन, तांत्रिक-व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करून आर्थिक विकास साधण्यावर जास्त भर द्यावा, असे प्रतिपादन केले. आर्थिक स्थैर्य व प्रतिष्ठा प्राप्त झाल्यावर निग्रोंना गोऱ्यांच्या बरोबरीने समान हक्क प्राप्त होतील, अशी त्याची अटकळ होती. त्याच्या या भूमिकेकडे सुरुवातीला निग्रो बहुसंख्येने आकृष्ट झाले. पण एका परीने ॲटलांटा तडजोडीतून त्याने निग्रोंचे सामाजिक विलगीकरण व असमानता यांना मान्यताच दर्शवली होती. त्याच्या या गौरवर्णीयधार्जिण्या धोरणामुळे गोऱ्या लोकांना त्याच्याविषयी आत्मीयता वाटू लागली. त्यातन त्याची राष्ट्रीय नेता व कृष्णवर्णियांचा प्रवक्ता अशी प्रतिमा तयार झाली. थीओडोर, रूझवेल्ट, विल्यम टॅफ्ट हे राष्ट्राध्यक्ष, उच्चपदस्थ व काही सिनेटर निग्रोंच्या शासकीय नियुक्त्यांत त्याचा सल्ला घेऊ लागले. निग्रोंच्या संघटनांना त्याने धनिकांकडून भरघोस देणग्या मिळवून दिल्या. तसेच कृष्णवर्णीय चालवीत असलेल्या वृत्तपत्रांना आर्थिक साहाय्यही मिळवून दिले. तत्कालीन बहुतेक सर्व कृष्णवर्णीय चालवीत असलेल्या वृत्तपत्रांवर त्याचे वर्चस्व होते. त्यांतून तो आपले विचार प्रसृत करीत असे आणि आपल्या समकालीन कृष्णवर्णीय विरोधकांच्या वृत्तांना प्रसिद्धीपासून दूर ठेवीत असे. जीवनभर त्याने गोऱ्यांना-विशेषतः दक्षिणेकडील व उत्तरेकडी गोऱ्यांना-आपल्या भाषणांतून व कृतींद्वारे खूश ठेवण्याचा प्रयत्न केला आणि उघडपणे कृष्णवर्णियांच्या राजकीय मागण्यांस कधीच पाठिंबा दर्शविला नाही परंतु दक्षिणेकडील घटक राज्यांविरुद्ध विलग्नता आणि मतदानाचा हक्क या संदर्भातील निग्रोंच्या चाललेल्या खटल्यांना व प्रयत्नांना तो गुप्त रीत्या आर्थिक करून उत्तेजन देत असे.

वॉशिंग्टनला अनेक मान-सन्मान मिळाले. हार्व्हर्ड विद्यापीठाने त्यास एम्. ए. ही सन्मान्य पदवी दिली (१८९६). न्यूयॉर्क विद्यापीठाच्या कीर्तिदालनात त्याचे छायाचित्र लावण्यात आहे. त्याचे जन्मस्थान हे पुढे राष्ट्रीय स्मारक करण्यात आले. द स्टोरी ऑफ माय लाइफ अँड वर्ल्ड (१९००) व माय लार्जर एज्युकेशन हे त्याचे आत्मचरित्रपर ग्रंथ होत. टस्कजी यथेच त्याचे निधन झाले. 

वॉशिंग्टनच्या धोरणास त्याच्या जीवनाच्या अखेरीस डब्ल्यू. इ. बी.द्यू-बॉइस, जॉन होप, विल्ययम ट्रॉट वगैरे काही तत्कालीन कृष्णवर्णीय नेत्यांनी विरोध केला. द्यू-बॉइसने द सोल्स ऑफ ब्लॅक फोक (१९०३) या ग्रंथात आपल्या टीकेची रूपरेषा स्पष्ट केली असून वॉशिंग्टनच्या सरकारधार्जिण्या धोरणावर टीकेची झोड उठविली आहे. निग्रोंचे राजकीय व नागरी हक्क यांबाबतीत वॉशिंग्टनने गोऱ्यांबरोबर जे समझोत्याचे गुळमुळीत धोरण अंगीकारले, ते वरील नेत्यांना अमान्य होते. त्याची परिणती नायगारा चळवळीत झाली (१९०५) आणि तीतून कृष्णवर्णियांची ‘राष्ट्रीय विकास आघाडी’ (एन्.ए.ए.सी.पी.-१९१०) व ‘नॅशनल अर्बन लीग’ या संस्था उदयास आल्या. वॉशिंग्टनच्या मृत्यूनंतर त्याच्या विरोधकांनी कृष्णवर्णियांच्या राजकीय, सामाजिक व समान हक्कांसाठी उन्मूलनवादाचा (गुलामगिरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी चालविलेली चळवळ) प्रवक्ता फ्रेडरिक डग्लस याने प्रसृत केलेले लढाऊ डावपेच पुन्हा कार्यवाहीत आणण्याची चळवळ जोमाने सुरू केली.

संदर्भ : 1. Bontemps, Arna, Young Booker: Booker T. Washigton’s Early Days, New York,1972.

             2. Harrian, Lousi, Booker T. Washigton: The Making of a Black Leader, Oxford, 1972.

             3. Thrnbrough, Emma Lou, Ed. Booker T. Washington, Englewood Cliffs, 1969.

देशपांडे, सु. र.