वावटळ : चक्रीय वा चक्राकार गती असलेल्या वाऱ्याच्या लहान वादळास वावटळ असे म्हणतात. जमिनीचे एखादे लहान क्षेत्र सौर प्रारणामुळे (तरंगरूपी ऊर्जेने) खूप तापले म्हणजे त्या क्षेत्रावर न्यूनदाब (कमी दाबाचे क्षेत्र) निर्माण होतो व संनयन (अभिसरण) सुरू होऊन हवेस घूर्णता (चक्राकार गती) प्राप्त होते. ह्या न्यूनदाबाभोवती हवा चक्राकार फिरते. न्यूनदाब क्षेत्रावर हवेचे अभिसारण होते (सर्व बाजूंनी हवा एका स्थानाकडे येते). या आविष्कारात हवेच्या स्तंभात चक्राकार तसेच ऊर्ध्व (वरच्या दिशेत) गती असते आणि हा स्तंभ सरकतो. वावटळीच्या केंद्रीय भागात हवेचा दाब न्यूनतम असतो. उष्ण कटिबंधी महासागरावरील काही ⇨जलशुंडा अशाच रीतीने निर्माण होतात. वावटळीची उंची सु. २०० ते ५०० मी. असते आणि भूपृष्ठावरील क्षेत्र १०० ते २०० चौ. मी. इतके कमी असू शकते. गती बरीच बदलत असते. यातील चक्राकार गती घड्याळाच्या काट्याप्रमाणे किंवा त्याविरुद्धही असते. वाळवंटात किंवा बरीच धूळ असलेल्या जमिनीवर जेव्हा अशी वावटळ निर्माण होते तेव्हा तिला धुळी वावटळ असे म्हणतात. धुळी वावटळीने मोठ्या प्रमाणात वाळू एका ठिकाणाहून दुसरीकडे नेली जाते (उदा., सहारा वाळवंट). अशा प्रदेशातील भूपृष्ठ सौर प्रारणामुळे बरेच तापत असल्यामुळे न्यूनदाब जास्त तीव्र असतो, तसेच ऊर्ध्व गती आणि चक्राकार गती दोन्ही जास्त तीव्र असतात. त्यामुळे धुळी वावटळ १ किमी. उंचीपर्यंत पोहोचू शकते. वावटळीची पुढे सरकण्याची गती ताशी ५ ते १० किमी. एवढी कमी पण कधीकधी ती ताशी ५० किमी. किंवा त्यापेक्षा जास्त असते. वावटळी साधारणपणे उन्हाळ्यात दुपारी अथवा संध्याकाळी निर्माण होतात. वावटळीत धूळ उधळली जाते तेव्हा दृश्यमानता बरीच कमी होते. याशिवाय वावटळीत हवामानाचा कोणताही उपद्रवी आविष्कार निर्माण होत नाही.
पहा – धुळी वादळ वादळ
संदर्भ – Critchfield, H. J. General Climatology, New Delhi, 1987
मुळे, दि. आ.