वाततल्पयान : (हॉव्हरक्राफ्ट, एअर-कुशन व्हेइकल किंवा मशीन, ग्राउंड-इफेक्ट मशीन, हायड्रोस्कीमर). जमिनीच्या वा पाण्याच्या पृष्ठभागापासून अल्प अंतरावरून तरंगत चालणारे हे वाहन आहे. पृष्ठभाग व यान यांच्या मध्ये निर्माण केलेल्या हवेच्या दाबाच्या आधारावर यानाचे वजन तोलले जाते. ही दाबयुक्त हवा एखाद्या गिरदीसारखे (वा उशीसारखे) कार्य करते. सामान्यतः या हवा-गिरदीचा दाब वातावरणीय दाबाच्या वर सु. २०० ते ४०० किग्रॅ. प्रती चौ. मी. ठेवलेला असतो. सुमारे ९० किग्रॅ. वजन उचलू शकणाऱ्या यानाकरिता हवा-गिरदीचे क्षेत्रफळ सु. १.३ × २.४ चौ.मी. लागते. यावरून वजन उचलण्यासाठी हवा-गिरदीचे क्षेत्रफळ सापेक्षतः पुष्कळच मोठे लागते. रस्त्यावरून जाणारी वाहने व पाण्यावरून जाणाऱ्या नौका यांच्याप्रमाणे वाततल्पयानाचा पृष्ठभागाशी प्रत्यक्ष संपर्क नसतो, तसेच विमानाप्रमाणे या पृष्ठभागाच्या वर ते त्याच्या सर्वांंत मोठ्या आडव्या परिमाणाच्या काही अल्पशांपेक्षा जास्त वर जाऊ शकत नाही. वाततल्पयानांचे दोन वर्ग आहेत. पहिल्या वर्गातील यानांत अग्रदिशीय वेगाशी संबंध नसलेला असा दाब विभेद (फरक) निर्माण केला जातो (यांना वायुस्थितिक यान किंवा हवा-गिरदी यान म्हणतात) दुसऱ्या वर्गातील यानांना दाब विभेदी मिळण्यापूर्वी अग्रदिशीय वेग आवश्यक असतो (यांना वायुगतिकीय भू-परिणामी यान म्हणतात).

वाहन या दृष्टीने दिलेल्या स्थूल वजन व वेग या बाबतींत वाततल्पयानाला मोटारगाडी वा ट्रक यांच्यापेक्षा तीन ते चार पट जास्त शक्ती लागते. सापेक्षता कमी वेगाने चालविलेल्या नौका वा जहाज यांच्याशी तुलना केल्यासही हीच गोष्ट दिसून येते. याउलट उड्डाणात असलेल्या विमानाला वा हेलिकॉप्टराला आधाराकरिता लागणाऱ्या शक्तीपेक्षा वाततल्पयानाला निम्मी वा चतुर्थांश शक्ती लागते. यामुळे मोटारगाड्या, ट्रक, बस, आगगाड्या वा नौका यांनी भूपृष्ठ वाहतूक जेथे कार्यक्षमतेने होऊ शकत नाही तेथे वाततल्पयानांचा उपयोग होतो. हे यान नेहमीच्या लष्करी जहाजापासून सैनिकांची किनाऱ्याकडे वेगाने वाहतूक करू शकते. तसेच किनाऱ्यावर न थांबता ते ५% पर्यंत चढ पार करून व ज्याचा सरासरी खडबडीतपणा यान तरंगण्याच्या सरासरी उंचीच्या एक तृतीयांशापेक्षा जास्त नाही अशा भूप्रदेशावरून पुढे जाऊ शकते. या यानाची तरंगण्याची उंची त्याच्या महत्तम आडव्या भौतिक परिमाणाच्या सु. १/१० असल्याने यानाचे आकारमान खूप मोठे असण्याची आवश्यकता उघडच आहे. आर्क्टीक प्रदेशात निरनिराळ्या बेटांच्या दरम्यानच्या वाहतुकीसाठी वाततल्पयानांचा उपयोग होणे शक्य आहे. या प्रदेशात हिवाळ्यामध्ये नेहमीच्या जहाजांना बर्फामुळे वाहतूक करणे शक्य होत नाही आणि ट्रक व घसरगाड्या यांचा उपयोग करण्याइतपत तेथील बर्फ घनरूप वा गुळगुळीत नसते.

वाततल्पयानातील प्रवास सापेक्षतः सुखदायक, सुरक्षित व हिसकेधक्केविरहित असतो. या यानांना जहाजांपेक्षा खूपच कमी इंधन लागते आणि समान वजन वाहून नेणाऱ्या हेलिकॉप्टरापेक्षा त्यांच्या इंधन खप एक तृतीयांश असतो.

आ. १. वाततल्ययानाचे मूलभूत प्रकार : (अ) पोकळ कोठी प्रकार : (१) खालील बाजूस उघडीअसलेली पोकळ कोठी, (२) पंखा, (३) एंजिन, (४) झालर (आ) हवा-पडदा प्रकार : (१) पंखा, (२) एंजिन, (३) हवा झोत निर्माण करणारे प्रोथ (इ) चक्रव्यूह-बंदिस्त प्रकार : (१) एंजिन, (२) पंखा, (३) हवेचे पुनराभिसरण करणारा वलयाकृती प्रोथ (ई) पार्श्वभित्ती प्रकार : (१) पंखा, (२) पार्श्वभित्ती.इतिहास, विकास व रचना : सर जॉन थॉर्निक्रॉप्ट या ब्रिटिश अभियंत्यांना कदाचित प्रथम वाततल्पयानाची संकल्पना सुचली असावी. १८७० नंतरच्या दशकात त्यांनी असा सिद्धांत मांडला की, जर जहाजाची काया (सांगाडा) तळाकडून उघड्या असलेल्या मोकळ्या कोठीसारखी असेल व या कोठीत पंपाने हवा भरली, तर जहाज पाण्यापासून वर उचलले जाईल आणि त्यावरील पाण्याची ओढ कमी झाल्याने त्याचा वेग वाढेल. त्यांनी आपल्या संकल्पनेच्या चाचणीसाठी प्रतिकृती तयार केल्या व १८७७ मध्ये या संकल्पनेसंबंधीचे एकस्व (पेटंट) मिळविले. तथापि यानाच्या खालून हवा-गिरदी निसटण्याला प्रतिबंध कसा करावा ही एक मोठी अडचण थॉर्निक्रॉफ्ट यांना आपल्या संकल्पनेत आढळून आली.

क्रिस्तोफर कॉकरेल या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी १९५० नंतरच्या दशकात प्रथम हवा-गिरदी टिकवून ठेवण्याची एक पद्धत योजली असे सर्वसाधारणपणे मानण्यात येते व त्यांनाच वाततल्पयानाचे जनक समजण्यात येते. जहाजाची काया केवळ तळाकडून उघड्या असलेल्या कोठीसारखी ठेवण्याऐवजी कॉकरेल यांनी तळाच्या संपूर्ण परिघावरून एक खाच ठेवली व तिच्यातून हवेचा झोत सोडता येईल अशी योजना केली. हवा भरणाऱ्या परिघावरील प्रोथांना (निमुळत्या तोट्यांना) आतील बाजूस थोडासा कोन दिलेला असल्याने भरलेली हवा काही प्रमाणात यानाखाली गोळा होऊन ते वर उचलले जाई. या प्रोथांच्या प्रेरणेने एक हवेचा पडदा निर्माण होईल व त्यामुळे हवा-गिरदी निसटून जाण्यास प्रतिबंध होईल अशी उपपत्ती मांडण्यात आली होती. १९५९ मध्ये जगातील पहिल्या वाततल्पयानाचे (एसआरएन-१) अवतरण झाले. या पहिल्या नमुना यानात फक्त तीन प्रवासी बसू शकत आणि त्याचा वेग सापेक्षतः कमी होता व ते फक्त जमिनीवर वा शांत पाण्यावर चालविता येई. कॉकरेल यांच्या मूळ योजनेपेक्षा या नमुना यानात एक महत्त्वाचा फरक होता. परिघीय प्रोथांची प्रेरणा हवा-गिरदी निसटून जाण्यास प्रतिबंध करण्याकरिता पुरेशी नाही, असे आढळून आल्याने यानाच्या परिमितीभोवती एक रबरयुक्त झालर (स्कर्ट) टांगण्यात आली. या झालरीचा एक विशेष फायदा म्हणजे थोड्याशा उंचसखल जमिनीवर वा खवळलेल्या पाण्यावर हवा-गिरदी टिकविण्यास तिची मदत होई.


वाततल्पयानाच्या पाच मुख्य भागांपैकी झालर हा एक भाग आहे. इतर चार भाग काया, एंजिन, उच्चालक (यान वर उचलणारी) प्रणाली व प्रचालन (यानाला अग्रदिशीय गती देणारी) प्रणाली हे होत. कायेवरती प्रवासी, कर्मचारी वर्ग व माल यांच्यासाठी सोयी केलेल्या असतात. कायेच्या बांधणीसाठी ॲल्युमिनियम चौकटींवर ॲल्युमिनियम पत्र्याचे बाह्यावरण वितळजोडकामाने (वेल्डिंगने) बसविण्यात येते. अलीकडच्या काळात पोवळ्याच्या रचनेचे ॲल्युमिनियम तक्ते व ॲल्युमिनियम चौकटी यांचा तसेच काचतंतूंच्या संरचनेचा कायेमध्ये उपयोग करण्यात येत आहे. कायेत वायू टरबाइन एंजिन बसविलेले असून त्याच्या शक्तीवर उच्चालक व प्रचालक या दोन्ही प्रणाली चालविण्यात येतात. दोन्ही प्रणालींसाठी वेगवेगळी एंजिनेही बसविता येतात. यानाच्या प्रचालनापेक्षा ते उचलण्यासाठी एंजिनाची फार मोठी शक्ती खर्ची पडते. उच्चालनासाठी यानाखालील प्रोथांद्वारे हवा ढकलण्यासाठी उच्चवेगी केंद्रोत्सारी पंखे [⟶ पंखा] वापरण्यात येतात. प्रचालनासाठी सुधारित प्रकारचा विमानाचा पंखा (प्रचालक पंखा) वापरतात. हा प्रचालक पंखा यानाच्या मागील बाजूस व बहुधा एका मनोऱ्यावर बसवितात. हा मनोरा फिरता असल्याने चालकाला यान चालविण्यावर अधिक नियंत्रण ठेवता येते व यान बाजूला न सरकता उच्च वेगात सुद्धा वळणे घेणे शक्य होते. फिरत्या प्रचालक पंख्याची प्रचालन पद्धत सर्वांत कार्यक्षम असली, तरी प्रवाशांना व चालक वर्गाला ती धोकादायक होण्याची शक्यता असते. अधिक दिशिक नियंत्रणासाठी यानाच्या मागील बाजूस सुकाणूसारखे पक्ष बसविलेले असतात. हवा- गिरदीमुळे या यानांचे नियंत्रण करणे अवघड असते. तरंगण्याची उंची नियंत्रित करण्यासाठी हवा-गिरदी टिकवून ठेवणाऱ्या पंख्याना प्रदान शक्तीचे नियमन करण्यात येते.

वाततल्पयानाच्या दुसऱ्या एका प्रकारात पाण्यामध्ये विस्तार असलेल्या बाजू असतात व त्याला पार्श्वभित्तियुक्त किंवा बद्ध हवा बुडबुडा यान म्हणतात. जेव्हा कमी वेगाची जरूरी असते व जमीन-पाणी असे दोन्हीवर अथवा उथळ पाण्यावर चालविण्याची आवश्यकता नसते तेव्हा असे यान वापरतात. आणखी एका प्रकारात म्हणजे चक्रव्यूह-बंदिस्त यानात हवेचे पुनराभिसरण करणाऱ्या वलयाकृती प्रोथांची मालिका वापरण्यात येते. यानाच्या खालील दाब टप्प्याटप्प्याने एका प्रोथानंतर दुसरा अशा प्रकारे वाढविला जातो. सामान्यतः हवा पडदा व चक्रव्यूह-बंदिस्त प्रकारच्या यानांत उच्च दाबाची हवा-गिरदी तयार करण्यासाठी पंख्याची शक्ती कमी प्रमाणात लागते.

आ. २. ब्रिटिश हॉव्हरक्राफ्ट कॉर्पेरशेन लिमिटेडच्या एसआरएन−६ या वाततल्ययानाची सर्वसाधारण रचना : (१) मुख्य अधिकाऱ्याची खोली, (२) प्रवाशांच्या खोलीतील हवेचा आगममार्ग, (३) ३८ प्रवासी बसण्याचीसोय असलेली खोली, (४) एंजिनचा हवा आगममार्ग, (५) वायु टरबाइन, (६) मुख्य इंधन टाकी, (७) उच्चालक पंखा, (८) अग्रदिशीय गतीसाठी प्रचालक पंखा, (९) झालरी, (१०) उत्प्लावक टाक्या, (११) झालर उच्चालक नियंत्रक, (१२) इंधन/पूरक भार टाक्या.एसआरएन-१ या वाततल्पयानाच्या अवतरणानंतर झालरीमध्ये अनेक प्रकारे विकास झालेला आहे. प्रथमतः झालर यानाच्या कडे भोवती पडद्याप्रमाणे लोंबती ठेवलेली असे. ही झालर रबरयुक्त पदार्थाची केलेली असे आणि उच्च वेगाच्या प्रवासात जमिनीच्या वा पाण्याच्या पृष्ठभागाशी होणाऱ्या घर्षणाने ती लवकरच झिजून जात असे. आता झालरी अतिशय टिकाऊ, बहुस्तरीय नायलॉन व निओप्रीन प्लॅस्टीक या पासून तयार करतात आणि त्या दिसण्यात पडद्याप्रमाणे असण्याऐवजी यानाच्या कडेभोवती जाड नलिकेप्रमाणे असल्यासारख्या दिसतात. या झालरींना पिशवी (बॅग) झालरी म्हणतात, फुगविलेल्या पिशवी झालरीच्या आतील बाजूस असलेल्या छिद्रांतून यानाखाली हवा-गिरदी तयार होण्यासाठी झोतरूपात हवा सोडली जाते. यान जेव्हा थांबलेल्या अवस्थेत असते तेव्हा या पिशवी झालरीचा त्याला आधार मिळतो. पिशवी झालरीच्या तळाच्या कडेवर बोटांसारखे खंड असलेली दुय्यम झालर जोडलेली असते व तीमुळे पिशवी झालरीचे घर्षणाद्वारे होणाऱ्या हानीपासून संरक्षण होते. प्रत्येक खंडाची स्वतंत्रपणे क्रिया होत असल्याने संपूर्ण झालरीची खालील पृष्ठभागाशी अधिक चांगली जुळणी होते आणि त्यामुळे ओढ व हवा-गिरदी हानी कमी होतात. झिजलेल्या खंडांच्याजागी नवीन खंड चटकन सुलभपणे बसविता येतात. लवचिक झालरीचा अभिकल्प (आराखडा) व तीकरिता वापरावयाचे पदार्थ यांचा विकास प्रथमपासून करावा लागला होता आणि १९६५ पावेतो कार्यक्षम व काटकसरी झालर रचना विकसित झाली परंतु त्या वेळीही तीकरिता लागणाऱ्या पदार्थांचा विकास चालूच होता.


वाततल्पयानांसंबंधीच्या काही समस्या : वाततल्पयानाच्या अभिकल्पासंबंधीच्या महत्त्वाच्या समस्या म्हणजे तरंगण्याकरिता लागणारी शक्ती कमी करणे, तरंगण्याची उंची व यानाचे आकारमान यांच्या गुणोत्तरास सुधारणा करणे आणि अग्रदिशीय उड्डाणातील नियंत्रणात सुधारणा करणे. पहिल्या समस्येकरिता आधारक पंखे व त्यांच्याशी संबंधित असलेले अंतर्गत नळकाम यांच्या अभिकल्पासाठी व सुधारणा करण्यासाठी अधिक सूक्ष्म वायुगतिकीय विश्लेषण [⟶ वायुयामिकी] करणे आवश्यक आहे. दुसऱ्या समस्येसाठी यान व जमीन किंवा पाणी यांच्या मधल्या जागेतील प्रवाह क्षेत्रांच्या सुधारित ज्ञानाची आवश्यकता आहे. शेवटच्या समस्येसाठी यानाची तरंगण्याची वायुगतिकी व प्रचालन वायुगतिकी यांत अधिक चांगले एकत्रीकरण होण्याची आवश्यकता आहे.

वाततल्पयानाच्या निगराणीसंबंधीची एक महत्त्वाची समस्या म्हणजे विमानाचा पंखा वाततल्पयानात सागरी पाण्यामध्ये वापरताना खाऱ्या पाण्यामुळे होणाऱ्या गंजण्याच्या क्रियेने त्यावर फार अनिष्ट परिणाम होतो (जमिनीवरून जाणाऱ्या वाततल्पयानांच्या बाबतीत वाळूने वा मातीने वायू टरबाइने सहजपणे चोंदून जातात व खराब होतात). वाततल्पयान पाण्यावर तरंगताना फार मोठा फवारा उत्पन्न होतो व तो वायू टरबाइनात खेचला जातो. पुष्कळ प्रमाणात गाळणक्रिया केली, तरी आर्द्रता आणि लवण यांचे प्रमाण आधुनिक मोठे वायू टरबाइही गंजू लागण्याइतके जास्त असते. हे गंजण्याचे प्रमाण फार असल्याने एंजिन रोज शुद्ध पाण्याने स्वच्छ करूनही त्याचे दोन दुरुस्त्यांमधील आयुर्मान कमी होत जाते.

एंजिनाच्या दुरुस्तीचा खर्च आणि झालरीची निगराणी व दुरुस्ती हे वाततल्पयानाच्या प्रगतीतील महत्त्वाचे अडथळे आहेत. झालरीचे विकासकार्य एसआरएन-१ नंतरच्या पहिल्या दशकात अतिशय वेगाने झाले. एंजिनाच्या गंजण्याची समस्या नवीन पदार्थ सामग्री वापरून किंवा पाण्याच्या फवाऱ्याचे अंतःक्षेपण मर्यादित करण्यासाठी सुधारित आगममार्ग रचना अभिकल्प वापरून कदाचित सोडविता येईल. मध्यंतरीच्या काळात काही वाततल्पयान उत्पादक वायू टरबाइनांची अडचण टाळण्यासाठी उच्चवेगी नाविक डीझेल एंजिने बहुसंच रूपात वापरात आहेत. ही एंजिने स्वस्त, चालविण्यास अधिक काटकसरी व सापेक्षतः गंजण्यापासून मुक्त आहेत पण दिलेल्या शक्ती प्रदानासाठी ती वायू टरबाइनांपेक्षा पुष्कळच जड असतात.

उपयोग : वाततल्पयानांचा उपयोग मुख्यत्वे ५ ते ४० किमी. रुंदीच्या जलमार्गातील प्रवासी वाहतुकीसाठी व काही विशिष्ट लष्करी कार्यासाठी मर्यादित राहिलेला आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, स्वीडन व इटली या देशांत प्रायोगिक स्वरूपात वाततल्पयानांची वेळापत्रकानुसारी सेवा चालविण्यात आलेली असली, तरी ब्रिटन व फ्रान्स या देशांतच अशा सेवा एका मोसमापेक्षा अधिक काळ टिकून राहिल्या. १९७० नंतर प्रारंभीच्या काळात एका १७० टनी वाततल्पयानाची सेवा इतक्या मोठ्या प्रमाणात प्रस्थापित झाली होती की, परंपरागत सागरी नौका वाहतूक बऱ्याच प्रमाणात कमी झाली व हवाई सेवा जवळजवळ संपुष्टात आली.

नागरी वाहतुकीखेरीज वाततल्पयानांचा उपयोग उथळ पाण्याच्या क्षेत्रांत व वाळवंटांत भूकंपीय सर्वेक्षण पथकांकरिता, तसेच व्हँकूव्हर (कॅनडा), ऑक्लंड (न्यूझीलंड) व सॅन फ्रॅन्सिस्को येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शोध-व-सुटका कार्यासाठी करण्यात आलेला आहे. वाततल्पयानाचे लष्करी उपयोग अधिक नानाविध असून ब्रिटिशांनी मुख्यत्वे भू-जलचर हल्ल्यासाठी, सैनिकांच्या वाहतुकीकरिता व हल्ल्यानंतरच्या काळात रसद पोहोचविणारे वाहन म्हणून त्याचा उपयोग केलेला आहे. अमेरिकेच्या लष्कराने व्हिएटनाम युद्धात वाततल्पयानांचा उपयोग गस्त घालण्यासाठी तसेच मेकाँग त्रिभुज प्रदेशातील दलदलीच्या व भाताच्या विस्तीर्ण क्षेत्रात ताबा ठेवण्यासाठी यशस्वीपणे केला. भविष्यकाळात वाततल्पयानाचा उपयोग सुरुंग प्रति-उपाय, पाणबुडीविरोधी कार्य, विमान वाहन व क्षेपणास्त्र सोडणे यांसारख्या लष्करी कामांसाठी होण्याची शक्यता आहे.


इ. स. १९६० नंतरच्या दशकाच्या प्रारंभी वाततल्पयाने जगातील महासागरांवर उच्च वेगाने संचार करतील आणि पृथ्वीवरील वाळवंटी व आर्क्टिक प्रदेश संचारास खुले होतील, असे वाटत होते परंतु झालरीचा अभिकल्प व एंजिनाची निगराणी यांसंबंधीच्या अडचणी लक्षात आल्यावर प्रारंभीचे आशादायक चित्र नाहीसे झाले. १९६० -६४ या काळात जगातील सहा कंपन्यांनी आद्य नमुन्याची वा मोठ्या प्रमाणाची वाततल्पयाने बनविण्यास प्रारंभ केला पण नंतर तांत्रिक समस्यांमुळे प्रत्यक्ष उत्पादन झाले नाही. रशिया व फ्रान्स या देशांत मात्र काही वाततल्पयानांचे उत्पादन झाले. पार्श्वभित्ती प्रकारच्या यानांच्या उत्पादनाला अमेरिकेत काही प्रमाणात चालना मिळाली. व्हिएटनाम युद्धानंतर अमेरिकेचे वाततल्पयानाकडील लक्ष कमी झाले. आर्थिक वा उपलब्ध तांत्रिक साधने यांच्या दृष्टीने झालरी व उच्चालन-प्रचालन प्रणाली यासंबंधीच्या तांत्रिक अडचणी मोठ्या असल्याचे आढळल्याने इतर देशांनीही माघार घेतली. विसाव्या शतकाच्या अखेरच्या काळात अनेक देशांत वाततल्पयानासंबंधीचे संशोधन व विकास कार्य (विशेषतः लष्करी दृष्ट्या) चालू असले, तरी ग्रेट ब्रिटन या एकाच देशात त्याच्या विकासाचे व मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे प्रमुख क्षेत्र राहिले. वाततल्पयानांच्या निर्मितीचा पाया घालणाऱ्या तीन ब्रिटिश कंपन्या १९६० नंतरच्या दशकात ब्रिटिश हॉव्हरक्राप्ट कॉर्पोरेशन या एकाच कंपनीत विलीन झाल्या. हॉव्हरक्राप्ट डेव्हलपमेंट लि. या दुय्यम ब्रिटिश संस्थेची स्थापना झाल्यावर तिच्याकडे असणाऱ्या एकस्वांमुळे ती अनेक देशांतील झालरयुक्त हवा-गिरदी वाहनांच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवू लागली. ब्रिटिशांनी क्रमाक्रमाने मोठी व वेगवान वाततल्पयाने बांधली आणि त्यांचा इंग्लिश खाडीवर व्यापारी वाहतुकीसाठी प्रथम उपयोग केला. या मार्गावर उपयोगात असलेल्या वाततल्पयानांचा ताशी वेग सु . ११० किमी. असून ती ४२० प्रवासी व ६० वाहने वाहून नेऊ शकतात.

नमुनेदार लहान वाततल्पयानाचे वजन सु. ७,२०० किग्रॅ. असून ते १५ प्रवासी किंवा ३,२०० किग्रॅ. माल वाहून नेऊ शकते. त्याचा ताशी वेग सु. १०० किमी. असून ते हा वेग १ मी. ३ उंच लाटांत टिकवू शकते, तसेच २.५ मी. उंचीच्या लाटांत ते याहून कमी वेगाने संचार करू शकते. ४,५०० ते २७,००० टन वजनाच्या व ताशी ११० ते १८० किमी. वेगाने महासागर पार करू शकणाऱ्या वाततल्पजहाजांच्या योजना तयार करण्यात आल्या आहेत.

ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका व जर्मनी या देशांतील अभियंते हवा-गिरदीच्या तत्त्वाचा उपयोग करणाऱ्या आगगाडीचा, मोठी शहरी क्षेत्रे परस्परांना व आंतरराष्ट्रीय विमानतळांना जोडण्यासाठी उच्च वेगी भूपृष्ठीय वाहतूक व्यवस्था म्हणून विचार करीत आहेत. या आगगाडीचा ताशी वेग ४०० किमी.पर्यंत जाण्याची शक्यता आहे. याकरिता मार्ग तयार करण्याचा खर्च सापेक्षतः कमी आहे कारण साधी काँक्रीट संरचना लागते व ती स्तंभावर उभारून पृष्ठभागावर वा बोगद्यात खोदून तयार करता येते.

चाके वा साखळीपट्टा असलेल्या वाहनांना ज्या पृष्ठभागांवर जड ओझी हालविणे अशक्य असेल तेथे हवा-गिरदी तंत्र उपयुक्त ठरले आहे. लष्करी भू-जलचर वाहने व विद्युत् रोहित्रासारख्या जड वस्तूंची वाहतूक यांसाठी, तसेच आर्क्टिक प्रदेशात खनिज तेलाच्या विहिरी खोदण्यासाठी व सर्वेक्षणासाठी लहान प्रमाणात या तंत्राचा उपयोग करण्यात आलेला आहे. अमेरिकेतील व ब्रिटनमधील अनेक उद्योगांत या तंत्राचा कारखान्यातील जमिनीवरून जड वस्तू हलविण्यासाठी वा उत्पादन मार्गावर जमिनींवरील ताण कमी करण्यासाठी व घर्षण कमी झाल्याने प्रचालनात येणाऱ्या सुलभतेसाठी उपयोग करण्यात येत आहे.

मनोरंजनाकरिताही वाततल्पयानाचा उपयोग करण्यात येत आहे. १९६० नंतरच्या दशकाच्या मध्याच्या सुमारास जगातील अनेक भागांतील हौशी व्यक्तीनी मोटारगाडीची एंजिने, घरगुती तयार केलेले प्रचालक पंखे व झालरी यांचा उपयोग करून स्वतःची वाततल्पयाने बनविण्यास प्रारंभ केला. १९७० नंतरच्या दशकात सात देशांमध्ये (विशेषतः ब्रिटन, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांत) हॉव्हरक्राफ्ट क्लब स्थापन झाले. हौशी व्यक्तींनी बनविलेल्या शेकडो यानांपैकी काही थोडीच याने एकाहून अधिक प्रवासी घेऊन जमिनीवरून व पाण्यावरून जाऊ शकली. शक्ती उत्पादक संयंत्रे व इतर सामग्री उपलब्ध असली, तरी पुरेसे उच्चालन मिळविण्याचा प्रश्न अवघड होता. बहुतेक देशांत सार्वजनिक ठिकाणी हवा-गिरदी वाहने चालविण्यावर निर्बंध आहेत, ही या क्रीडा प्रकारची वाढ होण्यातील एक अडचण आहे.

पवई (मुंबई) येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने एक भू-जलचर वाततल्पयान १९८८ मध्ये विकसित केले होते. या यानाकरिता २५० घ.सेंमी.चे एंजिन वापरण्यात आले होते व त्याची झालर बोटांसारख्या ८० खंडांची तयार केलेली होती. मुंबई येथे स्थानिक किनारी सागरी वाहतुकीसाठी वाततल्पयानांचा उपयोग करण्याची योजना आखण्यात आलेली होती. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने कार्ला येथील पर्यटन केंद्राजवळील जलाशयास १९९१ पासून तीन छोट्या वाततल्पयानांची सोय केलेली असून पर्यटकांना ते एक आकर्षण ठरले आहे. या प्रत्येक यानात एका वेळी चालकासह पाच माणसे बसू शकतात व त्याचा कमाल ताशी वेग ५० किमी.पर्यंत पोहोचू शकतो.

वाततल्पयानांचे मूळ आशादायक उद्दिष्ट अद्याप प्रत्यक्षात आलेले नाही व पारंपारिक झालरयुक्त यान व्यापारी उपयोगाच्या दृष्टीने परवडेल असे अद्याप आढळून आलेले नाही. तथापि विशिष्ट लष्करी उपयोगांसाठी वाततल्पायान जवळजवळ आदर्श असल्याचे दिसून आले आहे.

संदर्भ : 1. Armfield, W. J. and others, Air-Cushion Vehicles : Transporation of the Future, New York, 1962.

2. McLeavy, R. M. Wood, J. W. Hovercraft and Hydrofoils, New York, 1977.

तांबे, मु. शं., भदे, व. ग.