वाजीकरण : (आयुर्वेद). वाजी म्हणजे घोडा. घोड्याप्रमाणे स्त्रीसंभोग करण्याचे सामर्थ निर्माण करणारे औषध, अन्न व विहार सेवन करणे म्हणजे वाजीकरण होय. वाजीकरण व ⇨वयःस्थापन यांमध्ये भेद आहे. वय म्हणजे तारुण्य, ते संपादन करणे, टिकवून धरणे व वाढविणे म्हणजे वयःस्थापन होय. याचाच अर्थ असा की, शरीराचे सर्व घटक अधिकाधिक वरच्या दर्जाचे साररूप करणारे ते वयःस्थापन होय, तर प्राधान्याने शुक्रधातू साररूप बनविणारे ते वाजीकरण होय. वाजीकरण शुक्राची वाढ, इंद्रियोत्तेजन, संभोग-सामर्थ्य व जननक्षमता उत्कृष्ट निर्माण करते. 

शुक्रधातूचे वैशिष्ट्य : शरीरात दोन प्रकारचे घटक असतात. सार व किट्ट घटक शरीराचे सतत धारण करतात, किट्ट घटक मल म्हणून शरीराबाहेर घालविले जातात. मल शरीराला लवकर निरुपयोगी होतात म्हणून त्यांना बाहेर घालवावे लागते. त्याकरिता मार्ग निर्माण केलेले आहेत. उदा., विष्ठेला गुद, मूत्राला शिश्न, घामाला त्वचेची रंध्रे वगैरे. धातू रक्षणीय आहेत, त्यांना बाहेर घालवावयचे नसते, अर्थात त्यांच्याकरिता बहिर्गमन मार्गांची आवश्यकता नसते. त्याला अपवाद एकच आहे. तो शुक्रधातू होय. शुक्रधातूचे कार्य जनन हे आहे व ते त्याला स्त्रीच्या गर्भाशयात जाऊन करावयाचे असते. गर्भाशय शरीराच्या बाह्यस्तराशी संलग्न नाही, तो शरीरात बाह्यस्तरापासून दूर आत काही अंतरावर असतो. बाह्यस्तर व गर्भाशय यांमध्ये योनी असते म्हणून गर्भाशयात शुक्रधातू पोचविण्याकरिता पुरुषात शुक्रधातू  मार्ग मुद्दाम निर्माण केला आहे शिश्न अवयव त्याकरिता आहे. मूत्रमार्ग शिश्नाला जोडला आहे एवढेच. मल शरीरात राहिल्याने शरीराला वेदना दुःख निर्माण होते पण धातूंनी सुखच होते. शुक्राने तर उत्कट सुख होते. मल शरीरातून बाहेर जाताना व गेल्यावर सुख होते पण धातू  शरीराबाहेर जाण्याने दुःखच होते. आघात किंवा विकृतीसारखे दुःख धातू बाहेर जाण्याच्या अगोदर होते, रक्तस्त्रावादी रूपाने धातू बाहेर जाताना होते व गेल्यानंतरही चक्कर, शोष, गळाठा इ. रूपाने होते. याला शुक्रधातू हाच एक अपवाद आहे. तो शरीरात असताना, शरीराबाहेर जाताना, जाण्यापूर्वी व गेल्यानंतरही सुख-आनंद (संभोगात) होतो. 

इतर धातूच्या  बहिर्गमनाने सुख नाहीच उलट धातुक्षयाची परंपराही सुरू होते पण शुक्रधातुगमन कार्यात, संभोगात व नंतर जो आनंद होतो त्या वेळी पुन्हा शुक्र व इतर धातू वाढतात. हा जीवाच्या जीवनातला चमत्कार आहे. अनुरूप संभोगाने शरीर, इंद्रिये, मन यांचे बळ वाढते, स्मृती, मेधा उत्तम होतात, म्हातारपण न येता आयुष्य व आरोग्य वाढते. पुष्कळशा स्त्री-पुरुषांना लग्न मानवलेले दिसते याचा अर्थ वरीलप्रमाणेच  आहे. 

वाजीकरणाची आवश्यकता : असे जर आहे, तर वाजीकरणाची आवश्यकता काय, असा प्रश्न उत्पन्न होतो. विषयात्मक अतिसंभोगाने शुक्रक्षय होतो. काही जन्मतः अल्पशुक्र असतात व काही शुक्र असार असे असतात. यांनी परिमित संभोग केला, तरी त्यांना शुक्रक्षीणतेचा त्रास होतो. काही नपुंसक परंतु सुधारण्यासारखे असतात. या सर्वांना वाजीकरणावाचून अन्य उपाय नाही. काही जोडप्यांची इंद्रिये परस्परानुरूप नसतात. मोठ्याला लहान करता येत नाही परंतु लहानाला मोठे करावे लागते. या जोडप्यात ज्याच्यावर निरुपायाने जबरदस्ती होते, त्याला  शुक्रक्षय व इतर विकृती होतात, दोन्ही समर्थ असून एक दुसऱ्याच्या अपेक्षेने अबल असेल, तरीही कमी असणाऱ्या व्यक्तीवर संभोगाचे अनिष्ट परिणाम हळूहळू नकळत घडत असतात. त्या परिणांमाचे (विकारांचे) कारण हे न्यूनत्व आहे हे तज्ञालाही सहज समजत नाही. त्या विकारांचे नित्याचे उपचार करूनही गुण येत नाही. कारणानुरूप उपचार जेव्हा केला जातो तेव्हा चटकन गुण येतो. कित्येक वेळा त्या विकाराचे साक्षात उपाय न करताही केवळ वाजीकरणाने गुण येतो. अशा जोडप्यांत स्त्रीवरच अनिष्ट परिणाम होतो असे नाही, पुरुषावरही होतो. स्त्री बलवान असेल, तर तिच्यावर अतृप्तीचे अनिष्ट परिणाम होतात, तिला क्षार इ. शुक्रनाशक द्रव्ये देऊन तिचे शरीर विकृत करण्यापेक्षा पुरुषाला वाजीकरण देऊन स्त्रीशी समबल करणेच योग्य होय. हा वाजीकरणोपचार सकृद्दर्शनी जरी स्त्रीकरिता पुरुषाला केला जात असला, तरी त्याच्यावर सापेक्ष अबल म्हणून नकळत हळूहळू घडत राहण्याच्या अनिष्ट परिणामांकरिताही तो उपयुक्त होत असतो. श्रीमंत, विलासी, प्रौढ, वृद्ध स्त्री-पुरुषांनी शरीरस्वास्थ्य राहील इतपत तरी वाजीकरण घ्यावेच.  


अतिविषयी स्त्रीच्या पतीने व अतिविषयी पुरुषाच्या स्त्रीने ते नेहमी घ्यावे. हस्तमैथुनाने शुक्र क्षीण झाल्याने ते घेऊन लग्न करावे. या व्यक्तींनी लिंग स्थूल, पुष्ट व्हावे म्हणूनही योग्य उपचार करावेत. दिर्घलिंगी व्यक्तिने वाजीकरण अवश्य घ्यावे. दिर्घलिंग स्वाभाविक जननेंद्रियाच्या लांबीच्या दृष्टीने अनिष्ट आहे, ते अल्पायुषाचे लक्षण आहे. भारतीय व्यक्तीचे ताठ झालेले इंद्रिय सहा अंगुले लांब असावे, यापेक्षाही थोडे कमी असणे फारच चांगले. सहा अंगुलांपेक्षा लांब होऊ शकणारे इंद्रिय उत्थान होताना व नंतर सतत सर्व शरीरपोषक द्रव्यातील वाजवीपेक्षा अधिक वाटा अकारण वापरत असते. इतर मांसस्नायूंपेक्षा शिश्नाचे मांसस्नायू श्रेष्ठ दर्जाचे आहेत. ते शुक्रजातीय आहेत. शुक्र सर्वश्रेष्ठ आहे, शरीरातील मूल्यवान घटक एखाद्या अवयवाच्या जननाला व पुढे पोषणाला खर्च होणे, ही गोष्ट शरीरजीवनाला घातक असते. हे वैषम्य आहे, शरीर फार दिवस टिकण्याला हे प्रतिकूल आहे. शुक्रजातिरूप घटकांपैकी पुष्कळसे घटक शुक्रकार्य करणाऱ्या साधनरूप अवयवांच्या पोषणालाच खर्च होतात. यामुळे  शुक्रालाच कमी पडतात. त्यामुळे स्वशरीर जननाचे कार्य नीट होत नाही. दिर्घलिंगी अल्पायुषी होतो म्हणून त्याने नेहमी रसायन व विशेषतः वाजीकरण अवश्य घेतलेच पाहिजे.  

औषधाशिवाय इतर वाजीकरणे : नाना प्रकारचे स्वादिष्ट खाद्य पदार्थ, सुगंधी रुचकर पेये, चांदणी रात्र, नवयौवन अशी स्त्री, आकर्षक विनोदी बोलणे, कानाला गोड लागणारे मनोहर गाणे, विडा, फुले, मनाला आवडणारा सुगंध, मनोरम उपवन व मनाला आघात करणारे काही नसणे यांनी कामोद्दीपन होते.  

अतिदरिद्री माणसापासून अतिश्रीमंतापर्यत सर्वांना सारखे उपभोगाला येणारे हे संभोगजन्य नैसर्गिक सुख आहे. गाद्यागिरद्या, आरसे, फुले, सुगंधी द्रव्ये इ. सोपस्कारयुक्त श्रीमंती संभोगसुखापेक्षाही गरिबाचे चंद्रमौळी झोपडीतले संभोगसुख सुखदर्शनस्पर्शनाला शतगुणी असते, म्हणून दोघेही श्रमी असल्यामुळे त्यांचा शुक्रधातू सकस असतो. त्यांना मनसोक्त संभोगसुख घेता येते, त्या सुखाची प्रत ही श्रीमंती संभोगसुखापेक्षा उत्कृष्ट असते. हे एकच श्रेष्ठ प्रतीचे सुख त्यांच्या आवाक्यातले असते म्हणून त्याचा अतिरेक होतो, त्यामुळे शुक्रक्षय होतो. अशांना वाजीकरणाची अतिशय जरूरी असते. 

वैषयिक सुख जीवनातले श्रेष्ठ नैसर्गिक सुख आहे पण अन्यापेक्षी (स्त्रीपुरुषांना परस्परपेक्षी) आहे. ते स्वयंनिरपेक्ष सुख नाही. मनोनिग्रह व ध्यानधारणादी तपाने शुक्राची प्रत वाढून शुक्रसारत्व आणि त्याबरोबर सत्वादी सारत्व निर्माण होते. तेव्हा शरीरसुखाची अपेक्षा इतरांपेक्षा कमी होत जाऊन शरीरात स्वयंनिर्मित सुखाचे तरंग सातत्याने संचार करीत असतात, तेव्हा विषयवासनेवर विजय मिळतो. हे तरंग विषय सुखापेक्षा वरच्या दर्जाचे असले, तरच हा विजय टिकतो. हा मार्ग नौष्ठिकी चिकित्सेचा मार्ग आहे. 

स्त्रीला वा पुरुषाला वेळेवर परस्पर संभोगाचा उचित मार्ग उपलब्ध झाला नाही, तर पुरुषाला अनुचित हस्तमैथुनाचा मार्ग सहजोपलब्ध होतो. स्त्रियांना वैषयिक वेगाचा दाब व ताण सहन होत नाही. संभोग व्हावयालाच हवेत, संभोगसंधी नाही. मनोनिग्रह नाही, मनस्ताप सहन होत नाही. अशा अवस्थेत स्त्रीला पाळीच्या वेळी रजःस्त्राव झाला, तरी हलके वाटते. शुक्र नाही तर शरीरातून काही तरी बाहेर गेलेच पाहिजे, या सततच्या भावनेने अतिसार झाला तरी बरे वाटते. एखाद्या तारुण्याने मुसमुसलेल्या मुलीला पाळीनंतर बरे वाटते. चाकूने शीर तोडून रक्त भळाभळा वाहू द्यावे असे वाटते. अशा अवस्थेत मुलींना श्वेतप्रदरही सुरू होतो. अशा मुलींना रक्तस्त्राव करून शुक्रसारत्व निर्माण करणारी दूध, फळे व औषधे द्यावीत, उत्तेजके, क्षार इ. शुक्रनाशके देऊन भावी आयुष्यावर अनिष्ट परिणाम करू नये. यावर लवकर लग्न हाच खरा उपाय असतो. 


निदान व अवस्थाविशेष : काही धिप्पाड शरीराचे अतिबलवान पुरुष संभोगात दुर्बल असतात. काही कृश लहान शरीराचे पण संभोगांत बलवान असतात. या दोघांचे परीक्षण करून व वैगुण्य कोठे आहे हे शोधावे. महापुरुषाच्या रसरक्तादी धातूंच्या शुक्रधराकलाचे जननसामर्थ्य चांगले दिसते. पण शुक्रधातूच्याच जननाचे वैगुण्य दिसते. या ठिकाणी इंद्रियांचे उत्तम उत्थापन होणे, त्याचे घर्षणसामर्थ्य वाढविणे व शुक्राचे प्रमाण वाढविणे जरूर आहे. त्यांतही अधिक काय हवे ते पाहिले पाहिजे. क्षुद्र पुरुषाच्या शरीराची अगदी उलट स्थिती आहे. त्याच्या वृषणांतील शुक्रधराकला चांगली कार्यक्षम आहे. पण तिला सर्व शरीरस्थ शुक्रधराकलेचा प्रवाही पुरवठा नाही म्हणून तो लवकरच शुक्रक्षीण होईल. याकरिता व्यापक शुक्रधराकलेचे सामर्थ्य वाढविणे जरूर असते. त्यांना प्रजाही पुष्कळ झाली, तरी ती पित्यासारखीच दुबळी असेल. काही चिमण्यासारखे चटचट पण पुनःपुन्हा संभोग करतात. त्यांच्यात अधिक काल घर्षणक्षमता नसते. त्यामुळे व योनीत अल्प शुक्रपतनामुळे स्त्रीचे समाधान होत नाही, तिचे स्वास्थ्य बिघडते. काही हत्तीप्रमाणे खूप शुक्रपतन करतात. पण घर्षणात टिकत नाहीत. वास्तविक घोड्याप्रमाणे लिंग ताठ, पर्याप्त घर्षण व हत्तीसारखे भरपूर शुक्रपतन आवश्यक असते.  

वाजीकरणांची सामान्यविशेषे : सर्व वाजीकरणे सामान्यतः शुक्रधातूची वृद्धी, इंद्रियोत्थान, शरीर व जननेंद्रिय बल व पुष्टी, तसेच अपत्य जननक्षमता निर्माण करणारी असतात. या गुणांतील काही गुणांचे उत्कटत्व काही द्रव्यांमध्ये असते, तर काही गुण अत्यल्प असतात. काही शुक्रवृद्धी भरपूर करतात पण त्या मानाने शुक्रबीजोत्पादन करतातच असे नाही. काही खाजकुइलीसारखी वृष्य बीजे, बोकडाचे वृषण शुक्रवृद्धीबरोबर शुक्रबीजेही उत्पन्न करतात. गाईचे दूध, वृष्य आहे. ते शरीरातील विशेषत्वाने शुक्रधराकला वाढविते, तर मोहाचा नारळ, बोकडाचे वृषण विशेषतः वृषणांतील शुक्रधराकला वाढवितात. काही अश्वगंधा, मकरध्वज, इ. उत्तेजक असतात. अशा वैशिष्ट्यांच्या नाना छटा वाजीकरणांमध्ये असतात.  

वाजीकारकाची कार्यकरणाची विशिष्ट रीती : लसूण हा शरीरातील वातशमन करून शुक्रधातूचा अग्नी वाढवून तो शुक्र वाढवितो. अंडी किंवा मगराचे शुक्र जसे साक्षात शुक्रघटकच वाढवितात तसे शुक्रघटक लसूण वाढविणार नाही. अंडी खाऊन ज्या व्यक्तीचे शुक्र वाढत नाही, अशा ठिकाणी त्याच्या स्थायी शुक्रधातूचा अग्नी मंद आहे काय हे पाहून तसे असेल, तर लसूण अंड्यांबरोबर व नुसता देणे उपयुक्त होईल. शुक्रधातू मंद असताना अंड्यासारखी पौष्टिक वृष्य द्रव्ये निरुपयोगी होतात. 

एखाद्याचा शुक्रधातूचा अग्नी चांगला पण त्याच्या आहारात कदान्नच येते. शुक्रपोषक अन्नच येत नाही, त्याला लसूण निरुपयोगी नव्हे, तर जाचकच होईल. अशांना अंडी अमृततुल्य होतील. सारांश, वाजीकरण औषधांचे विशेष गुण व कार्य करण्याची रीती पाहून त्यांचा उपयोग करावा. ही निवड व्यक्तीचे वैगुण्य, प्रकृती इत्यादींचा विचार करून करावी. 

काही वाजीकरणे : ज्याला वाजीकरणे द्यावयाची त्यात जे विशिष्ट वैगुण्य असेल ते वैगुण्य विशेषतः विशेषत्वाने नष्ट करणारे वाजीकरण द्यावयाचे असते. धिप्पाड व पुष्ट शरीराचा संभोगसमर्थ पुरुष असून जननक्षमता नाही, शुक्रबीजे नाहीत किंवा ती विकृत आहेत अशाला बोकडाच्या वृषणाचे कल्प उपयुक्त होतील. स्त्रोतोरोध असेल तर वृषणाच्या काढ्याची भावना दिलेले तीळ किंवा त्याच्या करंज्या उपयोगी होतील. कफ व मेद जास्त असेल तर रुक्ष, तुरट, पण वृष्य अशा पिंपळाच्या फळांचा कल्प कार्यकारी होईल. संभोगक्षमता चांगली आहे पण मांसादी धातू असार आहे अशांना वृष्य मांसे किंवा त्यांनी सिद्ध दुधेतुपे द्यावीत. अशा रीतीने शरीराचे सर्वतः परीक्षण करून तेथे असणारे वैगुण्य ध्यानात घेऊन तन्नाशक वाजीकरण निवडून त्याचा उपयोग करावा.  


शुक्रवर्धक व शिश्नाला ताठपणा आणणारी वाजीकरणे हा योग, वृषण व शिश्न यांतील  शुक्रधातुकलेचे पोषण करून तिला बलवान करतात. बृंहणगुटीका व वाजीकरण पिंडरस घोड्यासारखे ताठ बलवान लिंग करतात. वृष्यमाषप्रयोग वेग अधिक निर्माण करतो. वाजीकरण घृत शुक्राचा भरपूर साठा करून लिंगाला शक्ती देतो. वृष्यमाहिषरस, वृष्यरस, वृष्यक्षीर, वृष्यघृत, दह्याची साय, साठेसाळीचा भात शुक्र व बलवर्धक आहेत. वृष्यमांस व बोकडाच्या व इतर अंडांचे प्रयोग शुक्रक्षयनाशक आहेत व शुक्रातील सजीव बीजवर्धक आहेत. चिमण्यांचे मांस व अंडे वृष्य आहेत, त्यांचे प्रत्येकी विशेष कार्य लक्षात घेऊन जर उपयोग केला, तर अधिक चांगले होईल. चिमण्याचे मांस मनुष्याच्या वृष्य मांसावयवावर म्हणजे शिश्नावर व अंडे हे बीजावर विशेषत्वाने कार्य करील. कोंबड्याचे मांस व अंडरस शिश्न नित्य ताठ करणारे आहेत. वृष्य पुपूलिका घोड्याप्रमाणे लिंग ताठ व हत्तीप्रमाणे भरपूर शुक्राचा स्त्राव करणारे आहेत. वृष्य मांसगुटीका मांस व मेदोधराकलांतील शुक्रधरा कलेला बळ देऊन पुत्रोत्पत्तीचे सामर्थ्य निर्माण करते. तुपात भाजलेले माशाचे मांस, माशाचे मांस व कणीक यांची तसेच म्हशीच्या मांसरसात शिजवून ते पुरण घातलेली उडदाच्या पिठाची सांजोरी, माषादी पुपूलिका, पिप्पल्यादी योग, अपत्यकर घृत, वृष्यगुटीका, वृष्योत्कारिका हे सर्व योग पुत्रोत्पादक आहेत.

भिन्न भिन्न शुक्रधराकलांचे सामर्थ्य वाढविणारे योग :  तीळ, उडीद, भुई कोहळा इत्यादिकांची पुरी सर्व धातुगत शुक्रधराकलेला बलदायक आहे. बोकडाच्या अंडाने सिद्ध दुधाच्या भावना दिलेल्या तिळाच्या करंज्या तसेच दुधाच्या मलईच्या तुपात बोकडाचे अंड परतून ते सेवन केले, तर वृषणाच्या शुक्रधराकलेला बल मिळून बीजोप्तत्ती उत्कृष्ट होते. करंज्या, शुक्रवह स्त्रोतसाचा रोधही नाहीसा करतात. शिरस रेडा, बैल, उंदीर यांच्या अंडाचे कल्प कुलीर मासा, बेडूक, चिमणी, कासव व मगर यांची अंडी ही हेच कार्य करतात. ज्यांच्या शुक्रात सजीव बलवान बीजे नाहीत त्यांना हे योग उपयुक्त होतील.

दुधे : दूध रस धातूचा उपधातू व सर्वधातू परिपोषक निर्मल पदार्थ आहे. दूध वाढविणाऱ्या द्रव्यांनी सिद्ध दूध रस व रक्तधराकलेतील, बृंहण गणातील औषधांनी सिद्ध दूध मांसमेदोधराकलेतील व शुक्रल गणाने सिद्ध दूध शिश्नादी अवयवांतील शुक्रधराकलेला बल, पुत्रजनन सामर्थ्य निर्माण करते. जीवनीय द्रव्यसिद्ध दुधाने जन्मलेले बालक न मरता जगण्याचे सामर्थ्य निर्माण होते व बलवर्धक द्रव्यांनी सिद्ध दूध बलवान बालके निर्माण करते.

विशिष्ट गाईचे दूध : तांबड्या किंवा काळ्या रंगाच्या, उंच शिंगांच्या, शांत स्वभावाच्या, चार स्तनांच्या, पुष्ट व गरीब गाईचे दूध उत्तम शुक्रवर्धक असते. ती पहिल्यांदा व्यालेली, वासरू तिच्याच रंगाचे व जीवंत असलेली व भरपूर दूध देणारी असणे अधिक चांगले. पहिली वीण गाईच्या तारुण्याचा भर, पुष्टी तसेच तिच्या मांसभेद धातूंच्या शुक्रधराकला उत्तम असल्याचे दाखवितात. उंच शिंगे, कार्यक्षम अस्थिधराकलेची आणि विशुद्ध भरपूर दुधाची दर्शक आहेत. तांबडा व काळा रंग बलवान रक्तधराकलेची बोधक आहेत.

वासरू तिच्याच वर्णाचे व जीवंत असणे हे शुक्राच्या स्थानातील (वृषण, फल) शुक्रधराकलेचे सामर्थ्यदर्शक आहे. यावरून एकसमान व जीवंत राहणारी संतती निर्माण करण्याचे सामर्थ्य व्यक्त होते. गाईचा शांत स्वभाव शुक्रसारत्वाने, शुक्रधातूचा उत्कट सौम्य गुण असल्याचा दर्शक आहे. या गाईचे दूध स्वभावतःच इतर गाईंच्या दुधापेक्षा अधिक शुक्रवर्धक आहे व असते. सर्व धातूंच्या शुक्रधराकलेला परिपोषक असते अशा गाईला शुक्रवृद्धी व शुक्ररेचक अशा उडदाचा पाला खाऊ घातला, तर त्याच्या पचनानंतर तयार झालेले तिचे दूध रसधातूच्या शुक्रधराकलेला अधिक जननसामर्थ्य देईल. ज्याचा रसधातू मूळातच असमर्थ आहे, त्याचा रसधातू समर्थ करण्यास हेच दूध प्राधान्याने उपयुक्त होते. जेथे हृदयाकरिता रसधातू अधिक प्रसादरूप होण्याची गरज आहे, तेथे अर्जुनाच्या पानांचा चारा तिला देऊन ते दूध उपयोगात आणावे, जेथे सर्व शरीरव्यापी रसधातू सारवान बनवायचा आहे, तेथे ऊसाच्या कांड्यांचा चारा तिला द्यावा. या विचारसरणीप्रमाणे रक्तधातूकरिता वृष्यरक्तवर्धक लाल ऊस, गाजरे यांचा चारा तिला द्यावा.


याप्रमाणेच मांसादी धातूतील शुक्रधराकला बलवान करणारी व त्या कलांचे कार्य वाढविणारी द्रव्ये गाईला चारून ते दूध उपयोगात आणण्यास हरकत नाही. या दुधात मध, साखर घालावी. ते दूध धारोष्ण किंवा तापवून द्यावे. धारोष्ण दूध अधिक उपयुक्त असते.

तुपे : या गाईच्या तुपांचाही उपयोग ती वृष्य द्रव्यांनी सिद्ध करून करावा. प्राधान्याने दुधे रसादी धातूंवर तर तुपे मेदमज्जा शुक्रधातूवर वृष्य कार्य करतात.

अशा गाईच्या दुधात गव्हाचे पीठ वरीलप्रमाणे इष्ट ती औषधे घालून केलेल्या खिरीत त्याच गाईचे तूप, साखर व मध घालून सेवन करावी, म्हणजे शुक्र क्षीण होणार नाही. उडीद, गहू, तांदूळ, यांची मेदा इ. औषधियुक्त खीर सत्तर वर्षाच्या पुरुषालाही संततिदायक होते. त्याच गाईच्या दुधात सोन्याचे कडे उकळवून ते घेतल्यास संतती होते. पिप्पली योगाने लिंगोत्थापनशक्ती फार वाढते. मधुकयोगाने केव्हाही लिंगोत्थापन होते. या दोन्ही योगांत लिंगातील शुक्रधराकलेचे कार्य वाढते.

पार्थिवकल्प : षड्‌गुण गंधक, जीर्ण पारदभस्म, सुवर्ण राजवंग, मकरध्वज, सुवर्ण, सुवर्णभस्म, सुवर्णमाक्षिक भस्म, सोमल भस्म ही तूप, लोणी, दुधाची, दह्याची साय इत्यादींबरोबर शरीरावस्थांप्रमाणे देऊन शुक्रवृद्धी करता येते.

मिश्र कल्प : सिंदूररस, सशांकरस इ. कल्प शुक्रवर्धक आहेत. कामदेव, मदनकामकुसुमायुध इ. लिंगोत्थापक व स्त्रिया उपभोगण्याचे सामर्थ्य निर्माण करतात. सूतेंद्र रोगनाश करून शुक्रवृद्धी व लिंगोत्थापन करतो. मदनसंजीवनासारखे रस मेह व पांडू नष्ट करून शुकवृद्धिकर होतात. ज्या रोगाने शुक्रनाश झाला असेल तो रोग असो वा बरा झालेला असो तो रोगनाशक व शुक्रवृद्धिकर योग निवडून त्याचा उपयोग करावा. गरविषाची बाधा होऊन शुक्रक्षीणता आली असेल, तर कामाग्नी आणि शुक्रधातूच्या अग्निवर्धक असा अमृतार्णव रस द्यावा. विषाचा परिणाम असेल तेथे सुवर्णयुक्त रस किंवा निवडलेल्या रसाबेराबर सोने घालून तो योग द्यावा. हे सर्व योग स्त्रियांनाही अवस्थांनुसार योजले पाहिजेत.

औषधांचा खाण्यापिण्याखेरीज वृष्य तेलांचा अभ्यंग, नस्य बस्ती लेप इ. उपचारही करावे लागतात. संभोग चालू असता एकदम कोणी थाप मारली, त्याला दार उघडून विचारपूस करण्याकरिता पुरुषाला उठावे लागले, तर एक प्रकारचे नपुंसकत्व येते. अशा वेळी वृष्यौषधांबरोबर इंद्रियाघाताचे परिणाम घालविण्याकरिता वृष्य तेलाचे कर्णपूरण, नस्ये करणे अत्यावश्यक असते. ज्या शुक्रक्षयात अपानदुष्टी अधिक असते तेथे वृष्य बस्ती दिल्यावाचून गती नाही. इंद्रिय लहान झाले अशा वेळी इंद्रियावर लेपही करणे आवश्यक आहे. बिब्बा, शेवाळ, कमळाचे पानही बंद संपुटात जाळून त्यात सैंधव घालून रिंगणीच्या खोड आलेल्या बीच्या काढ्यातून लिंगावर लेप करावा. लेप लावण्यापूर्वी लिंगास म्हशीचे शेण लावून पाण्याने स्वच्छ करावे. या लेपात बिब्ब्यासारखी अतितीक्ष्ण क्षोभकद्रव्ये आहेत, असेच अनेक लेप आहेत. जनेंनद्रिय नाजूक असल्याने चुकीच्या लेपप्रयोगाने अठरा प्रकारचे शूकरोग होतात.


वाजीकरणाचे इष्ट परिणाम : याच्या नित्य सेवनाने नेहमी यथेच्छ संभोग केला, तरी शुक्रक्षय होत नाही, मन संतुष्ट व उत्साही राहते. गुणवान, वीर्यवान शुक्रसार, संतती तो निर्माण करू शकतो. त्याला धर्म, अर्थ, काम, प्रीती, यश, कीर्ती, या सर्वांचा लाभ होतो. म्हणून संभोगानंतर अशक्ता वाटू लागली किंवा सर्व प्रकारची वैषयिक अनुकूलता, मानसिक क्षुब्धता, इ. त्रास नसतानाही संभोगेच्छा कमी वाटू लागली की, लगेच वाजीकरण सुरू करावे.

पूर्व कर्म : वाजीकरण द्यावयाच्या व्यक्तीला प्रथम शोधक औषधे देऊन शरीरशुद्धी करावी. शोधक औषध हे शुक्रधातूला हितकर असावे किंवा हितकर द्रव्याबरोबर द्यावे. शोधन देण्यापूर्वी स्नेहन देतानाही वृष्यस्नेहन असावे, विशेषतः शुक्रक्षीण मनुष्याला तर अवश्य असावे. त्याला वाजीकर घृताचे स्नेहन देऊन, मृदू स्वेद द्यावा व मृदू  सारक द्यावे.  सारक  सहन होणार नसल्यास मधुतैलिक किंवा मात्रा बस्ती देऊन अत्यल्प शुद्धी करावी. विरेचनाकरिता एरंडेल चालेल पण कुटकी द्यावी लागली, तर वृष्य अशा ऊसाच्या रसाबरोबर द्यावी. शोधन द्रव्य शुक्राला अहितकर असू नये. रेचक, वामक, बस्ती सर्व हितकर असावीत. नंतर क्रमाने नेहमीच्या अन्नावर आणावे व वाजीकरण सुरू करावे.

पथ्यापथ्य दिग्दर्शन : वाजीकरण सेवन करणाराने शुक्र-हितकर आहारविहार घेतला पाहिजे. अहितकर सोडला पाहिजे. पुरुषाने स्त्रीचे दर्शन, स्मरण, स्पर्श, स्त्रीशी एकांतात भाषण, क्रीडा मैथुनाचा  संकल्प, निश्चय व मैथुन या गोष्टीही वर्ज्य केल्या पाहिजेत.

पहा : वयःस्थापन 

जोशी, वेणीमाधवशास्त्री