वागटीवागटी : (वाघटी लहान रानमांजर) : या प्राण्याचा समावेश मार्जार कुलात होत असून फेलिस बेंगॉलेन्सिस हे याचे शास्त्रीय नाव आहे. वागटी हे नाव सह्याद्री घाट भागातील आहे. याचा प्रसार भारतात सामान्यतः डोंगराळ प्रदेशात आहे. तसेच तो  म्यानमार (ब्रह्मदेश), श्रीलंका, आग्नेय आशिया, मँचुरिया व कोरिया येथे आहे. याच्या तीन प्रजाती भारतात आढळतात. 

वागटीचे डोके व धड यांची मिळून लांबी ६० सेंमी.पेक्षा थोडी कमी, शेपटी त्यापेक्षा जास्त लांब असते व वजन ३–४ किग्रॅ. असते. याचे आकारमान पाळीव मांजरासारखे असते पण पाय काहीसे लांब असतात. याचा रंग व त्यावरील खुणा यांमुळे तो छोट्या वाघासारखा दिसतो. शरीराचा एकूण रंग वरच्या बाजूस पिवळसर, पोटाकडे पांढरा असून त्यावर सर्वत्र काळ्या किंवा तपकिरी ठिपक्यांची नक्षी असते. जातिपरत्वे रंग व ठिपक्यांच्या नक्षीमध्ये फरक आढळतो. उत्तर काश्मीरातील प्राण्यांचा रंग करडसर किंवा तपकिरी तांबडा व त्यावर ठिपके असतात. या नियमितपणे मांडलेल्या ठिपक्यांच्या नियमित रेषा शरीरावर दिसतात. त्या एकत्र मिसळून सलग लांबट पट्टे तयार होतात. डोक्यावरून निघून पाठीवरून जाणारे चारपाच रंगीत पट्टे असतात. हेच पट्टे पुढे अंगाखांद्यावर तुटक रेषासारखे व मोठाल्या वर्तुळाकार ठिपक्यांसारखे होतात. गालांवर आडवे बारीक पट्टे असतात. त्यांची खालची टोके गळ्यावरून येणाऱ्या काळ्या पट्ट्यांत मिसळून जातात. पुढच्या पायांच्या पंजांवरही असे पट्टे तयार होतात. शेपटीवरील ठिपक्यांचे टोकाकडील भागात आडवे पट्टे तयार होतात.  

वागटी लहान पशुपक्ष्यांवर उपजीविका करतो. तो निशाचर असल्यामुळे क्वचितच नजरेस पडतो. झाडांच्या ढोलीत राहाणे तो पसंत करतो. मरकारा (कूर्ग, कर्नाटक राज्य) भागात तो सर्वत्र आढळतो. तेथे तो कोंबड्या खातो, त्यामुळे फारच नुकसान होते. दक्षिण भारतात मे महिन्यात मादीला एका वेळी ३–४ पिले होतात. वागटी क्रूर असला, तरी त्याची पिले माणसाळतात. पाळवी मांजर व याचा संकर झाल्याची उदाहरणे आहेत.  

वागटीची फे. रुबिजिनोजा ही जाती दक्षिण भारतात व पश्चिम घाटात आढळते. ही श्रीलंकेतही आढळते. या जातीतील प्राण्याचे आकारमान पाळीव मांजराच्या निम्मे ते तीन चतुर्थांश असते. तो सडसडीत बांध्याचा असून चपळ असतो. डोक व धड यांची मिळून लांबी ४०–४५ सेंमी. व शेपटी सुमारे २५ सेंमी. असते. शरीराचा रंग करडसर व त्यावर तपकिरी तांबूस छटा किंवा हिरवट करडा व त्यावर तपकिरी तांबूस छटा असते. पोट पांढरे व त्यावर मोठे तपकिरी तांबूस ठिपके असतात. कान लहान असतात. कपाळावर व मानेच्या काट्यावर ठळक गर्द तपकिरी किंवा काळ्या चार रेघा असतात. अंगावरील केस अगदी आखूड असतात. शेपटी एकसारख्या रंगाची असते. झाडाच्या रंगापेक्षा तिचा रंग जास्त तपकिरी तांबूस असतो. पंजे वरून तांबूस करडे व तळवे काळे असतात. मिशा लांब व पांढऱ्या असतात. गवताळ प्रदेश, झाडोरा व जंगलांत याची वस्ती असते. काही अंशी हा वृक्षवासी आहे. एका वेळी मादी २–३  पिलांना जन्म देते.  

पहा  :  रानमांजर 

कानिटकर, बा. मो.