वाइनबर्ग, स्टीव्हन : (३ मे १९३३- ). अमेरिकन सैद्धांतिक भौतिकीविज्ञ. मूलकण भौतिकीत महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल त्यांना अमेरिकन भौतिकीविज्ञ शेल्डन ली ग्लासहो  आणि पाकिस्तानी भौतिकीविज्ञ ⇨अब्दुस सलाम यांच्याबरोबर १९७९ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषकाचा बहुमान मिळाला. वाइनबर्ग व सलाम यांनी स्वतंत्रपणे दुर्बल अणुकेंद्रीय व विद्युत् चुंबकीय परस्परक्रियांच्या एकीकृत क्षेत्र सिद्धांताची व्यवस्थित मांडणी केली आणि W± व Z‌ या सदिश बोसॉन कणांचे भाकीत केले. १९८२-८३ मध्ये करण्यात आलेल्या महत्त्वाच्या प्रयोगमालिकांमध्ये या गोष्टीलामोठा पुरावा मिळाला. [⟶ मूलकण]. 

वाइनबर्ग यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. १९५४ मध्ये त्यांनी कॉर्नेल विद्यापीठाची ए.बी. पदवी मिळविली. कोपनहेगनमधील नील्स बोर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी एक वर्ष अध्ययन केले. १९५७ मध्ये त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी संपादन केली. त्यांचा पीएच्.डी.चा प्रबंध ‘दुर्बल परस्परक्रिया प्रक्रियांमधील जंबुपार अपसारण’ या विषयावर होता. त्यांनी कोलंबिया विद्यापीठात (१९५७-५९) आणि लॉरेन्स बर्कली रेडिएशन लॅबोरेटीत (१९५९-६०) डॉक्टरेट पदव्युत्तर संशोधन केले. त्यानंतर ते बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक (१९६०-६९), मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत अभ्यागत प्राध्यापक (१९६८-६९) आणि प्राध्यापक (१९६९-७३), हार्व्हर्ड विद्यापीठात हिगिन्स प्राध्यापक (१९७३-८३), स्मिथसोनियन ॲस्ट्रोफिजिकल ऑब्झर्व्हेटरीत व्रीत वरिष्ठ शास्त्रज्ञ (१९७३-८३) आणि स्टॅनफर्ड विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक (१९७५-७७) होते. ते ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठात विज्ञान विषयाचे जोसे रिजेंटल प्राध्यापक आहेत (१९८२- ). यांखेरीज त्यांनी येल, नॉर्थ-वेस्टर्न, ऑक्सफर्ड, कोलंबिया, जॉन हॉपकिन्स , केंब्रिज, स्टॉकहोम इ. विद्यापीठांत अभ्यागत अधिव्याख्याते म्हणून काम केले आहे. 

वाइनबर्ग यांनी १९५० नंतरच्या दशकात मूलकण भौतिकी विषयातील दुर्बल अणुकेंद्रीय परस्परक्रिया, ⇨ सममिती नियम आणि ⇨ पुंज क्षेत्र सिद्धांतामधील अनंत राशींच्या समस्या यांवरील संशोधनाला सुरुवात केली. या कालावधीत त्यांनी म्यूऑन व विचित्र कण यांतील दुर्बल परस्परक्रियांच्या विश्लेषणात भर घातली आणि दुर्बल निर्विद्युत् प्रवाहाच्या शक्यतेचे प्रथम विवरण केले [१९७३ मध्ये पश्चिम यूरोपीय राष्ट्रांनी सहकार्याने चालविलेल्या जिनीव्हा येथील सर्न (CERN) या संघटनेच्या प्रयोगशाळेत कार्लो रूबिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘उदासीन दुर्बल प्रवाहा’चा शोध लावला], तसेच पुंज क्षेत्र सिद्धांतामधील संवेग-अवकाश समाकलांच्या अभिसरणासंबंधीचे महत्त्वाचे प्रमेय सिद्ध केले. 

वाइनबर्ग यांनी दुर्बल परस्परक्रिया, उत्स्फूर्त सममिती भंग व पुनर्साम्यान्यीकरण सिद्धांत (काही विशिष्ट  पुंज क्षेत्र व सिद्धांतांत द्रव्यमान व विद्युत् भार यांसारख्या विशिष्ट राशींच्या अभौतिकीय आणि पुंज क्षेत्राशी परस्परक्रिया होण्याच्या अनुपस्थितीत असणाऱ्या मूल्यांच्या जागी अनुरूप निरीक्षणीय भौतिकीय राशींचा उपयोग करण्याची प्रक्रिया) यांचा एकत्रितपणे १९६७ मध्ये दुर्बल व विद्युत् चुंबकीय परस्परक्रियांच्या आपल्या एकीकृत सिद्धांतामध्ये समावेश केला.या सिद्धांतात बीटा क्षय हा दुर्बल परस्परक्रिया W या दिशिक बोसॉन कणाच्या देवघेवीमुळे आणि विद्युत् चुंबकीय परस्परक्रियेतील क्षेत्र पुंजकण फोटॉन व Z या नावाचा विद्युत् भाररहित कण यांच्या सहभागामुळे होते, असे मानले जाते. ज्या परस्परक्रियेमध्ये कणांच्या विद्युत् भारात फरक पडतो ते कार्य W± या मध्यस्थ दिशिक बोसॉनाद्वारे केले जाते. ज्या परस्परक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या कणांच्या विद्युत् भारात फरक पडत नाही ते कार्य Zव γ (फोटॉन) या क्षेत्र पुंजकणांद्वारे घडून येते, असे भाकीत करण्यात आले. सर्न या संघटनेच्या संशोधन प्रयोगशाळेत या कणांच्या अस्तित्वाबद्दल पुष्टिकारक पुरावा मिळाला आणि W± व Z हे कण मिळाले असल्याची घोषणा १९८३ मध्ये करण्यात आली [⟶ रूबिया, कार्लो]. 

परस्परक्रिया करणाऱ्या कणांची ऊर्जा कमी प्रतीची असेल, तर त्यामधील सममितीच्या उत्स्फूर्त भंग परिणामामुळे मध्यस्थ सदिश बोसॉन कणांना भारी द्रव्यमान प्राप्त  होणे शक्य आहे, याचे स्पष्टीकरण या सिद्धांतात मिळते. W± या कणाचे द्रव्यमान प्रोटॉन कणापेक्षा सु. १०० पटींनी जास्त म्हणजे ७०,००० MeV आणि Z चे द्रव्यमान १०,००० MeV असावे, असे वाइनबर्ग व सलाम यांनी गणन करून दाखविले. १९८३ मध्ये सर्नच्या संशोधन प्रयोगशाळेत या कणांची प्रयोगाने अनुमानित केलेली द्रव्यमाने अपेक्षित मूल्यांचीच असल्याचे आढळून आले. 

वाइनबर्ग यांनी १९६७ सालच्या निबंधात सुचविले होते की, ‘एकीकृत सिद्धांताचे सुद्धा पुनर्सामान्यीकरण होते’ आणि नंतर जी. हूफ्ट, बी. ली आणि इतरांनी ही गोष्ट सिद्ध केली. १९७२ मध्ये त्यांनी दाखविले की, प्रबल, दुर्बल आणि विद्युत् चुंबकीय या तीन परस्परक्रियांचे गेज सिद्धांताने [⟶ पुंज क्षेत्र सिद्धांत] वर्णन करता आले, तर विचित्रतेची अक्षय्यता, भार संयुग्मन निश्चलता इत्यादींचे स्पष्टीकरण देता येईल. 

वाइनबर्ग व सलाम यांनी स्वतंत्रपणे जाहीर केलेलादुर्बल अणुकेंद्रीय व विद्युत् चुंबकीय परस्परक्रियांचा एकीकृत सिद्धांत अनेक प्रयोगांच्या कसोटीला उतरला आहे. यामुळे या दोन परस्परक्रियांचे प्रबल परस्परक्रियेशी एकीकरण करण्यास चालना मिळाली. वाइनबर्ग यांनी एच्. गीऑर्गी आणि एच्. क्विन यांच्याबरोबर बृहत् एकीकरण क्षेत्र सिद्धांताचा पाया घातला.  

वाइनबर्ग यांनी विश्वरचनाशास्त्र, पुंज प्रकीर्णन सिद्धांत आणि गुरुत्वाकर्षण पुंज सिद्धांत या भौतिकीतील क्षेत्रांतही मोलाचे काम केले आहे. 

वाइनबर्ग यांची १९६८ मध्ये अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स ॲन्ड सायन्सेसमध्ये आणि १९७२ मध्ये नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसमध्ये निवड झाली. ते अमेरिकन फिजीकल सोसायटी, इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन व फिलॉसॉफिकल सोसायटी ऑफ टेक्सास या संस्थांचे सदस्य होते. त्यांना मियामी विद्यापीठाचे जे. आर्. ओपेनहायमर पारितोषिक (१९७३), अमेरिकन फिजिकल सोसायटीचे गणितीय भौतिकीकरिता असलेले डॅनी हाइनमान पारितोषिक (१९७७) आणि अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स यू. एस्. फाउंडेशनचा विज्ञान लेखन पुरस्कार (१९७७) हे बहुमान मिळाले. त्यांना फ्रँक्लिन इन्स्टिट्यूटचे एलिअट क्रिसन पदक मिळाले (१९७९). याखेरीज त्यांना शिकागो (१९७९), येल (१९७९), रॉचेस्टर (१९७९), ‘सिटी युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क’ (१९८०), क्लार्क (१९८२)व डर्‍मॉथ (१९८४) या विद्यापीठांनी तसेच वाइझमान इन्स्टिट्यूटने सन्माननीय डी.एस्सी. आणि वॉशिंग्टन कॉलेजने (१९८५) सन्मानीय डी.लिट्. पदव्या दिल्या. 

वाइनबर्ग यांनी लिहिलेले ग्रॅव्हिटेशन अ‍ँड कॉस्मॉलॉजी : प्रिन्सिपल्स अ‍ँड ॲप्लिकेशन्स ऑफ द जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हीटी (१९७२), द फर्स्ट थ्री मिनिट्स : मॉडर्न व्ह्यू ऑफ द ओरिजिन ऑफ द युनिव्हर्स (१९७७), द डिस्कव्हरी ऑफ सबॲटॉमिक पार्टिकल्स (१९८२) आणि आर्. पी. फाइनमन यांच्यासमवेत एलिमेंरी पार्टिकल्स अ‍ँन्ड द लॉज ऑफ फिजिक्स (१९८७) हे ग्रंथ आणि २०० हून अधिक वैज्ञानिक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. 

सूर्यवंशी, वि. ल.