वर्ड्स्वर्थ, विल्यम : (७ एप्रिल १७७०-२३ एप्रिल १८५०). थोर इंग्रज निसर्गकवी व इंग्रजी साहित्यातील स्वच्छंदतावादी काव्यसंप्रदायाचा एक प्रणेता. जन्म कॉकरमथ, कंबर्लंड येथे. इंग्लंडच्या लेक डिस्ट्रिक्टमधील हे ठिकाण. वर्ड्स्वर्थचे आईवडील तो लहान असतानाच वारले. त्याच्या दोन काकांनी त्याचा प्रतिपाळ केला. आरंभीचे शिक्षण हॉकशीड येथील ‘ग्रामर स्कूल’ मध्ये घेतल्यानंतर केंब्रिजच्या ‘सेंट जॉन्स कॉलेज’ मध्ये त्याने प्रवेश घेतला (१७८७). १७९१ साली तो बी. ए. झाला. तत्पूर्वी, १७९० मध्ये, त्याने फ्रान्स, आल्प्स आणि इटलीचा दौरा पायी केला होता. १७९१ साली तो पुन्हा फ्रान्सला गेला. फ्रेंच राज्यक्रांतीचा तो प्रकर्षकाल होता. फ्रान्समधील वर्षभराच्या वास्तव्यात ह्या क्रांतीचा त्याच्यावर फार मोठा प्रभाव पडला. फ्रान्समध्ये असतानाच आनेत व्हॅलाँ ह्या युवतीच्या प्रेमात तो पडला. तिच्यापासून त्याला एक कन्याही (कॅरोलिन) झाली. तो आनेतशी विवाह करू शकला नाही मात्र तिच्यासाठी आणि कॅरोलिनसाठी त्याला जेवढे करता आले ते सर्व त्याने केले. १७९२ च्या अखेरीस तो इंग्लंडला परतला. १७९३ मध्ये ‘ॲन ईव्हनिंग वॉक’ आणि ‘डिस्क्रिप्टिव्ह स्केचिस’ ह्या त्याच्या काव्यकृती प्रसिद्ध झाल्या. तथापि १७९३-९५ हा तीन वर्षांचा काळ त्याने अत्यंत व्यथित मनःस्थितीत घालविला. इंग्लंडचे फ्रान्सबरोबर सुरू झालेले युद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांतीनंतर फ्रान्समध्ये उसळलेला दहशतवाद ह्यांमुळे त्याला नैराश्य आले. एका मित्राकडून अर्थप्राप्ती झाल्यामुळे १७९५ च्या ऑक्टोबरात डॉर्सेट येथे त्याने एक घर घेतले व आपली बहीण डॉरोथी हिच्यासह तो तेथे राहू लागला. डॉरोथी वर्ड्स्वर्थ (१७७१-१८५५) ही स्वतः एक लेखिका होती. ॲल्फॉक्स्डन जर्नल १७९८ व ग्रासमिअर जर्नल्स १८००-०३ हे तिने लिहिलेले रोजनामे तिच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले. वर्ड्स्वर्थच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीने हे रोजनामे महत्त्वाचे आहेत. तिची लेखनशैली उत्स्फूर्त आणि पारदर्शक असून सहजता हा तिचा गुणधर्म आहे. तिच्या ह्या रोजनाम्यांतून आलेल्या जिवंत, वेधक निसर्गवर्णनांनी वर्ड्स्वर्थलाही प्रभावित केले होते. आपल्या भावाचे हरवलेले मनःस्वास्थ्य डॉर्सेट येथील घरात त्याला पुन्हा मिळवून द्यावे, ह्यासाठी तिने सर्वतोपरी काळजी घेतली. द बॉर्डरर्स हे आपले शोकात्म पद्यनाटक वर्ड्स्वर्थने येथेच लिहून पूर्ण केले (१७९५-९६). १७९३-९५ ह्या काळातील त्याची निराश मनःस्थिती या पद्यनाटकातून लक्षणीयपणे व्यक्त झालेली आहे. डॉर्सेट येथे राहत असतानाच श्रेष्ठ इंग्रज कवी आणि टीकाकार ⇨सॅम्युएल टेलर कोलरिज (१७७२-१८३४) ह्याच्याशी वर्ड्स्वर्थचा आणि डॉरोथीचा परिचय झाला. पुढे ह्या परिचयाचे घनिष्ट मैत्रीत रूपांतर झाले. वर्ड्स्वर्थ आणि कोलरिज ह्या दोघांच्याही काव्यनिर्मितीला ह्या स्नेहातून चेतना मिळाली. हे दोघे आणि डॉरोथी ह्यांचे एक स्नेहविश्वच तयार झाले. ‘व्यक्ती तीन, पण आत्मा एक’ असे त्यांचे वर्णन केले जाते. कोलरिजच्या जवळपास राहता यावे, म्हणून वर्ड्स्वर्थ आणि डॉरोथी समरसेटमधील ॲल्फॉक्स्डन पार्क येथे राहावयास आली.
कोलरिज व वर्ड्स्वर्थ ह्या मित्रांनी आपल्या कविता लिरिकल बॅलड्स ह्या नावाने १७९८मध्ये प्रसिद्ध केल्या. ह्या काव्यसंग्रहाच्या पहिल्या आवृत्तीत कोलरिजच्या एकूण तीन कविता होत्या. दुसऱ्याक आवृत्तीत त्याच्या आणखी दोन कविता अंतर्भूत करण्यात आल्या. ह्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाबरोबर इंग्रजी साहित्यात स्वच्छंदतावादाचा उदय झाला, असे मानले जाते. लिरिकल बॅलड्स च्या दुसऱ्या. आवृत्तीला वर्ड्स्वर्थने लिहिलेली विवेचक प्रस्तावना जोडण्यात आली होती. १७९९ च्या डिसेंबरात वर्ड्स्वर्थ आणि डॉरोथी वेस्टमोरलंडमधील ग्रासमिअर येथे राहावयास आली. १८०२ मध्ये वर्ड्स्वर्थने मेरी हचिन्सन ह्या आपल्या शालेय जीवनापासूनच्या मैत्रिणीशी विवाह केला. १७९६ ते १८०६ हा वर्ड्स्वर्थच्या जीवनातील महान कालखंड मानला जातो. त्याची बरीचशी उत्कृष्ट काव्यनिर्मिती ह्याच दशकात झाली. द प्रीलूड (लेखनकाळ १७९९ -१८०५) हे त्याचे काव्य ह्याच दशकातले वाढत्या कुटुंबाला ग्रासमिअर येथील घर अपुरे पडू लागले, म्हणून १८०८ साली वर्ड्स्वर्थ ॲलनबँक येथे राहावयास आला आणि पुढे १८११ पासून तो रायड्ल माउंट येथेच स्थायिक झाला. १८१३ मध्ये त्याला ‘डिस्ट्रिब्यूटर ऑफ स्टँप्स फॉर द काउंटी ऑफ वेस्टमोरलंड’ हे विनाश्रम पद देण्यात आले. १८४३ मध्ये इंग्लंडचा राजकवी होण्याचा सन्मान त्याला प्राप्त झाला. ग्रासमिअर येथे तो निधन पावला.
‘ॲन ईव्हनिंग वॉक’ आणि ‘डिस्क्रिप्टिव्ह स्केचिस’ ह्या वर्ड्स्वर्थच्या आरंभीच्या कवितांवर अठराव्या शतकातील इंग्रज कवींचा प्रभाव दिसून येतो. ‘हिरोइक कप्लेट’ आणि ‘स्पेन्सरिअन स्टँझा’ हे अठराव्या शतकातील लोकप्रिय वृत्तप्रकार होते. वरील दोन्ही कविता ‘हिरोइक कप्लेट’ मध्ये रचिलेल्या आहेत, तर ‘गिल्ट अँड सॉरो ऑर इन्सिडंट्स अपॉन सॉल्झबरी प्लेन’ ह्या आपल्या कवितेसाठी त्याने ‘स्पेन्सरिअन स्टँझा’चा वापर केला आहे. शीर्षके, शब्दकळा, वर्णने अशा संदर्भातही वर्ड्स्वर्थच्या आरंभीच्या कविता अठराव्या शतकातील इंग्रजी काव्याच्या संकेतांना अनुसरताना दिसतात पण अशा कवितांतही आत्मनिष्ठेचा एक समर्थ सूर दिसून येतो. वर्ड्स्वर्थ हा निसर्गकवी असला, तरी मानवाला आणि मानवी जीवनाला त्याने निसर्गाइतकेच महत्त्व दिले. निसर्ग आणि मानव ह्यांच्यातील अन्योन्यक्रिया हा वर्ड्स्वर्थच्या उत्कट आस्थेचा विषय होता आणि ह्या आस्थेची चाहूल त्याच्या सुरुवातीच्या कवितांतूनही स्पष्टपणे लागते. निसर्गाचे सौंदर्य आणि त्याची उदात्तता व्यक्तविणाऱ्या अनेक प्रतिमा वरील दोन्ही काव्यांत विपुल आहेत पण निसर्ग सुंदर असला आणि त्याच्या सौंदर्याचा आस्वादही माणसाला घेता येत असला, तरी ह्या जगात माणसाला खडतरपणाचाही अनुभव येतो आणि दुःखही सोसावे लागते, ह्याचे भानही वर्ड्स्वर्थने दाखविले आहे. ‘ॲन ईव्हनिंग वॉक’ मध्ये विपन्नावस्थेतील माता आणि तिची उपाशी मुले ह्यांचे चित्रण आहे. वर्ड्स्वर्थने केलेला आल्प्सचा दौरा हा ‘डिस्क्रिप्टिव्ह स्केचिस’ चा विषय आहे. ही कविता त्याने फ्रान्समध्ये असताना, फ्रेंच राज्यक्रांतीच्या वातावरणात लिहिली. परिणामतः तीत राजकीय विचारांचे स्पष्ट सूचन बऱ्याच प्रमाणात दिसून येते, ‘… …सॉल्झबरी प्लेन’ मध्ये हे अधिक दिसते (ह्या कवितेच्या मूळ संहितेत वर्ड्स्वर्थने वेळोवेळी बदल केले. ह्या कवितेचा काही भाग ‘द फीमेल व्हॅग्रंट’ ह्या शीर्षकाने लिरिकल बॅलड्समध्ये प्रसिद्ध झाला. वर्ड्स्वर्थच्या संपूर्ण काव्यसंकलनात ही कविता ‘गिल्ट अँड सॉरो ’ ह्या नावाने प्रसिद्ध झालेली आहे).
वर्ड्स्वर्थने लिरिकल बॅलड्सच्या दुसऱ्या आवृत्तीला लिहिलेली प्रस्तावना म्हणजे इंग्रजी साहित्यातील स्वच्छंदतावादी चळवळीचा जाहीरनामाच होय. सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रसंग आणि घटना सर्वसामान्यांच्याच भाषेत व्यक्त करणे, हा आपल्या कवितेचा प्रमुख हेतू म्हणून वर्ड्स्वर्थने ह्या प्रस्तावनेत नमूद केला आहे. अशा घटनाप्रसंगांतून निसर्गाच्या मूलभूत नियमांचा शोध घेता आला, तर हे वरवर सामान्य वाटणारे घटनाप्रसंगही स्वारस्यपूर्ण होऊ शकतील, अशी वर्ड्स्वर्थची धारणा होती. काव्यविषयांसाठी साधेसुधे ग्रामीण जीवन त्याला विशेष उचित वाटले. अशा जीवनावस्थेत मानवी भावभावना निसर्गाच्या सुंदर आणि चिरंतन रूपांशी समरसलेल्या असतात, असा त्याचा अनुभव होता. ह्या भूमिकेमागे काही सामाजिक-राजकीय संदर्भही होते. थोर फ्रेंच विचारवंत ⇨झां झाक रूसो (१७१२-७८) ह्याचे विचार यूरोपात प्रसृत झालेले होते. नैसर्गिक जीवनाला आदर्श मानणार्या रूसोला प्राथमिक अवस्थेतला माणूस ‘उदारमनस्क आरण्यवासी’- ‘नोबल सॅव्हिज’- वाटत असे. माणसाच्या बुद्धीचा विकास होऊन त्याची तथाकथित प्रगती झाली, तेव्हापासूनच तो अधोगतीला लागला, असे रूसोचे प्रतिपादन होते. आपल्या सांस्कृतिक जीवनातल्या कृत्रिमतेचा त्याग करून माणसे आपल्या नैसर्गिक अवस्थेजवळ जातील, तर तेच इष्ट ठरेल, असे रूसोचे म्हणणे होते. रूसोच्या ह्या विचारांचा प्रभाव चित्रकला आणि वास्तुकला ह्यांसारख्या कलाक्षेत्रांत दिसू लागला होता. इंग्रजी साहित्यात ⇨रॉबर्ट बर्न्ससारख्या (१७५९-९६) स्कॉटिश कवीने आपल्या कवितेतून सामान्य माणसाचे जीवन हळुवारपणे आणि सहानुभूतीने सशब्द केले होते. इंग्रजी साहित्यातील नव-अभिजाततावाद आणि स्वच्छंदतावाद ह्यांच्या संक्रमणकाळातील बर्न्स हा महत्त्वाचा कवी होता आणि ह्या दृष्टीने त्याला वर्ड्स्वर्थचा पूर्वसूरी मानता येईल. तथापि आपल्या प्रस्तावनेत वर्ड्स्वर्थने भर दिलेल्या इतर अनेक मुद्यांपेक्षा सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याने आत्मचरित्रात्मक आशयाला आपल्या कवितेत केंद्रवर्ती स्थान दिले, ही होय. द प्रीलूडसारखी आत्मचरित्रपर आणि महाकाव्यसदृश कविता इंग्रजी वाचकांना अनोखी होती.स्वतः वर्ड्स्वर्थला ह्या काव्यकृतीचे अपूर्वत्व जाणवलेले होते. आत्मचरित्रात्मकता हे त्याच्या एकूण कवितेचे एक लक्षणीय वैशिष्ट्य बनले. त्याच्या अनेक उत्कृष्ट कविता रोजनिशीसारख्या वाटतात, असे अभ्यासकांनी नमूद करून ठेविले आहे. ज्या कवितांतून अशा आत्मचरित्रात्मकतेचा अभाव दिसून येतो, तेथे तो अनुभवांचे सामान्यीकरण करण्याच्या, त्यातून नैतिक तात्पर्य काढण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. आपली बोधवादी भूमिका वर्ड्स्वर्थने कधीच लपविली नव्हती. प्रत्येक थोर कवी हा शिक्षक असतो, माझ्याकडेही शिक्षक म्हणूनच पाहिले जावे, असे त्याने नमूद करून ठेविले आहे.
वर्ड्स्वर्थच्या काव्यविषयक भूमिकेची आणखीही काही वैशिष्ट्ये सांगता येतील. कविता ही मूलतः एका विशिष्ट मानसिक स्थितीचे चित्रण असते. आणि अशा मानसिक स्थितीचे जे मूल्य असते, त्यातच ती सशब्द करणाऱ्यास कवितेचेही मोल सामावलेले असते. कवी हा असामान्य भावचैतन्य लाभलेला माणूस असतो. त्याच्या भोवतालची माणसे आणि बाह्य निसर्ग ह्यांचे त्याला जे संवेदन होते, त्यातून त्यांच्या परस्परांशी असलेल्या नात्यांची, तसेच सर्व अस्तित्वाच्या मुळाशी असलेल्या नैतिक आणि मानसशास्त्रीय सत्यांची प्रतिमाने त्याला प्राप्त होतात. ही प्रक्रिया तात्कालिक नसते. संवेदनाच्या अत्युत्कट क्षणातून जी भावना प्रतीत होते, तिच्या नंतर जाणवलेल्या स्मृतिरूपातून तिच्या मानवी आणि वैश्विक अर्थवत्तेचा साक्षात्कार होतो. तथापि कवीचे विशेष प्रकारचे संवेदन हा ह्या प्रक्रियेचा आरंभबिंदू असतो. अशा प्रकारची भूमिका कोणत्याही इंग्रज कवीने पूर्वी मांडलेली नव्हती. कविता म्हणजे उत्कट भावनांचा उत्स्फूर्त उत्सेक असतो व मनाच्या प्रशांत अवस्थेत अनुस्मृत झालेल्या भावनेत तिचा उगम असतो, ही त्याची कवितेची व्याख्या प्रसिद्धच आहे.
इंग्रजी साहित्याला स्वच्छंदतेचे नवे वळण देणाऱ्या लिरिकल बॅलड्स ह्या काव्यसंग्रहात वर्ड्स्वर्थप्रमाणेच कोलरिजच्याही कविता अंतर्भूत होत्या. दैनंदिन जीवनातील वस्तूंना आणि घटनांना नवतेचे सौंदर्य प्राप्त करून देणे, हा वर्ड्स्वर्थचा काव्यहेतू होता. कोलरिजने स्वतःच्या कवितांतून अतिमानुषतेला स्थान दिले. तथापि वर्ड्स्वर्थ मात्र आपल्या कवितेतून अतिमानुषतेशी समधर्मी अशी भावना चेतविण्यासाठी आपल्या समोर सतत असलेल्या जगातील सौंदर्य आणि अद्भुतता ह्यांकडे आस्वादकांची मने वेधून घेऊ पाहात होता सांकेतिक जीवनाच्या मरगळीपासून दूर जाण्याचा त्याचा प्रयत्न होता, असे कोलरिजने त्याच्या बायोग्राफिआ लितरारिआ (१८१७, इं. शी. ‘लिटररी ऑटोबायग्राफी’) ह्या ग्रंथात म्हटले आहे. वर्ड्स्वर्थचा विरोध बौद्धिक आणि विश्लेषक पद्धतीने विचार करण्याच्या पद्धतीला होता. विचाराची ही पद्धत हे अठराव्या शतकाचे वैशिष्ट्य होते. ही सवय निसर्गातील विविध वस्तूंची एकमेकांपासून निघृणपणे फारकत तर करतेच परंतु ज्या जगाचे माणूस चिंतन करतो, त्या जगापासून त्याच्या मनाची फारकत घडवून आणते. ह्या सवयीचा प्रतिकार करून तिच्या पलीकडे जाण्यासाठी मानवी कल्पनाशक्ती महत्त्वाची भूमिका बजावू शकते, अशी वर्ड्स्वर्थची धारणा होती.
वर्ड्स्वर्थला निसर्ग गुरुस्थानी होता. त्यांत त्याला ईश्वराचा साक्षात्कार होत असे. ‘लाइन्स रिटन अबव्ह् टिंटर्न ॲबी’ आणि ‘ओड ऑन द इंटिमेशन्स ऑफ इम्मॉर्टॅलिटी’ ह्यांसारख्या कविता त्या दृष्टीने निर्देशनीय आहेत. या तत्त्वचिंतनपर कवितांप्रमाणे वर्ड्स्वर्थच्या ग्रामीण परिसरातल्या साध्याभोळ्या स्त्री पुरुषांवरील भावकविताही लक्षणीय आहेत. सुनीत या काव्यप्रकारातही त्याने विविध प्रकारच्या उत्कृष्ट रचना केल्या.
आयुष्याच्या उत्तरार्धात वर्ड्स्वर्थमध्ये काही वैचारिक परिवर्तन झालेले दिसते. तो एक सनातनी ख्रिस्ती बनला. फ्रेंच राज्यक्रांतीविषयीही त्याचा भ्रमनिरास झाला आणि फ्रान्स व नेपोलियन ही त्याच्या दृष्टीने क्रूरता आणि दडपशाही ह्यांची प्रतीके बनली. या मानसिक स्थित्यंतरानंतर त्याच्या काव्यातील पूर्वीचा जिवंतपणा जवळजवळ लोपलाच. एकंदरीत, त्याच्या समग्र काव्यात दर्जाचे चढउतार एखाद्या पहिल्या प्रतीच्या कवीला न शोभेल इतक्या प्रमाणात आढळतात. तरीही, इंग्रजी कवितेला नवे वळण देणारा एक युगप्रवर्तक कवी म्हणून वर्ड्स्वर्थचे स्थान आजही अढळ आहे.
संदर्भ : 1. Bateson, F. W. Wordsworth: A Reinterpretation, London, 1954.
2. Beatty, Arthur, Ed. Wordsworth: Representative Poems, New York, 1937.
3. Burra, Peter Wordsworth, London, 1936.
4. Clarke, Colin C. Romantic Paradox: An Essay on the Poetry of Wordsworth, New York, 1963.
5. Darbishire, Helen, The Poet Wordsworth, Oxford, 1950.
6. Douglas, Wallace W. Wordsworth: The Construction of a Personality, Kent, Ohio, 1963.
7. Garrod, H. W. Wordsworth: Lectures and Essays, 2nd Rev. Ed. Oxford, 1927.
8. Harper, George McLean, William Wordsworth: His Life, Works and Influence, 2 Vols., London, 1916.
9. Hartman, Gooffrey, Wordsworth’s Poetry 1787-1814, London, 1964.
10. Marsh. F. Wordsworth’s Imagery, A Study in Poetic Vision, New Haven, 1952.
11. Moorman, Mrs. Mary, William Wordsworth: A Biography, 2 Vols., Oxford,1965.
12. Read, Herbert, Wordsworth, London, 1930.
13. Selincourt, E. de Darbishire, H. The Poetical Works of William Wordsworth, 5 Vols., Oxford, 1940-49.
14. Selincourt, E. de, The Letters of W. and Dorothy Wordsworth, 6 Vols., Oxford, 1935- 39.
15. Smith, J. C. A Study of Wordsworth, Edinburgh & London, 1944.
16. Smith, N. C. Ed. Wordsworth’s Literary Criticism, London, 1906.
17. Stallknecht, N. P. Strange Seas of Thought : Studies in Willam Wordsworth’s Philosophy of Man and Nature, Durham (N.C.), 1945.
कुलकर्णी, अ. र.
“