वयनिर्णय : वयनिर्णय करणे म्हणजेच व्यक्तीचे वय ठरविणे. अनेक वेळा अनेक कारणांनी ते आवश्यक असते. वयाचा पुरावा म्हणून सहसा नगरपालिकेचा जन्म दाखला, शाळेचा दाखला किंवा शालांत परीक्षेचा दाखला पुरेसा असतो. असा दाखला उपलब्ध नसल्यास अथवा दाखल्याबाबत संशय असल्यास शारीरिक व मानसिक क्षमतांचा अंदाज घेण्यासाठी किंवा कायदेशीर बाबींच्या पूर्तेतेसाठी इतर पद्धतींनी व्यक्तीचे अंदाजे वय ठरवून तसा दाखला तज्ञांनी देण्याची जरूरी पडते.
वयनिर्णयीची आवश्यकता भासण्याच्या कारणांचे वैद्यकीय, न्यायवैद्यकीय व इतर असे गट सोयीसाठी पाडता येतील परंतु ही कारणे बऱ्याच वेळा एकमेकांत गुंतलेली असतात.
वैद्यकीय कारणे : गर्भधारणेनंतर गर्भारपणाचा काळ ठरविण्यापासून मृत व्यक्तीचे वय ठरविण्यापर्यंत प्रत्येक वयाच्या व्यक्तीच्या बाबतीत वयनिर्णयाची जरूर लागू शकते. हा निर्णय व तशी नोंद मुख्यतः वैद्यकीय कारणासाठी केलेली असली, तरी तिचा कधीही न्यायवैद्यकीय (वैद्यकशास्त्र व वैद्यकीय बाबींशी अशा ज्ञानाचा न्यायदानाच्या मदतीकरिता उपयोग करणाऱ्या शास्त्रात) उपयोग होऊ शकतो. गर्भाची योग्य वाढ, प्रसूतीचा योग्य काळ, अकाल प्रसूतीत गर्भाची वाढ व गर्भ जगण्याची शक्यता, गर्भपात व अकाल प्रसूतीतील फरक, व्य्क्तीची योग्य प्रमाणातील शारीरिक व मानसिक वाढ, वृद्धपणात शारीरिक व मानसिक क्षमतांच्या ऱ्हासाचे प्रमाण, त्या त्या वयोगटातील व्यक्तीला असलेले निरनिराळ्या रोगांच्या मृत्यूच्या धोक्याचे प्रमाण इ. मुख्यतः वैद्यकीय कारणांसाठी वयनिर्णयाची आवश्यकता भासते. यासाठी माहीत असलेले कालिक वय व प्रत्यक्ष तपासणीत भासणारे शारीरिक व मानसिक वय यांची सतत तुलना केली जाते.
न्यायवैद्यकीय कारणे : वयनिर्णयाची आवश्यकता इतर कारणांपेक्षा मुख्यतः न्यायवैद्यकीय कारणांकरिताच बहुधा भासते. यामध्ये सर्व वयोगटांतील जिवंत वा मृत व्यक्तीचे वय ठरविणे आवश्यक ठरते. मृत व्यक्तीचे वय कित्येक वेळा मृत्यूनंतर निरनिराळ्या कालावधीनंतर व व्यक्तीच्या एखाद्याच उपलब्ध अवयवावरून ठरविणे भाग पडते. [⟶ न्यायवैद्यक].
इतर कारणे : स्पर्धात्मक शारीरिक व मानसिक चाचण्या आणि कसोट्या (उदा., क्रीडास्पर्धा, वयोगटानुसार क्रीडाप्रकार व गुणवत्तेचे निकिष, नोकरीचे वय, विशिष्ट धंदे किंवा व्यवसायांसाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी योग्य वय वगैरे). तसेच मतदान हक्क, अनुमती देता येणे, वाहन चालविण्याचा परवाना मिळणे यांसाठी एरवीही वयनिर्णयाची आवश्यकता असते. काही वेळा त्याला कायदेशीर महत्त्वही येते.
वयनिर्णयाच्या पद्धती : (१) शारीरिक वय ठरविण्याच्या पद्धती : यासाठी दात, हाडांचे अस्थिभवन (हाडाची पूर्ण वाढ होते वेळी त्याचे निरनिराळे भाग एकमेकांना जुळण्याच्या क्रिया), वजन व उंची वगैरे बाबींचा शारीरिक वय ठरविण्यासाठी उपयोग करण्यात येतो. [⟶न्यायवैद्यक].
(२) मानसिक वय ठरविण्यासाठी पद्धती : याकरिता विविध बुद्धिमापन कसोट्या वापरण्यात येतात [⟶ मानसिक कसोट्या].
उपयुक्तता व मर्यादा : वैद्यकीय दृष्टीने वयोगट, उपचारांचे स्वरूप, औषधाची मात्रा या गोष्टी ठरविण्यासाठी वयाचा ढोबळ अंदाज केला तरी पुरते. विलंबित वाढ किंवा अपुरी वाढ, बुद्धिमांद्य या रोगांत शारीरिक व मानसिक तपासण्यांतून जास्तीत जास्त अचूक शारीरिक व मानसिक वय काढून त्याची कालिक वयाशी जास्त सूक्ष्मतेने सांगड घालावी लागते.
न्यायवैद्यकीय कारणांसाठीही जास्त काटेकोरपणे वय ठरविणे आवश्यक असते परंतु सर्वसाधारणपणे सर्व उपलब्ध व शक्य तपासण्या करूनही वयाच्या अंदाजात तीन वर्षे कमीअधिक होऊ शकतात. जन्मापासून सतरा ते वीस वर्षे वयापर्यंत (वाढीचे वय) त्यातल्या त्यात वयाचा जास्त अचूक अंदाज करता येतो.
इतर कारणांसाठी (स्पर्धात्मक शारीरिक व मानसिक कसोट्या, नोकरी, विशिष्ट शिक्षणासाठी प्रवेश, परवाना इ.) सर्वसाधारणपणे जन्म दाखला किंवा शाळेचा दाखला पुरेसा असतो व संशयास्पद परिस्थितीतच वयनिर्णयाची जरूरी भासते.
प्रभुणे, रा. प.
“