वणी : महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण व महत्त्वाची कोळसा खाण वसाहत. लोकसंख्या ३१,७७३ (१९८१). निर्गुडा नदीच्या तीरावर वसलेले वणी हे हैदराबाद−नागपूर या मुख्य रस्त्यावरील तसेच माजरी (चंद्रपूर)−राजपूर लोहमार्गावरील एक स्थानक आहे. याला मराठीत वणी, तर हिंदीमध्ये वूण असे संबोधले जाते. परंतु वणी हेच नाव प्रचलित आहे. १९०५ पर्यंत जिल्ह्याचे नाव वणी व जिल्ह्याचे मुख्य ठिकाण यवतमाळ होते. १९२४ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. सातारचे छत्रपती शाहू यांच्या सूचनेवरून रघूजी भोसले आपले चुलते कान्होजी भोसले यांच्यावर चालून गेले. वणी येथे त्यांनी कान्होजीचा पराभव करून त्यांना पकडून साताऱ्यात आणले.
कापूस वटणी व दाबणी, हातमागाचे कापड, तढव, जाजमे व घोंगड्या बनविणे, तेलगिरण्या, लाकूडकटाई हे व्यवसाय वणी येथे चालतात. कोळसा खाणकामासाठी हे विशेष महत्त्वाचे असून चुनखडी खाणकामाच्या दृष्टीनेही त्याचे महत्त्व वाढत आहे. कापूस व गुरे यांचा मोठा व्यापार येथे चालतो. महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतच्या सुविधा येथे आहेत. येथील नगरवाचनालयाची स्थापना १८७४ मध्ये झालेली आहे. नगरात काही हेमाडपंती मंदिरे आढळतात. त्यांपैकी श्री रंगनाथस्वामी मंदिर उल्लेखनीय आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते. दक्षिणेस जवळच असलेल्या कायर येथे गरम पाण्याचे झरे आहेत.
चौधरी, वसंत