वट्टेळुत्तु लिपी : गोलाकार अक्षरे असलेली लिपी. लिपीच्या नावावरूनच तसा अर्थबोध होतो. सर्व अक्षरांचे सारखे वळण, हे वट्टेळुत्तूचे वैशिष्ट्य. हात न उचलता डावीकडून उजवीकडे या लिपीतील अक्षरे लिहिली जात असून सर्व अक्षरांचा झोक डावीकडे वळलेला आहे. ‘ड’, ‘व’, ‘र’ या अक्षरांना डाव्या बाजूला हूक आहे. या लिपीतील ‘ट’ या अक्षराचे उजव्या बाजूला हूक असलेल्या ‘म’ या प्राचीन तमिळ अक्षराशी साम्य आहे. पोपटाच्या चोचीसारखा वळलेला वट्टेळुत्तूमधील ‘य’ जुन्या तमिळ लिपीतील ‘य’ अक्षराशी बराच मिळता-जुळता आहे. गोलाई असलेला ‘उ’, डोक्यावर टोक असलेला ‘ए’ आणि डाव्या बाजूला टवळे असलेला ‘ण’ ही अक्षरे प्राचीनत्व दर्शवितात. या लिपीतील ‘क’ हे अक्षर चार ह्या आकड्यासारखे आहे. ‘त’ अक्षराच्या शेपटाची लांबी अक्षराच्या डोक्यापर्यंत गेलेली आढळते.
ह्या लिपीचे मल्याळम् लिपीशी जवळचे नाते आहे. मल्याळम् भाषेची प्राचीन लिपी, गोलाकार वळणाची (वट्ट-एळुत्तु) आहे. संस्कृत भाषा ज्याप्रमाणे निरनिराळ्या लिप्यांत लिहीत, त्याप्रमाणे मल्याळम् भाषा, ग्रंथ, वट्टेळुत्तु, कोळेळुत्तु, आर्य-एळुत्तू या लिप्यांतून लिहिली जात असे.
ह्या लिपीच्या उगमाविषयी विद्वानांत मतभेत आहेत, तरीही तमिळनाडूच्या गुंफांतून आढळणाऱ्या शिलालेखांतील दक्षिणेकडील ब्राम्ही लिपीपासून इ. स. पू. तिसऱ्या−दुसऱ्या शतकांत हिचा उगम झाला, असे मानतात. वट्टेळुत्तू लिपीनंतर जरी ग्रंथ लिपी आणि आर्य एळुत्तू लिपी अस्तित्वात आल्या, तरी या लिप्यांबरोबरच एके काळ तमिळ भाषिक पांड्य प्रांतात प्रचलित असलेली वट्टेळुत्तू लिपी मल्यालम् भाषिक केरळ प्रांतात अठराव्या शतकापर्यंत प्रचलित होती.
ह्या लिपीचा प्रसार प्राचीन मद्रास प्रांताच्या (सध्याचे तमिळनाडू राज्य) पश्चिम व दक्षिण भागांत झाला. हिचा उल्लेख सु. सातव्या शतकातील चोल, पांड्य राजांच्या शिलालेखातून आणि ताम्रपटांतून आढळतो. भास्कर रविवर्म्याच्या ज्यू लोकांसाठी दिलेल्या शासनलेखांतून आणि तिरुनेलवेली ताम्रपटांतूनदेखील ही लिपी आढळून येते (एपिग्राफिका इंडिका, भाग ३, पृ. ३७२). या लेखांचा काळ आठव्या शतकातील आहे. कोचीनमधील सिरियन लोकांच्या दानपत्रांत हीच लिपी प्रत्ययास येते.
पहा: मल्याळम् लिपि.
संदर्भ: ओझा, गौरीशंकर, भारतीय प्राचीन लिपिमाला , दिल्ली, १९५९.
गोखले, शोभना
“