लोध्र : (म., हिं. लोध गु. लोदर क. बललोद्दुगिनमर सं. लोध्र मार्जन, तिलक, तिल्वक कॅलिफोर्नियन सिंकोना, लोध ट्री लॅ. सिंप्लोकस रॅसिमोजा कुल-सिंप्लोकेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक लहान सदापर्णी वृक्ष. पूर्व व उत्तर भारतातील मैदानी प्रदेशांत व लहान टेकड्यांत आणि हिमालयात सु. १,४०० मी. उंचीपर्यंत व दक्षिणेस छोटा नागपूरपर्यंत हा सामान्यपणे आढळतो.
पाकिस्तानातही याचा प्रसार आहे. सिंप्लोकस ह्या त्याच्या प्रजातीत सु. ३०० जाती असून भारतात त्यांपैकी सु. ४० आढळतात. त्यांपैकी फार थोड्या आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. सिंप्लोकस प्रजातीतील लॉरिना (स्पायकॅटा), पॅनिक्युलॅटा (केटेंगॉइडिस), रॅसिमोजा, सुमुन्शिया, बेडोमी, रॅमोसिसिमा इ. कित्येक जातींना ‘लोध्र’ हीच संज्ञा मराठीत व संस्कृतात वापरलेली आढळते. या सर्वांत लहान मोठे फरक आहेत. भारतातील काही संस्कृत ग्रंथांत (कौटिलीय अर्थशास्त्र, बहृत्संहिता, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, रघुवंश इ.) याचे उल्लेख तिलक, तिल्वक, लोध्र या नावांनी भिन्न उपयोगाच्या संदर्भात आले आहेत. पुढे दिलेल्या मजकुरात सिंप्लोकस रॅसिमोजा या जातीचे वर्णन दिले आहे.
लोध्र वृक्ष सु. ६-८ मी. उंच असून त्याचा माथा रुंदट व साल गर्द करडी व खरबरीत असते. पाने वर गर्द हिरवी, साधी, एकाआड एक, भाल्यासारखी किंवा दीर्घवृत्ताकृती-आयत,
किंचित दातेरी किंवा अखंड, चिवट, गुळगुळीत व सु. ९-१८x३-५ सेंमी. असतात. फुलोरा [साधी किंवा संयुक्त मंजरी ⟶ पुष्पबंध] पानांच्या बगेलेत येतो व त्यावर लहान (१-१.३ सेंमी. व्यास), प्रथम पांढरी व नंतर पिवळी होणारी द्विलिंगी, पंचभागी व सुगंधी फुले येतात. फुलातील पाकळ्या जुळलेल्या असून केसरदले (पुं-केसर) अनेक व पाकळ्यांना चिकटलेली असतात. किंजदले (स्त्री-केसर) तीन, जुळलेली व अधःस्थ आणि किंजपुटात तीन कप्पे आणि प्रत्येकात दोन बीजके असतात. [⟶ फू ल]. आठळी फळ जांभळट काळी, लंबगोल (१-१.३सेंमी) व गुळगुळीत असून त्यांत १-३ सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश असलेल्या) बिया असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे सिंप्लोकेसी अथवा लोध्र कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.
संदर्भ : 1. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol.X, New Delhi, 1976.
2. Dastur, J. F. Medicinal Plants of India and Pakistan, Bombay, 1962.
3. Kirtikar, K. R. Basu, B.D. Indian Medicinal Plants, Vol.II, New Delhi, 1975.
४.काशीकर, चिं . ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४.
जमदाडे, ज.वि. परांडेकर, शं.आ.
“