लोककला: नागरीकरण न झालेल्या म्हणजे आदिवासी आणि ग्रामीण जीवनातील कलेसाठी ‘लोककला’ (फोक आर्ट) ही संज्ञा योजिली जाते. असे समजा जगात जेथे जेथे आहेत, तेथे तेथे लोककलाविष्कार आहेत. निसर्गाशी संवाद साधीत जगणाऱ्या लोकसमूहांचे दैनंदिन जीवनाशी संबंधित परंतु कलात्मक आविष्कार लोककला म्हणून ओळखले जातात.
सर्वच लोकसाहित्यविधांप्रमाणे लोककला हा लोकांच्या दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग असतो. लोकजीवनात गीत, नृत्य, नाट्य, हस्तकला इ. सर्वच आविष्कार दैनंदिन गरजेचा भाग म्हणून आविष्कृत होतात. कोणत्या ना कोणत्या कामाशी, कृतीशी त्यांचा संबंध असतो.
स्त्रियांची जात्यावरची ओवीगीते, कांडपगीते, बाळाला जोजवण्याची गीते किंवा सणासुदीची क्रीडानृत्ये व तत्संबद्ध गीते, उत्सवातील नृत्यनाट्ये , देवतोपासनेचा अविभाज्य भाग म्हणून केली जाणारी विधि- विधाने, विधीचा भाग म्हणून काढली जाणारी चित्रे, घडवली जाणारी शिल्पे, रांगोळ्या, मूर्तिकरण या सर्व कला पारंपरिक लोकजीवनाचा अविभाज्य भाग असतो. सादरकर्त्याच्या मनात कलात्मक सौंदर्यनिर्मितीचे निर्मात्याला भान जागृतपणे नसते. उलट कर्तव्यभावना असते. त्यातून आपाततः सौंदर्यनिर्मिती होते व निर्मात्याला आनंदही मिळत असतो, यात शंका नाही.
प्रयोगात्म लोककलांचा आविष्कार प्रायः समूहाद्वारे होतो. जेथे तो वैयक्तिक रीत्या होतो, अथवा अंशतः वैयक्तिक असतो, तेथे सुद्धा त्यामागची भावना समूहमनाच्या आविष्काराचीच असते.
प्रख्यात स्विस मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग यांनी अबोध समूहमनाचा सिद्धांत सांगितला आहे. ते अबोध समूहमन व्यक्तिमनातही कार्यरत असते. त्याच्या प्रेरणेने होणारे आविष्कार हे व्यक्तिनिर्मित असले, तरी समूहमनाला आवाहन करणारे असतात. समूहाला ते आपलेच वाटतात. त्यामुळे सर्व लोकलांमध्ये सहजपणणे आलेला परंपरेचा भाग दर पिढीत प्रवाहित होत असतो. सर्व लोककला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला आपोआप अनायासे मिळत असतात. शिवाय दर पिढी व दर व्यक्ती त्यात आपापल्या प्रकृतिपिंडानुसार आणि बदलत्या पर्यावरणानुसार भर-घटही करीत असते. त्यामुळे लोककलांमध्ये परंपरा व परिवर्तन यांचा मेळ सतत असतो. त्या जुन्या असूनही नित्य नव्या असतात. कारण समूहमनाची मुक्तता त्यामागे कार्यरत असते. प्राकृतिक मुक्तता आणि उत्स्फूर्तता व लवचिकता हे लोककलांचे अंगभूत वैशिष्ट्य असते. त्यामुळे लोककलांचा आविष्कार सदैव ताजा व जिवंत असतो. निसर्गतः त्यात जोश आणि जोम असतो. लोककलांना कृत्रिम बांधीलकी वर्ज्य असते. जाणीवपूर्वक कोणतीच बांधीलकी लोककला स्वीकारीत नाहीत. नेणीवेतून उत्स्फूर्तपणे उसळून आलेला आविष्कार हा लोककलांचा प्राण असतो, म्हणूनच लोककलेचा प्रत्येक आविष्कार नित्यनवा असतो. परंपरेचेही काटेकोर बंधन लोककला मानीत नाही.
जेथे जाणीवपूर्णक काटेकोर बंधनांची गणितमानी वृत्ती येते, तेथे लोककला नागर स्वरूपाकडे झुकू लागते. लोकपरंपरा आणि नागर परंपरा यांत सतत अभिसरण सुरू असतेच. नागर कलांमध्येही जेव्हा अतिगणितमानीमुळे साचेबंद निर्जिवपणा येऊ लागतो, तेव्हा नागर कलावंत लोककलांमधून उत्स्फूर्त, जिवंत झरे शोधीत राहतात व नागर परंपरा समृद्ध करीत असतात.
प्राचीन कृषी अवस्थेत सुगीच्या काळात देवतोत्सवाच्या निमित्ताने सगळा गावच जेव्हा आपले व्यक्तिपण विसरून नृत्यनाट्यात सहभागी होई, तेव्हा रात्र कधी सरे, याचे राहत नसे. तोच दशावतारासारखा मुळातला लोककलाविष्कार जेव्हा मुंबईसारख्या शहरात आज सादर होतो आणि बारा वाजण्यापूर्वी संपवण्याचे बंधन त्यावर येते, त्यावेळी आपोआपच त्यातील नृत्य, गीते, वाद्ये, संवाद या सर्वांवरच बंधने येतात. गणितमानी नागरत्वाकडे तो प्रकार झुकू लागतो, याचा प्रत्यय नित्य येत असतो.
आदिम यातुश्रद्ध अवस्थेतील यातुविधी हे सर्व लोककलांचे मूळ आहे. त्या अवस्थेत समूहातील व्यक्तींची शरीरे भिन्न असली, तरी समूहाचे मन यात्वात्मक भावाने झपाटलेले एकसंध मन असते. नृत्यगीतादी आविष्कारांत समूह सहभागी होतो, तेव्हा एका वर्तुळाकार गतीने तो फिरतो. विश्वाव्याप्त यातुद्रव्य समूहाच्या आवाहनाने वर्तुळमध्यात केंद्रित होते, अशी त्या समूहाची श्रद्धा असते.
भोवतालच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी यातुशक्तीचा उपयोग विविध नाट्यात्म विधींच्या द्वारे करण्याची प्रथा जगभरच्या आदिम समूहांमध्ये होती.
भौतिक विकासाबरोबर व वस्तुनिष्ठ ज्ञानामुळे प्रतिकूल वास्तवावर ताबा मिळवण्याचे अन्य उपाय सापडले आणि कलाविष्कारामागील यातुश्रद्धा उणावली व त्याची जागा लोकदैवतांनी घेतली. लोकदैवतांच्या उपासनेसाठी अनेक लोकाविष्कार होत राहिलेले दिसतात. त्यांतून रंजन व आनंद यांची प्राप्ती होत असल्याचे भानही वाढत गेलेले दिसते. परिणामी एकीकडे श्रद्धा उणावत गेली व दुसरीकडे कलात्मक सौंदर्य व आनंद यांचे भान येत गेले. आज अनेक लोककला या सीमारेषेच्या आसपास आहेत.
कित्येक लोककलांतून उपासना व श्रद्धा यांचा भाग नाहीसा झालेला दिसतो. परंतु उत्स्फूर्त आविष्कार मात्र कायम राहिलेला दिसतो. त्यामुळे आज लोकलांमध्ये श्रद्धायुक्त, श्रद्धामुक्त व दोहोंच्या सीमेवरचे असे तीनही प्रकारचे आविष्कार दिसतात.
लोककलांचे प्रमुख दोन प्रकार : (१) प्रयोगात्म लोककला − म्हणजे नृत्य, नाट्य, संगीतादी आविष्कार व (२) हस्तकला − म्हणजे चित्र, शिल्पादी सर्व वस्तुरूप आविष्कार. भारतीय परंपरेत सर्वच हस्तकलांचा समावेश ‘शिल्प’ या संज्ञेत केलेला आहे. लोककलांमध्ये आजही अनेक आविष्कार धर्मश्रद्धेशी संबंधित आहेत. लोककलांचे प्रकार वर वृक्षाकृतीत दाखवले आहेत. त्यांवरून लोककलांच्या व्याप्तीची स्थूल मानाने कल्पना येऊ शकेल.
औद्योगिकीकरणाच्या गदारोळातही भारतासारख्या देशात आणि पूर्वेकडच्या अन्य देशांतही विविध लोककलांचे प्रचलन होत असते. यांत्रिक जीवनाच्या काटेकोरपणाचा उबग आलेल्या जनसमूहांना लोककलांतील मुक्ततेचे आकर्षण वाटते आहे. भारतीय हस्तोद्योगातून निर्माण झालेल्या वस्त्र-पात्रादी व मूर्ति-शिल्पादी सर्व वस्तूंच आकर्षण पश्चिमेकडे वाढत असल्याचे दिसते. त्यामागचे रहस्यही लोककलांच्या मुक्ताविष्कारातच सामावले आहे.
भवाळकर, तारा
सैद्धांतिक विवेचन : आदिम जीवन अस्थिर असते. ग्रामीण जीवन स्थिर असते. मात्र त्याचे शहरीकरण झालेले नसते. म्हणून ग्रामीण जीवन हा आदिम आणि नागर जीवन यांच्यामधला दुवा असतो. आदिम काळातील अस्थिर मानवी समूह आज बहुशः स्थिर होत आले आहेत. त्यांना ⇨आदिवासी या संज्ञेने ओळखले जाते. आदिवासी हा आदिम व ग्रामीण यांच्यामधला दुवा होय. शिवाय, भारतात आणि इतरत्रही काही भटक्या जमाती अजून शिल्ल्क आहेत. त्यांच्या कलाविष्कारांचा समावेश लोककलांमध्ये करावा लागतो. भारतातील आजच्या सांस्कृतिक अभिसरणाची प्रक्रिया गुंतागुंतीची असल्यामुळे लोकजीवन आणि लोककला यांविषयीची संकल्पनात्मक गुंतागुंतही वाढत आहे.
शिक्षण आणि आर्थिक सुबत्ता यांचा वरदहस्त लाभलेल्या नागर समाजाला ग्रामीण आणि आदिवासी जीवन हे कमी प्रतीचे वाटते. आदिम व आदिवासी लोकांना संस्कृती नसते, असा गैरसमज आदिवासींमध्ये कार्य करणाऱ्या समाजसेवकांमध्येही असतो. खरे पाहता, आदिम व ग्रामीण जीवनावस्था म्हणजे नागरीकरणाच्या पूर्वावस्था असतात. एकेका व्यक्तीच्या संदर्भात अर्भकावस्था, बाल्य, तारुण्य या अवस्थांचा परिपाक प्रौढ आणि वृद्धावस्थांमध्ये होत असतो. त्याप्रमाणे आदिम−संस्कृति–कलांसह सर्व पूर्वावस्थांचा परिपाक नागर संस्कृतीमध्ये होत असतो. अगदी अत्याधुनिक वैज्ञानिक संस्कृतीही याला अपवाद असू शकत नाही. म्हणून या व्याप्तिलेखामधील सैद्धांतिक चर्चा या सर्वंकष अभिसरण−प्रक्रियेसह करणे आवश्यक आहे. आदिम आणि लोकजीवनात कला आणि जीवन यांचा अभेद असतो आणि जीवन निसर्गाशी एकजीव झालेले असते. म्हणून ही चर्चा जीवन आणि निसर्ग यांच्या संदर्भासह करणे आवश्यक आहे. शिवाय आदिम आणि लोकजीवनात कला आणि कारागिरी असा भेद नसतो. कलावंत आणि अ-कलावंत असा भेदही नसतो. सर्व माणसे आपापल्या परीने कधी वैयक्तिक आणि बहुधा सामूहिक कलाविष्कार करीत असतात. सगळेच नाचतात, गातात, रंगवितात. त्यांच्या या कृती त्यांच्या जगण्याचे अविभाज्य अंग बनून येतात. याचे भान ठेवणे येथे आवश्यक असून त्यांचा सैद्धांतिक अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. या चर्चेतून एकीकडे आदिमता आणि दुसरीकडे नागरता यांच्याशी असलेले लोककलेचे मध्यमभावी नाते उलगडत जाईल आणि दुसरीकडे लोकसंस्कृतीकडून नागर संस्कृतीला काही मूलभूत जीवनमान समजूल घेणे आवश्यक असते, हेही स्पष्ट होत जाईल.
चित्र, शिल्प, कारागिरी, हस्तकला, वस्त्रालंकरण, शोभालंकार, मृत्पात्री इ. अनेकविध दृश्य कलाप्रकार काव्य, संगीत, नृत्य, नाट्य आणि त्यांचे ⇨गोंधळ, ⇨भारूड, ⇨दशावतारी नाटके, ⇨यक्षगान, ⇨कीर्तन, ⇨पोवाडा, ⇨तमाशा, ⇨कव्वाली, ⇨लेझीम वगैरे अनेकविध प्रकार; शिवाय या सर्वांचे त्या त्या समाजाच्या चालीरीतींनुसार होणारे विपुल उपप्रकार या सर्वांचा समावेश लोककलांमध्ये करावा लागतो. काही लोककलाप्रकार हे दृश्य कला, संगीत, काव्य, नाट्य या सर्वांना किंवा काहींना सामावून घेणारे असतात. उदा., कर्नाटकात चामड्याच्या पातळ कडक पडद्यावर कातरठसा (स्टेनसिल) − पद्धतीने चित्रे कोरून, दिव्याच्या प्रकाशात त्यांच्या छाया चित्रपटासारख्या पडद्यावर कथानुक्रमाने दाखवून, आख्यान सांगितले जाते. कोकणात कुडाळ परिसरातील चित्रकथी या प्रकारात लोकशैलीतील लघुचित्रे कथानुक्रमाने प्रेक्षकांना दाखवून, काहीसे कीर्तन पद्धतीने आख्यान सांगणारी कलावंतांची परंपरा पिंगुळी या गावात अजून तग धरून आहे. ⇨कळसूत्री बाहुल्यांचा खेळ हा तर कारागिरी आणि नाट्य यांचा हृदयंगम मेळ होय. बाहुल्या तयार करतानाच त्यांचे एकूण कथानकातले स्थान, त्यांचे स्वभाव, त्यांनुसार पोषाख आणि त्यांच्या हालचालींमध्ये आवश्यक असलेली लय यांचा विचार करावा लागतो. कळसूत्रांच्या विशिष्ट हालचाली हाताच्या बोटांनी करताना सूत्रधाराच्या बोटांतून कथानकाचा जीव गोचर व्हायचा, प्रतीत व्हायचा असतो. त्यासाठी सूत्रधाराच्या अंतःकरणातच हे नाट्य प्रथम आकारित व्हावे लागते. संस्कृत नाटकामधील सूत्रधार या संकल्पनेचे मूळ या कळसूत्री खेळाच्या लोकपरंपरेत असले पाहिजे, असे काही अभ्यासक म्हणतात, ते या दृष्टीने अर्थपूर्ण आहे.
लोककलेतील बहुतांश आविष्कार सामूहिक असतात. ते लोकजीवनात संपृक्त झालेले असतात. त्या त्या लोकसंस्कृतीतील सामाजिक, धार्मिक, आध्यामिक श्रद्धा आणि चालीरीती यांच्याशी ते एकजीव झालेले असतात. या आदिम वृत्तीचे प्रतिबिंब वेदकालीन जीवनातही दिसते. त्यांचा यज्ञ ही यातुविद्या होती. आदिम शामान-यातुविद्येत सर्व कला एकजीव झाल्या होत्या. यज्ञयातूशी कलांचे असेच साहचर्य होते. यज्ञविधीच्या काळात करमणुकीचे कार्यक्रमही होत. त्यांत पुराणकथा, नाट्य, नृत्य यांत समावेश असणे स्वाभाविकच होते. यात आजच प्रयोगीय कलांचा उगम दिसून येतो. कीर्तन या आजच्या प्रयोगीय कलाप्रकारातही या सर्वांचा एकजीव झालेला दिसतो. ग्रीक नाट्य हेही धार्मिक विधीचे अविभाज्य अंग होते, मानसशास्त्रीय अर्थाने सर्जनाचा आदिबंध ठरणाऱ्या डायोनायसस या दैवताच्या उत्सवप्रसंगी नाट्यमोहत्सव करण्याची प्रथा ग्रीकांमध्ये होती. पूर्वजपूजेसाठी मुखवट्यांचा उपयोग करण्याची प्रथा आदिम आणि लोकजीवनात होती. ग्रीक नाट्य आणि भारतीय कथकळी नृत्य यांत पात्रांच्या स्वभावदर्शनासाठी मुखवटे येतात. हे आदिम आणि लोकजीवनाचे देणे होय.
आदिम संस्कृतीपासून ग्रामीण, नागर, आधुनिक आणि अत्याधुनिक संस्कृती या दिशेने निरीक्षण करीत गेल्यास कलाविष्कारातील वैयक्तिकता वाढत जात आहे असे दिसून येते. वस्तुतः नागर व्यक्तीसुद्धा समाजातच जगत असते. तिच्या आविष्कारातील सामाजिक आशय अपरिहार्य असतो. तो त्या त्या व्यक्तिमत्त्वाच्या मुशीतून त्याच्या स्वभावधर्मानुसार आकारित होत असतो. तेवढ्या कारणावरून तो पूर्णतः व्यक्तिगत असतो, असे समजणे मात्र अयोग्य ठरेल. संपूर्ण कलाविष्काराला काही एक प्रकारचे मानवी आदिबंध (आर्किटाइप्स) जेव्हा व्यापून राहिलेले असतात तेव्हा व्यक्तिकेंद्रित नागर कलेला महात्मता येते, हे कार्ल युंग या मानसशास्त्रज्ञाचे प्रतिपादन अर्थपूर्ण आहे. आदिम आणि ग्रामीण जीवनात व्यक्ती ही सामाजिक चैतन्याशी एकजीव झालेली असते. तिच्यामधून व्यक्तिमानसाऐवजी समष्टिमानस साकल्याने व्यक्त होत असते. म्हणून आदिम आणि लोककलाविष्कारांमध्ये व्यक्तिगत वैशिष्ट्यांऐवजी त्या त्या सामाजिक गटाची विशेषता आकारित होताना दिसते. तिलाच त्या त्या लोकसमूहाची विशिष्ट शैली असे म्हटले जाते. दृश्य कला असोत किंवा इतर प्रयोगीय कला, त्यांत ही लोकसमूहशैलीच सामान्यत्वाने लक्ष वेधून घेते. गोंधळ, पोवाडा, ⇨ मृत्पात्री यांसारख्या प्रकारांत व्यक्तिगत कौशल्याला महत्त्व येत आहे, असे दिसते. पण प्रत्यक्षात आविष्कार असतो तो सामाजिक भावनाशयाचा व्यक्तिकेंद्रित भावनांचा नव्हे.
येथवर उल्लेखिलेल्या कलाप्रकारांव्यतिरिक्त इतरही काही प्रकार आहेत. त्यांचा आविष्कार करणारे काही विशिष्ट सामाजिक गट आहेत. उदा., नंदीबैलवाले, जरीमरी, वाघ्यामुरळी, वासुदेव वगैरे. यांतील काहींच्या आविष्कारांना कलाप्रकार म्हणून काही अर्थ असतो तर डोंबारी, गारुडी, दरवेशी यांना कलावंत म्हणावे की नाही, असा प्रश्न नागर अभिरुचीला पडतो. हे प्रकार लोकजीवनाशी संपृक्त असल्याने परदेशात होणारे भारत-महोत्सव आणि भारतात होणारे ‘अपना-उत्सव’सारखे उपक्रम यांमध्ये त्यांचा समावेश करावा लागतो. नागर माणूस त्यांचा आस्वाद स्वतःच्या अभिरुचीनुसार घेत असतो. यामुळे लोककलांना नागर समाजाकडून एका परीने आश्रय मिळतो आणि बरेवाईट अभिसरणही घडत असते.
यामुळे नागर वृत्तीचा प्रभाव लोककलांवर पडू लागतो, तो मात्र हानीकारक असतो. औद्योगिकीकरण, आधुनिकीकरण यांमुळे आज खेड्यांचा कायापालट होत आहे. आदिवासी आणि ग्रामीण खेडी दत्तक घेऊन त्यांची सुधारणा करणाऱ्या नागर संस्था आणि उद्योजकही पुढे येत आहेत. शिवाय आदिवासी आणि भटक्या समूहांना स्थिर जीवन नाईलाजाने स्वीकारावे लागत आहे. या सर्वांमुळे लोकजीवन आणि कला यांची मूळची निकोप प्रकृती ढासळत आहे. उदा ., शहरी संपर्कामुळे तामाशासारख्या लोककलेवर शहरी चित्रपटसंगीताचा विपरीत प्रभाव पडत गेला. आधुनिक सुधारणांच्या प्रचारासाठी तामाशाचा ढाचा बदलून लोकनाट्य, ‘जलसा’ (दलितांनी केलेले तमाशाचे रूपांतर) वगैरे शहरी प्रकार निष्पन्न झाले. धोतर किंवा पंचा (फारतर पायजमा) नेसून नाचावयाच्या लेझीम या देशावरील नृत्यप्रकारात शहरातील तरुण कामगारपिढीची विजार-खमीस आल्याने हालचालींमधील डौलच बिघडून जात असल्याचे आज दिसते. शहरीकरण झालेल्या आजच्या गुजराती ⇨गरबा नृत्यामध्ये पश्चिमी डिस्कोचा शिरकाव झालेला दिसतो. वस्त्रभूषणांमध्येही नागर आणि त्यातही पश्चिमी आदर्शांचा प्रभाव पडला. त्यामुळे धारवाडी, इचलकरंजी, नारायण पेठी, दावणगेरे यांसारख्या मूळच्या लोकघाटी वस्त्रालंकरणावर विपरीत परिणाम होऊन त्यातील सौंदर्याचा लोप होत चालला. ⇨पैठणी हा खास मराठी वाणाचा वस्त्रप्रकार नामशेष होत चालला होता. अनेक प्रकारे प्रयत्न करून तज्ञांनी आता त्याला निदान जीवदान दिले आहे. जयपूरजवळील संगनेरी वस्त्रालंकरणशैलीचे आकर्षक आधुनिकीकरण झाल्याने तेथील कलावंत आणि रसिक बेचैन असतात. आंध्रमधील ⇨कलमकारी वस्त्रालंकरणप्रकारात प्रत्यक्ष कुंचल्याच्या रेषेतून अलंकरण केले जाते. पण कलमकारीचा भास निर्माण करणारी मुद्रित वस्त्रभूषणे नागर अभिरुचीच्या मागणीनुसार बाजारात आलेली दिसतात. हातमागाची वीण आणि तीतून मिळणारे अलंकरण यांना वेगळेच सौंदर्य असते. यंत्रातून ते प्राप्त होत नाही. यांत्रिकीकरणाबरोबर हातमागाचे वस्त्रालंकरण-प्रकार नामशेष हात चालले होते.
स्वातंत्र्यानंतर हातमाग मंडळाने त्यासाठी विशेष प्रयत्न केले, म्हणून ते काही प्रमाणात टिकू राहिले. परंपरागत कारागिरीमधील मौलिक अलंकरण-नमुने निवडून यांत्रिक पद्धतीने त्यांचे उत्पादन करावयाचे झाल्यास, त्यांतील मूळचे सौंदर्य टिकविण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील, त्याचा शोध घेण्यासाठी स्वातंत्र्यानंतर अखिल भारतीय पातळीवर ‘डिझाइन डेव्हलपमेंट सेंटर’ ही संस्था कार्य करीत आहे. ⇨कमलादेवी चट्टोपाध्याय आणि पुप्पुल जयकर यांनी लोककला-कारागिरीचा ऱ्हास थांबविण्यासाठी अखिल भारतीय पातळीवर अथक परिश्रम केले. त्यामुळे ऱ्हासाचा वेग किंचित कमी झाल्याचे दिसले. आता कृत्रिम धाग्यांची वस्त्रे यंत्रातून मुबलक मळू लागल्याने ऱ्हासाचा वेग पुन्हा वाढलेला दिसतो. अजून काही प्रमाणात तग धरून असलेल्या आदिवासी कला आणि लोककला खेड्यांचे औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरण झाल्यामुळे पूर्णतः नष्ट होणार आहेत, याची विदारक जाणीव झाल्यामुळे काही अपवादात्मक धयेयवादी विचारवंतांनी या कलाविष्कारांचे आणि त्याबरोबरच लोकजीवनातील संबंधित रीतिरिवाजांचे, उत्सवांचे, सणांचे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चलतचित्रण करण्याच्या कार्यास गेल्या वीस-पंचवीस वर्षापासून व्यक्तिशः वाहून घेतले आहे. नजरेत भरणारी त्यातील दोन उदाहरणे पुढीलप्रमाणे : मुंबईतील सुधाबेन ठक्कर, मेनका ठक्कर आणि अब्दुल्ला खांडवानी यांनी संपूर्ण पश्चिम भारताचे काम पूर्ण करीत आणले आहे. यांतील ठक्कर भगिनी या नर्तकी असून मेनक ठक्कर आणि अब्दुल्ला खांडवानी हे ‘सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’ चे माजी विद्यार्थी आहेत. गुजरात आणि राजस्थानच्या सीमाप्रदेशातील डोंगरी भिल्लांच्या विविध प्रकारच्या काव्य-संगीताचे ध्वनिमुद्रण भगवानभाई पटेल गेली पंधरा वर्षे करीत आहेत. आपल्या कार्याला संशोधनाची शिस्त लागावी, म्हणून त्यांनी त्याच विषयावर डॉक्टरेटचा विद्यापीठीय अभ्यासही केला आहे. ⇨ललित कला अकादमीसारखी राष्ट्रीय संस्था आणि अन्य प्रकाशनसंस्थाही काही अभ्यासकांना उत्तेजन देऊन लोककलेविषयीचे ग्रंथ प्रकाशित करू लागल्या आहेत. ललित कला अकादमीच्या ग्रंथांपैकी ज्योतींद्र जैन यांचा पेंटेड मिथ्स ऑफ क्रिएशन हा पूर्व गुजरातच्या रथवा आदिवासींवरील ‘लोककला मालिके’मधील ग्रंथ आणि हकू शहा यांचा ‘मॅपिन’ प्रकाशनातर्फे ‘लिव्हींग ट्रॅडिशन्स ऑफ इंडिया’ या मालिकेतील व्होटिव्ह टेराकोटाज ऑफ गुजरात हे ग्रंथ उदाहरण म्हणून उल्लेखिता येतील. हे प्रयत्न फार तोकडे आहेत, ह्याची जाणीव या सर्वांना आहे. संपूर्ण सुशिक्षित समाज जागरूक झाला, तरच निदान इतिहासाच्या रूपाने लोककला शिल्लक राहू शकतील.
जिव्या सोमासारख्या वारली आदिवासीच्या चित्रांचे ग्रंथरूपाने प्रकाशन झाल्याने, वारली लोकशैलीला जागतिक कीर्ती मिळाल्याचे आज दिसते. पण वारली चित्रे ही बहुशः स्त्रियांनी चितारावयाची अशी प्रथा असते, स्त्रियांनी चित्रे रंगविणे हा विवाहविधीचा एक भावनिक भाग असतो, याचे भान नागर अभ्यासकांना राहात नाही. या निर्व्याज विधीमुळे त्या रेषेत येणारी निर्व्याजता, सहजता पुरुष चित्रप्रकाराच्या रेषेत येणे कठीण असते. वारली जमातीतील जिव्या सोमा हा एक कलावंत, बाकीचे अ-कलावंत अशी नागर भूमिका येथे घेतली जात आहे. हेही अभ्यासकांच्या ध्यानी येत नाही. नागर कलावंताचा विशेष पेशा त्याच्यावर लादला जातो. त्याच्या चित्रणात अर्थातच सफाई येते पण भाबडेपणाचा लोप होतो. बिहारमधील ⇨मधुबनी चित्रशैलीसुद्धा अशीच जगप्रसिद्ध झाली आहे. नागर संपर्कामुळे तिच्यावर झालेले परिणाम हा अभ्यासाचा विषय ठरेल.
प्रत्यक्ष कलावंतांना मात्र लोककलेतील अवीट आशयसत्त्व आणि निरागस चैतन्य यांची मनस्वी ओढ असते. निव्वळ कौशल्य, सफाई, चटपटीतपणा यांच्या आहारी गेल्याने नागर कलेमधील चैतन्य जेव्हा जेव्हा हरवते, तेव्हा तेव्हा आदिम आणि लोककलांमधून जीवनसत्त्व शोषून नागर कलावंत आपल्या आविष्कारामधून चैतन्य जागवीत असतात, असा अनुभव कलेच्या जागतिक इतिहासात अनेकदा येतो. चैतन्यस्वीकाराच्या या वृत्तीचा निर्देश करण्यासाठी कलाविचारात ‘आदिमवाद’ अशी संज्ञा रूढ आहे.
आदिम आणि लोककलांच्या आविष्कारांत कला आणि कारागिरी असा भेद नसल्याने अनेक कारागिरीच्या वस्तू एकदम भावनाभिव्यक्तीच्या पातळीवर पोहोचू शकतात. पुण्याच्या राजा केळकर वस्तुसंग्रहालयात याची अनेक उदाहरणे दिसतात. उदा., विळीचा एक आकार आणि तिला आधार देणाऱ्या लाकडी पाटाचा खुरांसह आकार यांच्या विशिष्ट रचनेतून अंतरिक्षात झेप घेऊ पाहणाऱ्या पक्ष्याचा भास होतो. नागपूर येथील दक्षिण-मध्य-विभाग सांस्कृतिक केंद्राच्या संग्रहातील एक उदाहरण याहून बोलके आहे. खेड्यातील घरांच्या छपरांसाठी नळे वापरतात. एका नळ्यावर अलंकरण करताना ग्रामीण कारागिराने कोणतीही सुबक कारागिरी न करता फक्त एक टपोरा उंदीर भोवतालचा परिसर दक्षतेने न्याहाळताना दाखविला आहे. कारागिराची निरीक्षणशक्ती आणि एकूण लोकसंस्कृतीमधील जीवनास्था किती मुक्ततेने, सहजपणे आणि उपजत वृत्तीने कार्य करू शकते, यांचे येथे हृद्य प्रत्यंतर येते.
प्राचीन आणि मध्ययुगीन काळी लोकजीवन आणि नागर जीवन यांमध्ये अलंघ्य दरी निर्माण झालेली नव्हती. नागर संस्कृती लोकजीवनातील चांगल्या गोष्टींचा आणि वृत्तींचा स्वीकार करण्यासाठी तत्पर होती. विशेषतः जैन लघुचित्रशैली ही लोकशैलीची लक्षणे अंगभर मिरविताना दिसते. अजिंठा, वेरूळ, खजुराहो, हळेबीड, बेलूर यांसारख्या महाप्रकाल्पांमध्ये कोरणी कलावंत हे कारागीरच मानले जात. नागर शिळेपणा, त्यांच्यात आलेला नव्हता. त्यांनी वैयक्तिक आविष्कार केले नाहीत, तत्कालीन समाजमानसात व्याप्त असलेला आशय अभिव्यक्त केला. प्रसंगी काही शतकेही चालू राहिलेल्या या महाप्रकल्पांमध्ये शेकडा कारागीर काम करीत असूनही संपूर्ण प्रकल्पाची शैली एका मनाच्या मुशीतून आकारित झाल्याचे भावते. या प्रकल्पांमध्ये कारागिरांचा नामनिर्देशही नाही. व्यक्तीने समष्टीमध्ये विलीन होण्याची ही वृत्ती आदिम आणि लोकसंस्कृतींमधून लाभलेली आहे.
लोकसंस्कृतीच्या स्वीकाराचे लिखित पुरावे भारतीय दृश्य कलांच्या इतिहासात मिळत नाहीत; संगीताच्या इतिहासात मुबलक मिळतात. अभिजात भारतीय संगीतात स्वरवर्तनांचे काटेकार नियम करून निष्पन्न होणाऱ्या संगीताला ‘मार्गी संगीत’ आणि लोकजीवनातील धुनींना किंवा स्वरवर्तनांना काही शास्त्रीय शिस्त देऊन निष्पन्न होणाऱ्या संगीताला ‘देशी संगीत’ अशा संज्ञा आहेत. भरतप्रणीत जाती संगीतातून विविधता शोधता शोधता अनेक नवी स्वररूपे उपलब्ध झाली. ती आस्वाद्य होती, या अर्थाने त्यांना ‘राग’ अशी सामान्य संज्ञा प्राप्त झाली. काटेकोर शासकीय नियम असल्याने त्यांना ‘मार्गी राग’ अशी संज्ञा वापरली जाऊ लागली आणि लोकजीवनातील विविध आस्वाद्य स्वररूपांना काही थोडी शास्त्रीय शिस्त लावून निष्पन्न झालेल रागांना देशी राग अशी संज्ञा प्राप्त झाली . मतंगापासून शार्ङ्गदेवापर्यंतच्या शास्त्रकारांनी देशी रागांचा ऊहापोह केला आहे. काव्यासह संगीतरचना करणाऱ्या कलावंताला ‘वाग्गेयकार’ अशी संज्ञा रूढ होती. विविध प्रदेशांतील लोकसंगीताचा सखोल अभ्यास केल्याशिवाय उत्तम वग्गेयकार होता येणार नाही, असे शार्ङ्गदेवाने सांगून ठेवले आहे. ज्याला फक्त मार्गी संगीतात अधिकार असतो, त्याला ‘स्वरादि’ आणि मार्गी हे देशी संगीतातही ज्याला अधिकार असतो त्याला ‘गांधर्व’, अशी बिरुदे शार्ङ्गदेवाने नमूद केली आहेत. स्वराला होणारा भावनाविकार या अर्थी ‘काकु’ किंवा ‘छाया’ अशी संज्ञा संगीतरत्नाकरात येते. काकुच्या अनेक प्रकारांपैकी ‘देश काकु’ म्हणजे त्या त्या विशिष्ट प्रादेशिक लोकजीवनात स्वरांना होणारा विशिष्ट प्रकारचा विकार होय. ज्ञानेश्वरांच्या मुखातून महाराष्ट्रात सर्वतोमुखी झालेली ओवी हा वस्तुतः संस्कृतेतर देशी काव्यप्रकार. त्याच्याशी एकजीव झालेल्या सुरावटींचे अवशेष आजही काही थोडे दिसतात. काटेकोर नियमांनी बांधलेल्या गायनप्रकाराला त्या काळात ‘प्रबंध’ अशी संज्ञा होती. विविध प्रकारच्या प्रबंधांनी चर्चा करणाऱ्या प्रबंधाघ्यायात शार्ङ्गदेवाने ‘ओवी प्रबंधा’चाही उल्लेख देशभाषेतील प्रबंध म्हणून केला आहे. तत्कालीन लाट या लोकभाषेतील अशाच संगीतप्रकाराचा निर्देश त्याने ‘ढोल्लरी प्रबंध’ म्हणून केला आहे.
पश्चिमी आधुनिक चित्रकार ⇨पॉल गोगँ याने आफ्रिकी-आदिवासी कलेमधून चैतन्यस्रोत मिळविला. ⇨पॉल क्ले या अमूर्त प्रणालीच्या चित्रकाराने दुसऱ्या आदिम व्याधशैलीचे संस्कार आत्मसात केले. आधुनिक भारतीय चित्रकार ⇨जामिनी राय यांनी आपली शैली थेट लोकशैलीच्या टप्प्यावर नेऊन ठेवली. अब्दुल रहीम आलमेलकर या मराठी चित्रकाराने जिनगरी लोकशैलीच्या संस्कारामधून आपले आविष्कार सिद्ध केले. बद्री नारायण यांच्या चित्रांतील मानवाकृतींमध्ये लोकमानसात किंवा बालमानसात दिसणारी निर्व्याजता ओतप्रोत दिसते. मद्रासमधील जानकीराम आणि नंदगोपाल या शिल्पकरांनी लोकशैलीमधून सत्त्वसार आत्मसात केले. बंगाली शिल्पकर्त्री मीरा मुखर्जी आणि महाराष्ट्रातील शिल्पकार डी.जी. कुळकर्णी यांनी आदिम आणि लोककलेमधून जीवनसत्त्व शोषून आपापल्या प्रकृतींनुसार निर्व्याजपणे आकारित केलेले दिसते. मराठीतील घाशीराम कोतवाल आणि कन्नडमधील हयवदन यांसारख्या आधुनिक नाटकांत लोकनाट्याच्या रंगरीती आणि रचनापद्धती यांचा मार्मिक उपयोग केलेला दिसतो. ⇨शिवराम कारंत यांनी कन्नडमधील यक्षगान हा लोकनाट्यप्रकार त्याच्या मूळ स्वरूपात जतन करण्यासाठी अथक परिश्रम केले. संगीतात यक्षगान हा लोकनाट्यप्रकार त्याच्या मूळ स्वरूपात जतन करण्यासाठी अथक परिश्रम केले. संगीतात कुमार गंधर्व, किशोरी आमोणकार, भीमसेन यांनी लोकसंगीताचे संस्कार आस्थेने आत्मसात केले. माळव्यातील लोकधुनींमधून कुमार गंधर्वांनी धून-उगम राग तयार केल. किशोरी आमोणकरांनी गुजराती, राजस्थानी लोकधुनी आपल्या उपशास्त्रीय गायनात एकजीव केल्या. भीमसेन जोशींनी भजन तसेच भक्तिसंगीतातील अभंग या खास मराठी प्रकाराला नवे परिमाण देऊन संगीत जनसामन्यापर्यंत पोहोचविले.
लोकजीवनाला हीन लेखण्याची वृत्ती भारतात ब्रिटिश काळापासून सुरू होते. इंग्रजांच्या दृष्टीने सर्व भारतीय हे संस्कृतिहीन; म्हणून फक्त ‘नेटिव्ह’ होते. आधुनिक यंत्रयुगाचे स्वागत करताना स्वतःच्या जुन्या संस्कृतीशी, एकूण भूतकाळाशीच फारकत घेण्याची वृत्ती तत्कालीन यूरोपीय समाजात निर्माण झाली होती. इंग्रजी शिक्षणाबरोबरच भारतीय सुशिक्षितांमध्येही ही वृत्ती पसरली. आपल्या परंपरागत कारागिरीविषयी तुच्छतेचे उद्गार काढण्यात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील आंग्लशिक्षित मराठी तरुण अग्रेसर होते. लोकजीवनाशी संपृक्त असलेली कारागिरीची परंपरा इंग्रजांनी सुरू केलेल्या यांत्रिकीकरणामुळे संपुष्टात येत होती. याचे भान आधीच आल्यामुळे तिचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सर जमशेटजी जिजीभाईंनी ‘सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री’ची (क्राफ्ट ह्या अर्थाने इंडस्ट्री) स्थापना एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास केली होती. याच काळात मद्रासमध्येही ‘मद्रास स्कूल ऑफ आर्ट अँड क्राफ्ट’ची स्थापना झाली. मद्रासमध्ये ही संस्था अजूनही तिच्या मूळ स्वरूपात कार्य करीत आहे. महराष्ट्रात मात्र विसाव्या शतकाच्या सुरुवातीसच जे.जे. मधील परंपरागत कारागिरीचे वर्ग बंद करण्यात आले.
प्रत्यक्ष यूरोपात याच काळात एक वेगळीच वैचारिक वाटचाल पावले न वाजवता सुरू होती. यूरोपातील फ्रँकोकँटेब्रिअन आदिम कलेचा शोध एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातच लागला होता. ही पहिली व्याध संस्कती. शेतीचा शोध लागून कृषिसंस्कृतीचा उदय होण्याआधीची ही आदिम संस्कृती. कृषिसंस्कृतीच्या उदयानंतर आदिम संस्कृती विकलांग होऊन कृषिसंस्कृतीला समांतर जीवन अट्टाहासाने व्यतीत करीत होती. ही दुसरी व्याधसंस्कृती. आजचे आदिवासी ह्या दुसऱ्या व्याधशैलीचे वंशज आहेत. नंतर जगभरातील आदिम कलेचा आणि जीवनाचा अभ्यास वाढत गेला. त्याला आधुनिक मानसशास्त्राची जोड मिळाली. या सर्वांचा परिपाक होऊन विसाव्या शतकाच्या मध्यानंतर संस्कृतीविषयीची नवी दृष्टी विचारवंतांमध्ये जागी झाली. बुद्धिवाद आणि विज्ञान यांचा स्वीकार करताना आदिमतेचाही मानसिक पातळीवर आदरपूर्वक स्वीकार केला पाहिजे, याचे भान आले. भौतिक प्रगतीच्या मापाने संस्कृतीची गुणवत्ता मोजता येत नसते, याची जाणीव नव्याने झाली. भूतकाळाशी जोडलेली मानवतेची नाळ तोडण्याची उताविळी ही स्वतःचेच पाय तोडण्याची उताविळी होय. असा इशारा कार्ल युंग या स्विस मानसशास्त्रज्ञानेही दिला होता. या सर्वांचा प्रभाव पश्चिमी मानवशास्त्रज्ञांवरही पडला. भारतीय मानवशास्त्रज्ञांमध्येही ही दृष्टी येत आहे. आदिवासींच्या जीवनाचे तथाकथित संस्कृतिकरण करण्याच्या उपक्रमांमुळे आदिवासींच्या मनात स्वतःच्या संस्कृतीविषयी न्यूनगंड निर्माण होत आहे, स्वतःच्या दैवतकल्पनांचा त्याग करून प्रस्थापित नागर संस्कृतीची दैवते ते स्वीकारू लागले आहेत हे योग्य नाही, असे स्पष्टपणे दाखवून देणारे स.ह. देशपांड्यांसारखे काही अर्थतज्ञ, समाजचिंतक पुढे येत आहेत. अंदमानच्या आदिम जमातींमध्ये कार्य करणारे मानवशास्त्रज्ञ टी.एन्. पंडित यांनी अतिशय समतोल भूमिका घेतली आहे. आदिम संस्कृतीशी समरस होऊन प्रेमाचे नाते जोडणे म्हणजे आपणच आपल्यामधील आदिमतेशी नाते जोडणे होय, अशी मानवशास्त्रीय भूमिका त्यांनी घेतली आहे.
एकोणिसाव्या शतकात सुरू झालेल्या भारतीय प्रबोधनात पश्चिमी विज्ञान आणि बुद्धिवाद हे परवलीचे शब्द सुधारकांना आकर्षित करीत होते. त्यानी अंधश्रद्धांवर प्रहार केले, ते योग्यच होते. मात्र मानवी मन ही निव्वळ वैज्ञानिक वास्तवाच्या कोटीतील घटना नसून एक वेगळीच वैश्चिक वास्तवाची घटना असते, तीत वैज्ञानिक वास्तवाला आत्मसात करून घेणारी अतिव्यापक इष्टी (विल) असून ती काच वेळी व्यक्तिगत आणि समाष्टिगत असते, या वस्तुस्थितीकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. आज अबोध (नेणीव) मानसशास्त्राने हे भान दिले आहे. म्हणूनच मानसवास्तव (सायकिक रिॲलिटी) असा शब्दप्रयोग या मानसशास्त्रीय चर्चेत अनेकदा येतो. जीवनाच्या गरजांसाठी मानवाने आपल्या ज्ञानशक्तीच्या, म्हणजे मूलतः मानसशक्तीच्या, बळाने विज्ञानविश्व उभे केले. परिणामतः त्या विज्ञानाच्या दिमाखानेच तो दिपून गेला असून त्यापायी आपल्या मानसविश्वाचीच अक्षम्य आबाळ तो करीत आहे. वैज्ञानिक फायद्यांच्या हव्यासापोटी बाहेर निसर्गाचे प्रदूषण त्याने केले असून त्यामुळे निसर्ग त्याच्या जीवितावरच उलटण्याचा धोका निर्माण झाला आहे. तद्वतच अनेक दिशांनी ओढणाऱ्या भोगेच्छांमुळे त्याच्या मानसविश्वातही प्रदूषणाने धोक्याची अवस्था गाठली आहे. निव्वळ भोगविषयांमध्ये सुख नसते उपभोग घेणाऱ्या मनाची उपभोगकालीन भूमिका येथे महत्त्वाची असते, याचे भान आधुनिक नागर संस्कृतीला राहिलेले नाही.
आदिम आणि लोकजीवनाला विज्ञानाचा आधार नसतो. ग्रंथप्रामाण्य माहीत नसते. निसर्गाशी एकरूप होऊन निर्व्याजपणे जगणे एवढेच या मानवांना कळत असते. त्यामुळे बाह्यविश्वात तसेच मानसविश्वात प्रदूषण नसते. वस्तुतः या आदिमतेतच सर्व संस्कृतीची बीजे रुजलेली आहेत. विविध लोकसंस्कृती म्हणजे या आदिमतेचे वेगवेगळे कोंब होते. लोकसंस्कृती ही पहिली स्थिर संस्कृती. नागर संस्कृतीला मिळणारा मूलभूत चैतन्यस्त्रोत आदिम आणि लोकसंसकृतींमधून प्राप्त झालेला असतो. ही मानसशास्त्रीय वस्तुस्थिती नाकारल्यास नागर जीवन आणि कला यांवर विपरीत मानसशास्त्रीय परिणाम होणे अपरिहार्य असते.
मानवी अतृप्त इच्छा, आकांक्षा अनेकदा सुप्तपणे कार्य करीत असतात. मानसशास्त्रीय पद्धतीने विश्लेषण केले तरच त्यांचे आकलन होऊ शकते, असा सिद्धांत प्रथम फ्रॉइडने मांडला. युंगने या सिद्धांताला अतिशय व्यापक आशय आणि आकारही दिला. तृप्त असो किंवा अतृप्त, एकूण मानवी मनामध्येच जाणिवेच्या कक्षेत न येणारा प्रांत अथांग, असीम सागरासारखा असतो. अनादी भूतकाळ आणि अनंत भविष्यकाळ असलेल्या मानवतेला तो व्यापूर असतो. प्रत्येक व्यक्तीचा बाह्यतः गोचर होणारा मानस-अंश या असीम मानसाच्या मानाने फार थोडा असतो. या असीम मानवतामनाला त्याने ‘असीम समष्टी नेणीव’ (इन्फिनिट कलेक्टिव्ह अनकॉन्शस) अशी संज्ञा वापरली.
यातील आदिम भूतकाळाचा वारसाच तेवढा फ्रॉइडने स्वीकारला. मानवी मनाची ही अगदी आद्यावस्था. तीत बुद्धी, भावना, सुखदुःखादी अनुभवांचे ज्ञान, ते ज्ञान घेणारा ज्ञाता आणि ज्ञानाचे विषय असे जाणीवभेद निष्पन्नच झालेले नसतात. सर्व प्राणिमात्राला समान अशी ही अवस्था. तिला ⇨इदम् (इड) अशी संज्ञा त्याने वापरली. आदिम भूतकाळाचा वारसा इदमच्या रूपाने प्रत्येक व्यक्तिमनामध्ये सुप्त स्वरूपात कार्यरत असतो. पुढे भोगविषयांचे, भोगानुभवांचे आणि भोगेच्छेचे असे तिहेरी ज्ञान, शिवाय या सर्वांचे ज्ञान करून घेणाऱ्या ज्ञात्याचे स्वतःविषयीचे ज्ञान, अशा जाणिवा आधिकाधिक विकसित होऊ लागतात आणि भोग घेणारा ज्ञाता जाणीवेसह भोगविषयांकडे आकृष्ट होतो. या अर्थाने फ्रॉइडने त्याला ⇨अहं (एगो) अशी संज्ञा वापरली. त्याच्या ठायी असणाऱ्या भोगविषयाच्या आकांक्षेला फ्रॉइडने भोगेच्छा वा कामप्रेरणा (लिबिडो) अशी संज्ञा वापरली. अगदी आदिमतम अवस्थेत अन्न वेचीत फिरताना मानवाचा संघटित समाज बनण्यासाठी अपरिहार्य अशी परिस्थिती नव्हती. त्यावेळी भोगेच्छा पूर्णतः नैसर्गिक अवस्थेत कार्य करीत असावी, हे स्वाभाविक होते. पुढे व्याधसंस्कृतीत संघटित जीवन जगणे भाग पडले. तेथून समाजयंत्रणा सुरू झाली. त्याबरोबरच भोगविषयांची वाटणी करणेही भाग पडले. भोगेच्छेवर बंधने येऊ लागली. स्थिर संस्कृतीच्या विकासाबरोबर भोगविषयांची अनंत पटींनी वाढ होत गेली, त्यांविषयीचे अहंला वाटणारे आकर्षणही अनंत दिशांनी आणि पटींनी वाढत गेले. त्यांच्या वाटणीविषयीच्या समस्या जटिल होत गेल्या आणि सामाजिक बंधनेही जाचक होऊ लागली. अगदी बाल्यावस्थेपासून व्यक्तीच्या मनावर या सामाजिक बंधनांची पुटे चढत जातात आणि सामाजिक नीतीचे एक प्रतिबिंब व्यक्तीच्या मनामध्ये शिरून तिच्या वर्तनावर जागता पहारा ठेवू लागते. हा एका परीने समाजपुरुषाचा अहं असतो. म्हणून फ्रॉइडने त्यासाठी ⇨पराहम् (सुपर एगो) अशी संज्ञा वापरली. नवजात अर्भकामध्ये अहं, भोगेच्छा, पराहम् अशी त्रयी निष्पन्न झालेली नसते. या तिन्ही जाणिवा निष्पन्न करू शकेल अशी इदम् तेवढी उपस्थित असते. वाढत्या वयाबरोबर आपणास काहीतरी हवे आहे अशी जाणीव आकारित होता होता अहं, भोगेच्छा आणि त्याही पुढे पराहम् आकारित होतो आणि व्यक्तिमनाचा नियंत्रक म्हणून अढळ स्थान मिळवितो. कधी अह. हा पराहमशी एकभान होतो, तर कधी त्याचा जाच असह्य होऊन त्याच्याशी झगडा करण्यास उभा ठाकतो. मानसविश्वातील हा झगडा बाह्यविश्वात परावर्तित होतो, तेव्हा सामाजिक रूढींशी, नीतिनियमांशी आणि आदर्शांशी सामना करण्यासाठी व्यक्ती उभी ठाकते.
एवढ्या त्रोटक मांडणीवरूनही अनेक गोष्टी स्पष्ट होऊ लागतात. इदम् ही अखिल मानवतेची बाल्यावस्था असून भूतकालीन वारसा म्हणून तिचे मोल वादातीत असते. मानवतेची ही बाल्यावस्था म्हणजे आदिमता होय. ती प्रत्येक व्यक्तीमध्ये बालपणी अधिक गोचर होणारी असते. मोठेपणी ती भूतकाळाची साठवण आणि सुप्त आठवण म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये, तद्वतच प्रत्येक संस्कृतीमध्ये कार्यरत असते. असे असते म्हणूनच आदिम कला किंवा लोककला आणि बालकला यांमध्ये काही मूलभूत साम्य असते. दुसऱ्या आदिम व्याधशैलीतील अमूर्त आकृत बालांच्या चित्रांत अनेकदा वेगवेगळी रूपे घेऊन येतात. बालांच्या चित्रांतील क्षकिरणशैलीसुद्धा आदिम आणि लोककलांमध्ये कार्यरत असते, दुसऱ्या व्याधशैलीतील चित्रांची प्रकृतिवैशिष्ट्ये सर्व जगात बहुशः समान असतात. बालांच्या चित्रांतही, बालकाच्या वयाच्या सु. सातव्या वर्षाच्या काळापर्यंत सर्वत्र समान आविष्कार वैशिष्ट्ये दिसतात.
मूळच्या अस्थिर आदिम समूहाने एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिर जीवन जगण्यास सुरुवात केली, की त्याच्या त्या प्रादेशिक जीवनघाटीनुसार त्याच्या मूळ आदिम (दुसऱ्या व्याध) शैलीला नवी वळणे, वैशिष्ट्ये प्राप्त होतात आणि त्या त्या लोकसमूहाचे प्रादेशिक व्यक्तित्व असलेल्या लोकशैली निष्पन्न होऊ लागतात. बंगालमधील संथाळ, बिहारमधील मधुबनी, महाराष्ट्रातील जिनगरी शैली ही याची काही उदाहरणे होत. सावंतवाडीच्या कारागिरी-शैलीतील गंजिफाचित्रे ही लघुचित्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेली लोकशैलीची प्रगत अवस्था होय. राजस्थानमधील नाथद्वारा चित्रशैलीसुद्धा अशीच लघुचित्रांच्या पातळीवर येऊ घातलेली लोकशैली आहे.
बाल्यावस्थेमध्ये माणसाच्या व्यक्तिगत वैशिष्ट्यांपैकी सर्व बालांना समान अशी निरागसता, निर्व्याजताच प्रकर्षाने दिसते. आदिम आणि लोकजीवनातही समष्टिव्यक्तित्व निर्व्याजपणे व्यक्त होताना दिसते. व्यक्ती विरुद्ध समष्टी असे द्वंद्व अगदी आदिम जीवनात नसते. लोकजीवनात ते नगण्य असते. नागर जीवनात ते प्रकर्षान जाणवते. समाज जितका अधिक आधुनिक, तितके हे द्वंद्व अधिक तीव्र असावे, हेही स्वाभाविक. कारण सामाजिक अहं आणि पराहम् यांची बंधने अधिक जाचक असतात. वस्तुतः व्यक्ती आणि समष्टी यांचे नाते पूर्णतः संवादी असणे, हे आदर्श संस्कृतीचे लक्षण म्हणावे लागेल. समग्र जीवन निरागस वृत्तीने जगत असल्यामुळे नागरी जीवनात ज्या उपभोगांना कलाबाह्य नीरसता, रुक्षता यावी तेच उपभोग आदिम आणि लोकजीवनात गहिरेपणा घेऊन जिवंत आणि आस्वाद्य होतात. नव्हे, प्रत्येक कृती अशा निरागस वृत्तीमुळे आस्वाद्य बनत जाते. म्हणून सामान्य उदरनिर्वाहासाठी केलेली कृती आणि आस्वादासाठी केलेली कृती हा भेद येथे किमान पातळीवर पोहोचतो. म्हणून जगणे आणि कला यांचा अभेद होतो. कलावंत आणि सामान्य माणूस असा भेद शिल्लक राहण्याचेही कारण नसते. सगळ्यांनाच गावे, नाचावे, रंगवावेसे वाटते आणि सर्व कलाविष्कार बहुधा सामूहिक असतात. नांगरणी, कापणी, होडी वल्हवणे, समुद्रात गलबत ढकलणे, समुद्रातून तडीवर ओढून आणणे या सर्व सामूहिक कृती सामूहिक लयींसह साकार होता होता त्यांना कलेची पातळी अगदी अजाणता येते. श्रम आणि आनंद यांचा अभेद होतो. साधी धान्य दळण्याची क्रियासुद्धा पहाटेच्या नीरव शांततेत ओव्यांच्या सुरांनी संगीतमय होऊन घर भरून टाकते. मग जाते ही निव्वळ दोन पेडांची दळण्याची वस्तू रहात नाही. कधी ती रथ बनून ओवीत येते, तर कधी घराचा घरपणा जात्याच्या घरघरीतून अर्थ घेतो. सामान्य अनुभव अशा निरागस वृत्तीमुळे कल्पनेच्या पातळीवर पोहोचतो. स्त्रियांची असंख्य ओवीगीते व बहिणाबाईंची गीते ही ह्याची उत्कृष्ट उदाहरणे होत.
लोकजीवनात प्रत्येक अनुभव माणसाशी निसर्गाचा संबंध जोडून साकार हातो. शेतकऱ्याचा दिवस ‘कासराभर’ वर येतो. ‘माडाच्या शेंड्यावर दिवस’ आला असता बाळाचा जन्म झालेला असतो. सगळे जगणेच अशा रीतीने निसर्गाशी एकजीव होते. व्यक्तित्वारोप घडून निसर्गातील एकेक वस्तू ही माणसासारखीच व्यक्तित्व घेऊन जगू लागते. इंच, फुट आणि तास, मिनिटे या बुद्धिनिष्ठ, रुक्ष मापनरीती येथील जीवनात अर्थ भरू शकत नसल्याने व्यर्थ ठरतात. दिवस ज्याच्यामुळे उगवतो, तो सूर्य हाही ‘दिवस’ असतो. सूर्य आणि दिवस यांचा हा अभेद ‘मित्र’ या संस्कृत व अवेस्ता भाषांतील शब्दाच्या बाबतीतही वेदकाली होता, या घटनेचा उल्लेख एर्न्स्ट कासीरर ह्या जर्मन तत्त्ववेत्त्याने आपल्या लँग्वेज अँड मिथ (इं.भा., १९४६) या ग्रंथातील प्रतिपादनाच्या ओघात केला आहे. असा सामग्र्याने घेतलेला मिथ्यमग्न अनुभव अर्थपर्णू असतो; उलट बौद्धिक किंवा तार्किक वृत्तीने तोच अनुभव स्वीकारण्याची वेळ येते तेव्हा अर्थाचे अन्य सर्व पदर कापले जाऊन रुक्ष, नीरस, वस्तुनिष्ठ सत्य तेवढे शिल्लक राहते, हेही त्याने दाखवून दिले आहे. सर्व कलानिर्मिती या मिथ्यस्वीकारामधून आकार घेत असते. लोकजीवन आणि आदिम जीवन पूर्णतः मिथ्यमग्न असते. आदिमानव निसर्गाशी एकरूप होऊन सामग्र्याने जगत असल्यामुळे सर्वसामान्य अनुभव व्यवहाराच्या पातळवरून कल्पनेच्या पातळीवर उचलला जातो आणि त्याचे मिथ्य बनते. पूर्वोक्त डोंगरी भिल्लांच्या काव्यातूनही याचा हृद्य प्रत्यय येतो. विवाहानंतर सारी जाताना नववधू आपल्या कौमार्यावस्थेतील प्रियकराचे सांत्वन करण्यासाठी पुढील अर्थाच्या काव्यपंक्ती म्हणते ‘अरे, आपण जन्मभर एकत्र येणार नाही हे आपण प्रेमात पडलो त्या दिवशीच नदीनाल्यांनी आपल्याला बजावलं नव्हतं का ? दूर होण्याची वेळ आल्यावर शोक करणार नाहीस, असे तू मला त्या वृक्षांच्या साक्षीनेच वचन दिलं होतस ना ? (संदर्भ – भगवानभाई पटेल यांनी केलेले भाषांतर, दै. महाराष्ट्र टाइम्स, शनिवार, दि. १३ एप्रिल १९९१).
नागर जीवनात याउलट परिस्थिती असते. आधुनिकतेबरोबर वाढत जाणाऱ्या अतिगुंतागुंतीच्या हितसंबंधांमुळे व्यक्तीच्या मनाचे अवधान दशदिशांनी खेचले जाते; आस्वादासाठी अवधान (मनःशक्ती) शिल्लक रहात नाही. जीवनानुभव रूक्ष, नीरस होत जातो. तो आस्वाद्य बनविण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना ‘कलावंत’ म्हणून इतर माणसांहून वेगळे काढले जाते. या वस्तुस्थितीवर जेम्स हिल्मन या आधुनिक मानसशास्त्रज्ञाने आपल्या मिथ ऑफ ॲनॅलिसिस या ग्रंथात अचूक बोट ठेवले आहे. कलाविष्कार आणि आस्वाद यांचे स्वरूप शुद्ध रहावे, म्हणून सैद्धांतिक विचारांचे मंथन केले जाते. त्यातून विविध सौंदर्यशास्त्रीय सिद्धांत निष्पन्न होतात. अभिनवगुप्त, कांट, रॉजर फ्राय यांच्या सिद्धांतांनुसार निर्मिती आणि आस्वाद कालीन व्यावहारिक हेतू बाद होऊन व्यवहारातीत किंवा अलौकिक अशी मानसिक अवस्था येणे, ही कलेची मूलभूत अट ठरते. ही मानसिक अवस्था म्हणजेच एका अर्थाने बालमानस, आदिम मानस किंवा लोकमानस ह्यांची निर्व्याज दृष्टी होय. म्हणूनच केशवसुतांची ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे’ ही उक्ती सौंदर्यशास्त्र आणि मानसशास्त्र या दोन्ही दृष्टींनी अर्थपूर्ण ठरते.
सामान्य अनुभव आस्वाद्यतेच्या पातळीवर पोहोचण्यासाठी कोणती मानसशास्त्रीय प्रक्रिया घडावी लागते, या प्रश्नाचे उत्तर फ्रॉइड किंवा युंग यांच्या मानसशास्त्रीय विवेचनातही गवसत नाही. नेणीव मानसशास्त्रातील सिद्धांतांना अत्याधुनिक रूप देणारा जेम्स हिल्मन याने मानसशास्त्राच्या अंगाने कलेवर भाष्य करण्याऐवजी कलेच्या अंगाने मानसशास्त्रीय सिद्धांतांना नवा अर्थ देण्याचा यत्न केला आहे. मानसशास्त्रीय दृष्ट्या निकोप जीवन जगणे कसे शक्य होईल, या प्रश्नाचे उत्तर देताना ‘सामान्य अनुभव कल्पनेच्या म्हणजे मिथ्याच्या पातळीवर नेऊन जगण्याची कलावंताची वृत्ती हीच समग्र जीवनाला निकोपता प्रदान करू शकते’, अशा अर्थाचे प्रतिपादन त्याने आपल्या री−व्हिजनिंग सायकॉलॉजी या ग्रंथात अगदी सुरूवातीलाच केले आहे. कलानुभव हा व्यवहाराच्या मर्यादांनी जखडलेला नसतो. नीरस, बौद्धिक पातळीवरून कल्पनेच्या पातळीवर त्याचे उन्नयन झालेले असते. म्हणजे त्यातील वास्तवाचे मिथ्य बनलेले असते. त्यामुळे व्यवहारातील हेतूंचे आग्रह येथे शमलेले असतात. म्हणून त्या अनुभवाला आस्वाद्यता येते. मानवी मनाची मूलभूत वृत्ती ही ‘मिथ्यात्म वृत्ती’ असते. येथे अभिप्रेत असलेले मिथ्य आदिम आणि लोकजीवनात निसर्गतःच उपस्थित असते.
विकोपाला गेलेल्या व्यवहारीपणामुळे आज नागर जीवनातील मिथ्याचा नाश झाला आहे. सुखोपभोगांची अनंत साधने प्रत्यही वाढत असूनही आधुनिक माणूस तृप्त नाही, शांत नाही. संपर्काची अनंत आधुनिक साधने वाढत असूनही हृदयसंवाद अशक्य होत असल्याने माणूस एकाकी झाला आहे, या वस्तुस्थितीवर हिल्मनने अचूक बोट ठेवले आहे. नागर कलावंतांना हे मिथ्य काही क्षणांपुरते तरी सापडते. म्हणूनच त्यांना लोकजीवन आणि कला यांची मूलगामी ओढ असते. हे मिथ्य हरवून कलानंदाची अपेक्षा करणे, ही नागर संस्कृतीमधली दारूण विसंगती आहे. आदिवासी आणि लोकसंस्कृतींकडून नागर संस्कृतीने हे योगदान मागावयाचे, स्वीकारावयाचे आहे. यासाठी प्रथम आदिवासी आणि लोकसंस्कृतींसमोर नम्रतेची भूमिका स्वीकारावी लागेल. असे करताना आपण स्वतःमधील आदिम, मूलात्म चैतन्यासमोरच नम्र होत आहोत, याचे भान यावे लागेल आणि ते सर्वच संस्कृतींना उपकारक असेल.
पहा : आदिम कला; आफ्रिकेतील कला; निग्रो कला; प्रागैतिहासिक कला.
संदर्भ : 1. Bussabarger, Robert F. Robins. B. D. The Everyday Art of India, New York, 1968.
2. Cahill, Holger, American Folk Art, New York, 1932.
3. Dhamija, Jasteen, Indian Folk Arts and Crafts, New Delhi, 1970.
4. Dorner, Gerd, Folk Art of Mexico, New York, 1962.
5. Hansen, Hans Jurgen, Ed. European Folk Art in Europe and the Americas, London, 1968.
6. Hemphill, Herbert W. Jr. Weissman, Julia , Twentieth Century American Folk Art and Artists, New York, 1974.
7. Husa, Vaclav & Others, Traditional Crafts and Skills : Life and Work in Mediaeval and Renaissance Times, London, 1968.
8. Jenkins, J. G. Traditional Country Craftsmen, London, 1965.
9. Mode, Heinz Chandra, Subodh Trans, Ross, Peter and Ross, Betty, Indian Folk Art, Bombay, 1985.
10. Munsterberg, Hugo, The Folk Arts of Japan, New York, 1958.
11. Woidt, H. Chinese Handicrafts, 1951.
कदम, संभाजी
१. बाल येशूसमवेत सेंट अँथनी : रंगीत कोरीव काष्ठशिल्प, लिथ्युएनिया. २. मातीचा खुजा, हंगेरी. ३. गोंड जमातीतील मांत्रिकाची लाकडी बाहुली, मध्य प्रदेश. |
४. कागदी शिल्पकाम, पोलंड. ५. आदम व ईव्ह यांच्या प्रतिमा करून विवाहप्रसंगी बनविलेली पेस्ट्री, मोराव्हिया. | ६. वारली चित्रकलेचा नमुना, महाराष्ट्र. |
७. संथाळ जमातीतील कोरीव अलंकरणाने सजविलेली लग्नाची डोली, बिहार. ८. प्रसाधन करणारी युवती : कालीघाट चित्रशैली, बंगाल. | ९. धातूचा पक्ष्याकृती टांगता दिवा, दक्षिण भारत, १९ वे शतक. |
१. घरातील भिंतीवर टांगलेली सुशोभित कापडी झालर, स्वीडन, इ. स. १८०७. | २. वस्त्रावरील भरतकामाचा नमुना, क्रीट. | ३. कलमकारी : कापडावरील चित्र, मद्रास, तमिळनाडू. |
४. गणेश : सौराष्ट्र संप्रदायाचे लोकचित्र, गुजरात, अठरावे शतक. | ५. दीप-देवता, पक्वमृदा, बंगाल. | ६. सांडणीस्वार, शृंगशिल्प, राजस्थान. |
७. लाकूड व करवंटी यांपासून बनविलेली कासवाची गाडी, ओरिसा. | ८. हत्ती व माहूत : सिक्की गवती करंडी, बिहार. |