लेपचा : भारताच्या ईशान्येकडील भूतान व नेपाळ या देशांच्या पश्चिम व पूर्व भागांत तसेच सिक्कीम व प. बंगाल राज्यांतील एक भटकी आदिम जमात. पश्चिम बंगालमध्ये, विशेषतः दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये, त्यांची दाट वसती आहे. त्यांची लोकसंख्या २६,०७८ (१९८१) होती. ‘लेपचा’ हा शब्द नेपाळी ‘लप्-चा’ यावरून प्रचारात आला. लप्-चा म्हणजे ओंगळ भाषा बोलणारे खालच्या दर्जाचे लोक. यांत रोङ् व खांब असे दोन पोटभेद आहेत. याशिवाय प्रदेशपरत्वे त्यात रिंगजोंग, इलाम व तामसांग असे भेद आहेत.
लेपचा मंगोलियन वंशाचे असून ठेंगणे व पिवळसर-तपकिरी रंगाचे आहेत. रुंद चेहरा, बसके नाक ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. पुरुषांना दाढी-मिशा जवळजवळ नसतातच. स्त्री-पुरुष दोघेही डोक्यावरचे केस वाढवितात व त्यांचा बुचडा बांधतात. स्त्री व पुरुष यांचा पोशाखही सारखाच असतो.
त्यांच्या भाषेला रोङ् म्हणतात. रोङ्चा अर्थ खडकाळ प्रदेश असा होतो. रिंगजोंग (डोंगराळ प्रदेश) या शब्दावरून रोङ् शब्द आला आहे. रोङ् भाषेत साहित्य असून तिची स्वतंत्र लिपी आहे. ही भाषा तिबेटो-ब्रह्मी भाषासमूहातील आहे.
लेपचा व भूतिया यांमध्ये यादवी युद्ध झाले. तेव्हापासून ते बौद्ध धर्मीय झाले आणि लामाच्या मध्यस्थीने त्यांनी राजा निवडला.
शेती व पशुपालन हे त्यांचे प्रमुख व्यवसाय आहेत. तीन प्रकारची शेती ते करतात. न्याएमा-एल म्हणजे झूम पद्धतीची अथवा जंगल जाळून केलेली फिरती शेती पाणीखेत म्हणजे पाणथळ भागात केलेली शेती व कोरड्या जमिनीवरची शेती. भात, मका, कोद्रा वगैरे धान्ये ते पिकवितात. मका हे त्यांचे मुख्य अन्न. त्याच्या रोट्या करून त्या खातात. त्याशिवाय फळे व फुले यांची लागवड करतात. औषधी वनस्पतीही ते लावतात. लेपचा मांसाहारी असून पक्षी, डुक्कर, हरिण, याक, गाय यांचे ते मांस खातात. मुरवा वनस्पतीपासून बनविलेली दारू त्यांना फार प्रिय आहे. त्याशिवाय मासेमारी व शिकार हे उद्योगही ते करतात. तीरकमठ्याने ते हरिण, ससा, जंगली याक वगैरेंची शिकार करतात.
हे बासरी वाजविण्यात कुशल आहेत. स्वतःला ‘मू’ असे बिरुद लावतात. मू म्हणजे रहिवासी. वयात आलेल्या मुलामुलींचे विवाह होतात. देज देण्याची पद्धत आहे. गरीब मुलगा सेवाविवाह करतो व सासऱ्याच्या घरी नोकरी करतो. विवाहपूर्व लैंगिक संबंधांकडे जमात दुर्लक्ष करते.
कुटुंबात नवराबायको व त्यांची विवाहित व अविवाहित मुले असा परिवार असतो. घटस्फोट क्वचित आढळतो. पुनर्विवाहाची चाल असून धाकट्या दिराबरोबर केलेला विवाह प्रशस्त मानतात. लामा विवाहविच्छेद करतो इतर भांडणे पंचायत तोडते अगर अशा प्रकरणांचा निवाडा मठातील लामा ऊर्फ धर्मगुरू करतो. सिक्कीममध्ये पूर्वी बहुपतित्वाची प्रथा होती. लग्न मध्यस्थाच्या मार्फत ठरते. त्या मध्यस्थाला ‘पिक’ म्हणतात. वराला ‘बोडला’ व वधूला ‘बेडली’ म्हणतात.
बहुतेक लेपचा बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत तथापि त्यांच्यात काही जडप्राणवादी प्रथा अद्यापि आढळतात. ते निरनिराळ्या दुष्ट व पवित्र निसर्गशक्तींना मानतात. हिमाच्छादित कांचनगंगा पर्वत ही त्यांची प्रमुख देवता आहे. काहीजण महादेव व उमा यांचीही पूजा करतात. देवांना ते मद्यमांसादी पदार्थही अर्पण करतात. मृतात्म्यांवर त्यांचा विश्वास आहे. त्यांच्यात मांत्रिक व भगत अशी दोन्ही पदे आढळतात.
लेपचा नृत्यकुशल असून त्यांच्यात नृत्याचे विविध प्रकार आढळतात. त्यांची युद्ध व पौराणिक नृत्ये प्रसिद्ध आहेत. नैसर्गिक नृत्यांत ते हरिण, किडे, पशू व पक्षी यांची नक्कल करतात. शेतकीच्या नृत्यांना ‘झोतमल लोक’ म्हणतात व युद्धाच्या नृत्यांना ‘फेन लोक’ म्हणतात. आध्यात्मिक नृत्यांना ‘थाबा लोक’ म्हणतात. पौराणिक नृत्यात ‘सर्प-पक्षी नृत्य’ प्रसिद्ध आहे. यांच्यात पुरोहिताला ‘बोथिंग’ म्हणतात. लग्न, मृत्यू वगैरे सर्वप्रसंगी धर्मकृत्ये तोच करतो. त्याला जादू, मंत्र-तंत्र वगैरे सर्व काही अवगत असते.
सामान्य गरीब लेपचा प्रेताला कपडे घालून बसलेल्या स्थितीत पुरतात तर काही लेपचा मृताचे दहन करतात व रक्षा नदीत टाकतात. पुरलेल्या जागी थडगे उभे करतात. मृतात्म्याला आहुती देतात व पुढे वर्षश्राद्ध करतात.
संदर्भ :
1. Awasty, Indira, Between Sikkim and Bhutan : The Lepchas and Bhutias of Pedong,
New Delhi, 1979.
2. Chattopadhyay, Tapan, Lepchas and Their Heritage, London, 1990.
3. Das A. K. The Lepchas of West Bengal : A Socio-Economic and Cultural Study,
Calcutta, 1969.
4. Gorer, Geoffrey, The Lepchas of Sikkim, Delhi, 1984.
5. Silger, Haltdan Rischel, Jorgen, The Lepchas : Culture and Religions of the Himalayan
People (Part II), Copenhagen,1967.
भागवत, दुर्गा