लेनार्ट, फीलिप एडूआर्ट आंटोन फोन : (७ जून १८६२ – २० मे १९४७). जर्मन भौतिकीविज्ञ. ⇨ॠण किरणांविषयी केलेले संशोधन व त्यांच्या गुणधर्मांसंबंधी लावलेले शोध वा कार्याकरिता त्यांना १९०५ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. लेनार्ट यांचा जन्म हंगेरीतील प्रेसबर्ग (आता चेकोस्लोव्हाकियातील ब्रात्सिस्लाव्हा) येथे झाला. त्यांनी बुडापेस्ट, व्हिएन्ना, बर्लिन व हायडल्बर्ग येथे रोबेर्ट बन्सन, हेर्मान हेल्महोल्ट्स, लेओ कनिख्सबर्गर व गेओर्ख क्व्हिंग्के यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकीचे शिक्षण घेतले. १८८६ मध्ये त्यांनी हायडल्बर्ग विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी संपादन केली. त्याच विद्यापीठात क्व्हिंग्के यांचे साहाय्यक म्हणून तीन वर्षे काम केल्यावर १८९२ पासून बॉन विद्यापीठात ते अध्यापक व हाइन्रिख हर्टझ यांचे साहाय्यक होते. त्यानंतर ते ब्रेस्लॉ (१८९४), आखेन (१८९५), हायडल्बर्ग (१८९६) व कील (१८९८) या विद्यापीठांत भौतिकीचे प्राध्यापक होते. १९०७ मध्ये ते हायडल्बर्ग विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक म्हणून परत गेले व तेथेच १९३१ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी काम केले. त्याच विद्यापीठाच्या रेडिऑलॉजिकल लॅबोरेटरीच्या संचालकपदावर १९०९ मध्ये त्यांची नेमणूक झाली.
प्रारंभी त्यांनी संदीप्ती (इलेक्ट्रॉनांचा भडिमार, विद्युत् चुंबकीय प्रारण-तरंगरूपी ऊर्जा-विद्युत् क्षेत्र वगैरे उत्तेजक उद्गमांमुळे अथवा नेहमीच्या तापमानाला होणाऱ्या रासायनिक विक्रियेमुळे होणारे प्रकाशाचे उत्सर्जन) व प्रत्फुरण (उत्तेजक उद्गम काढून टाकल्यावरही होत राहणारी संदीप्ती) यासंबंधी संशोधन केले आणि हे संशोधन त्यांनी १८ वर्षे चालू ठेवले. त्यांनी जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) प्रारण व ज्योतींची विद्युत् संवाहकता या विषयांवरही विस्तृत संशोधन केले. १८८८ मध्येच त्यांनी ॠण किरणांविषयीच्या संशोधनास प्रारंभ केला होता. ॠण किरण धातूच्या पातळ पत्र्यातून पार जाऊ शकतात असा शोध लावल्यावर त्यांनी १८९८ मध्ये ॲल्युमिनियमाच्या पातळ पत्र्याची खिडकी (लेनार्ट खिडकी) असलेली ⇨ॠण किरण नलिका तयार केली. या खिडकीतून ॠण किरण मोकळ्या हवेत जाऊ शकतात. प्रत्फुरक पडद्याचा उपयोग करून त्यांनी असे दाखविले की, पडदा नलिकेपासून दूर नेल्यास या किरणांची संख्या कमी होते व ते काही अंतरावर नाहीसे होतात पण निर्वातात ते दुर्बल न होता कित्येक मीटर जाऊ शकतात. या किरणांचे शोषण करण्याची पदार्थांची क्षमता ही त्यांच्या रासायनिक स्वरूपावर अवलंबून नसून त्यांच्या घनतेवर अवलंबून असते आणि हे शोषण किरणांचा वेग वाढविल्यास कमी होते, असे या प्रयोगांवरून दिसून आले. प्रारंभी लेनार्ट यांचा हर्ट्झ यांच्याप्रमाणेच ॠण किरणांचे ईथरामध्ये [⟶ईथर-२] प्रसारण होते असा विश्वास होता परंतु झां पेरँ (१८९५), जे. जे. टॉमसन (१८९७) व डब्ल्यू. वीन (१८९७) यांच्या कार्यामुळे ॠण किरणांचे कण स्वरूप सिद्ध झाल्यावर लेनार्ट यांनी आपल्या या दृष्टिकोनाचा त्याग केला.
त्यानंतर लेनार्ट यांनी हर्ट्झ यांच्या ⇨ प्रकाशविद्युत् परिणामासंबंधीच्या कार्याचा विस्तार केला. उच्च निर्वातात या परिणामाचे त्यांनी विश्लेषण केले. त्यावरून जंबुपार प्रारण धातूवर पडल्यावर तिच्यातून इलेक्ट्रॉन उत्सर्जित होऊन ते निर्वातात प्रसारित होतात आणि निर्वातात ते विद्युत् क्षेत्राने प्रवेगित वा ॠणप्रवेगित करता येतात किंवा त्यांचे मार्ग चुंबकीय क्षेत्राने वक्र होतात, असे त्यांनी दाखविले. उत्सर्जित होणाऱ्या इलेक्ट्रॉनांची संख्या आपाती प्रकाशाच्या ऊर्जेच्या प्रमाणात असते परंतु त्यांचा वेग (म्हणजेच गतिज ऊर्जा) या संख्येवर अवलंबून नसून प्रकाशाच्या तरंगलांबीनुसार तो बदलतो व तरंगलांबी कमी झाल्यास वेगही कमी होतो, असेही अचूक मापने करून लेनार्ट यांनी दाखविले. या गोष्टी प्रचलित सिद्धांताशी विसंगत होत्या आणि आइन्स्टाइन यांनी १९०५ मध्ये यासंबंधीचे समीकरण मांडून फोटॉनांचा सिद्धांत विकसित केल्यावरच त्यांचे स्पष्टीकरण झाले. हे समीकरण नंतर आर्. ए. मिलिकन यांनी प्रयोगाद्वारे पडताळून पाहिले पण ते शोधून त्याच्याशी स्वतःचे नाव संलग्न केल्याबद्दल आइन्स्टाइन यांना लेनार्ट यांनी कधीही क्षमा केली नाही. लेनार्ट यांनी वायूतून जाणाऱ्या इलेक्ट्रॉनात विशिष्ट किमान ऊर्जा असल्याशिवाय तो वायूचे आयनीकरण (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगटांत रूपांतर) करू शकत नाही, असे १९०२ मध्ये दाखविले.
लेनार्ट यांनी १९०३ मध्ये अणूच्या संरचनेसंबंधीची आपली संकल्पना प्रसिद्ध केली. अणू हे अतिशय लहान व परस्परांपासून खूप दूर असलेल्या डायनामाइडांच्या समुच्चयाचे बनलेले असून या डायनामाइडांना द्रव्यमान असते आणि ते विरूद्ध विद्युत् भारांनी जोडलेल्या विद्युत् द्विध्रुवांचे बनलेले असतात व त्यांची संख्या अणुभाराबरोबर असते, असे त्यांनी तीत प्रतिपादन केले होते. ही संकल्पना अर्नेस्ट रदरफर्ड यांनी नंतर मांडलेल्या आणवीय प्रतिमानाच्या अगोदरची एक महत्त्वाची संकल्पना मानली जाते. अणूतील घन द्रव्य संपूर्ण अणूच्या फक्त एक हजार दशलक्षांश इतकेच असते म्हणजे अणूचा पुष्कळसा भाग पोकळी असते, हा महत्त्वाचा विचार लेनार्ट यांनीच प्रथम मांडला. त्यानंतरच्या काळात त्यांनी वर्णपट रेषांचे स्वरूप व उगम यांसंबंधी संशोधन केले.
नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना क्रिस्तियाना (आता ऑस्लो), ड्रेझ्डेन व प्रेसबर्ग या विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट पदव्या आणि लंडनच्या रॉयल सोसायटीची रम्फर्ड व फ्रॅंक्लिन पदके व जर्मन राईशचे (साम्राज्याचे) ईगल शिल्ड हे सन्मान मिळाले. तथापि आपल्या कार्याची उपेक्षाच होत आहे या भावनेने त्यांनी अनेक देशांतील इतर भौतिकीविज्ञांवर टीका केली. त्यांनी आइन्स्टाइन यांच्या सापेक्षता सिद्धांतासह सर्व ‘ज्यू विज्ञाना’ची जाहीरपणे निंदा केली. हिटलर यांच्या नॅशनल सोशॅलिस्ट पक्षाचे ते कट्टर सदस्य होते व त्या पक्षावर त्यांनी निःसंकोचपणे निष्ठा ठेवली. पक्षाने त्यांची ‘आर्यन वा जर्मन भौतिकी’च्या प्रमुखपदावर नियुक्ती केली. त्यांनी हर्ट्झ यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या Prinzien der Mechanik या ग्रंथाचे संपादन करून तो प्रसिद्ध केला. लेनार्ट यांनी ॠण किरण, सापेक्षता सिद्धांत व संबंधित विषयांवर लिहिलेल्या अनेक ग्रंथांत Ueber Kathoden-strahlen (१९०६), Ueber Ather und Materie (१९१०), Quantitatives Ueber Kathodenstrahlen (१९१८), Ueber Relativitatsprinzip, Aether, Gravitation (१९१८), Gross Naturforscher (१९३०), Deutsche Physik (४ खंड, १९३६-३७) इत्यादींचा समावेश आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांना अटक झाली नाही परंतु ते हायडल्बर्ग सोडून मेसेलहाउझेन या लहान खेड्यात राहावयास गेले व तेथेच ते मृत्यू पावले.
भदे, व. ग.