लेडरबर्ग, जोशुआ : (२३ मे १९२५- ). अमेरिकन आनुवंशिकीविज्ञ (आनुवंशिक गुणधर्मांच्या अभ्यासासंबंधीच्या शास्त्रातील तज्ञ). सूक्ष्मजंतूंच्या आनुवंशिकीच्या क्षेत्रातील आद्यप्रवर्तक. सूक्ष्मजंतूंतील जननिक सामग्रीची संघटना व जननिक पुनःसंयोजनाची यंत्रणा [⟶आनुवंशिकी] यासंबंधी लावलेल्या शोधांबद्दल त्यांना ⇨एडवर्ड लॉरी टेटम व ⇨जॉर्ज वेल्स विडल यांच्याबरोबर १९५८ च्या शरीरक्रियाविज्ञान अथवा वैद्यक विषयातील नोबेल पारितोषिकाचा बहुमान विभागून मिळाला.

लेडरबर्ग यांचा जन्म माँटक्लेअर, न्यू जर्सी येथे झाला. कोलंबिया कॉलेजात १९४१-४४ मध्ये शिक्षण घेऊन त्यांनी प्राणिविज्ञानातील बी.ए. पदवी मिळविली. नंतर त्यांनी १९४४-४६ मध्ये कोलंबिया विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फिजिशिअन्स अँड सर्जन्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेतले व त्याच वेळी तेथील प्राणिविज्ञान विभागात अर्धवेळ संशोधन केले. पुढे ते येल विद्यापीठातील सूक्ष्मजीवविज्ञान व वनस्पतिविज्ञान विभागात संशोधन अधिछात्र म्हणून गेले आणि १९४६-४७ मध्ये टेटम यांच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन करून १९४८ मध्ये त्यांनी पीएच्‌.डी. पदवी संपादन केली. १९४७ मध्ये विस्कॉन्सिस विद्यापीठात आनुवंशिकीच्या साहाय्यक प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली आणि तेथेच ते १९५० मध्ये सहयोगी प्राध्यापक व १९५४ मध्ये प्राध्यापक झाले. तेथे त्यांनी वैद्यकीय आनुवंशिकीचा विभाग संघटित केला व ते त्याचे १९५७-५९ मध्ये अध्यक्ष होते. नंतर १९५९-७८ या काळात ते स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनच्या आनुवंशिकी विभागात आनुवंशिकी, जीवविज्ञान व संगणकविज्ञान या विषयांचे प्राध्यापक होते. १९६२-७८ मध्ये त्यांनी केनेडी लॅबोरेटरीज फॉर मॉलिक्युलर मेडिसीन या संस्थेच्या संचालकपदावरील काम केले. १९७८ मध्ये ते न्यूयॉर्क येथील रॉकफेलर विद्यापीठाचे अध्यक्ष झाले.

टेटम यांच्याबरोबर लेडरबर्ग यांनी १९४६ मध्ये एश्वेरिकिया कोलाय या सूक्ष्मजंतूंसंबंधी संशोधन केले आणि सूक्ष्मजंतूंच्या वाणांचे संकरण करून जननिक घटकांचे नवीन संयोजन असलेला अपत्य सूक्ष्मजंतू तयार करता येतो, असा शोध लावला. या शोधापूर्वी सूक्ष्मजंतूंच्या जननिक यंत्रणेसंबंधी शास्त्रज्ञांना उच्च दर्जाच्या सजीवांप्रमाणे सूक्ष्मजंतूंतही जननिक यंत्रणा असते याबद्दलच शंका होती. लेडरबर्ग यांच्या शोधामुळे आणि सूक्ष्मजंतूंची साधी संरचना व झपाट्याने होणारी वाढ यांमुळे ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर ही फळमाशी व न्यूरोस्पोरा क्रासा ही पावावरील बुरशी यांच्याप्रमाणे सूक्ष्मजंतू हेही आनुवंशिकीतील संशोधनाचे एक महत्त्वाचे साधन बनले. पुढे विस्कॉन्सिन विद्यापीठात काम करीत असताना त्यांनी सूक्ष्मजंतूतील जननिक सामग्रीचा विनिमय फक्त संयुग्मनानेच म्हणजे एका सूक्ष्मजंतू कोशिकेकडून (पेशीकडून) दुसऱ्या कोशिकेकडे गुणसूत्रांच्या (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्मघटकांच्या) संपूर्ण पूरक संचाच्या संक्रमणानेच नव्हे, तर गुणसूत्राच्या काही तुकड्यांच्या संक्रमणानेही होतो असे दाखविले. याकरिता त्यांनी सूक्ष्मजंतूच्या शरीरात जननिक सामग्रीचे तुकडे घातले आणि ते तुकडे सूक्ष्मजंतू कोशिकेच्या जननिक सामग्रीचे भाग बनले व त्यामुळे त्याची संरचना बदलली, असे त्यांना आढळून आले. एखाद्या सजीवाच्या जननिक सामग्रीत फेरबदल करण्याच्या पहिल्या प्रात्यक्षिकांपैकी हे एक होते व त्यामुळे दूरगामी जननिक प्रयोगांच्या भावी काळास प्रारंभ झाला. लेडरबर्ग व त्यांचे विद्यार्थी एन्‌.डी. झिंडर यांनी साल्मोनेला सूक्ष्मजंतूसंबंधी प्रयोग करून काही विशिष्ट व्हायरस एका सूक्ष्मजंतूतील गुणसूत्राचा भाग दुसऱ्या सूक्ष्मजंतूत नेऊ शकतात, असे १९५२ मध्ये दाखविले. लेडरबर्ग यांनी सूक्ष्मजीवांचे नवीन बाण निर्माण करण्यासाठी त्यांचे प्रजनन व संकरण करण्यासंबंधीही कार्य केले. एका प्रयोगात त्यांनी पेनिसिलिनाला प्रतिरोधक असलेल्या एका सूक्ष्मजंतूचे स्ट्रेप्टोमायसिनाला प्रतोरोधक असलेल्या दुसऱ्या सूक्ष्मजंतूशी संकरण केले आणि त्यापासून उत्पन्न झालेला नवीन वाण या दोन्ही प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थांना प्रतिरोधक असल्याचे दाखविले. जननिक प्रक्रियेने सूक्ष्मजंतूंची रोगकारक शक्ती वाढविता येते व तीव्र मारक सजीवांची शक्ती सापेक्षतः कमी करता येते, असेही त्यांनी सिद्ध केले. लेडरबर्ग यांनी सूक्ष्मजंतूच्या आनुवंशिकीत कल्पक तंत्रे विकसित करण्याबरोबरच संगणकाने व गणितीय आलेख सिद्धांताने कार्बनी रसायने ओळखण्याच्या व त्यांचे वर्गीकरण करण्याच्या पद्धती योजल्या, तसेच अमेरिकेच्या जनगणना प्रदत्ताचा (माहितीचा) उपयोग करून मानवी जीवविज्ञानाचा अभ्यास करण्याकरिता सांख्यिकीय (संख्याशास्त्रीय) पद्धती विकसित केल्या.

लेडरबर्ग यांना येल, बिस्कॉन्सिन, येशिव्हा, न्यूयॉर्क, तूरिन वगैरे अनेक विद्यापीठांनी सन्माननीय पदव्या दिल्या. ते नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन असोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स, अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्टस्‌ अँड सायन्सेस, लंडनची रॉयल सोसायटी इ. अनेक मान्यवर संस्थांचे सदस्य आहेत. मंगळावरील जीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या शोधासाठी नासाने पाठविलेल्या व्हायकिंग यानाच्या योजनेत त्यांचा सहभाग होता. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे वैज्ञानिक सल्लागार व जैन अस्त्रांच्या नियंत्रणासाठी झालेल्या आंतरराष्ट्रीय वाटाघाटीत सल्लागार म्हणून काम केले.

भालेराव, य. त्र्यं. भदे, व. ग.