लेखप्रमाणक : (नोटरी पब्लिक). कायदेविषयक दस्तऐवज, संविदा इत्यादींची शपथेवर नोंद करून त्या अधिप्रमाणित (ऑथेंटिकेटेड) करणारा शासननियुक्त परवाना-अधिकारी. कॉमन लॉ रूढ असलेल्या आणि इतरही काही पाश्र्चात्य देशांत असा अधिकारी नेमण्याची पद्धत फार पूर्वीपासून अंमलात आहे.

लेखप्रमाणकाने अधिप्रमाणित केल्याशिवाय दस्तऐवजांना कायदेशीरपणा प्राप्त होत नाही. बनावट दस्तऐवज वापरला जाऊ नये, हा त्यामागे मुख्य हेतू असतो. दस्तदेवज अधिप्रमाणित करून घेताना संबंधित व्यक्तीने लेखप्रमाणकापुढे स्वतः उपस्थित राहून संबंधित दस्तऐवजावर स्वाक्षरी करावी लागते. संबंधित व्यक्तीची लेखप्रमाणकास व्यक्तिशः खात्री पटल्यानंतर लेखप्रमाणक तो दस्तऐवज आपल्या सहीशिक्क्यानिशी अधिप्रमाणित करतो. यासाठी नोंदनी शुल्क म्हणून विशिष्ट रक्कम आकारण्यात येते.

प्राचीन रोमन विधिसंहितेत या अधिकाऱ्याचा उल्लेख आढळतो. न्यायालयीन कामकाजाची टिपणे घेणे, हे त्याचे काम असे. मध्ययुगात धार्मिक बाबींसंबंधीचे पुरावे जतन करण्याचे काम लेखप्रमाणक करीतअसे. परंतु धार्मिक पदाधिकारी म्हणून तो हे काम करीत नसे तर कायदापालन हीच त्याची जबाबदारी होती.

लेखप्रमाणकाच्या नेमणुकीविषयी जगातील अनेक देशांत निरनिराळ्या स्वरूपाचे निकष व पद्धती अंमलात आहेत. कायदेविषयक ज्ञान असलेल्या व्यक्तीची या पदावर नेमणूक करण्यात येते. तसेच लेखप्रमाणकाच्या कामाच्या अधिकारितेबाबतही विविधता आढळते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत विशिष्ट प्रकारची कर्तव्ये पार पाडण्यासंबंधीचे बंधपत्र (बाँड) दिल्यानंतरच लेखप्रमाणक म्हणून नेमणूक होते. तसेच काही देशांत तेथील संविधानांनुसार विशिष्ट अधिकाऱ्यांची म्हणजे जे.पी. (जस्टिस ऑफ द पीस), वाणिज्य अधिकारी, सैनिकी अधिकारी, निरनिराळे न्यायालयीन अधिकारी इत्यादींची लेखप्रमाणकाच्या कामाकरिता नियुक्ती करण्यात येते.

भारतात सुरुवातीस लेखप्रमाणकाची नेमणूक परक्राम्य लेख अधिनियमानुसार (१८८१) होत असे. आताती १९५२ च्या लेखप्रमाणक अधिनियमानुसार होते. केंद्र शासन अथवा घटक राज्यशासन यांना विशिष्ट विभागात एखाद्या विधिज्ञाची अथवा तत्सम लायक व्यक्तीची लेखप्रमाणक म्हणून नेमणूक करता येते. त्याचा नेमणूक-कालावधी तीन वर्षांचा असून केंद्र अथवा घटक राज्यशासन यांनी नियुक्त केलेल्या लेखप्रमाणकांची यादी प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात राजपत्रात प्रसिद्ध होत असते. लेखप्रमाणक हा शासननियुक्त परवाना-अधिकारी असतो. केंद्र तसेच घटक राज्यशासनाने त्याचे अधिकार आणि कार्यक्षेत्र निश्र्चित केलेले असते. त्याचे प्रत्यक्ष कार्यालय ज्या विभागात त्याची नेमणूक केली जाते, त्या विभागात सोयीनुसार ठरविले जाते.

लेखप्रमाणकाला १९५२ च्या लेखप्रमाणक अधिनियमाच्या कलम आठमधील तरतुदीनुसार कामे पार पाडावी लागतात. सहीशिक्क्याच्या नकला देणे, प्रतिज्ञालेखाच्या वेळी शपथ देवविणे, पक्षकारांनी केलेले दस्तऐवज अनुप्रमाणित (अटेस्टेशन) करणे, त्यांचे सत्यापन (व्हेरिफिकेशन) करणे तसेच दस्तऐवज अधिप्रमाणित करणे इ. कामे त्याला करावी लागतात. त्याचप्रमाणे एखाद्या दस्तऐवजाचे भाषांतर करणे किंवा केलेल्या भाषांतराची सत्यता पडताळून पाहणे, व्यापारी जहाजांच्या संदर्भातील कागदपत्रे तयार करणे यांसारखीही कामे लेखप्रमाणक करू शकतो. धनकोकडे असलेली हुंडी जेव्हा ॠणको स्विकारत नाही किंवा हुंडीची अथवा वचनचिठ्ठीची परतफेड करीत नाही, तेव्हा धनको लेखप्रमाणकाच्या कार्यालयात जाऊन त्याची नोंद करून घेऊ शकतो. तशा अर्थाचे प्रमाणपत्र धनको लेखप्रमाणकाकडून घेतो. याला इंग्रजीत ‘नोटिंग प्रोटेस्ट’ असे म्हणतात. हुंडी अथवा वचनचिठ्ठी यांच्या परतफेडीपूर्वी जर ॠणको दिवाळखोर निघाला, तर लेखप्रमाणक त्याच्याकडून योग्य असा जामीन मागतो व जामीन न मिळाल्यास तशी नोंदही करतो. या नोंदी दाव्याच्या वेळी न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य ठरतात. एखाद्या देशातील लेखप्रमाणकाने अधिप्रमाणित केलेल्या नकला दुसऱ्या देशातही ग्राह्य मानल्या जातात. 

पटवर्धन, वि.भा. संकपाळ, ज.बा.