लूआनश्या : (ल्वान्शा). झँबियातील तांब्याच्या खाणउद्योगाचे एक प्रमुख केंद्र आणि लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील सहाव्या क्रमांकाचे शहर. लोकसंख्या १,६०,६६७ (अंदाज १९८७). पूर्व आफ्रिकेतील ताम्रपट्ट्यात (कॉपरबेल्ट) ते एन्दोलाच्या नैर्ॠत्येस सु. ३३ किमी.वर खंडांतर्गत भागात समुद्रकिनाऱ्यापासून जवळजवळ १,२०० किमी. अंतरावर आहे. ताम्रपट्ट्यातील इतर शहरांशी ते रस्त्यांनी जोडले असून लोहमार्गावरील ते अंतिम स्थानक आहे. मोझँबीकमधील बेइरा बंदराला ते लोहमार्गाच्या एका फाट्याने जोडले आहे. हवाई वाहतुकीसाठी येथे विमानतळही आहे.

 

या आधुनिक शहराला इतिहास असा फारसा नाही तथापि ब्रिटिशांच्या आगमनानंतर या भागाचे सर्वेक्षण झाले आणि येथे काही उद्योगांना चालना मिळाली. ऱ्होडेशियन कॉपर कंपनीत काम करणाऱ्या एका इंग्रज गृहस्थाने लूआनश्याजवळील जंगलात १९०२ मध्ये एक मगजी रंगाचा काळवीट (रोन अँटिलोप) मारला. तो एका खडकावर आदळला आणि त्याचे रक्त त्यावर पडले. तेव्हा खडकावर बारीक, हिरवट डाग आढळले. त्यावरून या इंग्रज गृहस्थाने येथील खडकात तांबे असल्याचा अंदाज बांधला. परिणामतः या भागातील तांब्याचा साठा उघडकीस आला आणि ‘रोन अँटिलोप’ हेच खाणीचे स्थळ निश्र्चित करण्यात आले. हिरव्यागार परिसरातील ह्या खाणीच्या वसतीस म्हणूनच ‘ताम्रपट्ट्यातील उद्यान शहर’ असे नाव मिळाले. सुरुवातीस येथील तांबे प्लवन प्रक्रिया पद्धतीने शुद्ध करण्यात येई. पुढे पहिल्या महायुद्धानंतर १९३० मध्ये विद्युत् विच्छेद्य पद्धतीचा वापर करण्यात येऊ लागला. त्यामुळे शहरात शुद्धीकरणाचे कारखाने झाले  आणि लोकसंख्याही झपाट्याने वाढली. या उद्योगाशिवाय पोलाद तयार करणे, तांब्याच्या तारा बनविणे, कापड तयार करणे, यंत्रसामग्री बनविणे इ. उद्योगही चालतात.

 

शहरात नगरपालिका असून आरोग्यविषयक तसेच अन्य नागरी सुविधा ती पुरविते. शासकीय व कॉन्व्हेन्ट विद्यालयांमार्फत शिक्षणाची सोय असून यूरोपीय व तद्देशीय रुग्णालये औषधोपचारांची व्यवस्था करतात.

संदर्भ : 1. Hickman, G. The New Africa, London, 1973.

           2. Jawwett, H. R. Africa, London, 1979.

           3. Mountjoy, A. B. Hilling, D. Africa : Geography and Development, London, 1988.

फडके, वि. शं.