लुक्रीशिअस : (इ. स. पू. पहिले शतक). लॅटिन कवी आणि तत्त्वज्ञ. संपूर्ण नाव टायटस लुक्रीशिअस केरस. त्याच्या जीवनाविषयी फारशी माहिती मिळत नाही. सेंट जेरोमच्या मते लुक्रीशिअसच्या जन्म इ.स.पू. ९४ मध्ये झाला पुढे एक प्रकारचे प्रीतिपेय (लव्ह पोशन) प्राशन केल्यामुळे त्याचा मानसिक तोल ढळून तो वेडा झाला अधूनमधून हा तोल सावरला जाई, तेव्हा त्याच्या हातून काही ग्रंथलेखन होई आणि त्याने असे लिहिलेले काही ग्रंथ सिसरोने संपादिले. सेंट जेरोमने असेही लिहिले आहे, की लुक्रीशिअसने वयाच्या ४४ व्या वर्षी आत्महत्या केली. म्हणजे इ. स. पू. ५० मध्ये तो मरण पावला असण्याची शक्यता आहे. ही विधाने कितपत खरी, ह्याविषयी निश्र्चितपणे काही सांगता येणार नाही. तथापि सिसरोच्या पत्रांवरून असे दिसते, कीसिसरोने आणि त्याच्या भावाने इ.स.पू. ५४ च्या सुमारास लुक्रीशिअसचे ग्रंथ वाचले होते. इ.स.पू. ५५ मध्ये लुक्रीशिअस मरण पावला असावा, असे मानावयालाही काही आधार मिळतो.
लुक्रीशिअस हा ग्रीक तत्त्वज्ञानातील एपिक्यूरसप्रणीत पंथाच्या तत्त्वप्रणालीचा निष्ठावंत अनुयायी होता. प्राचीन ग्रीसमध्ये सुखवादाचा पुरस्कार करणारा हा एक पंथ होता. आपल्या सुखवादी नीतीला अनुरूप असे सृष्टिशास्त्र आणि त्या सृष्टिशास्त्राला पोषक अशी ज्ञानमीमांसा त्याने अंगीकारिली होती. De Rerum Natura (६ खंड, इं. शी. ऑन द नेचर ऑफ थिंग्ज) ह्या लुक्रीशिअसच्या काव्यकृतीतून è एपिक्यूरस मताच्या तत्त्वप्रणालीचे दर्शन घडते. ह्या काव्याचा हेतू काव्यानंद देण्यापेक्षा ही तत्त्वप्रणाली समजावून सांगणे आणि पटवणे हा आहे, हे उघड दिसते. त्या काव्याचा बराचसा तात्त्विक आशय कवितेच्या माध्यमातून हाताळावा, असाही नाही. तसेच लुक्रीशिअस ज्या काळात हे काव्य रचित होता, त्या काळात तत्वज्ञानासारख्या विषयाच्या मांडणीसाठी उचित आणि आवश्यक असा शब्दसंग्रहही लॅटिन भाषेत नव्हता. परंतु त्यासाठी त्याच्या हाती असलेल्या सर्वसामान्य शब्दांना तांत्रिक अर्थ देऊन त्याने आपले काम कौशल्याने निभावून नेलेले दिसते. तसेच काही वेळा त्याने नवे शब्द निर्माण केले.
अज्ञानी, दु:खी मानवतेबद्दल लुक्रीशिअसच्या मनात करुणा होती. निरनिराळ्या देवदेवता या सृष्टिव्यापार आणि मानवी व्यवहार ह्यांत ढवळाढवळ करून माणसांना जिवंतपणी तर त्रास देतातच परंतु मृत्यूनंतरही त्यांच्या आत्म्याला शिक्षा आणि यातना देतात, ह्याला वास्तवात काहीही आधार नाही, ही एपिक्यूरस पंथाची भूमिका होती आणि अशा प्रकारचे धार्मिक भय माणसांच्या मनांत निर्माण करणाऱ्यांबद्दल लुक्रीशिअसला अत्यंत तिटकारा वाटत होता.
व्हर्जिल, स्टेशिअस, आणि ऑव्हिड ह्यांना लुक्रीशिअसच्या काव्यरचनेबद्दल आदर होता. मध्ययुगात मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. त्याच्या काव्याची पहिली आवृत्ती १४७३ मध्ये प्रसिद्ध झाली. सतराव्या शतकात लुक्रीशिअसच्या काव्याच्या पहिल्या भागाचा इंग्रजी अनुवाद जॉन ईव्हलिनने केला आणि ल्यूसी हचिन्सनने ते काव्य पूर्णत: अनुवादिले. मिल्टनच्या पॅरडाइज लॉस्ट ह्या महाकाव्यातील काही भागांवर लुक्रीशिअसचा प्रभाव दिसतो. टेनिसनने लुक्रीशिअसवर एक सुंदर कविता लिहिली आहे.
कुलकर्णी, अ. र.