लिस्टर, जोसेफ जॅक्सन : (११ जानेवारी १७८६-२४ ऑक्टोबर १८६९). ब्रिटिश हौशी प्रकाशकीविज्ञ. त्यांनी लावलेल्या शोधांमुळे संयुक्त सूक्ष्मदर्शकाची वस्तुभिंग प्रणाली निर्दोष होण्यास व हे उपकरणे एक महत्त्वाचे शास्त्रीय साधन बनण्यास मदत झाली.

लिस्टर यांचा जन्म लंडन येथे झाला. चौदाव्या वर्षीच शालेय शिक्षण सोडून ते वडिलांच्या मद्यव्यापारात शिरले. लहानपणापासून त्यांना प्रकाशकी विषयात रस होता पण १८२४ नंतरच त्यांनी सूक्ष्म दर्शकात सुधारणा करण्यात लक्ष घातले. यासंबंधी पुढील सहा वर्षांत स्वतः केलेले कार्य ऑन द इंप्रुव्हमेंट ऑफ कंपाउंड मायक्रोस्कोप्स या आपल्या निबंधात मांडून त्यांनी तो १८३० मध्ये रॉयल सोसायटीला सादर केला. या निबंधात त्यांनी दुहेरी विवर्ण वस्तुभिंगातील गोलीय विपथनरहीत दोन केंद्रबिंदूंच्या अस्तित्वाचा आपला शोध प्रसिद्ध केला आणि विवर्ण भिंग संयोगांचे दोन संच वापरून प्रतिमातील विकृती कमी करता येतात असे दाखविले [⟶ प्रकाशीय व्यूहांतील विपथन भिंग सूक्ष्मदर्शक]. या अभिकल्पामुळे (आराखड्यामुळे) चांगल्या सुस्पष्ट प्रतिमा मिळू लागल्या व सूक्ष्मदर्शकाची वस्तुभिंगे तयार करण्याची तोपर्यंत प्रचलित असलेली प्रयत्न-प्रमाद पद्धती कालबाह्य झाली. या निबंधामुळे लिस्टर यांची रॉयल सोसायटीच्या सदस्यत्वावर १८३२ मध्ये निवड झाली. १८३० मध्ये त्यांनी आपली भिंगे स्वतःच उगाळण्यास प्रारंभ केला व आपण विकसित केलेली तंत्रे त्यांनी लंडनमधील प्रकाशीय उपकरणे तयार करणाऱ्यांना शिकविली. नवीन विकसित केलेल्या भिंगांचा उपयोग करून त्यांनी सस्तन प्राण्यांच्या रक्तातील तांबड्या पेशीचा खरा आकार निर्धारित केला व तिचा अचूकपणे व्यासही मोजला. ते एसेक्समधील वेस्ट हॅम येथे मृत्यू पावले. त्यांचे पुत्र⇨जोसेफ लिस्टर हे पूतिरोधक (पू तयार होण्यास रोध करण्याची दक्षता घेणाऱ्या) शस्त्रक्रियाविज्ञानाचे जनक म्हणून प्रसिद्धी पावले. 

भालेराव, य. त्र्यं. भदे, व. ग.