लिव्ही, टायटस : (इ. स. पू. ५९- इ. स. १७). सुप्रसिद्ध रोमन इतिहासकार.इटलीतील पटेव्हिअम (पॅड्युआ) या गावी एका सधन कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती ज्ञात नाही.  स्थानिक ग्रामर विद्यालयात त्याचे शिक्षण झाले असावे.  पुढे रोममध्ये त्याने पुढील अभ्यास केला.  त्याचे बहुतेक सर्व आयुष्य रोममध्येच गेले.  सिसरो याचा त्याच्यावर प्रभाव होता.  सम्राट ऑगस्टस (कार. इ. स. पू. २९-इ. स. १४)  याची त्यावर मर्जी होती. लिव्ही हा राजकीय दृष्ट्या लोकसत्ताक (रिपब्लिकन) राज्यपद्धतीचा पुरस्कर्ता होता तरी त्याच्या विद्वत्तेबद्दल व लिखाणाबद्दल विद्वज्जनांत आदर होता.  त्याने रोमन संस्कृतीची तीन महत्त्वाची स्थित्यंतरे अनुभवली : रोमन प्रजासत्ताकाचा ऱ्हास, रोमन साम्राज्याची स्थापना व ऑगस्टसची वैभवशाली कारकीर्द.  त्याचे प्रत्यंतर त्याच्या ऐतिहासिक लेखनात दिसते. लॅटिनमध्ये लिहिलेल्या हिस्टरी ऑफ रोम फ्रोम इटस् फाउंडेशन (इं.शी)  या बृहद्ग्रंथाने तो विख्यात झाला. रोम नगरीच्या स्थापनेपासून ते सम्राट टायबीअरिअस याचा भाऊ ड्रसस याच्या मृत्यूपर्यंत(म्हणजे इ.स.पू. ९) तपशीलवार माहिती त्याने दिली आहे.  अखेरपर्यंत लिव्ही या विषयावर लिहीत होता.  रोमच्या इतिहासाचे १४२ खंड त्याने लिहिले. यांपैकी सध्या ३५ खंड उपलब्ध असून रोमच्या स्थापनेपासून इ. स.पू. १६७ पर्यंतचा जवळपास सर्व सलग इतिहास व त्यानंतरच्या काळातील काही उर्वरित भाग उपलब्ध झाला आहे. केवळ राजकीय इतिहास लिहिण्याचा लिव्हीचा उद्देश नव्हता.  त्याने रोमन प्रजासत्ताकातील सांस्कृतिक स्थिती, रोममधील थोर व्यक्ती इ. विषय हाताळले. शिवाय प्रजासत्ताक धुळीस का मिळाले, याचीही चर्चा त्याने प्रस्तुत ग्रंथात केली आहे.  प्रवाही-काव्यमय भाषाशैली, वास्तव कथन, भेदक विवेचन आणि अधूनमधून उल्लेखिलेल्या दंतकथा ही त्याच्या लिखाणाची काही वैशिष्ट्ये होत. समृद्धीमुळे आलेली हाव आणि सुखलोलुपतेमुळे आलेले कामस्वातंत्र्य हे रोमनांचे दुर्गुण त्याने यात स्पष्ट सांगितले आहेत तथापि लिव्ही हा काही चिकित्सक इतिहासकार नव्हता.  त्याच्या लेखनात विरोधाभास आणि कालगणनेच्या चुका आढळतात.  तसेच त्याने आपल्या लेखनात मूळ साधनांचा वापर न करता पूर्वसूरींच्या लेखनावर भर दिला, अशी टीकाही केली जाते. त्याच्या काळात हिस्टरी ऑफ रोम … ही अभिजात कलाकृती मानली गेली. अठराव्या शतकापर्यंतच्या इतिहास लेखनावर त्याच्या शैलीचा आणि  तत्त्वज्ञानाचा प्रभाव आढळतो. लिव्हीच्या लिखाणावर अनेक भाष्ये झाली. यांतील इ. स. तेराव्या शतकातील निकलस ट्रिव्हट याचे भाष्य सर्वात प्राचीन आहे. फिलीमन हॉलंड याने १६०० मध्ये याचे पहिले इंग्रजी भाषांतर केले.  त्यानंतर लिव्हीच्या ग्रंथाची भाषांतरे लॅटिनमधून जर्मन, स्वीडिश, फ्रेंच, इटालियन, रूमानियन इ. भाषांत झालेली आहेत. पटेव्हिअम येथेच तो मरण पावला.

संदर्भ : 1. Dorey, T. A. Ed. Livy, New York, 1971. 

           2. Usher, Stephen, The Historians of Greece and Rome, New York, 1970.

           3. Walsh, P. G. Livy : His Historical Aims and Methods, Cambridge.

देव, शां. भा.