लिन यू-थांग : (१० ऑक्टोबर १८९५-२६ मार्च  १९७६). ख्यातनाम चिनी साहित्यिक. लेखन चिनी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत. जन्म चीनमधील फूज्येन (फूक्येन)प्रांतातील (लून-ची) येथे एका  ख्रिस्ती  कुटुंबात. आरंभीचे शिक्षण श्यामेन (ॲमॉय) येथे. त्याने धर्मगुरू व्हावे म्हणून शांधायमधीन सेंट जॉन विद्यापीठात त्याला धर्मविद्येचे शिक्षण देण्यात आले. तथापि हे शिक्षण चालू असतानाच त्याचा ख्रिस्ती धर्मावरील विश्वास उडाला आणि त्या धर्माचा त्याने त्याग केला.  १९१६ मध्ये च्यिंग ह्या विद्यापीठात त्याने इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून नोकरी धरली. १९१९ मध्ये अमेरिकेतील हार्व्हर्ड विद्यापीठात त्याने उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तेथे त्याने पीएच्.डी.मिळवली. १९२३ साली लाइपसिक विद्यापीठातूनही त्याने पीएच्.डी. मिळवली. ‘ प्राचीन चिनी भाषेची उच्चार पद्धती’ हा त्याने पीएच्.डी. साठी घेतलेला विषय होता. त्यानंतर तो चीनला परतला आणि बीजिंग विद्यापीठात इंग्रजीचे अध्यापन करू लागला. तथापि राजकीय कारणांसाठी त्याला १९२६ साली आपल्या गावी परत यावे लागले.

अध्यापनाबरोबर त्याला राजकारणातही स्वारस्य होते. १९२७ साली वूहान येथे स्थापन करण्यात आलेल्या क्रांतिकारी सरकारात परराष्ट्र विभागाचा तो सचिव झाला. तथापि १९२८ साली नानकिंग (नानजिंग) येथे क्वोमिंतांगचे (ग्वोमिंनदांगचे) सरकार स्थापन  झाल्यानंतर त्याने ते पद सोडले राजकारणातून अंग काढून घेतले  आणि पुन्हा शिक्षणक्षेत्रात पदार्पण  केले. त्याचबरोबर खाइ-मींग ह्या नावाची प्रकाशनसंस्था काढली. १९३० साली Academia Sinica (मराठी अर्थ-चिनी अकादमी )  ह्या संस्थेच्या परकीय भाषाविभागाचे प्रमुखपद त्याला मिळाले आणि तेथे भाषाशास्त्रीय दृष्टीकोणातून चिनी भाषेवर संशोधन करण्यास त्याने सुरुवात केली.  १९३२ साली ल्वुन्-यू बान्-युए-खान् (मराठी अर्थ-चर्चा पाक्षिक ) हे विनोदी नियतकालिक सुरू केले. ह्या नियतकालिकावर डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही गटांनी जोरदार हल्ले केले.  त्यानंतर त्याने आणखी दोन नियतकालिके काढली आणि त्यांतील लेखांमुळे त्याला आणखी प्रसिद्धी मिळाली.

सन-यत्-सेन (स्वुन जुंगशान) ह्यांनी सुरू केलेल्या थ्यन्स्या (मराठी अर्थ-विश्व) ह्या नियतकालिकासाठी १९३५ साली तो लिहू लागला. चिनी विद्वानांचे लेख ह्या नियतकालिकात प्रसिद्ध होत. पुढे हे नियतकालिक बंद पडले. अमेरिकन लोकांना जपानबरोबर लढत असलेल्या चीनचा चांगला परिचय व्हावा, ह्या उद्देशाने त्याने माय कंट्री अँड माय पीपल हे आपले इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले (१९३५). पश्चिमी जगात ह्या पुस्तकाला ताबडतोब लोकप्रियता मिळाली आणि काही यूरोपीय भाषांत त्याची भाषांतरे झाली.  इतकेच नव्हे, तर चिनी भाषेतही ह्या पुस्तकाचा अनुवाद झाला. १९३६ मध्ये त्याने अमेरिकेस सहकुटुंब प्रयाण केले.  तेथेच त्याने द इंपॉर्टन्स ऑफ लिव्हिंग (१९३७) हे आपले दुसरे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. मोमंट इन बीजिंग (१९३९) आणि द बर्थ ऑफ न्यू चायना (१९३९) ही त्यानंतरची पुस्तके. १९४३ मध्ये ऐन युद्धकाळात तो चीनला परतला व चीनमधील अनेक विख्यात विद्यापीठांत त्याने व्याख्याने दिली. तथापि त्याचे विचार अनेक चिनी विद्वानांना पसंत पडले नाहीत. त्याला पुन्हा अमेरिकेस परतावे लागले.

अमेरिकेतील वास्तव्यात त्याने लक्षणीय अशी इंग्रजी ग्रंथनिर्मिती केली आणि चिनी ग्रंथांचे इंग्रजी अनुवादही केले.  ए लीफ इन स्टॉर्म (१९४२), चायना टाउन फॅमिली (१९४८), द व्हर्मिल्यन गेट (१९५३), लेडी वू (१९५७), द रेड पीनी (१९६१) ह्या त्याने लिहिलेल्या काही प्रसिद्ध इंग्रजी कादंबऱ्या. द सिक्रेट नेम (१९५८) आणि द प्ले्झर्स ऑफ ए नॉन-कन्फर्मिस्ट (१९६२) ही त्याची राजकीय आणि इतर विषयांवर लिहिलेल्या निबंधांची प्रसिध्द संकलने होत. द विजडम ऑफ चायना अँड इँडिया (१९४२) हे त्याचे पुस्तकही प्रसिद्ध आहे.

सिंगापूर येथील नानयांग विद्यापीठाचा तो कुलगुरू झाला.  तेथे मतभेद झाल्याने तो पुन्हा अमेरिकेत आला.  त्यानंतर त्याने पुन्हा ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आणि त्यासंबंधी फ्रॉम पेगन टू ख्रिश्चन हे पुस्तक लिहिले.

काही उत्कृष्ट चिनी कथा त्याने इंग्रजीत अनुवादिल्या (फेमस चायनीज शॉर्ट स्टोरीज रीटोल्ड, १९५२).

 

त्याचे इंग्रजी लेखन लोकप्रिय झाले. कन्‍फ्यूशस आणि लाव् ज ह्यांचे तत्त्वज्ञान त्याने पश्चिमी जगाला बाळबोध भाषेत सांगितले. पूर्वेकडील तत्त्वज्ञ अशी  त्याची ख्याती पश्चिमी देशांत असली, तरी चीनमध्ये मात्र त्याला फारशी प्रसिद्धी आणि मान्यता मिळाली नाही.

हाँगकाँग येथे तो निधन पावला.

देशिंगकर, गि. द.