लिथ्युएनियन साहित्य : लिथ्युएनियन साहित्याचा पहिला कालखंड दीर्घ, म्हणजे अगदी आरंभापासून अठराव्या शतकापर्यंतचा आहे. तथापि काही शतकाच्या ह्या कालखंडात निर्माण झालेले साहित्य मुख्यतः भाषाशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाचे आहे. हे साहित्य प्रधानतः धार्मिक स्वरूपाचे आहे. ह्या भाषेतले पहिले मुद्रित पुस्तक सोळाव्या शतकातले असून त्यात धार्मिक विचार मांडलेले आहेत. १७०१ मध्ये बायबलच्या ‘न्यू टेस्टमेंट’ चा लिथ्युएनियन अनुवाद प्रसिद्ध झाला. पहिला लिथ्युएनियन शब्दकोश १६२९ मध्ये प्रकाशित करण्यात आला.
अठराव्या शतकात लौकिक स्वरूपाची ग्रंथरचना काही प्रमाणात वाढली. लिथ्युएनियन लोकगीतांचा पहिला संग्रह ह्याच शतकात निघाला. व्याकरण, कोश अशी रचना झाली. क्रिस्तियॉनास डॉनेलायटिस (१७१४-८०) हा ह्या शतकातील विशेष उल्लेखनीय कवी होय. ‘फोर सीझन्स’(इं, शी.) ही त्याची काव्यकृती ख्यातनाम आहे. खेड्यातील वर्षभराचे जीवन तीत त्याने रंगविले आहे. एकोणिसाव्या शतकात लिथ्युएनियन भाषेला एक वाङ्मयीन भाषा म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने अधिक प्रयत्न करण्यात आले. स्वच्छंदतावादाच्या प्रभावामुळे लिथ्युएनियाच्या प्राचीन इतिहासाबद्दल आकर्षण निर्माण झाले. त्यातूनच लिथ्युएनियाचा इतिहास लिहिण्याचे प्रयत्न झाले. असे प्रयत्न करणारा आरंभीचा इतिहासकार म्हणून सिमोनोस डाउकांटास (१७९३-१८६४) ह्याचे नाव उल्लेखनीय आहे. फ्रेंच राज्यक्रांती झाल्यानंतर लिथ्युएनियन साहित्यावरील पश्चिमी प्रभाव लक्षणीयपणे वाढला. बिशप मॉट्येयुस व्हॉलॉन्चुस (१८०१-७५) ह्याने धार्मिक आणि शैक्षणिक स्वरूपाचे लेखन केले.‘द फॉरेस्ट ऑफ ॲनिकस्याई’ (इं. शी.) हे श्रेष्ठ काव्य बिशप आंतानास बारानाउस्कास (१८३५-१९०२) ह्याने लिहिले. १८६४ मध्ये रशियाच्या झारशाहीने लिथ्युएनियन पुस्तके मुद्रित करण्यावर बंदी घातल्यामुळे जवळपास चाळीस वर्षे लिथ्युएनियन पुस्तके मुद्रित करण्यावर बंदी घातल्यामुळे जवळपास चाळीस वर्षे लिथ्युएनियन पुस्तके पूर्व प्रशियात मुद्रित होऊन लिथ्युएनियात चोरट्या मार्गाने येत असत. मात्र ह्या काळातल्या साहित्याने राष्ट्रीय जाणिवा जागृत करण्याचा प्रयत्न केला.
रशियाच्या राजकीय वर्चस्वाबरोबरच पोलंडचे सांस्कृतिक वर्चस्व लिथ्युएनियनांवर होते. ह्या कालखंडातील साहित्याने त्याविरूद्धही प्रतिक्रिया नोंदवली.
‘डॉन’(इं. शी.) हे पहिले लिथ्युएनियन नियतकालिक १८५३ साली पूर्व प्रशियातून निघाले. यॉनास बासानाव्हिचुस (१८५१-१९२७) हा त्याचा संस्थापक आणि संपादक. लिथ्युएनियाच्या राष्ट्रीय चळवळीचा जनक म्हणूनही त्याचा गौरव करण्यात येतो. उपर्युक्त ‘डॉन’ ह्या नियतकालिकातून त्याने लिथ्युएनियन राष्ट्रवादाला सामर्थ देण्याचा प्रयत्न केला. लिथ्युएनियन लोकविद्येचा त्याचा व्यासंग मोठा होता आणि लिथ्युएनियन लोकसाहित्याचा संचयक म्हणूनही त्याचे कार्य महत्त्वाचे आहे. व्हिंकास कुदिर्का (१८५८-९९) हा नामवंत कथाकार. त्याने रचिलेली एक कविता स्वतंत्र लिथ्युएनियाचे राष्ट्रगीत म्हणून निवडली गेली होती. मायरॉनिस (१८६२-१९३२ मूळ नाव यॉनास माचुलिस) हा विख्यात लिथ्युएनियन कवी. लिथ्युएनियन राष्ट्रीय प्रबोधनाचा शाहीर, असे त्याचे वर्णन करण्यात येते. लिथ्युएनियनांची स्वातंत्र्याकांक्षा त्याने आपल्या कवितेतून प्रभावीपणे व्यक्त केली. ‘व्हॉइसिस ऑफ स्प्रिंग’ (१९२६, इं. शी.) हा त्याच्या भावकवितांचा संग्रह, तसेच ‘यंग लिथ्युएनिया’ (१९०७, इं. शी.) ही त्याची काव्यकृती काव्यसौंदर्य आणि भावगेयता ह्या दोन्ही दृष्टींनी उल्लेखनीय आहे. त्याने ऐतिहासिक नाटकेही लिहिली. जे बिलियुनास (१८७९-१९०७-कथाकार) आणि रेव्हरंड जे. टुमास-व्हाइझगांटास (१८६९-१९३३-समीक्षक) हे साहित्यिकही निर्देशनीय आहेत.
लिथ्युएनियन साहित्याच्या क्षेत्रातील काही लेखिका अशा : जे. झिमांटिएन-झिमैट (१८४५-१९२१- कथालेखिका) एम्.पेकाउस्केट सॅट्रिजोस रागाना (१८७८-१९३० – कथालेखिका) एस्. प्सिबिलाउस्किएन-लॅझ्डाय्नू पेलिडा (१८६७-१९२६ – कादंबरीकर्त्री आणि कथालेखिका).
विसावे शतक : ह्या शतकाच्या आरंभी रोमन लिपीतील लिथ्युएनियन ग्रंथांवरील बंदी मागे घेतली गेली. त्याचप्रमाणे १९१८ साली लिथ्युएनियाला स्वातंत्र्य मिळाले. ह्या घटना लिथ्युएनियन साहित्याच्या विकासाला उपकारक ठरल्या. नवकालवाद, दादावाद, अतिवास्तववाद ह्या चळवळीचा काही प्रभावही लिथ्युएनियन साहित्यावर पडला. व्हिंकास क्रेव्हे-मिकिएव्हिशस (१८८२-१९५४) हा थोर लिथ्युएनियन साहित्यिक. Dainos ह्या त्याने प्रसिद्ध केलेल्या लिथ्युएनियन लोकगीतसंग्रहाने त्याला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून दिली. परकीय सत्तेच्या जोखडाखाली चेपल्या गेलेल्या लिथ्युएनियनांची वेदना त्याने त्याच्या नाट्यकृतींतून प्रभावीपणे व्यक्त केली. तसेच त्याच्या कथांतून त्याने ग्रामीण जनांचे उत्कृष्ट चित्रण केले.
जे. बालट्रूसाइटिस (१८७३-१९४४) ह्याने लिथ्युएनियन आणि रशियन अशा दोन्ही भाषांत लेखन केले आणि श्रेष्ठ भावकवी म्हणून लौकिक मिळवला.
बी. ब्रॅझ्डझिओनिस, एस्. नेरिस, ए मिस्किनिस, एच्. रादाउस्कास हे अन्य निर्देशनीय कवींपैकी काही होत. जे. ग्रुसास, जे. जांकुस, व्ही. ॲलांटास हे काही नामवंत कादंबरीकार.
लिथ्युएनिया सोव्हिएट युनियनच्या ताब्यात गेल्यानंतर साम्यवादी वाङ्मयीन दृष्टीकोणाचे बंधन लिथ्युएनियन साहित्यिकांवर येऊ लागले. १९४४ नंतर काही लिथ्युएनियन साहित्यिक पश्चिम यूरोपात गेले. पुढे काही जण अमेरिकेत राहू लागले.
लिथ्युएनियाच्या एकूण साहित्याचा विचार करता असे दिसते, की कथा आणि भावकविता हे साहित्यप्रकार लिथ्युएनियन साहित्यिकांच्या विशेष आवडीचे आहेत आणि भावकविता हे साहित्यप्रकार लिथ्युएनियन साहित्यिकांच्या विशेष आवडीचे आहेत आणि त्यांचा विकास घडवीत असताना लिथ्युएनियन लोककथा आणि लोकगीते ह्यांच्या खोलवर रूजलेल्या परंपरेचे भान ह्या साहित्यकांनी राखले आहे.
कुलकर्णी, अ. र.