लिडल हार्ट, बेसिल हेन्री : (३१ ऑक्टोबर १८९५-२९ जानेवारी १९७०). एक सुप्रसिद्ध ब्रिटिश लेखक, पत्रकार, लष्करी डावपेचतज्ञ व यांत्रिकी युद्धतंत्राचा पुरस्कर्ता. जन्म पॅरिस येथे. त्याचे शिक्षण केंब्रिजमध्ये झाले. पहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर (१९१४) आपले शिक्षण अर्ध्यावर सोडून तो ब्रिटिश सैन्यात अधिकारी म्हणून दाखल झाला [⟶ महायुद्ध, पहिले]. ब्रिटिश पायदळात त्याने ईप्र व सॉम येथील आघाड्यांवर काम केले. या सैनिकी कारवायांत तो दोनदा जखमी झाला. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याने सॉम येथील युद्धाचा वृत्तांत लिहिला (१९१६). १९२० मध्ये सैनिकी माहितीवरील इन्फंट्री ट्रेनिंग हे त्याचे अधिकृत पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यात त्याने बॅटल ड्रिल पद्धतीची (लढाई तंत्र) संकल्पना मांडली आहे. १९२७ मध्ये तो कॅप्टन या पदावरून निवृत्त झाला.
लिडल हार्टने डेली टेलिग्राफ या वृत्तपत्राचा बातमीदार (१९२५-३५ ) तसेच द टाइम्स या वृत्तपत्राचा लष्करी सल्लागार म्हणून काम केले (१९३५-३९). दुसऱ्या महायुद्धकाळात त्याने डेली मेल या दैनिकात युद्धविषयक बाबींवर सातत्याने लेखन केले. [⟶ महायुद्ध, दुसरे]. युद्धात यांत्रिकी युद्धतंत्राबरोबरच चिलखती युद्धतंत्र आणि वायुसेना यांच्या उपयोगितेवर त्याने भर दिला. ⇨ रणगाडा युद्धतंत्राची मूलभूत संकल्पना त्याने विकसित केली. रणगाड्यांच्या साहाय्याने गतिमान हालचाल व त्वरित हल्ला करून आश्चर्यचकित करणाऱ्या ‘टॉरन्ट इक्स्पॅन्डिंग’ या पद्धतीचा पुढील युद्धांत उपयोग करण्यात आला तथापि त्याच्या या युद्धपद्धतीला बऱ्याच ब्रिटिश सेनाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला परंतु दुसऱ्या महायुद्धात फील्ड मार्शल ⇨ अर्विन रोमेल व जनरल ⇨ हाइन्ट्स गूडेरिआन या श्रेष्ठ जर्मन सेनाधिकाऱ्यांनी त्याच्या युद्धतंत्राचा अनुक्रमे उत्तर आफ्रिकेत तसेच फ्रान्समध्ये अवलंब केला.
लिडल हार्टने काही काळ ब्रिटिश युद्धमंत्र्याचा वैयक्तिक सल्लागार म्हणूनही काम केले. संपूर्ण युद्धाची (टोटल वॉर) आग्रही संकल्पना व युद्धात अणुशक्तीचा वापर यांना युध्दोत्तर काळात त्याने विरोध दर्शविला व पारंपरिक युद्धपद्धतीवरच भर दिला. या कार्याबद्दल दुसरी एलिझाबेथ राणी हिने त्याचा ‘नाइट’ ही पदवी देऊन सन्मान केला (१९६६).
सैनिकी अधिकाऱ्यांची अनेक चरित्रे लिहिणारा प्रसिद्ध लेखक म्हणून लिडल हार्टची ख्याती होती. याशिवाय त्याने द रिमेकिंग ऑफ मॉडर्न आर्मीज (१९२७) द डिसाइसिव्ह वॉर्स ऑफ हिस्टरी (१९२९) द डिफेन्स ऑफ ब्रिटन (१९३९) डायनॅमिक डिफेन्स (१९४०) ए हिस्टरी ऑफ द वर्ल्ड वॉर १९१४-१८(१९३४) डिफेन्स ऑफ द वेस्ट (१९५०) द टँक्स (१९५९) डिटेरन्ट ऑर डिफेन्स ए फ्रेश लुक ॲट द वेस्ट्स मिलीटरी पोझिशन (१९६०) मेम्वार्स (१९६५-६६) हिस्टरी ऑफ द सेकंड वर्ल्ड वॉर (१९७०) इ. महत्त्वाच्या ग्रंथांचे लेखन केले. तसेच द रोमेल पेपर्स व द सोव्हिएट आर्मी (१९५६) या पुस्तकांचे त्याने संपादन केले.
बकिंगहॅम परगण्यातील मार्लो येथे त्याचे निधन झाले.
बोराटे, सुधीर