लिंकन–२ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील नेब्रॅस्का राज्याची राजधानी, लँकेस्टर परगण्याचे मुख्य ठिकाण व राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. लोकसंख्या १,७१,९३२ (१९८०). ओमाहा या राज्यातील सर्वांत मोठ्या शहराच्या नैर्ऋत्येस ८१ किमी. वर वसलेल्या या शहराने प्रेअरी प्रदेशातील सु. ६२ चौ. किमी. क्षेत्र व्यापाले आहे. येथील क्षारयुक्त झऱ्यांमुळे १८५६ मध्ये वसाहतकरी या ठिकाणाकडे आकर्षिले गेले. मीठशुध्दीकरण उद्योगाच्या विकासासाठी १८६४ मध्ये लँकेस्टर नावाने या खेड्याची स्थापना करण्यात आली, पण या उद्योगाला यश आले नाही. १८६७ मध्ये नेब्रॅस्काचा समावेश संयुक्त संस्थानांत झाला, तेव्हापासून लँकेस्टर ही राज्याची राजधानी बनली. त्याचवेळी अब्राहम लिंकनच्या सन्मानार्थ लँकेस्टरचे नाव लिंकन असे बदलण्यात आले. १८६९ मध्ये याला नगराचा, तर १८८७ मध्ये शहराचा दर्जा देण्यात आला. त्यावेळी बऱ्याच मोठ्या प्रदेशाचे हे व्यापारी केंद्र होते. रस्ते, लोहमार्ग व हवाई वाहतूक मार्ग यांचे हे प्रमुख केंद्र असून १८९० च्या सुमारास येथे १९ लोहमार्ग येऊन मिळत होते. 

येथील औद्योगिक, व्यापारी, शासकीय व शैक्षणिक कार्य महत्त्वाचे असून त्यावरच शहराची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. जलसिंचनयुक्त कृषिक्षेत्रात वसल्याने ही धान्याची मुख्य बाजारपेठ आहे. येथे धान्याची कोठारेही बरीच आहेत. अन्न व दुग्धोत्पादने, मांस डबाबंदी, पीठ गिरण्या, रबर, कृषियंत्रे , दूरध्वनी उपकरणे, विटा, औषधे, खेळाचे साहित्य, लहान वाहने, मोटारी, स्कूटर, रेल्वे डबे, प्लॅस्टिक वस्तू, इलेक्ट्रॉनिकी साहित्य निर्मिती इत्यादींचे कारखाने शहरात आहेत. राज्यातील बँका व विमा कंपन्यांची अनेक प्रधान कार्यालये येथे आहेत. हॅव्हलॉक हे उपनगर यंत्रदुरुस्ती व वाहनांच्या व्यापारासाठी महत्त्वाचे आहे. येथील कत्तलखानाही बराच मोठा आहे.

 

नेब्रॅस्का विद्यापीठ (१८६९), नेब्रॅस्का वेस्लीयन विद्यापीठ (१८८७), युनियन कॉलेज (१८९१), लिंकन सिंफनी ऑर्केस्ट्रा, नेब्रॅस्का कलासंस्था, लिंकन कम्यूनिटी प्‍ले हाउस, कृत्रिम तारामंडळ, अब्राहम लिंकनचे स्मारक, बेनेट मार्टिन सार्वजनिक ग्रंथालय इ. शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था लिंकनमध्ये आहेत. येथील मनोरुग्णालय, विकलांग चिकित्सा केंद्र ही प्रसिद्ध आहेत. शहरातील १,०१२ हेक्टर क्षेत्र उद्यानांखाली आहे. राज्य विधान भवन ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी वास्तुशिल्पाकृती असून (१९३२) बी. जी. गुडह्यू या प्रसिद्ध वास्तुविशारदाने तिचा आराखडा तयार केला आहे. विल्यम जेनिंग्झ ब्रिअन या कायदेपंडिताचे १८८७ ते १९२१ या काळात लिंकनमध्ये वास्तव्य होते. शहराच्या राजकीय जीवनावर त्याचा विशेष प्रभाव दिसतो. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी १२० मीटर उंचीचा सुंदर मनोरा आहे. दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहरात नेब्रॅस्का राज्योत्सव भरतो. राष्ट्रीय जलतरण, नौकानयन व साध्या जमिनीवरील स्केटिंग स्पर्धा लिंकन येथेच होतात.

सावंत, प्र. रा. चौधरी, वसंत