लॉरँ, क्लोद : (? १६००-२१ नोव्हेंबर १६८२). फ्रेंच निसर्गचित्रकार. मूळ नाव क्लोद झेले. फ्रेंच लॉरेन प्रांतातील शॅमॅन गावी एका गरीब कुटुंबात जन्म. त्याचे शालेय शिक्षण फारसे झाले नाही. वयाच्या बाराव्या वर्षी आईवडील वारल्याने त्याला पोरकेपण आले. नंतर तो रोमला गेला. तिथे आगोस्तीनो तात्सी या निसर्गचित्रकाराच्या हाताखाली त्याने चित्रकलेचे प्राथमिक धडे घेतले. फ्लेमिश चित्रकार पॉल ब्रिल आणि आडाम एल्सहायमर यांच्या प्रभावातून त्याने स्वतःची अशी स्वतंत्र निसर्गचित्रशैली निर्माण केली. १६२७ पासून तो रोममध्ये स्थायिक झाला. रोमन ग्रामीण दृश्यांचे चित्रण त्याने प्रामुख्याने केले. रोममध्ये त्याने ‘रोमन कँपाना’ ची (प्राचीन संस्कृतीचे अवशेष असलेला रोमभोवतीचा ग्रामीण परिसर) जलरंगांतील अनेक रेखाटने केली. त्यांत लाल खडूच्या साहाय्यानेही काही ठिकाणी तो उठाव आणत असे. प्रकाशामुळे निसर्गात दिसणाऱ्या विविध सूक्ष्म छटांतून वातावरणाचा सुंदर परिणाम व यथादर्शनाचा आभास त्याच्या निसर्गदृश्यांत दिसत असे. सूर्यप्रकाशाच्या दिनक्रमातील विविध बदलत्या अवस्थांचे सूक्ष्म अवलोकन करून, त्यांतील सौंदर्य उलगडून दाखविणाऱ्या आपल्या निसर्गचित्रांना त्याने काव्यमय डूब दिलेली आढळते. या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर बायबलमधील तसेच ऐतिहासिक कथांतील घटना-प्रसंग चितारुन व त्यांत छोट्या मानवाकृतींचे समूह दाखवून त्याने जिवंतपणा तर आणलाच, शिवाय घटनांतील भावदर्शन व त्यांना अनुरूप नैसर्गिक वातावरणनिर्मिती यांचा मेळ साधला. अशा चित्रांतील मानवाकृती दुय्यम दाखवून त्याने सूर्यप्रकाशाच्या परिणामाला अधिक महत्त्व दिले.

आदर्शवादी निसर्गचित्रण-परंपरेतील सतराव्या शतकातील लॉरँ हा एक श्रेष्ठ निसर्गचित्रकार मानला जातो. निसर्गापेक्षाही अधिक सुंदर व सुसंवादी निसर्गदृश्यांची रचना साधणे, हे आदर्शवादी निसर्गचित्रणाचे उद्दिष्टे होते. ह्या सौंदर्यांचे गुणधर्म अभिजाततावादी संकल्पनांनी निश्चित केले जात. ह्या निसर्गचित्रांत प्राचीन रोमन अभिजात अवशेषांचे चित्रण, तद्वतच अभिजात वेशभूषांतील ग्रामीण व्यक्तिचित्रेही रेखाटली जात. प्राचीन रोम व आसपासचा परिसर ही या चित्रांमागील मुख्य प्रेरणा असून, क्लोदची रोमन कँपानाची चित्रे या संदर्भात लक्षणीय आहेत. त्याने प्रामुख्याने तीन प्रकारची निसर्गदृश्ये रंगवली : (१) पर्वत व दऱ्याखोरी यांचे चित्रण (२) बंदराची दृश्ये व (३) सागर-भूभाग यांच्या संमिश्र किनारपट्टीची दृश्ये. त्याच्या सर्व चित्रांत सागराची दृश्ये अधिक परिणामकारक आहेत व त्यांत काव्यमयता ओतप्रोत भरल्यासारखी वाटते. त्यांतील लाटांवर नाचणारे किरण, दूरवरच्या धूसर दिसणाऱ्या वास्तुशिल्पाच्या सुंदर छटा, त्यात दाखविलेली किनाऱ्यावरील आगमन करणाऱ्या लोकांची लगबग व मुख्य म्हणजे या सर्व वातावरणात भरून राहिलेला व प्रेक्षकांच्या अंतःकरणास साद घालू पाहणारा सुंदर, सौम्य सूर्यप्रकाश याने पाहणाराचे मन भारून जाते. एखाद्या स्वप्‍ननगरीतील दृश्याची जादू आपल्यासमोर उलगडून दाखविल्याचा परिणाम त्याची चित्रे साधतात. 

क्लोदने परस्परसंबद्ध दृश्यांच्या मालिका, तसेच जोड निसर्गदृश्येही रंगविली. ब्रिटीश संग्रहालयात असलेल्या Liber Veritatis (इं. शी बुक ऑफ ट्रूथ, १६३५-३६) या चित्रसूचीमध्ये त्याने आपल्या विकल्या गेलेल्या चित्रांची व ती विकत घेणाऱ्या व्यक्तींची नोंद केली आहे. शिवाय त्यासोबत त्या त्या चित्रांची छोटी रेखाटनेही त्याने काढली आहेत. या चित्रांवरून त्याच्या बऱ्याच चित्रांबद्दल महत्त्वाची व अधिकृत माहिती मिळते.

निसर्ग आहे तसा विचित्र न करता आपल्या मनातील त्याचे जे आदर्श रूप त्याने चित्रांत रंगविले, ते केवळ अजोड आहे. त्याच्या चित्रांतील सूर्यप्रकाशाच्या सूक्ष्म छटांचे सौंदर्यं बऱ्याच काळानंतर दृकप्रत्ययवादी चित्रकारांनी दाखविण्याचा प्रयत्‍न केला. त्याची समकालीन फ्रेंच चित्रकार पूसँ याने आपल्या चित्रांत झगमगीत प्रकाश दाखविला तर क्लोदने आपल्या चित्रांच काहीसा सौम्य-विशेषतः प्रभातकालीन अगर संध्यासमयीचा-प्रकाश दाखवून एक गूढ भावही त्यांतून सूचित केला. काही चित्रांत त्याने प्रत्यक्ष सूर्य दाखवला, तर काही चित्रांत सूर्य न दाखवता क्षितिजाच्या वरच्या बाजूने उदित झालेल्या प्रकाशातून सूर्याचे स्थान सूचित केले व चित्राच्या पुढच्या भागापासून क्षितिजापर्यंत पसरलेला त्याचा एकसंध प्रकाश दाखविला. शांत व गंभीर भाव दाखविणारी त्याची काही चित्रे उल्लेखनीय आहेत. क्लोदच्या चित्रांना फ्रान्यमध्ये त्या मानाने फारशी लोकप्रियता लाभली नाही. त्याचे खरे कौतुक झाले ते इंग्‍लंडमध्ये. एवढेच नव्हे, तर प्रख्यात आंग्‍ल चित्रकार विल्यम टर्नर यानेही क्लोदपासूनच स्फूर्ती घेतली.

रोम येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : 1. Rothlisberger, Marcel, Claude Lorrain : The Drawings, 2 Vols, 1968.

          2. Rothlisberger, Marcel, Claude, Lorrain : The Paintings, 2 Vols., New Haven, 1961.

भागवत, नलिनी