लॉज, टॉमस : (१५५८?–१६२५). इंग्रज कवी, नाटककार आणि गद्य रोमान्सकार तसेच ‘युनिव्हर्सिटी विट्‍स’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तत्कालीन उच्च विद्यावभूषितांपैकी एक. लंडनमधील एक नामवंत व्यापारी आणि लंडनचा महापौर (लॉर्ड मेयर) सर टॉमस लॉज ह्याचा हा पुत्र. त्याचा जन्म लंडन येथे झाला असावा. लंडनच्या ‘मर्चंट टेलर्स’ स्कूल मध्ये आरंभीचे काही शिक्षण घेतल्यानंतर ऑक्सफर्डच्या ट्रिनिटी कॉलेजातून तो बी.ए झाला आणि कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लंडनला आला. तथापि कायद्यात त्याचे मन रमले नाही. तो साहित्याकडे वळला. स्टीव्हन गॉसन ह्याने नाटककारांवर केलेल्या टीकेवर उत्तर म्हणून लॉजने एक पुस्तपत्र लिहिले. हाच त्याच्या वाङ्‍मयीन कारकीर्दीचा आरंभ होय. त्यानंतर त्याने नाटके, रोमान्स असे विविध प्रकारचे लेखन केले. १५९७ साली अँग्‍लिकन चर्चचा त्याग करून त्याने गुप्तपणे रोमन कॅथलिक पंथाचा स्वीकार केला. त्यानंतर ॲव्हीन्यों विद्यापीठातून त्याने वैद्यकातली पदवी घेतली. ऑक्सफर्डला परतल्यावर वैद्यकीचा व्यवसायही केला. १६०५ साली इंग्‍लंडंमध्ये रोमन कॅथलिकांविरुद्ध विशेष कडवी प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्यावर तो ब्रूसेल्सला पळाला. १६१० साली तो लंडनला परत आला. लंडन येथेच त्याचे निधन झाले.

लॉजची कीर्ती त्याने लिहिलेल्या रोझॅलिंड (१५९०) ह्या गद्य रोमान्सवर आज मुख्यतः अधिष्ठित आहे. ॲज यू लाइक इट ह्या आपल्या सुखात्मिकेसाठी शेक्सपिअरने ह्या गद्य रोमान्सचा आधार घेतलेला दिसतो. जिवंत व्यक्तिरेखा, नादमधुर भावकवितांचा त्या रोमान्समध्ये असलेला अंतर्भाव, कथानकाचीनाट्यपूर्ण रचना ही रोझॅलिंडची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत. स्किलाज मेटमॉर्फसिस (१५८९) ह्या त्याच्या कथाकाव्याचा प्रभाव शेक्सपिअरच्या ‘व्हीनस अँड अडोनिस’ ह्या कवितेवर पडलेला दिसून येतो. ए फिग फॉर मोमस (१५९५) ह्या त्याच्या उपरोधप्रचुर दीर्घकाव्यांच्या संग्रहावर अभिजात लॅटिन साहित्यातील उपरोधपर साहित्याचे संस्कार दिसून येतात. द वुंड्‍स ऑफ सिव्हिल वॉर (१५९४) हे त्याचे नाटक. रोमन इतिहासावर लिहिल्या गेलेल्या आरंभीच्या इंग्रजी नाटकांचा एक नमुना म्हणून ह्या नाटकाचा उल्लेख करता येईल. ए लुकिंग ग्‍लास फॉर लंडन अँड इंग्‍लंड (१५९४) हे त्याने रॉबर्ट ग्रीन ह्या नाटककाराच्या सहकार्याने लिहिलेले नाटक.

लॉजने उत्कृष्ट भाषांतरेही केली. जोसेफस आणि सेनिका ह्यांच्या साहित्यकृतींच्या त्याने केलेल्या अनुवादांना –द वर्क्स ऑफ जोसेफस (१६०२) आणि द वर्क्स ऑफ सेनीका (१६१४) उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. अलार्म अगेन्स्ट यूझरर्स (१५८४) आणि ए ट्रीटिझ ऑफ द प्‍लेग (१६०३) ही त्याची पुस्तपत्रेही उल्लेखनीय आहेत.

लॉजचे सर्व साहित्य सर एडमंड गॉस ह्याने चार खंडांत संपादित केले आहे. (१८७५-८३).

संदर्भ :  1. Rae, Wesley D. Thomas Lodge, New York, 1967.

            2. Ryan, Pat M. Jr. Thomas Lodge, Gentleman, Camden (Conn), 1959.

            3. Sisson, C. J. Lodge and other Elizabethans , Cambridge (Mass), 1933.

कळमकर, य. शं.