लास्की, हॅरल्ड जोसेफ : (३० जून १८९३-२४ मार्च १९५०). इंग्लंडमधील एक व्युत्पन्न राजकीय विचारवंत आणि मजूर पक्षाचा अध्यक्ष (१९४५). त्याचा जन्म सधन ज्यू कुटुंबात नेथन व सेरा या दांपत्याच्या पोटी मँचेस्टर (लँकाशर) येथे झाला. मँचेस्टर ग्रामर स्कूलमधून त्याने सुरुवातीचे शिक्षण घेतले. विद्यालयात असतानाच त्याने वेस्टमिन्स्टर रिव्ह्यूमधून ‘सुप्रजाजननशास्त्राची व्याप्ती’ हा लेख लिहिला (१९१०). या सुमारास त्याने आपल्यापेक्षा वयाने आठ वर्षे ज्येष्ठ फ्रिडा केअरी या यहुदीतर युवतीशी विवाह केला (१९११). परिणामतः घर आणि ज्यू समाज यांच्यापासून तो अलग पडला. फ्रिडा केअरी ही स्त्री-मताधिकार चळवळीतील एक अग्रणी महिला होती. हॅरल्डने न्यू कॉलेज (ऑक्सफर्ड) मधून पदवी घेतली (१९१४).
सुरुवातीस तो डेली हॅरल्ड या वृत्तपत्रातून स्फुटलेख व संपादकीय लिहीत असे. नंतर त्याला कॅनडात माँट्रिऑल येथे मॅक्गिल विद्यापीठात अधिव्याख्यात्याची नोकरी मिळाली (१९१४–१६). त्यानंतर हार्व्हर्ड विद्यापीठात तो अध्यापक झाला (१९१६-२०). या काळात त्याने राज्यसंस्थेचे अधिकार, स्वरूप, मर्यादा आणि सार्वभौमत्व यांविषयी लेखन केले आणि बहुसत्तावादाचा पुरस्कार केला. ऑथॉरिटी इन द मॉडर्न स्टेट (१९१९) आणि द फाउंडेशन ऑफ सॉव्हरिन्टी अँड आदर एसेज (१९२१) या दोन ग्रंथांत त्याने झां बॉदँ व विशेषतः जॉन ऑस्टिन यांच्या राज्यसंस्थेच्या सार्वभौमत्वाच्या सिद्धांतावर टीका केली आहे. त्याच्या मते सार्वभौमत्व हे एका व्यक्तीमध्ये वा गटामध्ये वास करीत नसून ते समाजातील अनेक गटांमध्ये व त्यांच्या परस्पर-सहकार्यात एकवटलेले असते. राज्याचे खरे स्वरुप अनेकसत्तात्मक असते कारण व्यक्ती अनेक संस्थांशी संबंधित असते. हार्व्हर्डनंतर त्याची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स (लंडन) येथे अधिव्याख्याता म्हणून नियुक्ती झाली (१९२०-२६). पुढे याच संस्थेत त्यास प्राध्यापकपद मिळाले (१९२६-५०). अखेरपर्यंत तो या पदावर होता.
इंग्लंडमधील वास्तव्यात त्याने मजूर पक्षासाठी सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेतला (१९२३). त्याच सुमारास राज्यशास्त्रावरील सैद्धांतिक कल्पनांचा ऊहापोह करणारा ग्रामर ऑफ पॉलिटिक्स (१९२५) हा मौलिक ग्रंथ त्याने लिहिला. लास्की पुढे समाजवादी तत्त्वज्ञानाने प्रभावित झाला. बहुसत्तावादाचा त्याने त्याग करून असे मत व्यक्त केले, ‘कोणतीही राज्यसंस्था तिच्या वर्गीय पायावर उभी असते. ती त्या समाजातील संपन्न वर्गाच्या हातातील एक हत्यार असते’. त्याने सामाजिक विम्याच्या योजनेचा पुरस्कार केला. नियोजनबद्ध विकासाचा तो पाठीराखा बनला. राज्यसंस्थेने समाजजीवनात अर्थपूर्ण हस्तक्षेप करून सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करावी. त्यासाठी त्याने नियोजन, सामाजिक विमा, वारसा हक्कात कपात, अत्यावश्यक सेवांचे राष्ट्रीयीकरण आणि विविध कल्याणकारी योजना यांची अंमलबजावणी इ. बाबींचा पुरस्कार केला. स्वातंत्र्य व समता एकाच वेळी कशाप्रकारे संपादन करता येईल, याचाही त्याने विचार मांडला.
यूरोपात फॅसिझमचा उदय, आर्थिक मंदीची लाट आणि इंग्लंडमधील मजूर मंत्रिमंडळाचा पराभव यांनी दुसऱ्या महायुद्धापूर्वी खळबळ उडविली. त्यावेळी त्याचा लोकशाही समाजवादावरील विश्वास ढळू लागला आणि मार्क्सवादाकडे तो किंचितसा झुकला. तेव्हा त्याने डेमॉक्रसी इन क्रायसिस (१९३३), द स्टेट इन थिअरी अँड प्रॅक्टिस (१९३५), द राइझ ऑफ यूरोपियन लिबरॅलिझम (१९३६), पार्लमेंटरी गव्हर्नमेंट इन इंग्लंड (१९३८) इ. एका पाठोपाठ एक विचारप्रवर्तक ग्रंथ लिहिले. या सर्व ग्रंथांत लोकशाही समाजवादाविषयी त्याने पुनर्विचार केला होता.
वॉशिंग्टन विद्यापीठात तो १९३८-३९ दरम्यान होता. नंतर त्याने इंडियाना विद्यापीठात व्याख्याने दिली. तीच पुढे द अमेरिकन प्रेसिडन्सी (१९४०) या नावाने प्रसिद्ध झाली. याशिवाय त्याने आधुनिक संस्कृती, संविधान, कामगार संघटना इ. विषयांवर विपुल ग्रंथलेखन केले. अमेरिकन प्रेसिडन्सी हा त्याचा ग्रंथ पुढे वादग्रस्त ठरला.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडमधील विविध ठिकाणी त्याने व्याख्याने दिली . मजूर पक्षाच्या कार्यकारिणीवर तो होता (१९३७-४९). क्लेमेंट ॲटली उपपंतप्रधान असताना त्याचा सहाय्यक म्हणूनही त्याने काम केले. काही महिने तो मजूर पक्षाचा अध्यक्ष होता.
हॅरल्ड लास्की हा विसाव्या शतकातील महत्त्वाचा राजकीय विचारवंत पण त्याच्या लेखनात सुसंगती आढळत नाही आणि त्याने अनेक वेळा आपले पूर्वीचे विचार बदललेले दिसतात. सतत बदलत जाणाऱ्या परिस्थितीशी वैचारिक संवाद साधीत असताना असे परिवर्तन होणे हे वैचारिक खुलेपणाचे लक्षण आहे, असे काही विद्वानांचे मत आहे. स्वातंत्र्य व समता, व्यक्तिस्वातंत्र्य व सामाजिक नियंत्रण यांच्यात मेळ कसा बसवायचा, हा राजकीय सिद्धांतातील न सुटलेला प्रश्न आहे.
लंडन येथे त्याचे आकस्मिक निधन झाले. अखेरपर्यंत लेखन, दौरे आणि अध्यापन यांत तो कार्यरत होता.
2. Magid, H. M. English Political Pluralism : The Problem of freedom and Organization, New York, 1941.
3. Martin, Kingsley, Harold Laski 1893-1950 : A Biographical Memoir, New York, 1953.
4. Martin, Kingsley, The Political Ideas of Harold Laski, New York, 1972.
5. Sarma, G. N. Political Thought of Harold J. Laski, Delhi, 1984.