लायकरगस : ग्रीक पुराणात लायकरगस नावाच्या काही राजांचा निर्देश आढळतो. उदा., ग्रीक महाकवी होमरच्या इलिअडमध्ये आर्केदीआतील लायकरगसचा निर्देश आहे. ड्रायसचा पुत्र आणि थ्रेसमधील एडोनिअन यांचा राजाही एक लायकरगस म्हणून ओळखला जातो. तथापि प्राचीन ग्रीसच्या इतिहासात (१) स्पार्टाचा राज्यघटनाकार आणि (२) अथेन्सचा सुप्रसिद्ध वक्ता व प्रशासक हे दोने लायकरगस विशेष ख्यातकीर्त असून त्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे :
(१) स्पार्टाचा लायकरगस : (इ. स. पू. आठवे वा नववे शतक). स्पार्टाच्या राज्यघटनेचा मूळ संस्थापक व कायदेतज्ञ म्हणून सुप्रसिद्ध. त्याच्या जन्म-मृत्यूबाबत विद्वांनात विविध मतप्रवाह आहेत. स्पार्टामध्ये संयुक्त राज्य करणाऱ्या दोन राजघराण्यांपैकी एका राज्यघराण्यातील युनोमस राजाचा तो धाकटा मुलगा होय. अज्ञान पुतण्याच्या (बालराजा) कारकीर्दीत त्याने स्पार्टाचा राज्यकारभार चालविला. तथापि राजमातेने त्याच्यावर बालराजाच्या हत्येचा आरोप केल्यावर त्याने स्वदेश सोडला. त्याने क्रीट, ईजिप्त, आयोनिया, स्पेन इ. प्रदेशांत प्रवास केला. या काळात त्याने निरनिराळ्या देशांच्या शासनयंत्रणा व कायेदकानून यांचा अभ्यास केला. त्यांतूनच स्पार्टाकरिता सम्यक् राज्यव्यवस्थेची योजना आखून तो स्वदेशी परतला. दरम्यानच्या काळात स्पार्टामध्ये पुष्कळशी अस्थिरता माजली होती. या पार्श्वभूमीवर स्पार्टाच्या त्रस्त जनतेने लायकरगसचे उत्फूानर्त स्वागत केले. त्याने राज्यव्यवस्थेची सूत्रे आपल्या हाती घेतली व विविध सुधारणा राबविण्यास प्रांरभ केला. सुरुवातीस त्याच्या योजना फारच चमत्कारिक वाटल्याने लोकांनी त्या अव्हेरल्या. तथापि लायकरगसने त्या सर्व शक्तीनिशी अंमलात आणल्या.
लायकरगसची राज्यघटना म्हणजे एक प्रकारची विशिष्ट विचारप्रणाली होती. तीत धैर्य, शौर्य, रणप्रियता, कडक शिस्त, राजकीय सुसंवाद, परंपरेचे पालन, राष्ट्रनिष्ठा इत्यादींना महत्त्वाचे स्थान होते. व्यक्तीपेक्षा राष्ट्र श्रेष्ठ आणि राष्ट्रासाठी सर्वस्व समर्पित करणे या मूलभूत तत्त्वावर आधारित समाजजीवनाची ती एक संहिताच होती. सातव्या वर्षी मुलगा सरकारच्या ताब्यात देण्यात येत असे व तो २१ वर्षांचा होईपर्यंत काटेकोर देखरेखीखाली मोठा होत असे. काहींच्या मते ही कालमर्यादा ३० वर्षांपर्यंत असावी. कौटुंबिक वातावरण, व्यक्तिगत स्वातंत्र्य इत्यादींना स्पार्टाच्या समाजजीवनात थारा नव्हता. व्यक्तीचे जीवन एका विशिष्ट चौकटीत जखडले होते. अर्थात या पद्धतीचा स्पार्टाला काही काळ फायदाही झाला. शिस्तबद्ध प्रशिक्षण मिळालेले स्पार्टाचे सैन्य त्या काळी ग्रीसमध्ये अजिंक्य समजले जाई. लायकरगसने घालून दिलेल्या विधिसंहितेमुळे नागरिकांमधील दुही नष्ट होऊन एकीची भावना वाढीस लागली. ग्रीक इतिहासकार हीरॉडोटसच्या (इ. स. पू. सु. ४८४–४२४) म्हणण्यानुसार लायकरगसने सर्व जुनी राज्यव्यवस्था बदलून नवीन निर्माण केली व संपूर्ण लष्कराची पुनर्रचना केली. स्पार्टामधील अस्थिरता व अराजक त्याने नाहीसे केले आणि एक सामर्थ्यशाली राष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टीने सर्व कारभार एककेंद्रित केला. त्याने संसद, कार्यकारी मंडळ, लष्करी शिक्षण, वृद्धांसाठी कायदे परिषद इत्यादींमध्ये सुधारणा केल्या. तसेच जमिनीची समान वाटणी, सोन्या-चांदीच्या नाण्यांवर बंदी घालणे वगैरे कायदेही केले. त्याने स्पार्टाला सबंध ग्रीसमध्ये उच्च प्रतीचे स्थान मिळवून दिले. प्लूटार्कच्या (इ. स. सु. ४६ – सु. १२०) लाइफ ऑफ लायकरगस या ग्रंथात त्याने तयार केलेल्या ‘ऱ्हेत्रा’ या राज्यघटनेविषयी माहिती मिळते. या घटनेनुसार स्पार्टामध्ये प्रभावशाली न्यायमंडळ अस्तित्वात असल्याचा उल्लेख आढळतो.