लाजाळू : (१) पाने व फुलोऱ्यासह फांदी, (२) फुलोरा, (३) फूल, (४) शेंग, (५) फलांश.

लाजाळू : (लाजरी, संकोचनी हिं. लाजवती, लज्जावंती गु. लजमणी, रिशामणी क. नाचिके गिड सं. लज्‍जिका, लज्‍जालु इं. सेन्सिटिव्ह प्लॅंटलॅ. मिमोजा पुडिका कुल-लेग्‍युमिनोजी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ही परिचित वनस्पती पसरट वाढणारे काटेरी आणि केसाळ उपक्षुप (लहान झुडूप) असून त्याचे मूलस्थान ब्राझील आहे व त्याचा प्रसार अमेरिकेत व भारतात सामान्यपणे उष्ण व दमट हवामानात, विशेषतः समुद्रकिनारी झाला आहे. त्याच्या मिमोजा या प्रजातीत एकूण ४५० जाती असून त्यांपैकी भारतात फक्त ८ जाती आढळतात. लाजाळू त्यांपैकी एक आहे. ⇨ बाभूळ, खैर व शिरीष ह्या याच्या कुलातील इतर वनस्पतींशी याचे साम्य आहे. लाजाळूचे झुडूप सु. ५०–९० सेंमी. उंच असून त्याला अनेक काटेरी व केसाळ फांद्या असतात. पाने संयुक्त व स्पर्शग्राही असून एका देठावर दोन ते चार दले व प्रत्येक दल संयुक्त व पिसासारखे असते दलकांच्या १०-२० जोड्या असून त्यांना देठ नसतात. फुलोरा लालसर, गोलाकार, गेंदासारखा, ६-८ मिमी. व्यासाचा, स्तबक प्रकारचा [⟶ पुष्पबंध] असून पानांच्या बगलेत सप्टेंबर-ऑक्टोबरात येतो. फुले सूक्ष्म, लालसर, बहुतेक द्विलिंगी व चतुर्भागी असतात. शिंबा (शेंग) गडद तपकिरी, चपटी, सु. १·३-२ सेंमी. X ३-४ मिमी. लहान व केसाळ असते. ती फूटून तिचे एकबीजी सुटे फलांश (भाग) निघतात. बीजे ३-५ दोन्ही बाजूंस फुगीर असतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी अथवा शिंबावंत कुलात व मिमोजॉइडी अथवा लज्‍जालू उपकुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

ह्या वनस्पतींच्या पानांस स्पर्श केल्यास दले व दलके एकमेकांवर पडून मिटतात व शेवटी सर्वच पान सैलपणे लोंबू लागते कारण दलकाच्या फुगीर तळभागातील पातळ भित्ती असलेल्या पेशींतील पाण्याचा अंश कोणत्या तरी कारणाने कमी होतो. परिणामी या पेशी लुळ्या पडून दलके मिटली जातात आणि पाने खाली वाकतात. त्याचे मूळ स्वरूप बदलते या हालचालीने स्पर्श करणाऱ्या वस्तु-व्यक्तीपासून त्याचे संरक्षण होते. स्पर्शाचा परिणाम जसजसा कमी होत जातो, तसतसे ते पान पूर्ववत होत जाते. तीव्र प्रकाशात व अंधारात अशीच प्रतिक्रिया होते. एका पानास दिलेले उत्तेजन दुसऱ्या पानाकडे देठ व खोड यांमधून नेले जाते व इतर पानेही मिटतात. या हालचालीचा विशेष प्रायोगिक अभ्यास ⇨ सर जगदीशचंद्र बोस .यांनी केला होता व वनस्पती कमीअधिक प्रमाणात संवेदनक्षम असतात व प्राण्यांप्रमाणे त्या प्रतिसाद देतात, असे सिद्ध केले. प्राण्यांशी तुलना करता येईल असे सूक्ष्म व पूर्ण विकास न पावलेले तंत्रिका तंत्र वनस्पतीत असल्याचा हा पुरावा आहे.

लाजाळू थंड व कटू असून शरीरातील पित्त आणि कफ विकारांवर गुणकारी असते. भारतीय वैद्यक ग्रंथांत तिच्या गुणधर्माची चिकित्सा केलेली आढळते. हल्ली भिन्न देशांत तिचा औषधी उपयोग भिन्न प्रकारे करतात. मुळांचा काढा रक्तमिश्रित आवेत देतात. मूळव्याधीवर पानांचे चूर्ण दुधाबरोबर देतात मुळांचा काढा मुतखडा व इतर मूत्र विकारांवर देतात. पाने वाटून त्याचा लेप ग्रंथिक सूजेवर लावतात. नाडीव्रणावर (नालव्रणावर) व मूळव्याधीवर पानांच्या रसात भिजविलेला कापूस बांधतात. मुलांच्या आकडीवर लाजाळूचा उपयोग मॅलॅगॅसीत करतात. ब्राझीलमध्ये मुळाचा वापर गडमाळांवर आणि वांतिकारक (ओकारी येण्यास) म्हणून करतात. गुरे पाने खातात. फिजीमध्ये याची चराऊ कुरणे बनविली आहेत यामुळे गुरांचे मांस व दूध वाढते असा अनुभव आहे. शेंगांमुळे आतड्यात दाह होतो. घोड्याला लाजाळू मानवत नाही. पाने खाल्याने कोंबड्यांची वाढ खुंटते किंवा त्या मरतात. ही वनस्पती तणाप्रमाणे त्रासदायक ठरते तिचा नाश करण्यास एमसीपीए हे तणनाशक दर हेक्टरी ०·८-१·२ किग्रॅ. वापरतात. लाजाळूचे तीन प्रकार (हिस्पिडा, टेट्रॅन्डा व युनिजुगा ) आढळतात. लाजाळूच्या बियांत श्लेष्मल द्रव्य आणि हिरवट पिवळे मेदी (स्‍निग्ध) तेल असते ते सोयाबीन तेलासारखे असते त्याचा उपयोग मुलामा (लेप) देण्याच्या पदार्थांकरिता होऊ शकतो. 

पहा : वनस्पतींचे चलनवलन. 

संदर्भ : 1. C. S. I. R., The Wealth of India, Raw Materials,Vol. VI. New Delhi, 1962.  

            2. Kirtikar, K. R. Basu. B. D. Indian Medicinal plants, vol. II, New Delhi. 1975. 

            ३. देसाई. वा. गो. औषधीसंग्रह, मुंबई, १९७५. 

पाटील, शा. दा. परांडेकर, शं. आ.