लॅटव्हिया : सोव्हिएट रशियातील पंधरा प्रजासत्ताकांपैकी बाल्टिक समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले एक प्रजासत्ताक. त्याचे अधिकृत नाव ‘लॅटव्हियन सोव्हिएट सोशालिस्ट रिपब्लिक’ असून क्षेत्रफळ सु. ६३,७०० चौ.किमी. व लोकसंख्या सु. २६,४७,००० (जाने. १९८७) एवढी होती. लॅटव्हियाच्या पश्चिमेस बाल्टिक समुद्र, उत्तरेस एस्टोनिया, पूर्वेस बेलोरशिया व रशियन सोव्हिएट फेडरेटेड सोशालिस्ट रिपब्लिक (आर्एस्एफ्एस्आर्) व दक्षिणेस लिथ्युएनिया ही राज्ये येतात. ‘लॅटव्हिया’हा लॅटव्हियन (लेटिश) भाषेतील शब्द आहे. १९१८-४० पर्यंत लॅटव्हिया हे एक स्वतंत्र प्रजासत्ताक होते. १९४० मध्ये ते सोव्हिएट संघराज्यात सामील करण्यात येऊन त्याला वरील अधिकृत नाव देण्यात आले. रीगा हे लॅटव्हियाचे राजधानीचे शहर असून त्याची लोकसंख्या ८,९०,००० (१९८६) एवढी होती. लॅटव्हियाच्या सर्व सरहद्दींची एकूण लांबी सु. १,८०० किमी असून त्यांपैकी ४९४ किमी. लांबीचा किनारा आहे.
भूवर्णन : लॅटव्हिया हा प्रामुख्याने ऊर्मिल मैदानी प्रदेश असून मधूनमधून सपाट खोलगट प्रदेश व डोंगर-टेकडयांचे प्रदेश आढळतात. प्रजासत्ताकाचा पूर्वेकडील भाग हा अधिक उंच असून त्यांपैकी व्हीड्झेमे हा उंच भाग आहे. या भागातील सर्वाधिक उंच भाग ३११ मी. पर्यंतचा आहे. त्याशिवाय आग्नेय भागात २८९ मी. उंचीचे शिखर आहे. पश्चिम भागातील कूर्झेमे (कुरलँड) हे सर्वाधिक उंचीचे ठिकाण व्हेंटा नदीने पूर्व-पश्चिम भागांत विभागले आहे. केंद्रीय (मध्यस्थित) व्हीड्झेमे आणि लाट्गाले या दोन उंच भागांत पूर्व लॅटव्हियन सखल प्रदेश आढळतो. हा प्रदेश हिमोढ कटकांनी सीमित केलेला असल्यामुळे जलनिःसारणाला (जलवाहनास) अडथळा निर्माण झाला आहे. याच प्रदेशात अनेक पीट बॉग आढळतात. बाल्टिक समुद्र व रीगा आखात यांचे किनारे काहीसे दंतुर आहेत. या भागात अनेक विस्तीर्ण व उत्तम वालुकामय पुळण्या आढळतात.
जलनिःसारण व मृदा : लॅटव्हियात अनेक नद्या बाल्टिक जलनिःसारण क्षेत्राकडे वाहत गेलेल्या आढळून येतात. सर्वांत मोठ्या नद्यांमध्ये द्वीना (पश्चिम द्वीना)- स्थानिक नाव डाउगाव्हा (लॅटव्हियातील या नदीची एकूण लांबी ३५८ किमी.), गाउया (रशियन ग्वाया), व्हेंटा व ल्येलूपे यांचा अंतर्भाव होतो. जंगलव्याप्त डोंगरांमध्ये अनेक सरोवरे असून त्यांचा आकार काही हेक्टरांपासून ते ३० चौ.किमी.पर्यंत आहे. अधिककरून पडझोल मृदा आढळत असली, तरी कॅल्शियमी (चूर्णीय) मृदा झेम्गाले मैदानात दिसून येते. काही ठिकाणी, विशेषतः पूर्व लॅटव्हियन सखल प्रदेशात, दलदली मृदा आहेत. डोंगराळ भागातील सघन शेतीक्षेत्रात अपक्षरण (धूप) ही मोठी समस्या आहे. खनिज संपत्तीमध्ये रेती, वाळू, डोलोमाइट, चुनखडी, चिकणमाती, पीट इत्यादींचा मुख्यतः समावेश होतो. कुरलँड द्वीपकल्प प्रदेशात तेल सापडले असले, तरी तेलसाठ्यांचा निश्चित आकडा मिळू शकला नाही.
हवामान : अटलांटिकवरून येणाऱ्या वायुराशींचा लॅटव्हियातील हवामानावर परिणाम झालेला आहे. आर्द्रतेचे प्रमाण मोठे असते आकाश साधारणतः ढगाळच आढळते. वर्षाकाठी ३० ते ४० दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश मिळतो, तर १५० ते १८० दिवस आकाश पूर्णतः ढगाळ असते. सखल प्रदेशांत सरासरी पर्जन्यमान सु. ५५०-६०० मिमी तर उंच प्रदेशांत सु. ७००-८०० मिमी. एवढे असते. दक्षिणेकडून व नैऋत्येकडून वारे वाहत असतात. वर्षाकाठी सु. १२५-१५५ दिवस धुकेरहित असतात. उन्हाळे थंड व अधिककरून पावसाळी असतात. जूनमधील सरासरी तापमान सु. १७° से.असून कधीकधी ते ३४° से.पर्यंतही जाते. मध्य डिसेंबरपासून मध्य-मार्चपर्यंत हिवाळा असतो. किनारी भागातील जानेवारीमधील सरासरी तापमान-२° से., तर पूर्व भागात सरासरी -७° से. क्वचित ते -४०° से.पर्यंतही खाली येते.
वनस्पती व प्राणी : लॅटव्हियाचा सु. ६६% प्रदेश जंगले, कुरणे, चराऊ वने दलदली तसेच पडीक व निरुपयोगी जमिनी यांनी व्याप्त आहे. एकूण भूप्रदेशाच्या सु.३३% प्रदेश वनव्याप्त आहे १०% वनप्रदेशामध्ये लागवड करण्यात येते. कुरलँड द्वीपकल्पाचा उत्तर भाग, प. द्वीनाचा डावीकडील तीर प्रदेश तसेच ईशान्य लॅटव्हिया या प्रदेशांत मोठाली अरण्ये आढळून येतात. सूचिपर्णी वृक्षांचे (स्प्रूस, पाइन इ.) प्राबल्य असून पानझडी अरण्यांमधील (वृक्षांमधील) भूर्ज, ॲस्पेन आणि ॲल्डर या वृक्षजाती विशेषेकरून आढळतात. नदीखोरी व डोंगर-पठारे या ठिकाणी कुरणे व चराऊ वने पहावयास मिळतात.
येथील संमिश्र अरण्यप्रकारांचा विचार करता, लॅटव्हियामधील प्राणिजीवन वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे खारी, कोल्हे, ससे, लिंक्स, बिजू हे प्राणी आढळतात. एरमाइन व बीझल हे प्राणी कमी प्रमाणात दिसून येतात. संवर्धन धोरणाचा पाठपुरावा केल्यामुळे हरिणे व एल्क या प्राण्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून बीव्हरची निगा कसोशीने राखली जात आहे. पक्ष्यांमध्ये नाइटिंगेल, हळदू, कस्तूरक, सुतारपक्षी, घुबड, ग्राउझ, तितर, फिंच, टॉमटिट, लावा, चंडोल यांचा अंतर्भाव आढळतो. पाणथळी आणि कुरणे यांमध्ये बलाक व बक हे पक्षी सापडतात.
इतिहास व राजकीय स्थिती : बाल्टिक समुद्रमार्गावरील स्थानामुळे लॅटव्हियाच्या इतिहासावर फार मोठा परिणाम झाला आहे. ट्यूटॉनिक, फिनिश व इतर टोळ्या यांनी प्रारंभीच्या काही शतकांत आपल्या स्थलांतर-मोहिमांत लॅटव्हियामध्ये अनेकदा प्रवेश केला, तथापि लॅटव्हियाचा खराखुरा इतिहास ११५८ पासून सुरू झाल्याचे मानले जाते, कारण त्या वर्षी जर्मन व्यापाऱ्यांनी डाउगाव्हा नदीतून वाहतूक केली आणि ते त्या नदीच्या काठीच स्थिरावले. त्यानंतर आलेल्या जर्मन मिशनऱ्यांनी लेट लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली त्याचा परिणाम प्रारंभी काही काळ चालू असलेल्या जर्मन-लेटिश सहकारातून दृग्गोचर होतो. जर्मनांनी नगरे वसविली. चर्च बांधली, व्यापारास प्रोत्साहन दिले आणि आवश्यक तेथे तटबंदी उभारली. १२०३ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या रीगा नगराची हॅन्सिॲटिक संघाच्या व्यापाऱ्यांनी पूर्व बाल्टिक प्रदेशातील सर्वांत महत्त्वाचे व्यापार केंद्र म्हणून जोमाने वाढ केली. ट्यूटॉनिक सरदारांच्या अंमलाखाली असलेल्या एखाद्या राज्याप्रमाणे लॅटव्हियाचे संघटन करण्यात आले आणि १३४६ मध्ये डॅनिश सत्तेखालील एस्टोनिया प्रांत खरेदी करण्यात येऊन लॅटव्हिया व एस्टोनिया यांच्या एकत्रीकरणातून लिव्होनिया हा प्रदेश निर्माण करण्यात आला.
जर्मन सरदारांनी लिव्होनिया राज्यावर एकतंत्री अंमल सुरू केला व तेथील बहुतांश लोकांना भूदासपद्धतीच्या नांगराखाली लोटले. १५५८ मध्ये रशियनांनी लिव्होनियावर आक्रमण केले, ते अयशस्वी झाले, तरीही त्यामुळे १५६१ मध्ये जर्मन सरदारांचे तेथील वर्चस्व व सत्ता संपुष्टात आली कारण पोल लोकांनी जर्मन सरदारांवर विजय मिळवून लॅटव्हिया पादाकांत केला व सतराव्या शतकारंभापर्यंत त्यावर आपला अंमल बसविला. त्यानंतर स्वीडनने लॅटव्हियाचा पूर्व भाग बळकाविला आणि रीगा बंदरही हस्तगत केले. १७२१ मध्ये रशियाच्या पीटर द ग्रेटने स्वीडनचा अंमल नष्ट करून आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि बाल्टिक समुद्रात शिरकाव वा प्रवेश मिळविण्याची कित्येक वर्षांपासूनची रशियाची सुप्त इच्छा पूर्ण केली. स्वीडिश सत्ता लॅटव्हियाच्या ज्या प्रदेशावर होती, ते सर्व प्रदेश त्याने रशियात सामील केले, उर्वरित लॅटव्हियाचा प्रदेश अठराव्या शतकांती पोलंडची फाळणी झाल्यानंतर रशियाच्या अंमलाखाली गेला. तथापि जर्मन सरदार-दरकदारांची लॅटव्हियामधील जमीनदारी-सरंजामशाहीच्या स्वरूपातील दृढमूल झालेली सत्ता-रशियाच्या पहिल्या अलेक्झांडर झारने १८१७ मध्ये लेट लोकांची भूदासपद्धतीतून मुक्तता करण्याचे आदेश देऊनही, अबाधितच राहिल्याचे दिसून येते.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आपणाला लेट लोकांची राष्ट्रीय आकांक्षा (अस्मिता) आणि झारने रशियाई धोरणांचा चालविलेला पाठपुरावा यांमधील संघर्ष व द्वंद्व पहावयास मिळते. लॅटव्हियन राष्ट्रीय चळवळींचा क्रांतिकारक स्वरूपातील उद्रेक १९०५ मध्ये शिगेला पोहोचला, तथापि पहिले महायुद्ध आणि रशिया व जर्मनी या दोन्ही देशांमधील राजसत्तांचा निःपात (मार्च १९१७ मध्ये झारची जुलमी राजवट नष्ट होऊन तेथे संसद व सोव्हिएटे यांच्या संयुक्त सरकारची स्थापना व जर्मनीमध्ये ९ नोव्हेंबर १९१८ रोजी सम्राट दुसऱ्या कैसरने केलेला राजत्याग) यांमुळे १९१८ मध्ये स्वतंत्र लेटिश राज्याची स्थापना झाली. काही काळ जर्मनी, इतर पश्चिमी राष्ट्रे, तसेच कम्युनिस्ट यांनी लॅटव्हियावर आपली सत्ता आणण्याचे प्रयत्न केले, तथापि १९२२ मध्ये लॅटव्हियाच्या स्वातंत्र्यास यूरोपीय राष्ट्रे व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांनी मान्यता दिली. त्यानंतर लॅटव्हिया हे उदारमतवादी, सांवैधानिक लोकशाही प्रजासत्ताक म्हणून संघटित, करण्यात येऊन अल्पसंख्याकांना सांस्कृतिक स्वायत्ततेचे आश्वासन दिले गेले. ५० हेक्टरांपर्यंतच जमिनीचा कमाल धारणाधिकार मान्य करण्यात येऊन मूलभूत कृषिसुधारणा कार्यवाहीत आणल्या गेल्या. उर्वरित भूमीचे रूपांतर शेतजमिनी व उद्याने यांमध्ये करण्यात आले, परदेशी व्यापारास प्रोत्साहन देण्यात आले. शैक्षणिक सुविधांचा विस्तार करण्यात आला, रीगा येथील तांत्रिक संस्थेचे रूपांतर लॅटव्हियन विद्यापीठामध्ये करण्यात आले त्याचप्रमाणे शेती, ललितकला व संगीत यांच्या प्रसारासाठी व अध्ययनासाठी संस्था उभारण्यात आल्या. इतर बाल्टिक राष्ट्रांशी तसेच स्कँडिनेव्हियन सत्ता (राष्ट्रे) केंद्रांशी लॅटव्हियाने सहकार्य व सख्य यांचा हात पुढे केला सोव्हिएट रशिया व जर्मनी यांच्याशी त्याने अनाक्रमणचे करार केले.
सर्वंकषवाद (टोटॅलिटेरिअनिझम) व सर्वसत्तावाद (सिंडिकॅलिझम) या दोन तत्त्वांचा लॅटव्हियावर १९३० च्या सुमारास मोठा प्रभाव पडला. १९३४ मध्ये संसदीय राजवटीचा त्याग करण्यात येऊन राष्ट्रीय ऐक्यासाठी विविध राजकीय पक्ष मोडीत काढण्यात आले. पंतप्रधान कार्लिस उलमानिस हा जवळजवळ हुकूमशहाच बनला. सबंध देशभर सहकारी संस्था उभारण्यात आल्या आणि अर्थव्यवस्थेच्या सर्व उपांगांमध्ये, वित्तीय व्यवहारांत, सांस्कृतिक व प्रशासकीय क्षेत्रांमध्ये प्रबळ केंद्रीय (मध्यवर्ती) संस्थांची उभारणी करण्यात आली. १९३५ ते १९४० या कालावधीत औद्योगिक उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले व बेकारीचे उच्चाटन करण्यात आले.
सोव्हिएट रशियाने १९३६ मध्ये लॅटव्हियाशी सक्तीचा पारस्परिक सहकार्य करार करून तसेच लॅटव्हियाच्या भूमीवर नौदल व वायुदल यांचे तळ उभारून लॅटव्हियाचे स्वातंत्र्य नष्ट केले. जून १९४० मध्ये रशियन सैन्याने लॅटव्हियावर आक्रमण केले. सोव्हिएटप्रणीत निवडणुका घेण्यात येऊन लॅटव्हियात एक नवीन संसद स्थापण्यात आली, तिने लॅटव्हियाच्या रशियातील विलीनीकरणास संमती दिली. ३ ऑगस्ट १९४० रोजी लॅटव्हिया हे ‘लॅटव्हियन सोव्हिएट सोशालिस्ट रिपब्लिक’ या नावाने सांवैधानिक प्रजासत्ताक बनले. दुसऱ्या महायुद्धात काही काळ जर्मनीने लॅटव्हियावर आपला अंमल प्रस्थापिला होता, तथापि १९४४ पासून रशियाने लॅटव्हियात पुनश्च १९४० ची स्थिती दृढमूल केली.
राजकीय स्थिती : १९८५ मध्ये निवडण्यात आलेले सुप्रीम सोव्हिएट या संसदेमध्ये ३२५ प्रतिनिधी (प्रत्येक दहा हजार लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी)-११५ स्त्रिया, तर २१५ पुरुष प्रतिनिधी-असतात. एप्रिल १९७८ पासून नवीन संविधान अंमलात आले. २१ जून १९८७ रोजी जिल्हा, नागरी व ग्रामीण सोव्हिएटांच्या निवडणुकांमध्ये निर्वाचित झालेल्या २३,३९८ प्रतिनिधींपैकी ११,३९२ स्त्रिया (४८.७%) होत्या १२,७१५ (५४.३%) पक्षेतर प्रतिनिधी, १४,१३३ (६०.४%) प्रतिनिधी औद्योगिक कामगार व सामुदायिक शेतकरी होते. लॅटव्हियामध्ये २६ जिल्हे, ५६ गावे व ३७ नगरे आहेत. लोकन्यायालयांद्वारा न्यायदानाचे काम पाहिले जाते. या न्यायालयांवरील न्यायधीशांची मुदत दोन वर्षांकरिता असते. सोव्हिएट रशियाच्या आधिपत्याखालून (राजकीय, आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक) सुटण्यासाठी लिथ्युएनिया, एस्टोनिया व लॅटव्हिया ह्या बाल्टिक राष्ट्रांनी १९९० पासून व्यापक स्वरूपात चळवळ सुरू केली आहे. लॅटव्हियाने असेही घोषित केले आहे की, १९२४ साली बनविलेल्या संविधानाचा आधार घेऊनच हे प्रजासत्ताक रशियाजवळ स्वांतत्र्याची मागणी करीत आहे.
आर्थिक स्थिती : एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लॅटव्हियात ओद्योगिकीकरणास प्रारंभ झाला व विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत सोव्हिएट रशियातील सर्व प्रजासत्तांकांत लॅटव्हिया हे औद्योगिकीकरणात अग्रेसर ठरले. त्यामुळे लॅटव्हिया हे सांप्रत कृषिप्रधान प्रजासत्ताक समजले जात नाही. १९३९ मध्ये नागरी लोकवस्तीचे प्रमाण ३५% होते, तेच १९८६ मध्ये दुपटीच्यावर (७१%) झाले. लॅटव्हियन अरण्यांखालील प्रदेशांमधून (सरकारी व खाजगी २४ लक्ष हे.) १९३७-३८ मध्ये ३४ लक्ष घ.मी इमारती लाकूड उत्पादन झाले तेच उत्पादन १९८३ मध्ये ४२ लक्ष.घ.मी एवढे झाले.
लागवडीखालील क्षेत्र १९१३, १९४० व १९८५ या वर्षात अनुक्रमे १४ लक्ष, २० लक्ष व १७ लक्ष हे. होते. १९८३ मध्ये १८ लक्ष हे. दलदलीचे क्षेत्र हे ओलिताखाली आणण्यात आले. पशुपैदास व दुग्धशाळा उद्योग हे शेतीक्षेत्रातील प्रमुख उद्योग होत. ओट, सातू, राय, बटाटे व फ्लॅक्स ही प्रमुख पिके घेतली जातात.
सोव्हिएट राजवट लॅटव्हियात प्रस्थापित झाल्यानंतर सु. ९.६० लक्ष हे. जमीन भूमिहीन वा अतिशय कमी भूक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांमध्ये वाटण्यात आली. १ जानेवारी १९८६ रोजी प्रजासत्ताकात २४८ सरकारी शेते व ३३१ (यांतच ११ मत्स्यकेंद्रे अंतर्भूत) सामुदायिक शेते होती. शेतांवर सु. ३६,७०० ट्रॅक्टर, ७,७०० पीक कापणीयंत्रे वापरात होती. १९६४ पासून सरकारी व सामुदायिक अशा सर्व प्रकारच्या शेतांवर विजेचा वापर करण्यात येत आहे.
लॅटव्हियात १९८७ मध्ये महत्त्वाचे शेतमाल उत्पादन पुढीलप्रमाणे होते (हजार टनांत) : धान्य २,०८६ साखर-बीट ३५२ फ्लॅक्स तंतू ४.५ (१९८६), बटाटे १,१३५ भाज्या १९४ मांस ३३८ दूध १,९७२ अंडी ९,१७० लक्ष नग, पशुधन (१ जानेवारी १९८७, आकडे लक्षांत) : गाईगुरे १४.८२ मेंढ्या व बकऱ्या १.७२ डुकरे १७.६३ कोंबड्या १२७.१६.
उद्योग : यंत्रनिर्मिती व धातु-अभियांत्रिकी हे प्रमुख निर्मिती-उद्योग होत. रेडिओसंच, शास्त्रीय उपकरणे, प्रशीतक, धुलाई यंत्रे, मोटारसायकली, स्कूटर इत्यादींचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असते. अवजड उद्योगांमध्ये जहाजे, रेल्वे एंजिने व डबे, मोटारगाड्या, जनित्रे, डीझेल मोटरी, कृषि-अवजारे यांच्या निर्मिती-उद्योगांचा समावेश होतो. कापड, वस्त्रे, पादत्राणे, विणमाल, अन्नप्रक्रियित पदार्थ इ. उपभोग्य वस्तु-उद्योगांची सम्यक् वाढ झालेली आहे.
सबंध रशियामध्ये विजेवर चालणाऱ्या रेल्वे प्रवासी गाड्या तसेच दूरध्वनि-निर्मितीकेंद्रे यांच्या उत्पादनाबाबत लॅटव्हियाचा अग्रक्रम असून कागद व लोकरी वसतू यांच्या उत्पादनात चौथा, कापीव इमारती लाकूड उत्पादनाबाबत पाचवा, तर खनिजीय खतांच्या उत्पादनात सहावा क्रमांक लागतो. १९८५ मधील प्रमुख उत्पादन असे होते : कागद १.६७ लक्ष टन विणमाल ७६० लक्ष जोड्या वस्त्रे ४५० लक्ष नग पादत्राणे १०५ लक्ष जोड्या रेडिओसंच १६ लक्ष धुलाईयंत्रे ६.४७ लक्ष नग फेरोकाँक्रीट १३ लक्ष घ.मी. साखर २.४९ लक्ष टन हवाबंद अन्नपदार्थ व फळे ४,१५० लक्ष टन. वीज उत्पादन ५०० कोटी किवॉ. ता. १९८५ मध्ये उद्योगधंदे व कार्यालये यांमधील एकूण कामगारांची संख्या सु. १२,३१,००० एवढी होती.
इंधननिर्मितीबाबत लॅटव्हिया ५०% गरज स्वतः भागवू शकतो उर्वरित ५०% इंधन बाहेरून आयात करावे लागते. डाउगाव्हा नदीवर प्लॅव्हीन्यास, ट्येगूम्स व रीगा ही मोठी जलविद्युत् शक्तिनिर्मिति केंद्रे, तर रीगा व इतर काही महत्त्वाच्या शहरांत औष्णिक वीजनिर्मितिकेंद्रे उभारण्यात आली आहेत. पीटचे निक्षेप सु. ६.४५ लक्ष हे. क्षेत्रात पसरले असून एकूण निक्षेप ३००-४०० कोटी टन असल्याचा अंदाज करण्यात आला आहे. याशिवाय जिप्सम व अंबर यांचेही साठे आहेत.
लॅटव्हियात सर्व प्रकारची वाहतूक चालू असून रेल्वेमार्गाच्या जाळेविस्तारात (रेल्वेमार्गांची घनता) रशियातील सर्व प्रजासत्ताकांमध्ये लॅटव्हियाचा अग्रक्रम लागतो. १९८६ मध्ये या प्रजासत्ताकातील लोहमार्गांची लांबी २,३८० किमी., तर रस्त्यांची लांबी २७,९०० किमी. होती. सबंध बाल्टिक प्रदेशात रीगाचा लेनिनग्राडनंतर मोठे बंदर म्हणून क्रम लागतो. १९८६ मध्ये अंतर्गत जलवाहतूक माध्यमांद्वारा २,११० लक्ष टन/किमी. मालवाहतूक करण्यात आली. रीगा व व्हेंट्सपिल्स ही रशियन विदेश व्यापारासाठीची जवळजवळ वर्षभर खुली असणारी बंदरे आहेत. रीगा हे मॉस्को व रशियातील इतर मोठ्या शहरांशी हवाई-मार्गाने जोडलेले आहे. प्रजासत्ताकात १०८ वृत्तपत्रे (त्यांपैकी ६४ लेटिश भाषेतील) असून लेटिश-भाषिक वृत्तपत्रांचा दैनिक खप १३ लक्ष प्रती, तर इतर भाषांतील वृत्तपत्रांचा ५.१८ लक्ष होता (१९८५). १९७९ च्या जनगणनेनुसार प्रजासत्ताकात ५३.७% लॅटव्हियन वा लेट, ३२.८% रशियन, ४.५% बेलोरशियन, २.५% पोल व २.७% युक्रेनियन असे लोकसंख्या-विभाजन होते. जनन व मृत्यू यांचे प्रमाण १९८६ साली दरहजारी अनुक्रमे १५.९ व ११.९ असे हाते. लॅटव्हियन ल्यूथरन चर्चचे ६ लक्ष सदस्य होते (१९५६).
लोक व समाजजीवन : प्रजासत्ताकात मुख्यतः लॅटव्हियन (लेट) व रशियन लोकांचाच भरणा आहे. लॅटव्हियन हे लेटिश व लिथ्यूएनियन अशा दोन भाषा बोलतात. १९८५-८६ मध्ये प्रजासत्ताकात सु. ९०० प्राथमिक व माध्यमिक विद्यालये व सु. ४ लक्ष विद्यार्थी असून पूर्व-प्राथमिक शाळांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १,३१,००० होती. दहा उच्च शिक्षणसंस्थांमधून ४३,९०० विद्यार्थी शिकत होते, तर ५५ तांत्रिक महाविद्यालयांतून ४०,८०० विद्यार्थी होते. यांशिवाय २१ संगीत व कला विद्यालये, ३ शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालये व एक कृषी अकादमी होती. अकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९४६) या देशातील सर्वोच्च शास्त्रीय संस्थेशी १५ संशोधनसंस्था संबद्ध असून त्यांमधून १,६२१ विज्ञानविषयक कर्मचारी संशोधनकार्य करीत होते देशातील १०१ संशोधनसंस्थांमधून १३,५०० शास्त्रविषयक कर्मचारी कार्य करीत होते. १९८० च्या पुढे देशात मोठ्या प्रमाणात साक्षरता साध्य करण्यात आली असून शालेय शिक्षण रशियन वा लॅटव्हियन किंवा दोन्ही भाषांमधून दिले जाते. लॅटव्हियन भाषिक शाळांमधून रशियन भाषा अध्ययन सक्तीचे आहे. या प्रजासत्ताकात १२,६०० डॉक्टर आणि येथील रुग्णालयांत ३६,५०० खाटा उपलब्ध होत्या (१९८५).
लॅटव्हियात हौशी कलाप्रकारांना मोठ्या प्रमाणात उत्तेजन दिले जाते. क्लब आणि युवा गटांतर्फे वाद्यवृंद, संगीतजलसे, नृत्य, नाट्य इ. मनोरंजनात्मक प्रकारांचे प्राबल्य आढळते. १८७३ पासून देशात आजतागायत चालू असलेल्या संगीत महोत्सवांना मोठी परंपरा असून ते अतिशय लोकप्रिय आहेत. रीगा येथे दर पाच वर्षांनी मोठा संगीत महोत्सव साजरा करण्यात येतो. प्रजासत्ताकात संगीत संरक्षिका, कलाअकादमी, तसेच संगीत, चित्रकला, उपयोजित कला यांसंबंधीचे विशेष प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. प्रसिद्ध लॅटव्हियन संगीतकारांत जाझेप्स मेदिन्स, जानिस मेदिन्स व एमेलिस मेंगायलिस यांचा समावेश होतो.
आधुनिक लॅटव्हियन साहित्याचा प्रारंभ साधारणतः एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून धरला जातो. बेअरस्लेअर (इं.शी.) हा ए. पंपूर्स याचा ग्रंथ (१८८८) म्हणजे राष्ट्रीय महाकाव्य मानण्यात येतो. यान रॅइनिस (मृत्यू १९२९) हा सर्वात महत्त्वाचा लॅटव्हियन लेखक मानला जातो. तीन प्रकाशनसंस्थांद्वारा लॅटव्हियन, रशियन आणि इतर भाषा यांमधील साहित्य प्रकाशित करण्यात येते. रेडिओप्रसारणाच्या बाबतीत लॅटव्हियन प्रजासत्ताक हे इतर प्रजासत्ताकांच्या मानाने अधिक प्रगतिशील आहे. दूरचित्रवाणीचे कार्यक्रम स्थानिक व रशियन भाषांतून प्रसारित केले जातात. रीगा चित्रपटनिर्मितीगृहांमधून विशेषपट, अनुबोधपट व्यंग्यचित्रे, वृत्तचित्रे इ. विविध प्रकारचे चित्रपट निर्माण करण्यात येतात.
महत्त्वाची स्थळे : रीगा (लोकसंख्या ८.९ लक्ष-१९८६) ही लॅटव्हियाची राजधानी, सर्वात मोठे शहर व बाल्टिक समुद्रातील एक महत्त्वाचे रशियन बंदर म्हणून विख्यात आहे. ते लॅटव्हियाचे प्रमुख सांस्कृतिक, औद्योगिक, राजकीय व प्रशासकीय केंद्र आहे. दाउगाफ्पील्स (पूर्वीचे द्विन्स्क १,२२,०००) हे प. द्वीना नदीवरील शहर रेल्वे व रस्ते यांचे महत्त्वाचे प्रस्थानक तसेच औद्योगिक केंद्र आहे. ल्येपाया (१,०९,०००) हे शहर याच नावाच्या सरोवरावर वसलेले असून लॅटव्हियाचे धान्यनिर्यातीचे प्रसिद्ध बंदर तसेच मोठे औद्योगिक केंद्र आहे. येलगाव्हा (६९,०००) हे ल्येलूपे नदीतीरावरील शहर रीगाच्या नैऋत्येस असून रेल्वे प्रस्थानक व उद्योगप्रधान शहर आहे. व्हेंट्सपिल्स हे व्हेंटा नदीमुखावरील शहर आणि बर्फमुक्त बंदर असून व्होल्गा-उरल तेलनळ येथूनच जातो. येथे मासेमारीचे मोठे केंद्र तसेच मासे डबाबंद करण्याचा कारखाना आहे.
गद्रे, वि. रा.
“