लँब, विलिस यूजीन : (१२ जुलै १९१३ – ). अमेरिकन भौतिकीविज्ञ. हायड्रोजन वर्णपटाच्या सूक्ष्मसंरचनेसंबंधी त्यांनी लावलेल्या शोधाबद्दल त्यांना १९५५ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान ⇨पॉलिकार्प कूश या अमेरिकन भौतिकीविज्ञांबरोबर मिळाला. 

लँब यांचा जन्म लॉस अँजेल्स येथे झाला. बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात शिक्षण घेऊन त्यांनी रसायनशास्त्राची बी.एस्.पदवी १९३४ मध्ये मिळविली. त्याच विद्यापीठात जे.रॉबर्ट ओपेन. हायमर यांच्या मार्गदर्शनाखाली अणुकेंद्रीय प्रणालीच्या विद्युत् चुंबकीय गुणधर्मावर संशोधन करून त्यांनी १९३८ मध्ये भौतिकीतील पीएच्.डी पदवी संपादन केली. त्याच वर्षी ते कोलंबिया विद्यापीठात निदेशक म्हणून काम करू लागले व यथाक्रमाने १९४८ मध्ये तेथे प्राध्यापक झाले. १९४३-५१ या काळात त्यांनी कोलंबिया रेडिएशन लॅबोरेटरीमध्येही काम केले. १९५१ मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठात भौतिकीच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली. १९५३-५४ मध्ये ते हार्व्हर्ड विद्यापीठात मॉरिस लोब अध्यापक आणि १९५६-६२ या काळात इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात न्यू कॉलेजचे अधिछात्र व भौतिकीचे वाइकॅम प्राध्यापक होते. त्यानंतर येल विद्यापीठात ते १९६२ मध्ये भौतिकीचे हेन्री फोर्ड प्राध्यापक व १९७२ मध्ये गिब्ज प्राध्यापक झाले. १९७४ पासून ते ॲरिझोना विद्यापीठात भौतिकी व प्रकाशकी विज्ञानाचे प्राध्यापक झाले. 

दुसऱ्या महायुद्धानंतर लवकरच लँब यांनी हायड्रोजनाच्या ऊर्जा पातळ्या व वर्णरेषा यासंबंधी पॉल डिरॅक यांनी वर्तविलेल्या भाकितांची अचूकता तपासण्याचे कार्य सुरू केले. डिरॅक यांच्या ⇨पुंजयामिकीय सिद्धांतानुसार हायड्रोजन अणूच्या समान ऊर्जा असलेल्या दोन ऊर्जा अवस्था शक्य असल्याचे भाकीत करण्यात आलेले होते. रेडिओ कंप्रता अनुस्पंदन तंत्राचा [⟶ अनुस्पंदन] उपयोग करून लँब यांनी १९४७ मध्ये केलेल्या अचूक कार्यावरून या ऊर्जा पातळ्यांत सूक्ष्म फरक असल्याचे दिसून आले. या फरकाला लँब स्थानच्युती म्हणतात. [⟶ पुंजयामिकी] आणि यामुळे इलेक्ट्रॉन व विद्युत् चुंबकीय प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) यांतील आंतरक्रियेसंबंधीच्या सिद्धांतात सुधारणा करणे आवश्यक झाले. या कार्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. युद्धकाळात लँब यांनी कूश यांच्याबरोबर सूक्ष्मतरंग रडार [⟶ रडार] विकसित करण्यासंबंधी काम केले होते. स्टॅनफर्ड येथे असताना लँब यांनी हीलियमाच्या वर्णरेषांची अतिसूक्ष्म संरचना तपासण्यासाठी सूक्ष्मतरंग तंत्रांची योजना केली. याखेरीज लँब यांनी पुढील विषयांवर संशोधन केले : न्यूट्रॉन व द्रव्य यांतील आंतरक्रियेसंबंधीचा सिद्धांत अणुकेंद्रीय संरचनेसंबंधीचे क्षेत्र सिद्धांत, बीटा क्षयासंबंधीचे सिद्धांत [⟶ किरणोत्सर्ग], विश्वकिरणांच्या (बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येणाऱ्या भेदक किरणांच्या) वर्षावात होणार फेरबदल, युग्मनिर्मिती (तीव्र विद्युत् क्षेत्रातून जात असलेल्या फोटॉनाचे इलेक्ट्रॉन व पॉझिट्रॉन या युग्मात रूपांतर होणे), रेणूंतील चतुर्ध्रुवी आंतरक्रिया, मॅग्नेट्रॉन आंदोलकांसंबंधीच्या [⟶ सूक्ष्मतरंग] सिद्धांत व त्यांचा अभिकल्प (आराखडा), सूक्ष्मतरंग वर्णपटदर्शकासंबंधीचा सिद्धांत वगैरे.

नोबेल पारितोषिकाखेरीज लँब यांना अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसचे रम्फर्ड प्रिमियम (१९५३), पेनसिल्व्हेनिया व येशिव्हा या विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या, गुगेनहाइम अधिछात्रवृत्ती (१९६०), रिसर्च कॉर्पोरेशनचा पुरस्कार हे बहुमान मिळाले. ते अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, एडिंबरोची रॉयल सोसायटी, अमेरिकन फिजिकल सोसायटी इ. संस्थांचे सदस्य आहेत. हायड्रोजन अणूच्या सूक्ष्मसंरचनेसंबंधी फिजिकल रिव्ह्यू या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका महत्त्वाच्या निबंधमालिकेचे ते प्रमुख लेखक होते. त्यांनी एम्. सार्जंट व एम्. ओ. स्कली यांच्या समवेत लेसर फिजिक्स (१९७४) हा ग्रंथ लिहिला.

भद्रे, व. ग.